विनया खाडपेकर
महाराष्ट्रात संततिनियमनाचे पायाभूत कार्य करणारी पहिली स्त्री अशी ओळख असलेल्या शकुंतला परांजपे. अशिक्षित जनतेपासून सुशिक्षित डॉक्टरांपर्यंत संततिनियमनाचा विचार प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी व्याख्यानं देणं, साधनं वापरण्यास शिकवणं याविषयी त्यांनी सातत्याने कार्य केलं. सततच्या गर्भारपणातून स्त्रीची सुटका करून तिच्यासाठी प्रगतीची दारं खुलं करणारं त्यांचं कार्य स्त्री-जीवनात परिवर्तन घडवणारं आहे.
महाराष्ट्रात संततिनियमनाचे पायाभूत कार्य करणारी स्त्री म्हणून शकुंतला परांजपे यांचं नाव महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात कोरलं गेलं आहे. र.धों. कर्वे यांनी आरंभ केलेलं हे कार्य शकुंतलाबाईंनी व्यापक पातळीवर नेलं.अनेक अडथळे पार करीत, जवळजवळ ३० वर्षं शकुंतलाबाई या क्षेत्रात धडाक्यात कार्यरत होत्या. सततच्या गर्भारपणातून सुटका होणं हा त्या काळच्या स्त्रियांच्या मुक्तीचा महत्त्वाचा, गरजेचा मार्ग होता. तो त्यांना मिळाला.
शकुंतला परांजपे यांचा जन्म १७ जानेवारी १९०६चा. वैचारिक आणि आर्थिक दोन्ही बाजूंनी समृद्ध असलेल्या रँग्लर र.पु.परांजपे यांची ही एकुलती एक लाडाची लेक, कुशाग्र बुद्धीची होती. ज्या काळात महाराष्ट्रातल्या मुली लग्न जमेपर्यंत चौथी-सातवी-अकरावी इतपतच शिकत होत्या, त्या काळात वडिलांसारखे ‘रँग्लर’ होण्यासाठी ती इंग्लंडला गेली. पण इंग्लंडमध्ये मुलींना ही परीक्षा देण्याची परवानगी नव्हती. म्हणून ती ‘केंब्रिज’हून गणिताची ‘ट्रायपॉस’ परीक्षा उत्तीर्ण झाली. काही वर्षं जिनेव्हा येथे ‘आंतरराष्ट्रीय मजूर कार्यालया’त शकुंतलाबाईंनी नोकरी केली.
साधारण १९२१ पासून महाराष्ट्रात र. धों. कर्वे यांनी संततिनियमनाचे विचार ‘समाजस्वास्थ्य’ मासिकातून मांडायला आणि प्रत्यक्ष कार्यालाही सुरुवात केली. ते शकुंतलाबाईंच्या नात्यातलेच होते. त्यांच्यापेक्षा २४ वर्षांनी मोठे. १९३१ मध्ये सरकारने र.धों. कर्वे यांच्यावर अश्लीलतेच्या कायद्याखाली पहिला खटला भरला. तेव्हा खर्चासाठी शकुंतलाबाईंनी जिनेव्हाहून दोन पौंड पाठवले होते.
शकुंतलाबाईंचे व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवन सर्वच वैशिष्ट्यपूर्ण होतं. त्यांनी स्वित्झर्लंडमध्ये राहणाऱ्या यूरा स्लेप्टझॉप या रशियन चित्रकार तरुणाशी विवाह केला मात्र दोन-तीन वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला. १९३७च्या आसपासचा हा काळ. तरुण पिढी स्वातंत्र्य चळवळ, स्त्री-शिक्षण इत्यादी ध्येयवादानं भारलेली होती. कितीतरी संस्था समाजकार्यात उतरलेल्या होत्या. पण शकुंतलाबाई शक्य असूनही कोठे नेत्या-पदाधिकारी झाल्या नाहीत. त्यांना असं काही करण्याचं आकर्षणच वाटलेलं दिसत नाही. त्या आपल्या लहानग्या लेकीला, सईला (सुप्रसिद्ध लेखिका-दिग्दर्शिका सई परांजपे) काय काय शिकवण्यात गुंतल्या होत्या. अधूनमधून र. धों. कर्वे यांच्या ‘समाजस्वास्थ्य’ मासिकात किंवा आणखी कोठे कोठे लेखन करत होत्या. फ्रॉक किंवा पॅण्ट घालून इकडेतिकडे भटकंती करत होत्या. मांजरे, शेळ्या, घोडे या मुक्या प्राण्यांच्या दुनियेत डोकावत होत्या.
