रुग्णालयात दाखल झालेला रुग्ण असो वा व्यसनमुक्ती केंद्रातील व्यसनाधीन रुग्ण, दिवाळीच्या दिवसांत आपल्या माणसांपासून, कुटुंबापासून तो दूर असतो. अनेक रुग्णांना त्याचं भान असतं, तर अनेकांना नाहीच, पण केंद्रातील कार्यकर्त्यांना ते भान नक्कीच असते आणि म्हणूनच केंद्रात साजऱ्या केलेल्या दिवाळी उत्सवात या रुग्णांना सामील करून घेतलं जातं, पण कुटुंबांबरोबर भेट हाही या दिवसातला आनंदाचा सोहळा असतो. या व्यसनाधीनांच्या आयुष्यातील
ही एक वेगळी दिवाळी..
तेसमाजाचे एक घटक आहेत. पण या दिवाळीत ते त्यांच्या व्यसनाधीनतेच्या आजारामुळे घरापासून दूर आहेत. एकटे. अपरिचित व्यक्तींच्या सहवासात. बंदिस्त. त्यांना इमारतीच्या बाहेर पडायची मुभा नाही. त्यांचा जीव घुटमळतो / की गुदरमतो आहे. घरी काय होत असेल? कशी साजरी करीत असतील दिवाळी? दिवाळीची तयारी, खरेदी, साफसफाई, फराळ, सामान आणणे यात कुठेही आपण नसणार. नरकचतुर्दशीच्या दिवशी सकाळी काय होणार? पाडव्याला पत्नीची/ पतीची तीव्र आठवण येणार? यंदाच्या भाऊबिजेला भाऊ वा बहीण नसणार?
तर इकडे घरचे अस्वस्थ. त्यांच्याविना दिवाळी साजरी तरी कशी करायची? त्याला-तिला श्रीखंड आवडते. पाडव्याला त्याला मनापासून तेल लावून आंघोळ करून घ्यायला आवडते. फराळ तर मुलांसाठी करायलाच हवा. पणत्या हव्यात अन् आकाशकंदीलही लावायला हवा. समाजापुरते तरी दिवाळी आहे हे दिसायला पाहिजे..
    अशा वेगवेगळ्या मन:स्थितीत व्यसनाधीन लोकही सापडलेले असतात आणि त्यांचे कुटुंबही. अनेकदा दोघांचेही या परिस्थितीवर नियंत्रण नसते. त्यातल्या त्यात चांगली गोष्ट म्हणजे जे व्यसनाधीनतेतून काही प्रमाणात बाहेर आले आहेत त्यातल्या काही जणांना जाणवते, ही परिस्थिती आपण व्यसनाने ओढवून घेतलेली आहे.  गेल्या दिवाळीला नरकचतुर्दशीच्या दिवशी फराळ झाल्या झाल्या आपण गुत्त्यात गेलो ते थेट झिंगतच जेवायला घरी आलो. जेवलोच नाही. रात्री लक्ष्मीपूजन झाले कधी हे कळलेसुद्धा नाही. पाडव्याला तेच झाले. कसली आंघोळ, कसली ओवाळणी? उलट घरात प्रचंड भांडण, शिवीगाळ. भाऊबिजेला तेच आणि नंतर रोज तेच. बरे झाले त्यांनी योग्य वेळी दाखल केले. नाही तर यंदाची दिवाळी म्हणजे गेल्या काही वर्षांची पुनरावृत्ती झाली असती. निदान या वर्षी दिवाळीत आपण कोणत्याही प्रकारचे व्यसन करायचे नाही अन्यथा मी घराबाहेर पडण्याची आणि परत कशा अवस्थेत येईन याची घरच्यांना चिंता नसेल. घरात भांडणे नसतील. पणत्या असतील त्या प्रकाश देतील. या अनुभवातून मला मी घरच्यांना किती त्रास दिला याची जाणीव झाली. अशी माझ्या वागण्याच्या चुकांचा विचार करण्याची संधी मिळाली. आता निर्धार व्यसनमुक्तीचा.
