‘‘..विचार केला की, हीच वेळ आहे, थांबण्याची; बेडीतून पाय सोडवून घेण्याची, पूर्णाशानं ‘राजहंस’कडे जाण्याची. वर्षभर विचार केला आणि निर्णय घेतला, की आपण प्रेस बंद करू. या निर्णयानं आर्थिकदृष्टय़ा माझं नुकसान होणार, हे मला दिसत होतं. उत्तम चालू असलेल्या प्रेसच्या तुलनेत अनिश्चिततेच्या भोवऱ्यात फिरणारा प्रकाशनाचा रस्ता मी निवडत होतो, याची मला कल्पना होती. तरीही या निर्णयानं आपण श्रेयसाची निवड करत आहोत, याचा मला मनातून आनंद होत होता..’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्री.ग.- माझे थोरले बंधू मला शिक्षणासाठी १९५२ मध्ये पुण्याला घेऊन आले. तोवर आम्ही सगळे सातारा रोडला राहत होतो. वडील कूपर कारखान्यात नोकरीला होते. गावात शिक्षणाची फार चांगली सोय नसल्याने मला पुण्याला नेण्याचा निर्णय श्री.गं.नी घेतला.

पुण्यात त्या वेळी आम्ही- म्हणजे श्री.ग., माझी मोठी बहीण निशा आणि मी असे तिघे राहत होतो. त्या वेळी आमचं घर टिळक स्मारक मंदिरावरून लक्ष्मी रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर होतं. तो घाणेकरांचा तीनमजली वाडा होता. आम्ही तिसऱ्या मजल्यावर राहत होतो. घर म्हणजे दहा बाय दहाच्या दोन खोल्या आणि समोर तीन फुटांची गॅलरी. तिसऱ्या इयत्तेत माझं नाव घालण्यात आलं. शाळा होती पेरूगेट भावे स्कूल. अकरा ते पाच ही माझ्या शाळेची वेळ. बाकी वेळ घरी. वाडय़ात माझ्या वयाची चार-पाच मुलं होती. त्यांच्याशी खेळण्यात वेळ जात असे, बाकी वेळ मी गॅलरीत उभा राहून रस्त्यावरची रहदारी पाहत असे. माझा वेळ मजेत जायचा. असाच वेळ जायचा, माझ्या घरासमोरच्या इमारतीमधलं एक दृश्य बघण्यात. आमच्या घरासमोर एक प्रिंटिंग प्रेस होता – आनंद प्रेस. दादा जोशी त्याचे मालक होते. त्या प्रेसचा कंपोझिंगचा विभाग हा तिसऱ्या मजल्यावर होता. तिथे दहा-पंधरा माणसं असायची- मध्यम वयाची. बहुतेकांच्या डोळ्यांवर चष्मे, अंगात हिवाळा सोडला तर बाकी सर्व दिवस गंजीफ्रॉक्स. चेहरे परिस्थितीनं ओढलेले. कोणाचंही एकमेकांत हसणं-बोलणं नाही. त्यांच्यासमोर छोटे छोटे कप्पे असलेल्या, लोखंडी स्टँडवर ठेवलेल्या उघडय़ा लाकडी पेटय़ा असत. त्या स्टँडला ‘घोडे’ म्हणतात, हे मला नंतर समजलं. प्रत्येक जण बाजूला ठेवलेल्या कागदाकडे बघत त्या छोटय़ा कप्प्यातून काही बारीक वस्तू उचलायचा आणि हातातल्या एका छोटय़ा पितळी पट्टीत ठेवायचा. हे एकमेव दृश्य मी वर्षांनुवर्ष बघत होतो. माणसं तीच. त्यांच्या जागाही त्याच. कामाची पद्धत तीच. या रोज नजरेपुढे दिसणाऱ्या दृश्याभोवती उभा असलेला व्यवसाय पुढे आपल्यालाही करावा लागणार आहे, याची त्या वेळी मला सुतराम कल्पना नव्हती. त्या वेळी कोणी मला विचारलं असतं, तर रोजच्या कंटाळवाण्या दृश्याचा विचार करून मी ते म्हणणं कानामागे टाकलं असतं.

