छाया दातार
१९७४मध्ये ‘समानतेकडे’ हा भारतातील स्त्रियांच्या स्थितीचे विश्लेषण करण्यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल प्रसिद्ध झाला आणि भारतीय स्त्रियांच्या चळवळीला नव्याने उभारी आली. त्याचे श्रेय समितीच्या सचिव वीणा मझुमदार यांच्याकडे जाते. मुलग्यांच्या तुलनेत कमी असलेले मुलींच्या जन्माचे प्रमाण आणि औद्याोगिकीकरणामुळे रोजगारात कमी झालेले स्त्रियांचे प्रमाण याकडे त्यांनी लक्ष वेधले आणि समाजाच्या दृष्टीने ‘अदृश्य’ असलेल्या स्त्रियांचा अभ्यास व्हावा यासाठी त्या प्रयत्नशील राहिल्या. त्यातलाच एक भाग म्हणजे अनेक ठिकाणी स्थापन झालेली स्त्री अभ्यास केंद्रे. भारतीय स्त्रीमुक्ती संकल्पनेच्या दोन्ही पैलूंची, शिक्षण आणि चळवळ यांची मुहूर्तमेढ करणाऱ्या वीणा मझुमदार यांच्याविषयी…
१९७४मध्ये ‘Towards Equality’, म्हणजेच ‘समानतेकडे’ नेणारा अहवाल प्रसिद्ध झाला, त्याचे श्रेय भारत सरकारने १९७१मध्ये त्यासाठी, भारतातील स्त्रियांच्या स्थितीचे विश्लेषण करण्यासाठी नेमलेल्या समितीकडे आणि १९७३मध्ये त्या समितीच्या सचिवपदी काम करणाऱ्या वीणा मझुमदार यांच्याकडे जाते. ज्या अहवालाने स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणाऱ्या अनेक स्त्रियांच्या निवृत्तीनंतर काहीशा शिथिल पडलेल्या स्त्रियांच्या चळवळीला उभारी आली, असं मानलं जातं तो हा अहवाल.
त्यात दोन मुद्दे महत्त्वाचे निघाले. एक म्हणजे लिंग गुणोत्तर (सेक्स रेशो) म्हणजेच लोकसंख्येमध्ये १००० पुरुषांच्या मागे केवळ ९३२ स्त्रिया आहेत हा एक निष्कर्ष. एवढंच नव्हे, तर पाच वर्षं वयोगटातील बालकांमध्ये तर हे प्रमाण याहूनही खाली, १००० मुलग्यांच्या मागे केवळ ८८९ मुली इतकंच आहे. दुसरा मुद्दा होता की, शेतीप्रधान देशातून औद्याोगिकीकरणाकडे जेव्हा देश वळला तेव्हा स्त्रियांमधील गरिबीचं प्रमाण खूप वाढलं. रोजगारामध्ये स्त्रियांचं प्रमाण फारच कमी होतं. या अहवालानंतर वीणा या ‘इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च’ या संस्थेनं स्थापन केलेल्या ‘स्त्री अभ्यास’ या नवीन विभागाच्या कार्यक्रम संचालक झाल्या. १९७५ ते १९८० ही पाच वर्षं त्यांनी ते पद भूषवलं, एवढंच नव्हे, तर समाजविज्ञान शास्त्राच्या (Social Science) नव्या शाखेला जन्म दिला. त्यानंतर त्यांनी ‘सेंटर फॉर विमेन्स डेव्हलपमेंट स्टडीज’ ही संस्था १९८०मध्ये स्थापन करून महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आणि १९९१मध्ये तेथून निवृत्त झाल्या. पुन्हा एकदा त्यांनी १९९६ ते २००५ या काळामध्ये तेथेच अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं. आज ‘विमेन्स स्टडीज’ किंवा ‘स्त्री अभ्यासा’ला एक विशिष्ट वळण मिळालं आहे. त्याचं महत्त्व असं आहे की, त्यांनी विद्वत्ता व कृती यांचा संगम करून ‘कृती संशोधन’ ही नवी शाखा तयार केली.