     परंतु चांगल्याबरोबर चुकीचा विचार करणारी मंडळीही थोडी असतातच. ऐन सणासुदीच्या दिवसात मला दाखल केले म्हणून कुटुंबीयांचा  प्रचंड राग येतो. पत्नीबद्दल/ पतीबद्दल संशय येतो. खुन्नस. ‘बाहेर पडल्यावर दाखवतोच’ हे विचार. असे दोन्ही प्रकारच्या मानसिकतेतले रुग्ण इथे असतातच.
   व्यसनमुक्ती क्षेत्रातील सर्व कार्यकर्त्यांना दाखल झालेल्या रुग्ण-मित्रांच्या मनातील या भावनिक कल्लोळाची पूर्ण जाणीव असते. म्हणूनच त्यांना दिवाळीचे कार्यक्रम विशिष्ट नियोजन करून करावे लागतात. त्यामागे दोन प्रमुख उद्दिष्टे असतात. घरात जे घडते त्यातले बरेच काही घडवून आणायचे आणि कुटुंबीयांना भेटायची संधी द्यायची. एक प्रकारे त्यांच्या मनातील अयोग्य भावनांपासून लांब नेण्याची धडपड करायची. त्यामुळे खरी कसोटी असते.
अनेकांना पुणे ठाऊक आहे ते विद्यानगरी म्हणून, आयटी हब म्हणून, ऑटोमोबाइल हब म्हणून. पण त्याबरोबर पुणे हे व्यसनमुक्ती केंद्रांचे हब आहे. किमान पंचवीस केंद्रे आहेत आणि सगळ्यात मिळून ५०० पेक्षा अधिक स्त्री-पुरुष ही दिवाळी केंद्रात राहून साजरी करतात आपल्या कुटुंबाशिवाय.
  ‘निशिगंध’ या महिलांनी महिलांसाठी चालवलेल्या व्यसनमुक्ती केंद्राच्या प्रकल्प समन्वयक प्रफुल्ला मोहिते यांनी बरीच माहिती दिली. गेल्या वर्षी म्हणजे २०१३ मध्ये दिवाळीत १२ जणी दाखल होत्या. त्यांपैकी आठ जणी आज व्यसनमुक्त आहेत आणि त्यांनी आवर्जून फोन करून सांगितले की, गेल्या वर्षीची ‘निशिगंध’मधील दिवाळी आमच्या पक्की लक्षात आहे. आणि आमचे अनुभव सांगण्याकरिता या दिवाळीत निदान एक दिवस तरी या दिवाळीत येऊन जाणार आहोत. ‘निशिगंध’मध्ये असे अनुभव नेहमीचेच.
   यंदाच्या ‘निशिगंध’मधील दिवाळीची तयारी दिवाळीच्या आठ दिवस अगोदरच सुरू झाली. व्यसनी महिला, मग त्या कोणत्याही आर्थिक थरातल्या असू देत, त्यांचे एकूणच स्वच्छतेबाबत कमालीचे दुर्लक्ष असते.
विशेषत: केसांची गुंतावळ, उवा-लिखा, कोंडा या मोळ्या समस्या असतात. म्हणून पहिले काही दिवस कार्यकर्त्यां रुग्णांच्या केसांचा गुंता सोडवून कोंडाविरोधी शाम्पूने न्हाऊ घालतात व त्यांच्या स्वच्छतेची काळजी घेतात.