पुढे माझं शिक्षण झालं. मी बी.एस्सी. झालो. आता पुढे काय, हा प्रश्न पडण्यापूर्वीच श्री.गं.नी ‘माणूस’मध्ये काम करण्याविषयी विचारलं. मीही होकार भरला. झालं असं होतं, की माझ्या थोरल्या बहिणीचे- कुमुदचे-यजमान बाबासाहेब पुरंदरे यांनी ‘राजहंस प्रकाशन’ सुरू केलं होतं. त्याच्या वाढीसाठी श्री.ग. त्यांना भागीदार म्हणून जाऊन मिळाले. पुढे श्री. गं.नी पत्रकारितेच्या आवडीतून ‘माणूस’ हे सुरुवातीला मासिक, पुढे पाक्षिक सुरू केलं. माझं शिक्षण संपलं त्याच वर्षी म्हणजे ६६ मध्ये त्यांनी त्याचं साप्ताहिकात रूपांतर केलं आणि मी तिथे कामाला सुरुवात केली.

सुरुवातीच्या काळात मी सर्व प्रकारची कामं करत होतो. ‘माणूस’ची दर आठवडय़ाची छपाई करून घेणं, मुंबईला दर आठवडय़ाला जाऊन मजकुराची जमवाजमव करणं आणि जाहिरात एजन्सींना भेटायला जाणं, असं माझ्या कामाचं स्वरूप होतं. पुण्यात असताना ‘माणूस’च्या छपाईसाठी मला दिवसातून दोन-तीन वेळा प्रेसमध्ये जावं लागे. त्या वेळी ‘माणूस’चे ऑफिस नारायण पेठेत होतं. तिथून जवळच असलेल्या ‘संगम प्रेस’ इथे ‘माणूस’ छापला जात असे. ‘संगम’ हा पटवर्धन बंधूंचा प्रेस. प्रेस खूप मोठा होता. माधवराव पटवर्धन हे प्रेसचं काम बघत. छपाई तंत्रातले अतिशय जाणकार. खास व्यक्तिमत्त्व होतं त्यांचं. त्यांना भेटणं, त्यांच्याशी गप्पा मारणं, त्यांना काम करताना, नोकरांशी बोलताना बघणं-हेच माझं एक प्रकारचं शिक्षण होतं. त्यांचा कामाचा आवाका मोठा होता. या सगळ्याचा माझ्यावर कळत-नकळत परिणाम होत होता; पण प्रत्यक्ष छपाई, त्याची मोठमोठी यंत्रं, त्यांचे आवाज ऐकणं हे मला तितकंच कंटाळवाणं आणि निरस वाटे. आपला कशाला संबंध येतोय याच्याशी, असंही वाटे.

दुसऱ्या बाजूला माझ्या मुंबई-भेटी हळूहळू वाढायला लागल्या. ‘माणूस’चा तो बहराचा काळ होता. श्री.ग. नेहमीच्या अंकांसाठी आणि विशेषांकासाठी नव्या नव्या कल्पना, विषय शोधत. त्यासाठी नेहमीच्या लेखकांच्या जोडीलाच नवे लेखक शोधणं, त्यांना भेटणं, त्यांच्याशी चर्चा करणं ही कामं मी एका उत्साहात करू लागलो होतो. राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रांतल्या किती किती लोकांना त्या काळी भेटत होतो! सर्व क्षेत्रांतला हा ऐन धुमाळीचा काळ होता. एका बाजूला मोर्चे, बंद, मिरवणुका, निवडणुका चालू होत्या, तर दुसऱ्या बाजूला सांस्कृतिक क्षेत्रात विशेषत: साहित्य, पत्रकारिता, नाटक-सिनेमात नवे वारे वाहायला लागले होते. हे सगळे वारे, नवे धुमारे यांचं प्रतिबिंब ‘माणूस’मध्ये उमटत होतं. ‘माणूस’चे विशेषांक गाजत होते. ‘माणूस’ हातोहात संपत होता. नवे लेखक ‘माणूस’ला मिळत होते. ‘माणूस’चं काम आणि त्याला जोडून धिम्या गतीनं चालू असलेलं ‘राजहंस प्रकाशना’चं काम यात मी पूर्ण बुडून गेलो. आता हेच काम पुढे करायचं; तर अजून काय नवं करता येईल, याचे कल्पनेत मनोरे रचत होतो.

