हेमा होनवाड
आजही छोट्या छोट्या गावांमध्ये जातीचा, विषमतेचा पगडा छुप्या स्वरूपात अस्तित्वात आहे. तरीही ‘लोक काय म्हणतील’ याची फिकीर न करता, आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी एकमेकांच्या विकासाला पूरक ठरणारं सहजीवन जगणारे आणि समाजातील अडथळे पार करत, उमेद जागृत ठेवून एकमेकांना प्रोत्साहन देऊन योग्य वेळी योग्य साथ मिळाली तर शिक्षणाची आस पूर्ण करता येते हे सांगणाऱ्या गौरव आणि पूजाची ही गोष्ट.
शाळेत शिक्षक आणि मुलांबरोबर संवाद साधताना आम्ही एक शर्यत घेतो, ‘विशेषाधिकाराची शर्यत.’ या धावण्याच्या शर्यतीत इतर कोणत्याही शर्यतीप्रमाणे सगळे एका सरळ रेषेत उभे राहतात. त्यानंतर खेळ घेणारी व्यक्ती सूचना द्यायला सुरुवात करते. सूचना साधारणत: अशा असतात, ‘ज्यांनी बसनं किंवा आगगाडीनं प्रवास केला आहे त्यांनी २ पावलं पुढे या.’, ‘ज्यांच्या घरी फ्रीज आहे त्यांनी एक पाऊल पुढे या.’ ‘ज्यांचे आई-वडील पदवीधर आहेत त्यांनी तीन पावलं पुढे या.’ ‘ज्यांनी विमानानं प्रवास केला आहे त्यांनी पाच पावलं पुढे या.’ अशा सूचना दिल्यानंतर शिट्टी वाजवली की पळायला सुरुवात होते. असे विशेषाधिकार ज्यांना आहेत ते आधीच काही पावलं पुढे असल्यामुळे जिंकणार हे उघड असतं.
बाकीची मंडळी कोणतेच विशेषाधिकार नसल्याने मागे पडतात. याचा अर्थ त्यांच्या क्षमता कमी असतात असा नव्हे. त्यांना शर्यत जिंकण्यासाठी जीव खाऊन पळण्यावाचून दुसरा पर्याय नसतो. दुर्दैवानं आजही छोट्या छोट्या गावांमध्ये जातीचा, विषमतेचा पगडा छुप्या स्वरूपात अस्तित्वात आहेच. सामाजिक उतरंड आहे. या उतरंडीत खालच्या पायरीवर जे असतात त्यांच्यासाठी ही शर्यत साधी शर्यत न उरता, अडथळ्यांची शर्यत ठरते. अशाच समाजात अडथळे पार करत, उमेद जागृत ठेवून, एकमेकांच्या विकासाला प्रोत्साहन देणाऱ्या गौरव आणि पूजाच्या प्रातिनिधिक उदाहरणानं अनेकांना प्रेरणा मिळेल अशी आशा आहे.
‘लोक काय म्हणतील’ याची फारशी फिकीर न करता, आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी एकमेकांच्या विकासाला पूरक ठरणारं हे सहजीवन. जशी या आधीच्या लेखात भेटलेल्या प्राचीला योग्य वेळी योग्य माणसं भेटली, त्यामुळे ती आता भावंडांची जबाबदारी सांभाळत जिद्दीनं पुढचं शिक्षण घेते आहे. आत्मनिर्भर झाली आहे. प्राचीचा सध्या तरी ‘एकला चालो रे’चा निश्चय आहे. पण योग्य वेळी योग्य साथ मिळाली, तर शिक्षणाची आस पूर्ण करता येते याचं गौरव आणि पूजा हेही एक छान उदाहरण आहे. आजपर्यंत सामाजिक उतरंडीत जे उपेक्षित होतं, त्यांची विकासाची आस पूर्ण होताना पाहिली की माझ्या मनाला दिलासा मिळतो आणि त्यांच्या डोळस आणि जागृत धडपडीबद्दल आदर वाटतो.
