‘मी चाळीस वर्षांची प्रगल्भ व्यक्ती आहे. इच्छा झाली म्हणून गोंदवले तर त्यात काही मोठे बिघडलेले नाही’ अशी माझी ठाम भूमिका होती. संध्याकाळी घरी गेल्या गेल्या मी माझा हात नवऱ्याला दाखविला. त्याला माझे गोंदण बघून धक्काच बसला. ‘काय वेडी-बिडी आहेस का तू?’ तो करवादला. मग त्याच्यातला डॉक्टर जागा झाला. ‘कोण कुठल्या रस्त्यावरच्या बायका. त्यांची सुई तू वापरली स्टरलाइझ न केलेली?’ मग त्याने मला कोणकोणते रोग होऊ शकतात, याची यादी वाचली त्यापैकी टिटॅनस व एड्स हे दोन रोग मी लक्षात ठेवले व त्याची काही लक्षणे दिसतात का यावर पुढील काही वर्षे ‘वॉच’ ठेवला.
आदिवासी समाजातल्या जेमतेम दोन वर्षांच्या मुलीच्या चेहऱ्यावर गोंदवले गेले त्याची तिला फार लाज वाटत असे. गोंदण झाकण्याचा ती प्रयत्न करीत असे, मात्र तिने त्यावर मात केली या आशयाची प्रा. मुक्ता आंभोरे यांची याच पुरवणीत आलेली ही हकिकत वाचली आणि माझे मन ३०-३५ वर्षांपूर्वीच्या काळात पोहोचले.
आदिवासी मुलीची परवानगी न घेताच तिला गोंदवले गेले पण आजकालच्या तरुणी राजीखुशीने स्वत:ला हवे ते डिझाइन हव्या त्या ठिकाणी गोंदवून घेतात. कोणा एका नटीने आपल्या ‘बॉयफ्रेंड’चे नाव मानेवर गोंदवून घेतले आणि आता त्याच्याशी बिनसल्यावर त्याचे नाव लपेल असे फुला-पानांचे डिझाइन मूळ गोंदणाच्या वर काढून घेतले. या नसत्या उपद्व्यापाची तिला लाज वाटत असेल का हे कळायला मात्र मार्ग नाही.
वय वर्षे दोन व बावीस अशा दोन वयोगटांतल्या या दोन कहाण्या प्रातिनिधिक आहेत. लहान नकळत्या वयात गोंदण केल्या गेलेल्या किती तरी मुली आपल्याकडे दिसतात आणि टॅटू न केलेल्या तरुणी अभावाने आढळतात. पण वयाच्या एकेचाळिसाव्या वर्षी गोंदवून घेणारी व्यक्ती मात्र कोणालाही काल्पनिक वाटेल, पण ती प्रत्यक्षातली आहे आणि मीच आहे.    
१९७५ पासून भारतात स्त्री-मुक्ती चळवळीने पाय रोवले त्यामुळे मीदेखील या चळवळीत हळूहळू ओढले गेले. सर्व वातावरण इतके भारलेले होते की त्या काळात स्त्री-मुक्तीची संकल्पना, स्त्री-पुरुष समानता, महिला सबलीकरण, जाणीव- जागृती कार्यक्रम या खेरीज दुसरा कसलाही विचार मनात येतच नसे. ‘मुलगी झाली हो’ या पथनाटय़ाचे प्रयोग जागोजागी आम्ही करत होतो. लेख लिहिणे, पुस्तिका छापणे, भाषणे करणे, दौरे काढणे अशा गोष्टींनी आम्ही पछाडल्या गेलो होतो. अशा या कालखंडात मी पूर्णवेळ नोकरी सोडून अर्धवेळ नोकरी धरली व रोज दादर ते ठाणे असा लोकलचा प्रवास सुरू केला.