आणि याच वेळी घडलेल्या दोन घटनांनी माझ्या आयुष्याला वेगळं वळण मिळालं.

पटवर्धन बंधूंनी व्यवसायवाढीच्या विचारानं नारायण पेठेत असलेला ‘संगम प्रेस’ त्या वेळी दूर वाटणाऱ्या कोथरूड भागात हलवण्याचा निर्णय घेतला. तोपर्यंत आमच्या हाकेच्या अंतरावर असणारा ‘संगम’ आता चार मैलांवर गेला. दररोज तिथे जाणं आणि काम करून घेणं जिकिरीचं झालं. दुसरा बदल म्हणजे ‘माणूस’चं ऑफिस लक्ष्मी रोडवरच्या उंबऱ्या गणपती चौकात होतं, तो गोखल्यांचा वाडा होता. त्या मालकांना त्यांच्या नव्या व्यवसायासाठी त्यांची जागा परत हवी होती. त्यामुळे नवी जागा शोधणं गरजेचं होतं, जागेचा शोध सुरू झाला. स्वत: गोखले अनेक जागा दाखवत होते. काही केल्या मनासारखी जागा मिळत नव्हती. अशात बाबासाहेबांच्या ओळखीतून एक जागा आली. आम्ही साधारण तीनशे-चारशे चौरस फूट जागेच्या शोधात होतो. बाबासाहेबांनी नागनाथपाराजवळ आणलेली जागा किती असावी? साडेचार हजार चौरस फूट. जागा बघून आम्ही तिघे बाहेर आलो आणि आम्ही दोघांनी श्री.ग. आणि मी – बाबासाहेबांना, ‘छे! नाही म्हणूनच सांगा’ असं सांगितलं. कारण एवढय़ा जागेचं करायचं काय? आणि भाडं कसं परवडणार? पण पुढे घटना अशा घडत गेल्या, की ती जागा आम्ही घेतली. आता जागेचा शोध थांबला आणि आम्ही तिघं उद्योग शोधू लागलो. अनेक पर्याय निघत होते, मागे पडत होते. मनासारखं काही जमत नव्हतं. जागा तर सोडवत नव्हती. काहीच सुचत नव्हतं, तेव्हा बाबासाहेब गमतीनं म्हणाले, ‘‘चला, आपण रणगाडय़ांची फॅक्टरी काढू किंवा बर्फाचा कारखाना काढू.’’ अखेर एक पर्याय निघाला. दर आठवडय़ाला ‘माणूस’ कोथरूडवरून छापून घ्यायचा, तर फार परवड होत होती. त्याऐवजी या जागेत प्रेस चालू करावा आणि ‘माणूस’ची सोय करावी. तोपर्यंत माझ्या चिकाटीवर आणि उत्साहावर बाबासाहेब आणि श्री.ग. खूश होते. त्यामुळे अंतिम अधिकार जरी त्यांचे असले, तरी निर्णयप्रक्रियेत माझं मत विचारात घेतलं जात होतं. प्रेस सुरू करायचा आणि त्याची व्यवस्था मी बघायची, असं ठरलं. प्रकाशनाच्या आपल्या आवडत्या कामांसाठी करावं लागणारं एक अटळ कर्तव्य, एवढाच विचार मी केला आणि प्रेस सुरू केला.