एकदा र.धों. कर्व्यांना शकुंतलाबाईंनी विचारलं, ‘‘कसं चाललंय संततिनियमनाचं काम?’’ ते म्हणाले, ‘‘प्रसार नाही होत म्हणण्यासारखा! तू करतेस?’’ वडिलांनीही या मूलभूत, महत्त्वाच्या कार्यास प्रोत्साहन दिलं. मग सरळ स्वभावाच्या, पण फटकळ शकुंतलाबाई, त्यांचा सर्व उत्साह आणि ताकदीनिशी या क्षेत्रात उतरल्या. र.धों.नी ‘पुणेकरांची सोय’ अशी जाहिरात ‘समाजस्वास्थ्य’मध्ये दिली आणि शकुंतलाबाईंच्या दारावर ‘भेटण्याची वेळ दुपारी ३ ते ५’ अशी पाटी लागली. कोणी फारसे येईना.
हळदीकुंकूप्रसंगी बायकांची कुजबुज कानावर पडल्यावर शकुंतलाबाईंच्या लक्षात आलं की, दिवसाउजेडी यायला स्त्रिया संकोचतात. वेळ बदलून संध्याकाळी ६ ते ८ केली. थोड्या बायका येऊ लागल्या. डॉक्टर मंडळीही या विषयाची उपेक्षा करत. एका डॉक्टरीणबाईंनी स्पष्ट विचारलं, ‘‘मग आम्ही आमची प्रसूतिगृह बंद करायची का?’’ फक्त डॉ. मधुमालती गुणे यांनी त्यांच्या दवाखान्यात संततिनियमनाची सोय केली होती. पण डॉक्टर नसलेल्या र.धों. किंवा शकुंतलाबाईंनी हे काम करावं हे काही डॉक्टरांना पटत नव्हतं. अशिक्षित जनतेपासून सुशिक्षित डॉक्टरांपर्यंत सर्व स्तरांत संततिनियमनाचा विचार रुजवणं आणि हा विचार व्यवहारात उतरवण्यासाठी प्रयत्न करणं, असं हे दुहेरी कार्य होतं. मुख्यत: व्याख्यानं देणं, साधनं वापरण्यास शिकवणं, शस्त्रक्रिया करण्यासाठी तयार करणं या सूत्राला धरून त्यांचं कार्य सुरू झालं.
एकदा शकुंतलाबाई हैदराबादला व्याख्यानासाठी निघाल्या होत्या. प्रवासात मनमाड स्थानकापासूनच आयोजकांकडून सूचना सुरू झाल्या, ‘व्याख्यानाचा विषय बदला.’ त्यांना शकुंतालाबाईंनी नकार दिला. व्याख्यान रद्द केलं तरी हरकत नाही, असं त्यांनी सांगून टाकलं. हैदराबादला शकुंतलाबाईंच्या राहण्याची व्यवस्था एका सरकारी अधिकाऱ्याकडे केलेली होती. तेथे पुन्हा आयोजकांचा विषय बदलण्यासाठी आग्रह सुरू केला. तिथले सरकारी अधिकारी समंजस होते, ते म्हणाले, ‘‘अहो बाई इथे निजामशाही आहे.
व्याख्यात्याचं नाव, भाषणाचा विषय, सगळ्याला सरकारी परवाना लागतो. ‘संततिनियमन’ हे नाव खपणार नाही. तुम्ही बोला या विषयावर, पण विषयाचं फक्त नाव बदला.’’ जरा विचार करून शकुंतलाबाईंनी ‘सुप्रजनन’ हे नाव जाहीर केलं. व्याख्यान ‘संततिनियमना’वरच दिलं. सभा व्यवस्थित पार पडली. काही अवांतर चौकशीला शकुंतलाबाईंची पुणेरी उत्तरं होती. केंद्रात एक बाई तपासणी होऊन बाहेर पडली. दुसरी बाई आत आली. दुसऱ्या बाईने शकुंतलाबाईंना विचारलं, ‘‘आता गेली त्या बाईंबरोबर होता, तो तिचा नवराच होता का?’’ शकुंतलाबाईंनी ताडकन उत्तर दिलं, ‘‘तो तुमचा नवरा नव्हता ना? मग झालं तर!’’ सभेत एका बाईंनं विचारलं, ‘‘तुम्ही संततिनियमनाची साधनं देताना फक्त विवाहित बायकांनाच देता ना?’’ शकुंतलाबाईंचं उत्तर, ‘‘मी चौकशी करत नाही. वयात आलेल्या बायकांना देते.’’
