मोनिका गजेरन्द्रगडकर

भीती ही संकल्पनाच अस्तित्वात नसती तर? याच भावनेनं आजवर आपल्याला कण्यातून थंड शिरशिरी आणत कित्येक अप्रतिम भयपटांचा आनंद घेऊ दिलाय. याच भावनेनं जगभरात अनेकांना ‘स्वर्गनरका’च्या धाकात ठेवलंय. नवरसातील हा रस माणसाला त्याच्या ‘माणूस’ म्हणून असलेल्या बऱ्यावाईट, प्रसंगी अनाकलनीय वागण्याची जाणीव देतो… म्हणून भीती तर हवीच!

भयाची थरकाप उडवणारी, गठाळून टाकणारी पहिली जाणीव, पहिला स्पर्श कधी झाला हे सांगता येतं का? मला वाटतं, भय हे माणसाच्या जन्माबरोबरच त्याला चिकटून येतं. एखाद्या नागिणीसारखी ही भीती, तिचा अदृश्य फणा माणसांच्या आयुष्यावर डोलत असतो. मला वाटतं, ‘कोऽहम’ म्हणत आईच्या गर्भशयात पिशवीत नऊ महिने आईच्याच श्वासांतून श्वास घेत ऊबदारपणे वाढत असलेला तो सुरक्षित जीव जेव्हा या विश्वाच्या कोलाहलात पहिलं पाऊल टाकतो, तेव्हा त्याला या विश्वाचीच भीती वाटून भयाची पहिली चरचरीत जाणीव होते, नि तो जीव भयभीत होऊन पहिला टाहो फोडतो. तेव्हापासूनच मग वेगवेगळ्या भीतीची कंपनं माणसाच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्याला अशीतशी भेदरवत, दचकवत राहतात. ज्या मृत्यूचं भय माणसाला आयुष्यभर सावलीसारखं सोबत करत असतं, त्याच मृत्यूच्या आलिंगनानं माणूस अखेरीस या सगळ्याच भयातून मुक्त होऊन जातो!

हेही वाचा : ‘एका’ मनात होती : पुरुषी एकटेपण

विचारच केला, तर समजा, ही भीतीची भावनाच जर नसती तर?… पण आयुष्यात भय आहे, म्हणूनच तर धाडस आहे. धाडस आहे म्हणून आयुष्यात थरार आहे. थरार नसता तर आयुष्य मिळमिळीत झालं असतं. भीतीनं थरारून जातानाच तर आयुष्याचं चैतन्य क्षणात उजळून जातं. या भीतीवर विजय मिळवून पुढे पावलं टाकण्यात, विजय प्राप्त केल्याची जी ‘अचीव्हमेंट’ वाटते, तोच तर आयुष्याचा अर्थ म्हणून आपल्या हाती येतो. माणूस भीतीनं होत्याचा नव्हताही होतो… पण तरीही विचार केला, की ही भीती मनात नाहीच निर्माण झाली, तर आपण आपल्या ध्येयाकडे पावलं टाकली असती? भीती नसती, तर आयुष्याची भेसूरताही कळली नसती. ना पाप-पुण्याच्या, नीती-अनीतीच्या संकल्पनांचा जन्म झाला असता. आपल्याला आपल्या स्वत:चाही एक धाक असतोच की! आपल्या सद्सद्विवेकबुद्धीचा धाक! विविध धर्मांनी स्वर्ग नि नरक या संकल्पनांना म्हणूनच तर महत्त्व दिलं आहे. पापं केलीत, तर तुम्ही नरकात जाल. ही धर्मानं निर्माण केलेली दहशत- हीदेखील एक भीतीचंच तर रूप!