पोहायला येत नसताना पाण्यात उडी मारल्यानंतर पोहणाऱ्याचं जे होतं, तेच माझं झालं. सुरुवातीच्या काळात नाकातोंडात भरपूर पाणी गेलं. आवड नाही, अनुभव नाही, काही प्रशिक्षण नाही. मशीन किंवा व्यवस्थापन यात पूर्ण अनभिज्ञ. त्यामुळे मशीनची निवड चुकणं, भांडवल अपुरं पडणं, घरचं आणि बाहेरचं काम याचा मेळ घालता न येणं, यामुळे सुरुवातीची दोन-तीन वर्ष रखडपट्टी झाली. नंतर हळूहळू प्रेस मार्गी लागला. पुढे ज्यांनी ‘प्रतिमा प्रकाशन’ सुरू करून प्रकाशन व्यवसायात स्वत:ची स्वतंत्र वाट काढली ते अरुण पारगावकर या काळात व्यवस्थापक म्हणून काम बघत होते. त्यांचं मोठं सहकार्य मिळालं.

व्यवस्थापनाची जबाबदारी जरी मी बाहेर सोपवू शकत होतो, तरी त्याची आर्थिक जबाबदारी अखेर माझीच होती. तिथे काही ना काही अडचणी येत होत्या. त्यामुळं एका बाजूला मला आवडणारं, जमणारं ‘माणूस’ आणि प्रकाशनाचं काम; तर दुसऱ्या बाजूला गरज म्हणून करावं लागणारं प्रेसचं काम या कात्रीत मी पुरता सापडलो. त्याच सुमारास १९७५ नंतरची पुढची सात-आठ वर्ष सर्व आघाडय़ांवर अडचणी आणि अपयशाची गेली. दर्डा प्रकरण, आणीबाणी आणि त्यानंतर वृत्तपत्रं आणि नियतकालिकांच्या जगात झालेले बदल यात ‘माणूस’ची वाटचाल मंदावली. तोवर प्रेसच्या यंत्रातंत्रात आमूलाग्र बदल होत होते. लेटरप्रेसची जागा ऑफसेटनं घेतली होती. काळाची ही पावलं आम्हाला ओळखता आली नाहीत असं नाही, पण सगळ्या गोष्टी आर्थिक उंबरठय़ापाशी ठेचकाळायच्या. अखेर १९८४ च्या सुमारास आम्ही ऑफसेटकडे वळलो. श्री.गं.चा मुलगा धनंजय त्यासाठी मुंबईहून त्याचं शिक्षण घेऊन आला. त्यानं हा विभाग उत्तम सांभाळला. त्यामुळे मी ‘राजहंस’च्या कामाकडे वळलो. माझी आवड आणि काम लक्षात घेऊन श्री.गं.नी ‘राजहंस’चं काम पूर्णपणे माझ्याकडे सोपवलं. नव्या उमेदीनं मी ‘राजहंस’चे पंख पसरायला सुरुवात केली. नवे विषय, नवे लेखक, नव्या योजना. जागोजाग ग्रंथ-प्रदर्शनं आणि जोडीला मुंबई ऑफिस चालू करून वितरणाचं जाळं विणायला सुरुवात केली. सगळेच निर्णय बरोबर घेत होतो असं नाही. काही चुकत होते. ‘सावरकर डायरी’ यशस्वी ठरली, पण नंतरची ‘विद्यार्थी’ आणि ‘नेहरू डायरी’नं आर्थिक गोत्यात आणलं. त्याचा भार प्रेसवर पडला. प्रेसचा जीव लहान, त्यामुळे आर्थिक ताण वाढले. याच सुमारास श्री.गं.ची प्रकृती साथ देईनाशी झाली. त्यांनी व्यवसायातून निवृत्ती घेतली. पुन्हा प्रेसकडे लक्ष देणं आलं. सुदैवानं या काळात प्रेसच्या संदर्भात घेतलेले निर्णय योग्य ठरले. प्रेसमध्ये फक्त बाहेरची कामं करून प्रेसची वाटचाल स्वतंत्र चालू ठेवली- ‘राजहंस’च्या कामाशी त्याचा संबंध ठेवला नाही. त्यामुळे दोन व्यवसाय एकमेकांत गुंतले नाहीत. प्रेस व्यवस्थित चालू लागला. त्यानं मला आर्थिक स्थैर्य दिलं.

