जुई कुलकर्णी

लग्न करताना जे घर सोडून आलो ते वडिलांचं आणि लग्न झाल्यावर ज्या घराला जीव लावला ते नवऱ्याचं, ही अस्वस्थ करणारी जाणीव प्रत्येक विवाहित स्त्रीला कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर होत असते. त्यासाठी तिचं लग्न मोडलं पाहिजे असंही नाही! पण जिचं लग्न मोडतं, तिला तर ‘माझं घर कोणतं?’ हा प्रश्न खोलवरची वेदना देतो. अशा एका स्त्रीचा आपल्या जीवनाचा ताबा आपल्याकडे घेण्याचा मानसिक प्रवास ‘वेलकम होम’ हा मराठी चित्रपट मांडतो. स्त्रीला अशा वेळी घरच्यांनी कसं समजून घ्यावं, याचा वस्तुपाठ असलेला हा चित्रपट पाहायलाच हवा!

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
balmaifal article, story for kids, water literacy, Water importance, do not waste water lesson, story cum lesson for water, save water, kids and water, marathi article, loksatta article,
बालमैफल : जलसाक्षरता
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Nagpur MIDC police arrested the youth who molested the girl crime news
विवाहितेच्या अंगावर चिठ्ठी फेकली, पुढे झाले असे की…

सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांचे चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत एक विशेष संवेदनशीलता घेऊन येतात. अनेक चित्रपट रसिक चित्रपट या विषयाकडे गांभीर्यानं पाहण्यात सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांच्या चित्रपटांचा मोठा सहभाग आहे. मराठीत ज्यांच्या चित्रपटांशी आपली नाळ जुळलेली आहे असं वाटतं असे काही उत्तम चित्रपट या द्वयीनं तयार केले आहेत. या दोघांच्या चित्रपटांमधून स्त्री कशी दिसते हे पाहणं विशेष ठरतं.

 ‘वेलकम होम’ हा सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर यांचा २०१९ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट. घर हा माणसाच्या जिव्हाळय़ाचा विषय; त्यातून बाईमाणसाच्या तर विशेष जिव्हाळय़ाचा विषय. बाईचा हात न फिरणारी बहुतेक घरं कशी निरस आणि उखीरवाखीर दिसतात. बाईचं घर तुटतं तेव्हा काय होतं, हे पाहण्यासाठी हा चित्रपट जरूर पाहावा. शहरात राहणारं एक सुशिक्षित, सुसंस्कृत आणि श्रीमंत मराठी कुटुंब. अशा कुटुंबात लग्न मोडतं म्हणजे काय होतं, बाईचं घर कोणतं असतं, या मूलभूत प्रश्नांना हात घालणारा आणि संथ लयीत चालणारा चित्रपट आहे.

 ‘आपलं घर कोणतं असतं?’ या प्रश्नाचा शोध महत्त्वाचा आहे. हा प्रश्न पुरुषांनाही पडू शकतो; पण बायकांसाठी या प्रश्नाचं महत्त्व विशेष आहे. कारण मुलगी जन्माला येते ते घर तिचं नाही, हे तिच्या मनावर ठसवलं जातं. माहेर सोडून ती सासरी जाते, ते घरही दुसऱ्याच कुणाचं असतं. लग्नात काही वर्ष घालवून सासरचं घर ‘आपलं’ करण्यात काही वेळेस बायकांची आयुष्यं निघून जातात. तरी कधी तरी एक क्षण असा येतोच, जिथे हे सासरचं घरही तिचं नाही हे तिला जाणवतं. बाईनं घर सोडणं हे कुठल्याही काळात आणि कुठल्याही समाजात प्रतीकात्मक आणि नाटय़मय आहे. इब्सेनच्या ‘डॉल्स हाऊस’ नाटकामधली नोरा घर सोडून गेली, ते एकोणिसाव्या शतकात आणि पश्चिमी संस्कृतीमध्ये. अजूनही बऱ्यापैकी घट्ट विणीच्या, पुरुषसत्ताक, कर्मठ असलेल्या भारतीय संस्कृतीत ही गोष्ट फार सहज स्वीकारली जात नाही. 

हा चित्रपट सुरू होतो तेच सौदामिनीच्या (मृणाल कुलकर्णी) घर सोडून जाण्याच्या घटनेनं. ‘सी.ए.’ असणाऱ्या नवऱ्याशी- सदानंदशी भांडण होऊन सौदामिनी घर सोडून माहेरी आली आहे. बरोबर अल्झायमर आजारानं ग्रस्त सासूबाई आणि दहा-बारा वर्षांची मुलगीही आहेत. हे भांडण काही आजचं नाही. यापूर्वीही या लग्नात बरंच काही घडून गेलेलं आहे. आज एक घाव पडला आहे इतकंच; पण घर सोडून सौदामिनीनं हा घाव घालण्याचं धाडस केलं आहे.