गौरव मला ‘गुरुकुल’ या बीडजवळच्या शाळेत पुण्याहून घेऊन जाणार होता. त्याची स्वत:ची मोटार आहे. त्याचं घर ‘गुरुकुल’ पासून अर्ध्या तासाच्या अंतरावर होतं. लांबचा पल्ला असल्यामुळे मी एक पॉडकास्ट ऐकत होते. गौरव म्हणाला, ‘‘ताई, मला पण ऐकायला आवडेल.’’ लग्न आणि पतीपत्नीचे परस्पर संबंध यावर एक तज्ज्ञ बोलत होते. ते ऐकून झाल्यावर गौरवनं स्त्री-पुरुष समानतेवर काही छान विचार मांडले. ते ऐकल्यावर माझी उत्सुकता वाढली. विचारल्यावर समजलं की गौरव बीड जिल्ह्यातील लहान गावात वंजारी समाजात जन्माला आला. गौरवचं लग्न झालेलं होतं. त्याच्या बायकोचं नाव पूजा. ती कुठे आहे, काय करते, असं विचारल्यावर, तो म्हणाला ‘‘ताई, ती लोणावळ्याला असते, इंजिनीरिंग करतेय.’’
हे ऐकून आनंद तर झालाच पण आश्चर्यही वाटलं. गौरव कॅब चालवतो आणि त्याची पत्नी अभियांत्रिकीचा अभ्यास करते आहे. ही गोष्ट आजही पुरुषप्रधान असलेल्या आपल्या समाजात अतिशय दुर्मीळ आणि त्यातही ग्रामीण समाजात, तर अधिकच दुर्मीळ आहे. गौरवची पिढी त्यांच्या कुटुंबातील शिकणारी पहिली पिढी होती. गौरव अगदी प्रांजळ मनानं बोलू लागला. वंजारी समाजातील त्याचे वडील ऊसतोड कामगार. पूर्णपणे अशिक्षित! सहा महिने गावात राहून शेती करायची आणि सहा महिने दिवाळीपूर्वी ऊसतोडीला जायचं. हे काम ते वर्षानुवर्षं करत आले होते. आई गृहिणी. घरकाम करून त्यांना मदत करण्यामध्ये तिचा अख्खा दिवस जायचा.
त्यांचं गाव तसं छोटंसं, जेमतेम २ हजार लोकसंख्येचं. लहानपणी त्याला शाळा मुळीच आवडायची नाही. पण जसा थोडा मोठा होऊन चौथीत गेला तशी हळूहळू त्याला शाळेची गोडी वाटू लागली. वडिलांना शिक्षणासाठी खर्च करणं शक्य नव्हतं, पण गौरवनं शिकावं, समाजात नाव कमवावं अशी तळमळ मात्र होती. त्यांना अध्यात्माची आवड होती. गौरवला शासनाच्या सर्वसामान्य शाळेत न घालता त्यांनी एका आश्रमातर्फे चालवल्या जाणाऱ्या शाळेचा शोध घेतला आणि अगदी विचारपूर्वक ती शाळा सर्व दृष्टीनं योग्य वाटली म्हणून तिथे गौरवचं नाव घातलं. तिथं एक तर मोफत निवास आणि शिक्षण मिळणार होतं. जोडीला श्रमाचं महत्त्व आणि उत्तम संस्कारही होतील, अशी त्यांना खात्री वाटली. गौरवलाही शाळा आवडली. त्याला दहावीला ८९ टक्के गुण मिळाले. पुढे बी.एस्सी.लाही तो चांगल्या गुणांनी पास झाला.
