शिक्षक म्हणाले, ‘इयत्ता असतील पण वर्ग असणार नाहीत. वर्ग म्हटलं की एका जागी बसणं आलं सक्तीनं. वर्गात न मावणारी मुलं, वर्गात बसवावीच लागतात. आपण असं करू या. विभाग करू या. मुलं त्या त्या विभागात त्या त्या विषयांना जातील. मुलं मोबाइल असतील. विभागात फिरती राहतील..’ मुलांना ही कल्पना भन्नाट आवडली, मोबाइल वर्गाची.
वर्गात तासन्तास एकाच बाकावर बसण्यासारखी दुसरी कंटाळवाणी गोष्ट नाही. पाय लोंबकाळत बसणं, अजिबात हलता न येणं म्हणजे किती त्रास! वर्गात इतकी मुलं! खरं तर हुंदडण्याचं वय हे! इकडून तिकडे धावाधावी करण्याचं वय! मुलांना असं डांबून बसवलेलं पाहून शाळेला खूप वाईट वाटायचं. शाळा वर्गाशी बोलायची. काहीतरी केलं पाहिजे. मुलांना मजा वाटली पाहिजे, मुलांना हालचाल करता आली पाहिजे. मुलं कधी झाडाखाली बसावी, कधी नदीकाठानं फिरावी, कधी मुलांनी झाडांशी बोललं पाहिजे, फुलपाखरं पाहिली पाहिजेत. शाळा विचार करू लागली. शाळेच्या मनात आलं, असं जर लहानपणापासून घडलं तर मुलं याच विचारानं मोठी होतील. मुलांनी शाळेला आपल्या कंटाळा येण्याच्या अनेक गोष्टी सांगितल्या. अभिव्यक्ती फलकावरून शाळेनं त्या वाचल्या. यावर काम करायला पाहिजे. मुलांबरोबर बसून गप्पा मारू लागली.
तुम्हाला कशाकशाचा कंटाळा येतो ते ऐकून मला खूप वाईट वाटलं. तुमचा कंटाळा दूर जाण्याचा कोणीच विचार करत नाही.. तुम्हीच सांगा काय करायचं? ‘अगं शाळा, आम्ही खूप बोललो यावर. आपल्या इथे काय करता येईल यावर एक आयडिया सुचली आम्हाला. आपले वर्ग ‘मोबाइल’ करता येतील?’
आयडिया तर भन्नाट आहे. पण म्हणजे करायचं काय? वर्ग काही उचलता येत नाहीत. इमारत हलत नाही.. तुला माहितेय, शाळा! तुझी एक मैत्रीण जपानमध्ये आहे. ती आहे आगगाडीच्या डब्याची. जपानमध्ये असते ती! आमच्यासारखीच तिथली एक मुलगी आहे. तोतोच्चान. तिनं तुझ्या मैत्रिणीची माहिती सांगितली आहे. आम्ही वाचली.
शाळा मुलांना म्हणाली, ‘ती एक तशी असेल. पण बाकी सगळ्या चारचौघींसारख्याच आहेत ना!’ मला वाटतं तुम्ही कल्पना करा, विचार करा. तुम्हालाच उपाय सुचवतील. शाळेने मुलांना विश्वास दिला. शाळा म्हणाली, ‘तुम्ही आणि तुमचे सर एकत्र बसा. विचार करा.’ अगं! आमची विद्यार्थीसभा होतेच ना! त्यातही आम्ही या विषयावर चर्चा केली. नुसता चिवचिवाट..
थोडे दिवस असेच गेले. शाळा पाहात होती. सगळे शिक्षक एकत्र जमले होते. विषय होता, ‘वर्गव्यवस्था’, ‘बाकावर बसू देत’, ‘खाली जमिनीवर बसू दे’, जमीन असते कुठे? फरशीवर बसली मुलं तर ती बाधेल, पालक तक्रार करतील. ‘एवढा वेळ खाली बसवेल का?’ नुसतेच विचार. निष्पन्न काही होईना. एका शिक्षकाच्या मनात मात्र वेगळी कल्पना होती. या कल्पनेची आज त्यांनी मांडणी करायचं ठरवलं. त्यांना पाहून शाळेला आधार वाटला. आता नक्की काहीतरी वेगळं घडणार. ते शिक्षक म्हणाले, ‘इयत्ता असतील पण वर्ग असणार नाहीत. वर्ग म्हटलं की एका जागी बसणं आलं सक्तीनं. वर्गात न मावणारी मुलं, वर्गात बसवावीच लागतात.. आपण असं करू या. विभाग करू या. मुलं त्या त्या विभागात त्या त्या विषयांना जातील. मुलं मोबाइल असतील. विभागात फिरती राहतील.. त्यांची कल्पना लक्षात येईना. ‘आपण हे करून पाहू. मग मुलांशी बोलू. त्यांना काय वाटतं? आवडतंय का?..’ सर म्हणाले.