  सौदामिनीच्या माहेरी तिचे वडील अप्पासाहेब (मोहन आगाशे) आणि आई (उत्तरा बावकर) आहेत. धाकटी सडेतोड पत्रकार बहीण मधू (स्पृहा जोशी) आहे. भाऊ (सुबोध भावे) अमेरिकेत स्थायिक आहे. कर्मठ लोक आणि टिपिकल नातेवाईक यांचा नमुना म्हणून अधूनमधून येणारी मावशी (दीपा श्रीराम) आहे. सौदामिनीनं ‘पीएच.डी.’ प्राप्त केली आहे आणि ती कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे. तिचं व्यवस्थित करिअर आहे; पण बऱ्याच सुशिक्षित, चांगली नोकरी करणाऱ्या बायकाही व्यवहारात कच्च्या असतात, तशीच ती कच्ची आहे. घरावर तिच्या नावाची पाटी असली तरी कायद्यानं घर तिच्या नावावर नाही. घराचा प्रॉपर्टी टॅक्स भरला आहे की नाही, ही साधी माहितीदेखील तिला नाही. आर्थिकदृष्टय़ा नवऱ्यावर अवलंबून नसली, तरी भावनिक दृष्टीनं सौदामिनी नवऱ्यावर अवलंबून आहेच.

    माहेरच्या घरी सौदामिनीचा घर सोडून येण्याचा निर्णय तसा फारच सहज स्वीकारला जातो. तितके सुधारक आईवडील तिला लाभले आहेत. बहीण घरातली ‘स्पेस’ कमी झाली म्हणून थोडी चिडचिड करते खरी, तरी मदत करते. भाचीला पंखाखाली घेते. सौदामिनी घर सोडून येण्यानं अवघडली आहे. ही बहिणीची खोली, ही अप्पांची खुर्ची, ही अमेरिकेत असलेल्या भावाची खोली, हे तिला जाणवतंय. ती सतत ‘सॉरी’ म्हणते. आपण काही तरी चूक केली आहे अशी वावरते. माहेरचं कुणीच तिला समजून घेण्यात कमी पडत नाहीत. सौदामिनीचे आईवडील दोघांना स्वत:चं लहानपण आठवतं, तरुणपण आठवतं. आईला त्या काळी केलेल्या लग्नातील तडजोडी आठवतात आणि मन मारलेलं आठवतं. अप्पासाहेबांना त्यांच्या आईचा वैधव्यानंतरचा घर गमावण्याचा संघर्ष आठवतो. या भूतकाळातल्या कहाण्या नेमक्या आहेत आणि सौदामिनीच्या सध्याच्या प्रश्नाशी निगडित आहेत.

  एके काळी सौदामिनीच्या प्रेमात असणारा तिचा मित्र सुरेश मसूरकर (सुमित राघवन) मुंबईहून येऊन सौदामिनीला आधार देतो, समजून घेतो. सुरेश आणि सौदामिनीचा पुण्यातला प्रवास आणि त्यांचे संवाद  आणि अबोल साथ हे सगळं फारच मनस्वी आणि सुंदर आहे. मागे ऐकू येणारं ‘राधे राधे गोबिंद बोलो रे’ हे कृष्ण भजन सुरेशचं सौदामिनीच्या आयुष्यातलं कृष्णसख्याचं स्थान दाखवणारं आहे. सुमित राघवन या अभिनेत्यासाठी ही चार्मिग भूमिका अगदी हातखंडा होती आणि ती त्यानं चोख केली आहे. एके काळी प्रेमात असणारा मित्र लग्नानंतरही टिकून असणं हीच किती दुर्मीळ गोष्ट आहे! असा एखादा खंबीर मित्र विवाहित स्त्रीला असणं, तिला त्याच्यासोबत असा सहज मोकळेपणानं वेळ घालवता येणं, जेवायला जाता येणं, ही तर खास भावे-सुकथनकर चित्रपटातली एक सुरेख ‘अर्बन फँटसी’ वाटते.