दुसऱ्या बाजूनं ‘राजहंस’ची घडी बसायला लागली. मी प्रेसची अधिक जबाबदारी व्यवस्थापक आणि कुशल कामगारांवर सोपवली आणि मी पुन्हा ‘राजहंस’कडे वळलो. माझा मूळ पिंड, शाळा-कॉलेजात शिक्षण चालू असताना झालेली जडणघडण, श्री.गं.मुळे आजूबाजूला असलेलं जिवंत वातावरण, या साऱ्यातून माझ्यापर्यंत झिरपलेले राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक संस्कार, ‘माणूस’ आणि ‘राजहंस’साठी केलेल्या कामातून, त्यात भेटलेल्या अनेकांच्या सहवासातून माझ्या विकसित झालेल्या जाणिवा – या सगळ्यांचा एकत्रित विचार करता मला सतत जाणवत होतं, ‘राजहंस’चं काम हे माझं श्रेयस आहे, पण प्रेस मला आर्थिक स्थैर्य देत होता.

वास्तविक या काळात प्रेस आणि प्रकाशन हे दोन्ही व्यवस्थित चालू होते. तरी मन सतत खंतावलेलं राहत होतं. मनात धडका मारणाऱ्या ‘राजहंस’संबंधीच्या किती तरी सर्जनात्मक कल्पना दाबून टाकाव्या लागत होत्या, कारण एक पाय प्रेसच्या जबाबदारीत अडकून पडलेलाच होता. प्रकाशनातल्या काही प्रकल्पांमध्ये अपयश आलं; तर कळत नव्हतं, की या गोष्टी मुळातच कमकुवत असल्यानं यशस्वी झाल्या नाहीत, का आपण केलेले प्रयत्न अर्धे-कच्चे होते.

१९६९ मध्ये मी प्रेसचं काम शिरावर घेतलं, ते एक आवश्यक कर्तव्य म्हणून. शिवाय वेगळ्या क्षेत्रात नवं काही करून पाहण्याचा एक तारुण्यसुलभ साहसी भावही त्यात तेव्हा असेल. मात्र पुढची ३२ वर्ष माझा एक पाय प्रेसच्या बेडीत जखडलेलाच राहिला. आर्थिक आधाराची ही जखडणारी बेडी सोन्याची असली तरी बेडीच होती. एकीकडे मला हवंहवंसं वाटणारं, मन रमवणारं, मला सदैव ताजं ठेवणारं प्रकाशन क्षेत्र मला खुणावत होतं; तर दुसरीकडे प्रेसमध्ये जखडलेला पाय मला ती वाट मोकळेपणानं चालू देत नव्हता. मनाच्या या द्विधा अवस्थेत असताना अखेर २००१ उजाडलं.

‘राजहंस प्रकाशना’ची नाव आता हळूहळू स्थिरावू लागली होती. संपादकांची टीम मनासारखी जमून आली होती. नव्या नव्या कल्पना सुचत होत्या. वितरणासाठी उघडलेल्या नव्या शाखा जोमानं काम करत होत्या. संपादन आणि वितरण यासंबंधी मी केलेल्या नव्या व्यवस्थेचे परिणाम आता स्पष्ट दिसायला लागले होते.