शाळेला शिक्षकांचं बोलणं ऐकून खूप आनंद झाला. थोडं तरी मुलांना हवं तसं घडेल. पण घडेल का? इतरांना आवडेल? आपण बदललो. आपलं स्वरूप बदललं. कारण आपण असतो दगडविटांचे. पण माणसाचं काय? ती तर बदलायला वेळ लागतो. ती असतात हाडामांसाची. त्यांना मन असतं. शाळा विचार करत होती आपण बदललो, पण आपल्या ठिकाणी असणारी माणसं मात्र नवीन स्वीकारत नाहीत, असं का होतं? आपल्यावर खूप बंधनं आहेत या भासात वावरणारी इथली माणसं आहेत तशी शाळेबाहेरचीही माणसं आहेत. कसं असणार मग भीतीविरहित जगणं?
ज्या शिक्षकांनी ही नवी संकल्पना मांडली ते बोलायला उभे राहिले नि शाळा त्यांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकू लागली. सर म्हणाले, ‘मराठी, इंग्रजी, हिंदी- संस्कृत, गणित, विज्ञान, समाजशास्त्र असे विभाग असतील. मुलं त्या त्या विषयांसाठी त्या विभागात जातील. म्हणजे सर्व वर्गाचा मराठीचा तास मराठी विभागात होईल. त्या त्या वर्गात त्या त्या विषयाच्या संदर्भात संदर्भ साहित्य, शैक्षणिक साधनं असतील, मुलं सर्व गोष्टींची अनुभूती घेतील..’ तरी सगळेजण ऐकत राहिली. काय करायचं कुणाच्याच लक्षात येईना. सर म्हणाले, ‘प्रात्यक्षिक करू या आपण’ दुसऱ्या एका शिक्षकांच्या मदतीने वेळापत्रक कुशलतेने तयार झाले. यात दोन-तीन दिवस गेले. वेळापत्रक एक-दोन दिवसांचे तयार झाले.
प्रत्यक्ष तो दिवस उजाडला. सकाळपासून आज सगळेचजण नव्या उत्साहात होते. सर्व मुलं शाळेत आल्यावर एकत्र बसली. मग पहिल्या चार दिवसांची वही-पुस्तकं बरोबर घेतली. खूप मजेशीर वातावरण दिसत होतं. मुलं आपापल्या तासाला इकडून तिकडे जात होती. पाय मोकळे होत होते. जाता जाता बोलणं होत होतं. सगळा दिवस असा पूर्ण झाला. शेवटच्या तासानंतर शाळेने सगळ्या मुलांना एकत्र बोलावलं आणि या बदलाबद्दल चर्चा सुरू झाली. ‘कसं वाटलं आता दिवसभर’ ‘खूप मजा वाटली’ ‘वर्गात एका जागी बसावं लागतं पाय लटकत राहतात. आता कंटाळा येत नाही.’ ‘वर्गातच नकाशे, पुस्तकं असल्याने लगेच बघता येतात.’ ‘तास वेळेवर होतात. कारण मुलं बाहेर पडतात. वेगळ्या विभागात जातात. म्हणजे वर्ग योग्य वेळी बदलतोच.
‘आता आपण अशीच रचना देऊ या का?’ ‘हो! मजा येते. खूप मजा येते.’ मुलांनी आपली मतं मोकळेपणाने मांडली. मुलांना ही रचना खूपच आवडली. त्यातही महत्त्वाची गोष्ट ही होती की, नवी रचना करताना मुलांना महत्त्व दिलं होतं आणि मुलांचा विचार त्याबद्दल घेतला होता. आपलं मत घेऊन एखादी गोष्ट सुरू होतेय याचा मुलांना आनंद झाला होता.
मुलांचा आनंद पाहून शाळेला आनंद झाला. शाळेच्या शरीराचा कणन्कण रोमांचित झाला. ही बातमी तिने ‘मेसेज’ करून सगळ्यांना कळविली. इतर सगळ्या मैत्रिणींचे तिला त्वरित ‘मेसेज’ आले. शाळा मनात म्हणाली, आता माझं सर्वाग सजलंय, नटलंय अर्थपूर्ण झालंय. कारण त्या त्या विभागात अभ्यासक्रमाचा विचार करून सर्व साहित्य ठेवलं होतं. अभ्यासपट्टय़ा ठेवल्या होत्या. वाचनसाहित्य ठेवलं होतं. अगदी गणित-विज्ञानाचंही वाचन साहित्य ठेवलं होतं. हे सारं शाळेत सुरळीत. आनंदात सुरू झालं. जेव्हा शिक्षकांना काम असे, सभा असे तेव्हा मुलांना गप्प बसा, वाचत बसा, अभ्यास करा, असं सांगावं लागत नाही. पुस्तकाबाहेरच्या कितीतरी कविता मुलं म्हणतात. मुलांनी केलेलं काम वर्गातच ठेवलं जातं आणि काही काही हरवत नाही, चोरलं जात नाही. शाळा सगळ्यांना नेहमीच सांगते मुलं चांगली असतात, प्रामाणिकही असतात. फक्त अशा संधी समजून उमजून नको का द्यायला? हे सारं स्वप्नच वाटत होतं, पण जे प्रत्यक्षात घडत होतं.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: School without classrooms
First published on: 05-04-2014 at 01:02 IST