ही भाजी अनेकांना आवडत नाही म्हणूनच याला दोडका हे नाव पडलं असावं. पचायला अतिशय हलकी असलेली ही भाजी पथ्याची समजली जाते, कारण त्यात फॅट खूपच कमी असते आणि कॅलरीज जवळजवळ नसतातच. रक्तदाब आटोक्यात ठेवण्यासाठी आणि यकृताच्या आरोग्यासाठी दोडका उपयुक्त आहे. दोडक्याच्या सेवनाने मूळव्याध आणि मलावरोध या दोन्ही व्याधीत फायदा होतो.
दोडक्याची सालं म्हणजे शिरा फेकू नयेत. कोवळ्या असतील तर बारीक चिरून, शिजवून भाजी करावी किंवा परतून चटणी करावी. नाहीतर एका दोडक्याची सालं आणि एक टोमॅटो उकडून मिक्सरमधून काढून गाळावं आणि त्याचं सार किंवा सूप करावं.
दोडकेभात
साहित्य: ३ वाटय़ा दोडक्याचा कीस, १ वाटी तांदूळ,  २ वाटय़ा पाणी, चवीला मीठ, १ चमचा गोडा मसाला, फोडणीसाठी १ मोठा चमचा तेल, मोहरी, िहग, हळद, सात-आठ लसूण पाकळ्या, २ हिरव्या मिरच्या, ओलं खोबरं, कोिथबीर.
कृती: तांदूळ धुऊन ठेवावेत, तेलाची फोडणी करून त्यात लसूण मिरच्यांचे तुकडे परतावे, तांदूळ आणि दोडक्याचा कीस परतावा, मीठ, मसाला, गरम पाणी घालून भात शिजू द्यावा. वर खोबरं-कोिथबीर घालावी.
वसुंधरा पर्वते -vgparvate@yahoo.com