‘‘अविवाहित आणि विधवांनासुद्धा?’’ ‘‘त्यांना तर त्याची जास्त जरुरी असते.’’ बाईंनी ठणकावलं. लग्न झालेल्या बाईला कोणापासूनही मूल झालं तरी नवऱ्याच्या नावावर खपवता येतं, असं कुणी म्हटलं तेव्हा यावर शकुंतलाबाईंचं भाष्य- ‘‘नीतिमत्तेचं सर्व डबोलं आपल्यापाशीच असून, दुसऱ्यांना हीन लेखणाऱ्या स्त्रिया भेटल्या की माझ्या तळपायाची आग मस्तकाला पोहोचते.’’
संततिनियमनाचं कार्य करताना शकुंतलाबाई आणि ‘ग्रामीण महाराष्ट्र’ यांचे सवाल-जबाब ऐकण्यासारखे आहेत. शकुंतलाबाई स्वच्छंदी. स्वत:च्या लहरीनुसार वागणाऱ्या. कोणाशी तडजोड करणं त्यांना माहिती नव्हतं. पण ग्रामीण महाराष्ट्रातल्या लोकांशी संततिनियमनावर संवाद साधताना काय बोलणं होत असे? यावर त्या लिहितात, ‘‘खेड्यातल्या बायकांशी वागणं मोठं कठीण. खेड्यात जायचं, म्हणून मी चांगलं टोपपदरी इरकली लुगडं नेसलं. केसांचा अंबाडा घातला. मोठ्ठं कुंकू लावलं.
पायात कोकणी वहाणा घातल्या. मला वाटलं एवढं पुरे झालं, पण गळा भुंडा. आमच्या सुधारकी दृष्टीला ते जाणवलं नाही. बरं इतकं करून थांबलं असतं तर, लगीन न झालेली शिकलेली बाई वाटली असते. पण माझ्या सईला बरोबर घेऊन गेले. बायका आपापसात कुजबुजू लागल्या, ‘नवरा हाय म्हणावं तर गल्यात काय बी न्हाई. नवरा न्हाई म्हणावं तर कुंकू लाविती. लगीन झालं न्हाई म्हणावं तर प्वारीला घेऊन येती. कसली आवा हाय काय जनु.’ ही एवढी सगळी भानगड चुकवायला मग आईचं मंगळसूत्र धुंडून काढलं आणि ग्रामसुधारणेच्या वेशात त्या मंगळसूत्राची भर घातली. एवढं सगळं कशासाठी, तर दुसऱ्याची संतती मर्यादित ठेवण्यासाठी. होईनात का खंडीभर पोरं. मला कशाला उठाठेव…’’
संततिनियमनाची साधनं वापरणं बायकांना कटकटीचं वाटे. खेड्यात त्यांची उस्तवारी करणंही कठीण जाई. तेव्हा एकीनं म्हटलं, ‘‘बाई, हा भानगडीचा उपाय नको. नरड्यावाटे घ्यायचं औषध द्या.’’ लगेच शकुंतलाबाईंचं तिला समजेलशा शब्दात उत्तर, ‘‘नरड्यावाटं पोर काढून दावा. मग नरड्यावाटं घ्यायचं औषध देईन.’’ (त्या काळात गोळ्या उपलब्ध नव्हत्या.) या विषयावर सोप्या भाषेत बोलायला मी ग्रामीण स्त्रियांकडून शिकले, असं शकुंतलाबाईंनी नोंदवलं आहे. त्या लिहितात, माझी बडबड ऐकून एक बाई म्हणाली, ‘‘लई खरं हाय बामनीन बोलते ते. समद्याचं रेशनिंग झालं. धान्याचं झालं. साखरेचं झालं. राकेलचंबी झालं. मुलांचं रेशनिंग कशापायी नको?’’ एकदा पंचविशीतला तरुण त्यांच्याकडे आला. शकुंतलाबाईंनी विचारलं, ‘‘तुम्हाला मुलं किती?’’ त्याने उत्तर दिलं, ‘‘अहो बाई, लग्न कुठं झालंय मुलं व्हायला? आईबापांचा संसार चालवतो. आईबापाची पोरं थांबेनात, म्हणून आईला आनली तुमच्याकडे.’’