एक दिवस अशीच मी ठाण्याहून निघाले तर थोडय़ा वेळाने मला दारात दोन फेरीवाल्या फतकल मारून बसलेल्या दिसल्या. गळ्यात, नाकात, हातात मोठमोठे अलंकार आणि भरपूर गोंदवलेले हात अशा त्या दोघी म्हणजे गोंदवण्याचा व्यवसाय करणाऱ्या बायका आहेत हे माझ्या लगेच लक्षात आले. त्या क्षणी मला स्वत:च्या हातावर गोंदवून घेण्याची तीव्र इच्छा झाली. डब्यात कोणीही ओळखीपाळखीचे नव्हते. कोणाशी चर्चा करावी असे वाटलेही नाहीच म्हणा, पण काय गोंदवायचे याचा निर्णय त्याच क्षणी झाला हे मात्र पक्के आठवते आहे. भारलेपण, पछाडलेपण असे मी जे म्हणते आहे तेच या निर्णयामागचे कारण होते. स्त्री-मुक्ती चळवळीचे चिन्ह हातावर गोंदवून घ्यावे असे मी ठरवले. लगेच मी पर्समधून वही काढली, पेन काढलं आणि जगातील सर्व बायका संघटित आहेत, असे सांगणारे ते चिन्ह मला जमेल तसे कागदावर रेखाटून तिला दिले आणि बसले तिच्यापुढे उकिडवी! कमाल म्हणजे त्या बाईने ते चित्र तसेच्या तसे माझ्या मनगटाच्या आतल्या बाजूला मनगट व कोपर यांच्यामध्ये ५ मिनिटांत कोरून टाकले. मला सुई टोचल्याचे कळले नाही. आग आग झाली नाही. मी मजेत दादरला उतरून स्त्री-मुक्ती संघटनेच्या कार्यालयात व नंतर घरी गेले. दोनच दिवसांत हात पूर्ण बरा झाला. ते विचित्र चित्र हिरव्यागार रंगात माझ्या हातावर छानपैकी उठून दिसू लागले. चळवळीतल्या अनेक मैत्रिणींमध्ये ही बातमी पसरली. अनेक जणी माझ्यावर प्रचंड भडकल्या. ‘काय हा वेडेपणा. दुखले असेलच पण सांगत नाही.’ ‘ही मीना म्हणजे वाट्टेल ते करत असते. मनात आलं की
मार उडी असली बाई आहे ही.’
अशी प्रेमळ टिपणी मला ऐकावी लागली. जनावरांच्या पाठीवर शिक्के मारतात ना? तसे मी स्वत:ला चळवळीशी बांधून टाकणारी ‘ब्रँडेड’ कार्यकर्ती झाली आहे, असे माझ्या कृतीचे मी समर्थन केले तरी इतर सर्व जण ते उडवून लावत होते. पण हळूहळू मंडळी माझे गोंदण विसरली.
माझ्या घरी मात्र वेगळीच गंमत झाली. घरातल्या तिन्ही पुरुषांचे माझ्या हाताकडे लक्षच गेले नाही. त्यांची टवाळकी ऐकायला नको म्हणून मीदेखील स्वत: होऊन माझा हात दाखविण्याच्या भानगडीत पडले नाही. नोकरीच्या ठिकाणी माझ्या सहकारी मैत्रिणींना याचे फार नवल वाटत होते. ‘बघितले का गं कोणी तुझे गोंदण?’ असे त्या मला मधूनमधून विचारीत. ‘काय विचित्र घर आहे’ असे त्या मनातल्या मनात म्हणत असाव्यात.
अखेर तो दिवस उजाडला. त्या दिवशी वर्तमानपत्रात एका अपघाताची बातमी होती. दोन आगगाडय़ांची टक्कर होऊन भीषण अपघात झाला होता. महिलांच्या डब्याचा चुराडा झाला होता. इकडे-तिकडे विखुरलेल्या मृतदेहांचे फोटो वर्तमानपत्रात आले होते. विद्रूप झालेल्या चेहऱ्यांमुळे नातेवाईकांना ओळख पटविणे कठीण जात असल्याचे बातमीत म्हटले होते. आमच्या ऑफिसमध्ये लंच टाइममध्ये या बातमीचीच चर्चा चालू होती. अन् अचानक माझ्या डोक्यात ठण्ण वाजले.. ‘अरे देवा! जर माझ्या लोकलचा असा अपघात झाला तर? ए, मी आजच माझ्या नवऱ्याला गोंदण दाखवून टाकते बाई.’ मी एकटीच स्वत:शी बडबडले तेव्हा सगळेच आता हिला काय झालं? अशा नजरेने माझ्याकडे बघू लागले तेव्हा मी म्हटले, ‘एखाद्या अपघातात माझे शिर धडावेगळे झाले तर माझा नवरा मला ओळखणार नाही कारण त्या हातावरचे गोंदण बघून तो म्हणेल ही नाही माझी बायको, तिच्या हातावर असा टॅटू वगैरे नव्हता बुवा!’ सर्वाना माझे म्हणणे पटले. शिवाय आता बघू हिच्या घरी काय गंमत होते. उद्या ही सांगेलच, अशी उत्सुकताही त्यांना लागली असणारच.