स्त्रियांच्या जगण्याचा अभ्यास करायचा तर स्त्रियांना बोलतं करणं आवश्यक आहे. नुसतं निरीक्षण व संख्यात्मक संशोधन करून त्यांच्या मनाचा, आकांक्षांचा, अस्मितांचा, त्यांच्या उद्यामशीलतेचा वेध घेणं शक्य नाही हे त्यांच्या लक्षात आलं होतं. या नव्या संस्थेमार्फत त्यांनी प्रथम पश्चिम बंगालमधील बांकुरा जिल्ह्यातील शेतमजूर स्त्रियांना बोलतं केलं, त्यांना संघटित होण्यासाठी उद्याुक्त केलं. त्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत, नागरिक म्हणून त्यांचे हक्क काय आहेत याची त्यांना जाणीव करून देण्यात अशा प्रकारच्या अभ्यासांचा आणि या पद्धतींचा चांगला उपयोग होतो, असं लक्षात आलं आहे. आज देशपातळीवर अनेक विद्यापीठांतर्गत ‘स्त्री अभ्यास कें द्र’ स्थापन झाली आहेत. म्हणजेच ती एक चळवळच बनली आहे. पुढे या सर्व ‘स्त्री अभ्यास केंद्रां’ना एकत्र आणणारी एक संस्था निर्माण केली गेली. तिचं नाव ‘इंडियन असोसिएशन ऑफ विमेन्स स्टडीज’ (IAWS), जी मुख्यत: दर तीन वर्षांनी परिषदा भरवून या अभ्यास केंद्रांमध्ये शिकवणाऱ्या व शिकणाऱ्या, तसेच चळवळीमध्ये कृतिशील स्त्रियांना एकत्र येऊन चर्चा करण्याचे नवे कल, स्त्रीविषयक नवं संशोधन समजून घेण्याची संधी देते, जसे ‘समलैंगिकता’ आणि ‘पारलैंगिकता’ हे विषय. तंत्रज्ञान व स्त्रिया इत्यादी. केवळ ‘बहिणीला रोख पैशांची मदत’ अशा प्रकारे लाचखोरी धोरणं राबवून नारीशक्ती वाढवण्याच्या आजच्या धोरणांपेक्षा हे कृती कार्यक्रम व संशोधन प्रकल्प खूप वेगळे आहेत हे लक्षात घेणं आवश्यक आहे.
वीणा यांचा जन्म २८ मार्च १९२७ रोजी झाला आणि ३० मे २०१३ रोजी वयाच्या ८६व्या वर्षी त्यांचं निधन झालं. प्रकाश मझुमदार हे त्यांचे वडील व्यवसायाने इंजिनीअर होते आणि त्या पाच भावंडांमध्ये सर्वांत लहान होत्या. त्यांचं शालेय शिक्षण कलकत्याला (आता कोलकाता) येथे झालं आणि त्या ‘बनारस हिंदू विद्यापीठा’त शिक्षणासाठी गेल्या. तिथून पुन्हा कोलकाताला ‘आशुतोष महाविद्यालया’मध्ये शिकायला आल्या. तेथे त्यांच्यातील बंडखोर वृत्तीला वाव मिळाला. ‘विद्यार्थिनी युनियन’च्या त्या सचिव झाल्या. त्या वेळी त्यांनी हिंदू कायद्यामध्ये सुधारणा करणाऱ्या रामा राव यांच्या समितीच्या काही सूचनांना पाठिंबा देण्यासाठी बैठक बोलावली होती. विशेषत: वडिलोपार्जित संपत्तीमध्ये स्त्रियांना वारसा हक्क मिळावा, अशी ती सुधारणा होती. तो हक्क २००५ मध्ये दिला गेला, परंतु वीणा मझुमदार यांनी त्या काळी म्हणजे १९४७ मध्ये याला पाठिंबा दिला होता हे महत्त्वपूर्ण आहे. वीणा या ‘ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी’मध्येही शिकायला गेल्या होत्या. तेथे त्यांना डी.फिल. (Doctor of Philosophy) पदवी मिळाली होती. १९५१मध्ये त्या ‘पटना विद्यापीठा’मध्ये शिकवायला गेल्या आणि तेथेही त्या ‘पटना विद्यापीठा’च्या शिक्षकांच्या संघटनेच्या सचिव झाल्या. त्यानंतर त्यांनी ओडिशामधील ‘बेरहामपूर विद्यापीठा’मध्ये काही काळ शिकवलं. त्या दिल्लीला आल्या त्या ‘युनिव्हर्सिटी ग्रॅन्ट कमिशन’ (यूजीसी)मध्ये शिक्षणाधिकारी (एज्युकेशन ऑफिसर) म्हणून. त्या वेळी त्यांना शिमल्याच्या ‘अॅडव्हान्स स्टडीज संस्थे’कडून संशोधन प्रकल्पाची संधी मिळाली. प्रकल्पाचं नाव होतं, ‘युनिव्हर्सिटी एज्युकेशन अँड सोशल चेंज’.