 खरे तर सध्या इथे राहणाऱ्या सर्व महिला महाराष्ट्रातीलच आहेत, पण काही जणींना फराळ घरी करायचा असतो, पहाटे लवकर उठायचे असते, हे ठाऊकच नव्हते. त्यांच्या लेखी दिवाळी म्हणजे बाजारात जाऊन मिठाई आणायची आणि कुठल्या तरी गावी जाऊन मनसोक्त नशा करायची. पण इथे आल्यानंतर कार्यकर्त्यांशी बोलल्यावर, इथले एकूणच दिवाळीचे वातावरण पाहिल्यावर ‘अय्या, फराळ घरी करता येतो, इथपासून आम्हाला शिकवा नं!’ अशा अनेक प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. आणि त्यांपैकी तिघी जणी चक्क ‘सहचरी’ प्रकल्प येथे मुक्तांगण, निशिगंध येथील रुग्णांसाठी आणि विक्रीसाठी मोठय़ा प्रमाणात फराळ बनवला जातो, त्या प्रकल्पात जाऊन फराळ करायला मदत करू लागल्या. एकीने चकली पाडून खमंग तळण्यापर्यंत झेप घेतली.
  यंदाच्या वर्षी इथल्याच काही व्यसनग्रस्त मुलींनी सुंदर किल्ला केला होता. हेही नवेच. लहानपणी काहींनी किल्ला करताना पाहिले होते; परंतु तिथे मुलांची दादागिरी चालायची. स्वत: किल्ला करणे, त्यावर हिरवाई आणणे, चित्रे मांडणे, हे किती आनंदाचे असते आणि ते करताना भान कसे हरपते, याचा अनुभव घेतला. सगळ्यांना रांगोळी काढणे अनिवार्य होते. जशी येईल तशी रांगोळी काढण्याची मुभा होती. प्रफुल्ला मोहितेताई सांगत होत्या, ‘आयुष्यात पहिल्यांदा रांगोळी काढणाऱ्या मुलीनींही दाद द्यावी अशी रांगोळी काढली होती.’
  पहिल्या दिवशी अभ्यंगस्नान झाले. पहाटे साडेचार-पाचपासूनच लगबग होती. सुगंधी तेल, उटणे असे सारे साग्रसंगीत, अगदी मोती साबणाच्या वापरासकट पार पडले. त्यानंतर सगळ्यांनी मिळून प्रार्थना आणि एकेकीने गाणी म्हटली.
  या वर्षी विशेष चर्चा होती, ‘मी आणि कुटुंब’ या विषयावर. माझ्या नशेमुळे मी कुटुंबापासून शरीराने आणि मनाने कशी दुरावली आहे, माझ्या जबाबदाऱ्यांचे भान कसे सुटले आहे, हे प्रत्येकीने सांगितले. व्यसन सोडले तर काय चांगले होईल याची कल्पना मांडली. आणि सर्वानी मिळून व्यसनमुक्ती नेकीने निभावून नेण्याचा निश्चय केलाच, पण त्यापेक्षा यापुढे कुटुंबाशी जोडले जाण्याचा निर्धारही व्यक्त केला.
दिवाळी म्हणजे केवळ संगीत, नृत्य, मिठाई इतपत मर्यादित न ठेवता प्रकाश आमटे यांच्यावरील चित्रपट दाखवला गेला आणि त्यावर चर्चा घडवून आणली. यातला एक दिवस होता, कुटुंब-भेटीचा! हसू आणि आसू या संमिश्र भावनांनी तो हेलावून जाणारा दिवस होता. ऐन दिवाळीत कुणी आपल्याला भेटायला आले याचा एका बाजूला आनंद होता, तर आणखीही कोणी आले असते तर.. हेही वाटून गेलंच. भाऊबीजेच्या दिवशी विविध गुणदर्शन आहेच.
   पुण्यातील ‘कृपा फाऊंडेशन’ येथे महिला आणि पुरुष स्वतंत्र उपचार घेतात. वसईचे फादर जो परेरा यांनी चालवलेले हे केंद्र आहे. इथे एक दिवस घरच्यांनी भेटायला यावे, फराळ घेऊन यावा आणि तो फराळ एकत्रित करावा अशी प्रथा आहे. या दिवाळीचे आकर्षण असणार आहे काही जुन्या व्यसनमुक्त रुग्ण-मित्रांनी सादर केलेला वाद्यवृंद. नामवंत संगीतकार श्रीरंग उमराणी यांच्या मार्गदर्शनाखाली जमलेली संगीताची मैफल.