त्याला इंग्लिश आणि गणितात फारशी गती नव्हती. त्यामुळे पुढे शिकायचं की गाडी चालवून कमवायला लागायचं, या संभ्रमात तो काही दिवस होता. कुटुंबाची आर्थिक घडी बसवायची होती. त्यामुळे शेवटी त्यानं गाडी चालवण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला दुसऱ्याच्या गाडीवर काम करावं लागलं. पण नंतर त्यांनं पैशांची बचत करून स्वत:ची छोटी गाडी घेतली आणि ‘समर्थ टूर्स आणि ट्रॅव्हल्स’ ही स्वत:ची कंपनी स्थापन केली. आता व्यवसाय चांगला चालतो आणि कुटुंबाला काही प्रमाणात स्थैर्य लाभलं आहे. त्याची जीवनसाथी पूजा. ती दोघं एकाच गावातली, पण पूजा गावात राहायला आली ती करोना साथीच्या काळात. मग मी पूजालाही भेटले. पूजा गौरवच्या समजूतदार स्वभावाबद्दल, स्वत:चं बालपण आणि त्या दोघांच्या मैत्रीची सुरुवात कशी झाली याबद्दल भरभरून बोलत होती.
दोघं एकाच गावातले, एकाच गल्लीतले असूनही एकमेकांना ओळखतही नव्हते. पूजाचे वडील शिकलेले होते आणि एस.टी. बसचालकाची नोकरी रायगड जिल्ह्यातील पेण येथे राहून करायचे. पूजा दोन वर्षांची असल्यापासून बारावीपर्यंत तिकडेच राहात होती. लहानपणी आंगणवाडीत खाऊ मिळायचा म्हणून आवडीनं शाळेत जायला लागली. तिला मनापासून शाळा आणि अभ्यास आवडायचा. तेव्हा शाळेची जी गोडी लागली ती आजही कायम आहे.
करोनाकाळात सगळे गावी परत आले, तेव्हा गौरवशी ओळख झाली आणि पाण्याच्या नळावर भेटले की गप्पा होऊ लागल्या. तेव्हा खरी ओळख झाली, मैत्री झाली. एकमेकांचे विचार जुळले, स्वभाव आवडले. पहिली आवडलेली आणि समान वृत्ती म्हणजे वास्तव ‘जसं आहे तसं’ स्वीकारायचं आणि दुसरी म्हणजे ‘खरं बोलायचं’. एखाद्या समुपदेशकानं एखाद्या जोडप्याला सल्ला द्यावा इतकं शहाणपण या दोघांमध्ये आधीच होतं. पण त्यांच्या ओळखीचं पुढे जाऊन मैत्री, प्रेमात आणि नंतर लग्नात रूपांतर होईल अशी शंकासुद्धा तेव्हा पूजाच्या मनाला शिवली नव्हती. लहान गावात एक तरुण मुलगा आणि एक मुलगी यांच्यातील निखळ मैत्रीकडे आजही दूषित नजरेनंच पाहिलं जातं. हे ६०-७०च्या दशकात पुण्यासारख्या शहरातही घडत असे. त्याचा अनुभव माझ्यासारख्या अनेक जणींनी घेतला आहे. तेव्हाही सामाजिक उतरंडीत वरच्या स्तरावरील व्यक्तींना वेगळे नियम होतेच. ‘समाज बदल’ सोपा नसतो आणि त्यासाठी वेळ लागतो, अनेकांना त्यासाठी आयुष्य वेचावं लागतं तेव्हा कुठे पहाट होते.
त्यांच्या सुरुवातीच्या साध्या मैत्रीला प्रेम प्रकरण समजून गावात कुजबूज सुरू झाली, चिडवाचिडवी चालू झाली आणि ते तिसऱ्याच कोणीतरी पूजाच्या आई-वडिलांच्या कानावर घातलं. आईला तर तिनं मुलांशी बोललेलंसुद्धा चालत नव्हतं. वडील तेवढे रागीट नसूनही आई त्यांना काहीबाही सांगायची त्यामुळे ते हिच्यावर रागवायचे. घरातील वातावरण पूर्ण बदललं. वडिलांनी तिला चांगलं ठोकून काढलं. बाहेर जायला बंदी केली. साधं गच्चीवरही जाऊ द्यायचे नाहीत. मोबाइल फोन काढून घेतला. इतका मानसिक छळ त्यांनी सुरू केल्यावर, पूजानं शांतपणे विचार केला की जर प्रेमाचा आरोप सगळी करताहेत, तर हे मैत्रीचं नातं प्रेमात बदलायला काय हरकत आहे? या संघर्षाच्या काळात, त्रास सहन करताना, गौरव अतिशय प्रगल्भ विचारांचा मुलगा आहे हे तिच्या लक्षात आलं.
