पावसाळ्यातील जेवणाच्या वेळा खूप महत्त्वाच्या आहेत. सकाळचा नाश्ता चुकवू नये व रात्रीच्या जेवणाला उशीर करू नये. या ऋ तूमध्ये पचनशक्ती मंद असते म्हणून एका वेळी जड आणि जास्त खाणे टाळावे. हलका आहार दिवसभरातून थोडय़ा थोडय़ा वेळाने थोडा थोडा करून घ्यावा.
धान्यांमध्ये दिवसा गव्हाची पोळी व रात्री ज्वारीचा वापर करावा. त्यामुळे रात्रीचे जेवण हलके राहते आणि पचनाच्या तक्रारी येत नाहीत. नाचणी, बाजरी यांचा वापर अधूनमधून करावा. दिवसभर बसून काम करणाऱ्यांनी व वृद्धावस्थेतील सर्वानी रात्रीचा आहार हलका ठेवावा. गर्भवती व भरपूर व्यायाम करणाऱ्यांनी तसेच लहान मुलांनी हा आहार व्यवस्थित घ्यावा. पण तो लवकर असावा. रात्री उशिरा जेवण करू नये.
वातावरणातील उष्णता कमी झाल्याने तहान लागल्याची संवेदना कमी जाणवते. त्यामुळे उन्हाळ्यात जसे आपण आवर्जून पाणी पितो त्याप्रमाणे पावसाळ्यात तेवढे पाणी घेतले जात नाही. म्हणून आपण आवर्जून आवश्यक तेवढं म्हणजे दिवसभरातून २.५ लिटर पर्यंत पाणी अवश्य प्यावे. चहा, कॉफी इत्यादी सेवन या ऋ तूमध्ये वाढते. त्यामुळे भूक व तहान या दोन्हींवर परिणाम होऊ शकतो. म्हणून चहा, कॉफीच्या वेळा पाळाव्यात.
जेवणाच्या वेळेमध्ये चहा, कॉफी घेऊ नये. पाणी उकळून गार केलेले किंवा सुंठ घालून उकळून घेतलेले असावे. या ऋ तूमध्ये पाण्याचा वापर कमी झाल्यास लघवीचा त्रास उन्हाळ्याबरोबर पावसाळ्यातसुद्धा होऊ शकतो. तसेच पाणी उकळून न घेतल्यास जुलाब व उलटय़ांचा त्रास होऊ शकतो.
डॉ. सारिका सातव,आहारतज्ञ
dr.sarikasatav@rediffmail.com