सरला भिरूड
‘‘आमच्या ह्यांना माझ्या हातचाच चहा लागतो…’’ हे वाक्य ऐकताना त्यातली प्रेमळ काळजी जाणवते, परंतु त्यामागे भावनिक जबाबदारीचं ओझंही लपलेलं असतं, त्यात तिच्या स्वत:च्या ओळखीचा बंदिस्तपणा आहे, हे अनेकदा त्या स्त्रीच्या लक्षातही येत नाही आणि मग ते तिचं कर्तव्यच होऊन जातं, ते काम उरत नाही. साहजिकच त्याचं मूल्यमापनही होत नाही. गृहिणी अर्थात घराची स्वामिनी अनेकदा ‘पोळ्यांच्या वर्तुळात कैद झालेलं आकाश’ हाच आपला अवकाश मानू लागते… ३ नोव्हेंबरच्या ‘गृहिणी दिना’ निमित्ताने खास लेख.

‘‘मला ना या ‘रांधा, वाढा, उष्टी काढा’चा कंटाळा आला आहे. आधी आपली मुलं आणि आता नातवंडं सांभाळा, यातून कधी सुटका होईल कोण जाणे?’’ घरोघरी स्वयंपाक करून पोट भरणारी सिंधू मावशी हे म्हणते, भांडीधुणी करणारी आशा मावशीही हेच बोलते, शिक्षिका म्हणून निवृत्त झालेली सुजाताही हेच म्हणते आणि प्रसिद्ध कारखानदार आप्पासाहेब यांची पत्नी सुवर्णाचंही हेच म्हणणं असतं…

आजच्या बदलत्या काळातल्या काही स्त्रियांचा अपवाद वगळता अन्य बहुसंख्य स्त्रियांच्या बाबतीत हेच घडतं. ‘स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता’ हे आजही असंख्य भारतीय स्त्रियांचं सामूहिक मनोगत आहे. करिअर, नोकरी करणाऱ्या स्त्रीलाही ते सुटलेलं नाही. हे तिचं कर्तव्य मानलं गेलं आहे, काम नव्हे.

‘गृहिणी’ हा शब्द संस्कृतमधील ‘गृह’(घर) आणि ‘इणी’ (असलेली स्त्री) या शब्दांपासून तयार झाला आहे. त्यामुळे ‘गृहिणी’ म्हणजे घराची मालकीण किंवा घराची स्वामिनी असा अर्थ होतो. परंतु वास्तवात विरोधाभासच पाहायला मिळतो अनेकदा. आजही अनेक घरी ‘‘आमच्या ह्यांना माझ्या हातचा चहा लागतो.’’, ‘‘स्वयंपाकाची मावशी फक्त पोळ्या करते, पण मी स्वत: फोडणी घालते.’’, ‘‘मला माझ्या हातचीच चकली आवडते.’’, स्वयंपाकात सुगरण आहे मी असं कसं माझं कौशल्य वाया जाऊ द्यायचं? हेच ऐकू येतं. ‘आमच्या ह्यांना माझ्या हातचा चहा लागतो…’ हे वाक्य ऐकताना त्यातली प्रेमळ काळजी जाणवते, परंतु त्यामागे भावनिक जबाबदारीचं ओझंही लपलेलं असतं. ‘माझ्या हातचा स्वयंपाक’, ‘माझ्या हातची चकली’ हे अभिमानाचं वाक्य असलं तरी त्यात स्वत:च्या ओळखीचा बंदिस्तपणा आहे, असं मला वाटतं. मानसशास्त्रज्ञ डॉ. सुधीर काकर म्हणतात, ‘‘भारतीय स्त्रीची ओळख तिच्या नात्यांतून आकार घेते, तिच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वातून नव्हे. यामुळे आई, पत्नी, सून या भूमिका निभावताना तिचं स्वत:चं ‘मी’पण अनेकदा हरवून जातं.’’ आता चित्र थोडं बदलत चाललंय. हे सगळं सांभाळूनही स्त्रिया स्वत:ला सिद्ध करीत आहेत.

पूर्वीच्या काळी संसाराचा वैताग आला, नवऱ्याबरोबर भांडण झालं की, मी चार घरची भांडी घासीन आणि पोळ्या लाटून पोट भरीन, अशी धमकी ऐकू यायची… त्यातली ‘मी चार घरची भांडी घासीन!’ ही खरं तर तिच्या अस्तित्वाची घोषणा आहे. स्त्री स्वत:चं काम करण्यास कमी लेखत नाही; उलट, तेच तिच्या आत्मसन्मानाचं प्रतीक होतं. पण या कामाला समाजात किंमत नव्हती आणि आजही नाही. आणि साहजिकच मग आईच्या, बायकोच्या अशा कामाला महत्त्व मिळत नाही. आई म्हणून पुजली जाणारी स्त्रीच असते, पण तिच्या श्रमांचं अस्तित्व मात्र पुसलं जातं, हा आपल्या जगण्यावागण्यातला विरोधाभास आहे.