वीणा मझुमदार यांनी पुष्कळ लेखन केलं, पण ‘मेमॉयर्स ऑफ रोल्लिंग स्टोन’ या त्यांच्या आत्मकथनामध्ये त्यांच्यामधील लिंगभावविषयक चिंतनाचं स्फुल्लिंग कसं शिलगावलं गेलं याची माहिती मिळते. त्यांचा जन्म हा स्वातंत्र्य युद्ध काळातील आहे आणि त्याचा त्यांचे व्यक्तिमत्त्व घडताना प्रभाव पडणं स्वाभाविक होतं. त्या ‘दिल्ली विद्यापीठा’मध्ये शिकायला आल्या होत्या, त्या वेळी संविधान समितीच्या बैठका सुरू झालेल्या होत्या. राजकारणशास्त्राच्या त्या विद्यार्थिनी असल्यामुळे संविधान समितीच्या सभा ऐकण्यासाठी त्या जात असत. या सभा त्या कधी कधी गॅलरीमध्ये बसून ऐकत असत. तेथे भाषण देणारी नेते मंडळी म्हणजे आकाशातील चांदण्यांची मांदियाळी होती. त्या काळातील आठवणारे सर्वात महत्त्वाचे क्षण म्हणजे ‘इंडिया गेट’समोर ब्रिटिशांचे युनियन जॅक हळूहळू खाली येताना आणि भारताचा तिरंगा हळूहळू वर चढत जाताना त्यांनी पाहिला होता. ब्रिटनमध्ये ऑक्स्फोर्ड येथील ‘ह्युग महाविद्यालया’त शिकत असताना महात्मा गांधींच्या हत्येची बातमी त्यांनी ऐकली होती. त्यावर कॉमेंट म्हणून डेव्हिड लोव यांचं कार्टून पाहिलेलं त्यांना स्मरतं, असे त्या म्हणतात. हातात बाऊल घेऊन असलेला सॉक्रेटिस, क्रॉसवर, सुळावर चढवलेला ख्रिास्त आणि हातात काठी घेऊन चालणारे गांधी. महात्मा गांधीजींचं महत्त्व त्यांना असं जाणवलं. जागतिक पटलावर ज्यांची नोंद घेतली गेली. त्या स्वातंत्र्यपूर्व काळाचा अतूट ठसा त्यांच्या जीवनावर उमटलेला होता असं जाणवतं. अशी व्यक्ती स्वातंत्र्योत्तर काळामध्ये तिचा ठसा उमटवण्यास तयार झाली असे म्हणता येईल. पहिला अनुभव ओडिशामधील ‘बेरहामपूर विद्यापीठा’मध्ये आला. तेथे त्यांनी प्राध्यापकांची संघटना बांधून प्रशासनाला धक्का मारण्याचा आणि जुन्याच्या जागी काही नवीन प्रथा, नवीन अभ्यासक्रम आणण्याचे प्रयत्न केले. अर्थात त्याचे चटकेही भोगले. त्या वेळी १९५२ मध्ये पटना येथे शिकवत असताना त्यांचा विवाह शंकर मझुमदार यांच्याशी झाला. त्यांना पुढे चार मुलं झाली. त्यामुळे या सर्व व्यावसायिक कारकीर्दीमध्ये सतत घरगुती कामं, ताणतणाव आणि बाहेरची आव्हानं या सर्वांना तोंड देताना स्त्रियांच्या प्रश्नांचं स्वरूप आणि गांभीर्यही जाणवणं स्वाभाविक होतं. या सर्वांचं प्रतिबिंब १९७४ मध्ये बाहेर आलेल्या अहवालामध्ये पडलेलं दिसतं. हजारो वर्षांच्या स्त्रीविषयक भ्रामक समजुती, सांस्कृतिक व्यवहार हे सर्व खिजगणतीत नसलेली सरकारी निर्जीव नोकरशाही या सर्वांना पुरून उरून हा अहवाल त्यांनी प्रसिद्ध केला. अर्थात त्या त्याचं श्रेय प्रस्थापितातील काही लोकांना जरूर देतात. उदा. जे. पी. नाईक यांना त्या ‘दूरदर्शी नोकरशहा’ म्हणतात.