दुसरीकडे प्रेस उत्तम प्रकारे सुरू होता. आर्थिक आघाडी सुस्थिर होती. प्रेस आकारानं छोटा होता, पण ‘दर्जेदार आणि वेळेवर काम’ अशी प्रेसची ओळख होती. भरपूर काम होतं. विचार केला, आज परिस्थिती ठीक आहे, उद्या ती अशीच राहील याची शाश्वती नाही, कारण अत्यंत आधुनिक अशी चार-रंगी, पाच-रंगी छपाई करणारी मशीन्स पुण्यात मोठय़ा प्रमाणात यायला सुरुवात झाली होती. स्पर्धा वाढणार होती. त्यात टिकून राहायचं, तर पुन्हा नवी आर्थिक गुंतवणूक, पुन्हा अडकून पडणं. म्हणून विचार केला की, हीच वेळ आहे, थांबण्याची, बेडीतून पाय सोडवून घेण्याची, पूर्णाशानं ‘राजहंस’कडे जाण्याची. वर्षभर विचार केला आणि निर्णय घेतला, की आपण प्रेस बंद करू.

या निर्णयानं आर्थिकदृष्टय़ा माझं नुकसान होणार, हे मला दिसत होतं. उत्तम चालू असलेल्या प्रेसच्या तुलनेत अनिश्चिततेच्या भोवऱ्यात फिरणारा प्रकाशनाचा रस्ता मी निवडत होतो, याची मला कल्पना होती. तरीही या निर्णयानं आपण श्रेयसाची निवड करत आहोत, याचा मला मनातून आनंद होत होता.

प्रेस बंद केल्यानंतर मी आता माझं लक्ष पूर्णाशानं ‘राजहंस प्रकाशना’वरच केंद्रित केलं. नव्या निकोप दृष्टीनं इतिहासाकडे पाहण्याची ‘राजहंस प्रकाशना’ची परंपरा होतीच. इतिहास-राजकारण-समाजकारण हे विषय पुढे नेत असतानाच त्या विषयांना मी वर्तमानाच्या संदर्भात महत्त्व असलेल्या इतर विषयांची जोड दिली; त्यातून अंधश्रद्धा निर्मूलन, पर्यावरण, विज्ञान अशा विषयांवरील पुस्तकांचं ‘राजहंसी’ दालन उभं राहिलं. चरित्रं अन् आत्मचरित्रं म्हणजे तर ‘राजहंस’चा खास प्रांत. त्यात अनेक नव्या नावांनी- विशेषत: निर्मिती विचार मांडणाऱ्या कलावंतांनी बहुरंगी विविधता आणली. कादंबऱ्या अन् ललित साहित्यातलं ‘राजहंस’चं काम मोजकं, पण निवडक अन् मोलाचं ठरलं. निर्मितीमूल्यांच्या बाबतीत ‘राजहंसी’ पुस्तकांचं आवर्जून नाव घेतलं जाऊ लागलं. २००१ नंतरच्या गेल्या सतरा वर्षांच्या वाटचालीत मी माझ्या आवडत्या क्षेत्रात अधिकाधिक रमत गेलो, अनेक प्रतिभावान गुणीजनांच्या सहवासानं अनुभवसमृद्ध होत गेलो, असंख्य वाचकांचा अदृश्य हात धरून ही श्रेयस्कर वाट मी आजही उत्साहानं चालतो आहे.

मात्र या सगळ्या झाल्या नंतर घडलेल्या गोष्टी!

प्रेसला कायमचं टाळं ठोकताना अन् प्रकाशनाकडे वळताना ‘राजहंस’ची पुढची वाटचाल कशी असेल, याबद्दल २००१ मध्ये मी पूर्ण अनभिज्ञ होतो. मात्र ती कशीही झाली असती, तरी मला घेतलेल्या निर्णयाची खंत वाटली नसती.

अखेर श्रेयस निवडण्याच्या निर्णयाचा लौकिक यशापयशाशी संबंध नसतो.

rajhansprakashaneditor@gmail.com

chaturang@expressindia.com

मराठीतील सर्व श्रेयस आणि प्रेयस बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about rajhans prakashan
First published on: 24-03-2018 at 01:01 IST