नव्या तंत्रविज्ञानाच्या आहारी गेलेल्या आजच्या शुष्क होत चाललेल्या जगाच्या संवेदनांना जागवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग कॉर्पोरेट क्षेत्रात केले जात आहेत. त्यात तुमची हरवत चाललेली संवेदनशक्ती वाढवण्यासाठी, याच भीतीला सामोरं जात, ती ओलांडून तुम्ही तुमच्या संवेदना तीव्र करण्याची तंत्रं विकसित करत होत आहेत. नुकतंच वाचनात आलं, की हैदराबादच्या एका मॉलमधे ‘Dialogue in the dark’ हा एक खेळ आहे. दृष्टिहीन व्यक्ती त्यांच्या काळोख्या विश्वात कसं जगत असतील, याचा तुम्ही या खेळात अनुभव घ्यायचा. तो घेतल्यानं तुम्हाला या व्यक्तींबद्दलची करुणा जागृत होईल. घनगर्द म्हणता येईल अशा अंधारात तुम्ही उतरायचं, नि अंधांची दृष्टिहीनता काही काळ अनुभवायची. इथला घनदाट कृत्रिम अंधार अनुभवताना बरेच लोक त्या अंधाराला घाबरून काही क्षणांतच किंचाळत बाहेर उजेडात येतात. तेव्हा भय हा माणसावर अधिराज्य गाजवणारा सर्वव्यापकत्व असणारा नवरसातील एक रस आहे, हे जाणवतं. पण गंमत अशी, की याच भावनेचा आधार घेऊन हॉलीवूडच्या सस्पेन्स चित्रपटांचा प्रसिद्ध दिग्दर्शक अल्फ्रेड हिचकॉकनं आपल्याला भयाचा कलात्मक अनुभव देत गुंगवून टाकलं. तो म्हणाला होता, ‘My good luck in life was to be a really frightened person. I am fortunate to be a coward to have a low threshold of fear.’ तो असंही म्हणत असे, की प्रेक्षकांना भीती समजायला अवघड नसते. आपण सगळेच लहान मुलासारखे घाबरत असतो. भीतीची मुळं प्रत्येकातच असतात. लहानपणी हिचकॉक यांनी स्वत:च्याच घरी चोरी केली. त्या वेळी त्यांच्या वडिलांनी पोलिसांना, लहान अल्फ्रेडला त्यानं केलेल्या गुन्ह्याची कायम आठवण राहावी म्हणून एक दिवस कोठडीत ठेवायला सांगितलं. त्या कोठडीतल्या काळ्याकभिन्न अंधाराची लहानग्या हिचकॉकला जी भीती वाटली, त्यातूनच त्याला भयाचं प्रचंड आकर्षण (?) वाटत गेलं आणि भीती हीच त्यांच्या चित्रपट निर्मितीमागचा प्रेरणास्राोत ठरली. मग त्याच्या एकेक चित्रपटांतून त्यानं रहस्याची जोड देत भीती ही भावना इतकी कलात्मकरीत्या सुंदर करून टाकली, की तो भीतीचा सर्वांगावर काटा फुलवणारा अनुभव- त्यातली गूढता अनुभवण्यासाठी लोकांनी त्या चित्रपटांवर भरभरून प्रेम केलं. जणू काही हिचकॉकनं चित्रपटातून निर्माण केलेल्या भीतीवरच प्रेक्षकांना प्रेम करायला भाग पाडलं. म्हणजे, ज्या भयातून मुक्ती हवीशी वाटते, ती भयाची भावना त्यानं लोकांच्या अशी जवळ आणली. चित्रपटातला वा भयकथांतला हा भीतीचा थरार जेव्हा असं कलात्मक रूप धारण करून अवतरतो, तेव्हा आपल्याला ती भीती मुद्दाम अंगावर घ्यावीशी वाटते. भीती अशी मग ‘फँटसी’ वाटू लागते. मनाला एका अद्भुततेच्या पातळीवर नेणारी. प्रत्यक्ष अनुभूतीशिवायचा धक्का, बरोबरीनं गूढरम्यतेचा आनंदही ती देते. तो कल्पित असतो खरा, पण दुसरीकडे मात्र आयुष्याची दचकवणारी विचक्षणता दाखवणारा, अनाकलनीयतेचा प्रत्यय देणाराही असतो.

हेही वाचा : इतिश्री : दु:खाचा हात सोडायलाच हवा…

कुठलीही भीती आपल्याला आपल्या अंताच्या- मरणाच्या एका अंतिम सत्यतेच्या जाणिवेपर्यंत घेऊन जाते. संकटाची भीती का वाटते, कारण ते संकट कदाचित आपला विध्वंस घडवणार नाही ना? याची वाटते. म्हणूनच रवींद्रनाथ टागोरांनी या भयावर विजय मिळवता आला पाहिजे, असं म्हणत लिहिलंच आहे, की ‘विपत्तीमधे तू माझं रक्षण कर, ही माझी प्रार्थना नाही. विपत्तीमधे मी भयभीत होऊ नये, एवढीच माझी इच्छा!’