नव्या आव्हानांचं वर्णन त्या अशा तऱ्हेनं करतात. हे नवं काम म्हणजे सामुदायिकपणे नवा भारत, नवं जग, त्याच वेळी आपला भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ याचा अर्थ शोधण्यासाठी वैचारिक चौकटीचा शोध घेत असताना श्रम करणाऱ्या गरीब स्त्रिया, ग्रामीण भागातील आणि शहरीसुद्धा, यांच्या नजरेतून आपण पाहिलं पाहिजे, याचं खोलवर भान त्यांना येत गेलं.
१९७१च्या जनगणनेचं विश्लेषण अशा तऱ्हेनं करणं आवश्यक होतं की ज्यामुळे स्त्रियांची परिस्थिती जी सर्व वर्गातील, सर्व जातीतील, सर्व धार्मिक विभागांतील आहे, ज्यांचं सीमांतीकरण (Marginalization) झालेलं आहे, ज्या अदृश्य केल्या आहेत आणि गरिबीच्या ओझ्याखाली चिरडल्या गेलेल्या आहेत. त्यांना दृश्य करणं आवश्यक होतं. आणि त्या कौतुकाने सांगतात की, ‘आम्ही समितीमधील सभासद ‘सामुदायिक विवेक’ पद्धतीने हे सर्व करू शकलो. खरं म्हणजे हा अहवाल सरकारच्या कामाबद्दल खूपच गंभीररीत्या टीका करणारा होता. पण सरकारमधील सर्वांना त्याबद्दल माहिती होण्याच्या आतच हा अहवाल लोकसभेमध्ये ठेवला गेला आणि तो मंजूरही झाला.’ त्याबद्दल वीणा मझुमदार सरकारमधील काही मदतनीस लोकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. त्याच वेळी आपल्या आत्मकथानामध्ये त्या कबूल करतात की, ‘बलात्कार’ आणि ‘हुंडाबळी’ या दोन घटनांचा शोध घेण्यात आम्ही कमी पडलो.
माझा स्वत:चा वीणा यांच्याशी खूप जवळून संबंध आला नाही. पण पुणे येथे झालेल्या ‘इंडियन असोसिएशन ऑफ विमेन्स स्टडीज’च्या परिषदेला त्या आल्या होत्या. त्या परिषदेची जबाबदारी त्या काळातील सचिव म्हणून मी आणि रोहिणी गवाणकर यांनी घेतली होती. तेथे ‘Nurturing Nature’ या माझ्या पुस्तकाचं प्रकाशन त्यांच्या हस्ते झालं होतं. त्यांचं प्रसन्न हसणं आणि विनोदबुद्धी सतत जागृत असणं हे त्यांचे विशेष मला नेहमी जाणवतात. १९९८ मध्ये पुण्याला झालेल्या त्या परिषदेच्या वेळीच अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना पोखरण येथे आण्विक बॉम्बची चाचणी केली गेली होती. त्या वेळी आण्विक शक्तींना विरोध आणि शांततेसाठी लढा, अशा मागण्या घेऊन परिषदेला आलेल्या सर्व सभासदांनी मोर्चा काढला होता. त्यात वीणा मझुमदार सामील झाल्या होत्या.
स्त्रियांना बोलतं करून त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी कृती कार्यक्रम व संशोधन प्रकल्पाची सुुरुवात करणाऱ्या, त्यासाठी ‘स्त्री अभ्यास केद्रां’ना चालना देणाऱ्या वीणा मझुमदार यांचे कार्य स्त्री चळवळींचा मार्ग मोकळा करणारंच ठरलं आणि म्हणूनच चिरस्थायी झालं.