   संपूर्ण चित्रपटात सौदामिनीचा नवरा दिसतही नाही. तो नात्यात अप्रामाणिक, स्वैर आहे, हे थोडय़ाफार संवादांतून समजतं. एका प्रसंगातून त्याची वृत्ती मात्र नीट कळून येते. बायको घर सोडून गेल्यावर तातडीनं घराचं कुलूप बदलण्याइतका सौदामिनीचा नवरा वृत्तीनं हलकट आहे. ते कुलूप पाहताच हे घर आपलं नाही हे जाणवून सौदामिनी तुटते. सोडून जाताना विस्कटलेलं घर सौदामिनी जेव्हा पदर खोचून निगुतीनं आवरते, तिथे चहा करून पिते आणि छान आवरलेल्या घराचा निरोप घेते, तेव्हाच्या सौदामिनीच्या भावना अगदी हेलावून टाकणाऱ्या आहेत. नातं तुटलं, घर सुटलं; पण तिचं मन इथं गुंतून राहिलं आहे. मागे वाजणारं ‘किर्र्र रान’ हे गाणं परिणाम दुणावणारं आहे. घर बंद करून जातानाचा मृणाल कुलकर्णीचा अभिनय संयत आहे. सौदामिनीची मुलगी कृत्तिका हिचं काम करणाऱ्या बालकलाकाराचं (प्रांजली श्रीकांत) काम विशेष सहज आणि त्यामुळे छान झालंय. ’आपण बाबाच्या घरी कधी जायचं,’ म्हणून कृत्तिकाचा हट्ट अगदी सहज आणि वाजवी वाटतो. ‘आपलं घर कोणतं?’ हा सौदामिनीच्या मुलीचा प्रश्न साधा वाटतो, तरी गहन आहे. सौदामिनी आणि कृत्तिकामधला तो संपूर्ण संवाद फार महत्त्वाचा आहे.

घर माणसांनी बनतं हे खरं; पण जिथून तुम्हाला कुणी जा म्हणणार नाही ते घर तुमचं असतं. ‘आपलं घर कोणतं?’ हा एक सनातन प्रश्न आहे. बहुतेक वेळेस बाईला घर नसतं. घरावर तिच्या नावाची पाटी असली, तरी घर तिचं नसतं. बहुतेक घरांवर तर बाईच्या नावाची पाटीही नसते. वर्षांनुवर्ष ज्या घरात बाई राबत राहते, प्रेमानं आणि मायेनं जे घर जोपासत त्या जागेला घरपण देत राहते, त्या घरावर कायदेशीर रीतीनं फार क्वचित तिचा हक्क असतो. माहेरच्या घरी आता मुलींना कायदेशीर अधिकार असला, तरी नाती टिकवायला बाईला तो अधिकार अनेकदा सोडूनच द्यावा लागतो. हा मुद्दाही चित्रपटात आला आहे. ती राजकारणं आणि मुलीकडून त्यागाची अपेक्षा हे घरोघरी दिसतं. ‘ओपन रिलेशनशिप’मध्ये असणारी सौदामिनीची बहीण मधू आणि तिचा बॉयफ्रेंड यांचाही ‘शक्यतो घर मांडायलाच नको, म्हणजे तुटायची भीती नाही’ असा अ‍ॅटिटय़ूड नवीन पिढीच्या विचारांशी सुसंगत आहे.

   दु:खाची प्रतवारी लावता येत नाही. ती लावायला जाऊही नये. प्रत्येक माणसाचं दु:ख त्याच्या परीनं खरंच असतं. इतरांना ते राजसी आणि नाजूकसाजूक वाटलं, तरी त्या माणसासाठी तो कोलमडून टाकणारा, पिळवटून टाकणारा अनुभव असतो. अगदी अमेरिकेतून आलेल्या सौदामिनीच्या मैत्रिणीलाही दु:ख आहेच. भले त्या दु:खाचा पोत खास ‘एनआरआय टाइप’ राजवर्खी आहे आणि वरवर हसून साजरं करत ही मैत्रीण अगदी शांतपणे तिच्या दु:खाला वळसा घालून जाते. ही भूमिका इरावती हर्षे यांनी केली आहे.