 ‘मानस-वर्धन’, ‘चैतन्य’ आणि ‘नित्यानंद’ या केंद्रात व्यसनी व्यक्तीबरोबर मानसिक आजाराने ग्रस्त रुग्णही दाखल असतात. तिथे सजावट, मिष्टन्न अशा प्रकारे दिवाळी साजरी होते. घरच्यांना भेट देण्याचे दिवस प्रत्येकाचे वेगवेगळे.
   पुण्यातले पुरुषांसाठीचे सर्वात मोठे व्यसनमुक्ती केंद्र म्हणजे ‘मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र’. येथील दिवाळी स्पेशल असते. इथे व्यसनमुक्ती उपचारांनंतर दीर्घकाळ राहणाऱ्या रुग्ण-मित्रांचा खास विभाग आहे. तेथील मित्र दिवाळीच्या साफसफाईची जबाबदारी उचलतात. आणि विक्रीसाठी शेकडो आकाशकंदील तयार करतात. ठिकठिकाणी जी दिवाळी प्रदर्शने भरतात तेथे जाऊन त्यांची विक्री करतात. यानिमित्ताने त्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळतोच; परंतु समाजाच्या मुख्य प्रवाहात मिसळण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची संधीही मिळते. ‘मुक्तांगण’ची रोषणाई ही त्यांचीच जबाबदारी असते. पणत्या आणि माळा यातून ‘मुक्तांगण’ची इमारत प्रकाशमान करण्यात त्यांचा मोलाचा वाटा असतो.
   मोठ्ठा किल्ला ही कामगिरी पाच आठवडय़ांसाठी दाखल झालेल्या रुग्ण-मित्रांवर सोपवली जाते. आणि दगड-मातीतून भला मोठा किल्ला केला जातो. रांगोळी स्पर्धा असते. निरनिराळे खेळ असतात. नरकचतुर्दशीच्या निमित्ताने अभ्यंगस्नान, फराळ हा भाग असतोच. पण खरे आकर्षण ठरते दस्तूरखुद्द अनिल अवचटांची बासरी आणि गाणी. या निमित्ताने ‘आनंदयात्री’ या द्विमासिकाचा ‘प्रकाशोत्सव’ विशेषांक प्रसिद्ध झाला. त्याची थीम होती ‘व्यसनांचे तिमिराकडून मुक्तीच्या प्रकाशाकडे मार्गक्रमण’. दररोज गोड पदार्थ, बदल म्हणून पावभाजी यातून दिवाळी साजरी होतेच. फन-गेम्स, कथा-कथन, दिवाळी पहाट असे सांगीतिक कार्यक्रम सुरूच झाले आहेत. आता दिवाळी अंकांचे स्वतंत्र वाचनालयही सुरू होईल.
  हे सारे केंद्राने केल्याने व्यसनमुक्तीची इच्छा वाढेल का, असा प्रश्न काही जण विचारतील.
तेव्हा एक लक्षात घेतले पाहिजे की, व्यसन हा मेंदूतील काही रासायनिक बदलांमुळे होणारा आणि शरीराच्या प्रत्येक भागावर परिणाम करणारा आजार आहे. त्यात स्वत:ची इच्छाशक्ती, माहिती, तंत्र, मंत्र आणि बारा पायऱ्यांच्या सभा, समुपदेशकाशी पाठपुरावा यांनी बळकटी आणणे महत्त्वाचे असते.
   कदाचित अशी दिवाळी व्यसनमुक्ती निभावून नेण्याच्या निर्धाराला बळकटी आणत असेल. ‘निशिगंध’मध्ये आलेले व्यसनमुक्त स्त्रियांचे ते आठ फोन ही आशा नक्कीच जागवतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Special article on diwali occasion
First published on: 24-10-2014 at 01:13 IST