संध्याकाळी घरी गेल्या गेल्या मी माझा हात नवऱ्याला दाखविला त्याला माझे गोंदण बघून धक्काच बसला ‘काय वेडी -बिडी आहेस का तू?’ तो करवादला. मग त्याच्यातला डॉक्टर जागा झाला. ‘कोण कुठल्या रस्त्यावरच्या बायका. त्यांची सुई तू वापरली स्टरलाइझ न केलेली? ’ मग त्याने मला कोणकोणते रोग होऊ शकतात, याची यादी वाचली त्यापैकी टिटॅनस व एड्स हे दोन रोग मी लक्षात ठेवले व त्याची काही लक्षणे दिसतात का यावर पुढील काही वर्षे ‘वॉच’ ठेवला.
माझ्या दोन मुलांनी, ‘टॅटू काढला तर काढला, पण इतका बंडल?’ म्हणून नाके मुरडली निदान जॉमेट्रिकल डिझाइन तरी काढायचे अशा कुचकट प्रश्नापलीकडे त्यांची प्रतिक्रिया गेली नाही. ते काही तरी चिन्ह असेल,अशी पुसटशी शंकादेखील त्यांना आली नाही. मला मुलगी असती तर तिची प्रतिक्रिया किती वेगळी आणि सुखकारक झाली असती, अशी कल्पना मी करीत बसले अन् ते दोघे ‘निदान हा हात आता लपवत जा मीनाकुमारीसारखा,’ असे सुचवून खेळायला पळाले.
 मला खरे तर कोणाच्याच प्रतिक्रियेचे काहीच वाटले नाही. ‘मी चाळीस वर्षांची प्रगल्भ व्यक्ती आहे. इच्छा झाली म्हणून गोंदवले तर त्यात काही मोठे बिघडलेले नाही’ अशी माझी ठाम भूमिका होती. फक्त जी व्यक्ती हे चिन्ह नीट सुबक काढायला हवे होते, अशी टिप्पणी करीत असे अशी व्यक्ती मला एकदम आपलीशी वाटू लागे, कारण हीच मंडळी माझ्या दु:खात सहभागी होणारी आहेत, अशी खूणगाठ मी मनात बांधत असे. ते चिन्ह विचित्र दिसते हे माझे खरे दु:ख होते.
चालत्या गाडीत मी चित्र रेखाटले व त्या बाईला दिले ही माझी घाई मला नडली. लहानपणी नाशिकला मी किती तरी बायकांच्या हातावर राधाकृष्ण, तुळशी वृंदावन अशी छान आखीव-रेखीव चित्रे गोंदवलेली पाहिली होती. या स्त्रियांची चित्रकला छान असणार पण हे चिन्ह त्यांच्या दृष्टीने एक अनोळखी आकृती होते त्यामुळे मी काढलेल्या रफ चित्रासारखे चित्र काढताना स्वत:ची कला वापरून ते चित्र सुबक करण्याचा प्रयत्न त्यांनी केलाच नाही. ही गोष्ट मला फार लागली होती व अजूनही त्या गोंदणाकडे पाहिले की मला हळहळ व लाज वाटते अन् मग मी हे सर्वधर्मसमभावाचे चित्र आहे, अशी स्वत:ची माझ्या मनाची समजूत काढते.
आता मी सत्तर वर्षांची झाले आहे. गेली ३५ वर्षे माझ्या हातावर ठाण मांडून बसलेली स्त्रियांची एकजूट व सर्वधर्मसमभाव माझ्या बरोबरच पल्याड जाणार.
चालत्या गाडीत चित्र काढण्याचा खटाटोप करण्यापेक्षा ‘स्त्रियांच्या एकजुटीचा विजय असो’ असे वाक्य गोंदवायला हवे होते नाही का? मग मी जरी पल्याड गेले तरी स्त्रियांच्या एकजुटीचा दमदार आवाज घुमतच राहील, अशा विश्वासाने मी डोळे मिटले असते.       

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Story of my tattoo
First published on: 20-09-2014 at 01:01 IST