सात मुली असलेल्या बाईला शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी शकुंतलाबाई सांगत होत्या. पण ‘अजून मुलग्याची आशा हाय’, हा तिचा हेका. सगळं सांगून झालं. नेहरूंना एकच मुलगी आहे हे सांगून झालं. पण तिचा हेका कायम. शेवटी भडकून शकुंतलाबाईंच्या तोंडून शब्द सुटले, ‘‘मडकंच धरायला मुलगा हवा ना!’’ त्यांना वाटलं की, ही बाई आता शिव्यांची लाखोली वाहणार. पण ती शांतपणे म्हणाली, ‘‘पाहिजे ना बाई मडकं धरायला मुलगाच.’’
खेड्यांमध्ये काही ठिकाणी सभेसाठी पुरुष येऊन बसत. बायका नाही. दोघांनी येण्यासाठी शकुंतलाबाईंचा आग्रह असे. बायका यायला तयार नाहीत, असं पुरुष सांगत. शकुंतलाबाईंचं उत्तर, ‘‘मी एक बाई बोलणार आहे हे माहिती असताना असं कसं?’’ एका ठिकाणी बायका नाहीत म्हणून पुढे आलेला चहा शकुंतलाबाईंनी नाकारला. दुसऱ्या ठिकाणी ‘बायका नाहीत तर सभा रद्द’, असं सांगून त्या जीपमध्ये जाऊन बसल्या. मग बायकांना बोलावणी गेली. पुरुषांच्या चौपट संख्येने बायका जमल्या. त्यांच्याशी बोलताना शकुंतलाबाईंच्या लक्षात आलं की, आधी सभा असल्याचा निरोप बायकांपर्यंत पोहोचवलाच गेला नव्हता.
ग्रामीण भागातला शस्त्रक्रिया झालेला एक पुरुष आणि एक स्त्री यांना सभेसाठी दौऱ्यावर नेण्यास शकुंतलाबाईंनी सुरुवात केली. त्यांना आर्थिक मोबदला दिला जात असे. ते आपला अनुभव सांगत. त्यांच्याभोवती ग्रामीण जनता जमून, त्यांना काय काय विचारत असे. हा प्रयोग खूपच यशस्वी झाल्याचं शकुंतलाबाईंनी म्हटलं आहे. या कार्यासाठी १९६४मध्ये राष्ट्रपतींकडून शकुंतलाबाईंची नियुक्ती राज्यसभेत झाली. राज्यसभेत संततिनियमनावर भाषण करण्याची एकही संधी त्यांनी फुकट घालवली नाही. पण राज्यकारभाराच्या या केंद्रस्थानी एकंदरीतच वातावरण असं होतं की, वाढती लोकसंख्या हा महत्त्वाचा विषय आहे हे सर्वांना पटत होतं. पण मंत्री, युनियनचे पुढारी कोणीच या विषयाला गंभीरपणे घेत नव्हते.
सहा वर्षांनंतर शकुंतलाबाईंनी या पदाला रामराम ठोकला. संततिनियमनाच्या त्यांनी केलेल्या कार्यासाठी १९९१मध्ये त्यांना ‘पद्माभूषण पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आलं. र. धों. कर्वे यांनी आरंभ केलेलं कार्य शकुंतलाबाईंनी व्यापक पातळीवर नेलं, परंतु एका टप्प्यावर त्यांनी कार्य थांबवलं. नंतर त्या त्यांच्या अनेकानेक छंदांत बुडून गेल्या. उत्तर आयुष्यात हा विचार भारतभर रुजल्याचं त्यांनी पाहिलं. सततच्या गर्भारपण-बाळंतपणातून स्त्रीची सुटका झाल्यावर तिच्यासाठी प्रगतीची अनेक द्वारं खुली झाली. शकुंतलाबाईंचं हे कार्य स्त्री-जीवनात मूलभूत परिवर्तन घडवणारं आहे.