आपल्याला हा जीवनभर साथ देऊ शकेल याची खात्री वाटली. एखाद्याने या परिस्थितीचा गैरफायदा घेतला असता. पण गौरव सच्चा साथीदार होता. तिनं एकदा संधी साधून गौरवला प्रत्यक्ष भेटून तिच्या भावना व्यक्त केल्या. अर्थात हे घरी कळल्यावर आभाळ कोसळलं. लगेच पूजाच्या पालकांनी पूजासाठी स्थळांची यादी करायला सुरुवात केली. तेव्हा मात्र पूजानं ‘लग्न केलं तर गौरवशीच करेन’, असा निश्चय बोलून दाखवला. कोणत्याही दबावाखाली येऊन निश्चयापासून मागे हटली नाही. त्या दोघांना खरं तर लग्नाची घाई नव्हती. पण घरच्यांनी ताबडतोब लग्न लावून देण्याचा आग्रह धरला आणि त्या दोघांना ते मान्य करावंच लागलं.
मी मुख्याधापिका म्हणून निवृत्त झाल्यावर प्रथम ग्रामीण भागात कामाला सुरुवात केली, तेव्हा समजलं की नववीत सगळ्या विषयात नापास झाल्या तरी मुलींना ‘सुजाण शाळे’त दहावीत ‘चढवतात’. त्यामुळे त्यांचं लग्न किमान एक वर्ष पुढे ढकललं जातं. माझ्या अनेक सीमित शहरी समजुतींना सुरुंग लागले ते अशा वास्तवाची ओळख झाल्यावर.
पूजाही तेच वास्तव सांगत होती, ‘‘गौरव मला भेटला हे माझं भाग्य! तो बाहेरच्या जगात वावरत होता. मला त्या जगाची फारशी माहिती नव्हती. जगात वागावं कसं, इतरांशी बोलावं कसं, हे तो मला समजावून सांगायचा. माझ्या वर्गातील मुली त्यांच्या मित्रांच्या नादानं वाहवत जाऊन अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात हे मला दिसत होतं. पण कधी मला समजावून सांगून तर कधी लटकं रागावून, अभ्यासाकडे लक्ष द्यायला सांगणारा गौरव माझा सन्मित्र आहे. अभ्यास होता म्हणून मी गावच्या यात्रेला गेले नाही, तर यात्रेचा खाऊ मला कुरियरनं पाठवून दिला त्यानं.’’ सासूबाई म्हणतात, ‘‘पूजा शिकली म्हणजे तुमचं आयुष्य पुढे अधिक चांगलं जाईल.’’
आईंचे हे शब्द आठवले तरी दोघांच्या डोळ्यात पाणी येतं. आईवडिलांची स्वत:ची ओढाताण होते तरीही ते या दोघांना संपूर्ण पाठिंबा देतात. पूजाला छान समजावून घेतात आणि ती त्यांची मुलगीच असावी असे लाड करतात. फक्त मुलाला जन्म देऊन कोणी पालक होत नाही. परस्पर विश्वास, दुसऱ्याचा वेगळा मुद्दा ऐकून घेऊन गरज वाटली, तर स्वत:चा दृष्टिकोन बदलण्याची तयारी यामुळे जो सुसंवाद होतो, त्यातून दोन्ही व्यक्तींचा विकास होतो. ही वृत्ती नेहमीच ‘देत सुखाला होकार आणि दु:खाला नकार.’ अशी. त्यामुळेच त्यांचं घर आज हसतंखेळतं आहे. हेच तर हवं असतं आयुष्याला.