भीतीचा माझ्या लहानपणीचा एक प्रसंग आजही मला शहारून टाकतो. माझ्या शाळेच्या पाठीमागची बाजू पुण्यातल्या ‘भारत इतिहास संशोधन मंडळा’च्या मागच्या बाजूस लागून होती. मध्ये कंपाउंड नव्हतं. दगडी, बंद खिडक्या-खिडक्यांची ती मंडळाची इमारत वर्दळ नसल्यानं निपचित, मुकाट असायची. आजूबाजूला विलायती चिंचांची पिसाटलेली झाडं! एका वर्षी शिक्षकांचा संप चालू होता, नि शाळेला भलीमोठी, अमर्याद सुट्टी मिळाली होती. माझ्या घराला लागूनच शाळा असल्यानं वर्ग बंद असले तरी पूर्ण शाळा आम्हा मुलांना खेळायला उपलब्ध होती. त्या दिवशी आम्ही मित्रमैत्रिणींनी लपाछपी खेळायला ही भलीमोठी रिकामी शाळा निवडली. मी खेळाच्या नादात ‘भारत इतिहास संशोधन मंडळा’च्या पहिल्या मजल्याच्या खिडकीच्या सज्जावर उतरले नि कासवासारखी शरीर मुडपून लपून बसले. एकेक जणांचा शोध लागत गडी आऊट होत होते, पण मी अशा ठिकाणी लपले होते की कुणालाच सापडत नव्हते. दरम्यान, शाळेच्या रखलवालदारानं सगळ्या मित्रमैत्रिणींना शाळेबाहेर काढलं. मी एकटीच त्या उंच सज्जावर मला शोधण्याची वाट पाहत राहिले. बराच वेळ कुणीच कसं येत नाही, हे लक्षात आल्यावर मी सज्जावर उठून उभी राहिले आणि जोरजोरात हाका मारत सुटले. पण लक्षात आलं, की आपण या परिसरात अगदी एकटे उरलो आहोत. रखवालदारानं शाळेचं गेटही बंद केलं असावं. भीतीनं थरकाप उडत माझ्या हाका चिरक्या होत गेल्या. माझीच नि:स्तब्ध शाळा मला गूढ, अनोळखी जणू काही ती माझ्यावर दबा धरून चाल करते आहे असं भासू लागलं. संध्याकाळची उन्हं उतरली होती. हळूहळू निर्जन, सुनसान शाळेत अंधार भरत चालला होता. त्या दगडी इमारतीवर मी अशी एकटीच. एखाद्या उंच कराल कड्यावर अडकल्यासारखी. खाली बघावं, तर खोल दिसणारी जमीन. विलायती चिंचेच्या झाडांचे सांगाडे त्या संधीप्रकाशात धूसर होत चाललेले. मला खिडकीच्या सज्जावर सहज उतरता आलं होतं, पण आता ना वर चढता येत होतं, ना खाली उडी मारता येत होती. भीतीच्या विळख्यात अडकलेला माणूस अगदी एकटा असतो आणि त्याचं हे एकटेपणच त्याच्याभोवती अवाढव्य भेसूर भीतीचा घट्ट वेढा घालतं. मग स्वत:ला स्वत:चीही सोबत वाटत नाही. तर स्वत:चीच स्वत:ला एक विचित्रशी भीती वाटू लागते. अशा वेळी भय नावाची महाकाय शक्ती ‘आ’ वासते, नि स्वत:च्या जबड्यात त्या माणसाला आत आत खेचू लागते. आठ वर्षांच्या माझ्या इवल्या मनाला त्या क्षणी जर कुठली जाणीव झाली असेल, ती ही, की आपण आता फक्त मरूच तेवढे शकतो! मला खाली उतरायचं, तर पहिल्या मजल्यावरून उडी मारावी लागणार होती. छातीतली धडधड वाढवत मन शंभरदा उडी मारण्याचा हिय्या करत होतं. पण पाऊल आपोआप मागे येत होतं. शेवटी मी धाडस केलं, नि डोळे मिटून खाली गप्पकन उडी घेतली. माझा डावा पाय वाकडा झाला होता, तो ओढत ओढत त्या सुनसान शाळेतून भूत मागे लागावं तशी मी धावत सुटले होते. सुनसान, निर्जन परिसरात मी एकटी… हे एकटेपणच भयाच्या सावल्या माझ्यापुढे नाचवत मला मरणाच्या वाकुल्या दाखवत दचकवत होतं.

हेही वाचा : सांधा बदलताना : खुरट(व)लेली रोपं!

कुठल्याही भयाच्या तळाशी मरणाची एक सुप्त जाणीव लवलवती असतेच. भयाचा अनुभव कोणताही असो, पण त्यातून आपल्या जिवाला काही होणार तर नाही? या विचारानंच त्या भयाला मरणगंध लगटून येतो! ‘भय इथले संपत नाही… मज तुझी आठवण येते…’ असं आईच्या मृत्यूमुळे जगण्याचंच भय वाटणाऱ्या कवी ग्रेसांची ही भावना जगण्यातल्या वेदनेतला भयसंकेत नोंदवणारी.

माणूस आहे तिथे भय त्याचा पाठलाग करत येणारच. मग या भयाचं भय कशाला वाटावं? ते अनुभवतच, त्याच्याशी लढतच तर आपलं माणूसपण सिद्ध करत राहायचं!

monikagadkar@gmail.com