   या चित्रपटाची खासियत म्हणजे अलंकारिक संवाद. अप्पासाहेबांच्या तोंडी असलेला, ‘ज्याची माणुसकी जागी आहे तो संन्यासी अडकलेलाच राहणार.’ हा संवाद किंवा सौदामिनीचा भाऊ म्हणतो, ‘तडजोड तपशिलात करावी, मूल्यांमध्ये नाही.’ असे बरेच संवाद तुम्हाला विचार करायला आणि स्वत:त डोकावून पाहायला भाग पाडतील. ‘जबाबदारी जो मानतो त्याची ती असते.’ हे सौदामिनीचं फार महत्त्वाचं वाक्य आहे. आजारी सासू आणि मुलगी आता यापुढे सौदामिनीची जबाबदारी असणार आहेत ही लख्ख जाणीव इथे होते. सतत दुखऱ्या डोळय़ांनी पराभूत वावरणारी सौदामिनी तिथे खंबीर झालेली दिसते. सौदामिनीला आधार देणाऱ्या माणसांची कमतरता नाही. लग्न संपलेलं असलं तरी तिला वडिलांचं घर आहे; पण तरीही तिचं स्वत:चंच घर असणं आवश्यक आहे. ‘वेलकम होम’ पाहताना सतत वाटतं, की सौदामिनीच्या आयुष्यात नवरा सोडून इतके समंजस पुरुष आहेत म्हणून तिचं आयुष्य लवकर सावरेल. उच्चविद्याविभूषित, सुधारक विचारांचे वडील आहेत, समंजस मित्र आहे आणि घरावर अधिकार गाजवण्यापेक्षा घरात तिचं स्वागत करायला उत्सुक असणारा भाऊ आहे. तसंच तिच्या माहेरच्या घरी भावजय नाही हेही महत्त्वाचं ठरतं. हे असं सगळं असलं, तरी कुठल्याही बाईसाठी घर सोडण्याचं दु:ख फार मोठं असतं आणि ते तिचंच असतं. कदाचित काही बायका घरात अति जीव ओततात आणि गुंतवून घेतात म्हणून त्यांच्या नशिबात असं दु:ख येत असेल. 

    या चित्रपटात सगळेच कलाकार तगडे आणि उत्तम काम करणारे असले तरी हा चित्रपट संपूर्णपणे मृणाल कुलकर्णीच्या खांद्यावर तोलला जाणार होता. तो त्यांनी समर्थपणे पेलला आहे. लग्न आणि घर तुटल्याची जखम आणि वेदना सौदामिनीच्या डोळय़ांत सतत ठसठसताना दिसली आहे. थोडी भांबावलेली, खूप दुखावलेली, जराशी अवघडलेली सौदामिनी आपली वाटते. मुलीवर चिडणारी आणि तिचे लाडही करणारी, आजारी सासूची जबाबदारी न टाळता तिचं सगळं मनापासून करणारी, एक निडर, खंबीर स्त्री मृणाल कुलकर्णी नीट उभी करतात.

   हा चित्रपट कदाचित सगळय़ांना ‘अपील’ होणार नाही. इथे कसलाही मेलोड्रामा नाही, बटबटीतपणा नाही. प्रत्यक्ष आयुष्य जसं साधं, शांत लयीत चालतं, तशीच या चित्रपटात सगळी माणसं वावरतात. बिरडय़ा सोलत बसलेली नवरा-बायको घरी आलेल्या मुलीविषयी चर्चा करतात, वृद्ध वडील कानटोपी घालून सकाळचा पहिला चहा करतात, मावशी गावाहून येताना नारळाच्या वडय़ा आणते, मावशी-भाची मटार सोलत गप्पा मारतात, लहान मुलगी हट्ट करून मॉलमध्ये जायला लावते.. हे सगळं काही आपल्या घरात दिसणार आहे! अगदी मधूनं पत्रकारिता करताना ‘रेव्ह पार्टी’ कव्हर करणं आणि त्या अनुषंगानं आलेले काही सीन्सदेखील फारच साधे आहेत. पण संवेदनशीलता, संयम आणि जगाकडे पाहण्याची तरल, निकोप दृष्टी शाबूत असेल तर मात्र हा चित्रपट अवश्य पाहावा.

    स्त्री सक्षमीकरणाचा विषय येतो, तेव्हा मध्यमवर्गाकडे अनेकदा पद्धतशीरपणे दुर्लक्ष केलं जातं. ‘वेलकम होम’ म्हणजे या विषयावरचा नेटका, संयमित चित्रपट अनुभव आहे. लग्न मोडण्याची अशी घटना कुठल्या घरात घडू नये हे खरं; पण घडलीच तर त्या स्त्रीला आधार कसा देता येईल, याचा या चित्रपटात एक वस्तुपाठच दिला आहे.

 सुमित्रा भावे, सुनील  सुकथनकर यांच्या चित्रपटनिर्मिती संस्थेनं- ‘विचित्र फिल्म्स’नं स्त्रीवाद, संवेदनशीलता, सुधारकता, लोकशिक्षण आणि पुरोगामी मूल्यं दाखवणारी चित्रपटनिर्मिती केली. उथळपणा, बेगडीपणा आणि चकचकीतपणाचा आरोप असणाऱ्या  चित्रपटसृष्टीत ही खरोखर किती वेगळी आणि दर्जेदार घटना आहे! ‘वेलकम होम’देखील याला अपवाद नाही. हा चित्रपट ‘हॉटस्टार’ या ‘ओटीटी’वर उपलब्ध आहे.