‘गृहिणीपद प्रेम की बंधन?’ यावर समाजशास्त्रज्ञ, लेखिका सिमोन द बोव्हार यांनी लिहून ठेवलं आहे की, ‘स्त्रीपण ही नैसर्गिक देणगी नसून ती एक सामाजिक रचना आहे.’ गृहिणीपदही तसंच. समाजाने तिला ज्या चौकटीत बसवलं,

तिनं त्यालाच ‘कर्तव्य’ समजून स्वीकारलं. त्यामुळे ती करत असलेल्या घरातील कामाचं अवमूल्यन झालं आहे. ती सगळं करते, पण ‘काही करत नाही’ असं म्हणणारा समाज (अगदी घरचेसुद्धा) आजही आहेच. प्रेमाच्या नावाखाली बांधलेली ही साखळी आजही तिला स्वत:च्या अस्तित्वाकडे बघू देत नाही.

करोना साथीच्या काळात असंख्य पुरुष स्वयंपाक करताना ‘सोशल मीडिया’वर झळकले. ‘आधुनिक पती’ म्हणून गौरवले गेले; परंतु ‘लॉकडाऊन’ संपताच त्यांच्या हातात पुन्हा रिमोट आले. हा बदल म्हणजे तात्पुरता प्रयोग होता, स्थायी परिवर्तन नव्हे. म्हणूनच समानता अजूनही स्वयंपाकघराच्या दाराशीच थांबली आहे, असं म्हणायला हरकत नाही.

भारतीय परंपरेत स्त्रिया अगदी वैदिक काळापासून ते भक्ती काळापर्यंत विविध रूपांनी प्रकट वा व्यक्त झाल्या. कधी त्या विदुषी होत्या, कधी कवयित्री, तर कधी संत. पण या सर्व उदाहरणांमध्ये एक समानता आहे, ती म्हणजे त्यांची अपवादात्मकता. या स्त्रिया प्रातिनिधिक नव्हत्या, त्या अपवाद होत्या. केवळ त्यांनी आपल्या काळाच्या सीमांना ओलांडण्याचं धाडस केलं. वैदिक काळात स्त्रियांना शिक्षणाचा आणि श्रौत (धार्मिक) विधींमध्ये सहभागी होण्याचा अधिकार होता. गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा, घोषा या विदुषी स्त्रिया वेद आणि उपनिषदे यामध्ये वादविवाद, चर्चेत दिसतात, परंतु या विदुषी काही मोजक्या उच्चवर्णीय स्त्रिया होत्या. सामान्य स्त्रियांना तो अधिकार नव्हता. हळूहळू पुढच्या काळात पितृसत्ताक कुटुंब पद्धतीचा प्रभाव वाढत गेला आणि स्त्री ही शिक्षण, वारसा, वादविवाद या सगळ्यांतून बाहेर फेकली गेली.

भारतीय परंपरेतील स्त्रीची वाटचाल ही विरोधाभासांनी भरलेली आहे. कधी देवी म्हणून मांडली गेली, तर कधी तिचं देहस्वातंत्र्य नाकारलं गेलं. तिची प्रवासकथा ही शोषण, बंड, उपरोध, उपेक्षा आणि दु:खाची आहे. तिलाच दु:खाचं कारण मानलं गेलं. आजची स्त्री मात्र त्या प्रवासाचा पुढचा अध्याय लिहिताना दिसत आहे.

लेखिका व्हर्जिनिया वूल्फ मांडते, ‘‘एखाद्या स्त्रीला कल्पित कथा लिहायची असेल तर तिच्याकडे पैसे आणि स्वत:ची खोली असणं आवश्यक आहे.’’ फक्त लेखनासाठी नव्हे, तर विचार करण्यासाठी, जगण्याकरिता प्रत्येक स्त्रीला तिची स्वत:ची ‘खोली- जागा’ तिचा अवकाश आवश्यक आहे. (A Room of One’s Own)

गृहिणीपद हे श्रमाचं, प्रेमाचं आणि संयमाचं प्रतीक आहे. पण ते तिच्या अस्तित्वाचं एकमेव परिमाण असू नये. ती स्वयंपाकात माहीर असली तरी तिला तिच्या स्वप्नांचं तेल तापवायचं स्वातंत्र्य मिळायलाच हवं. स्वयंपाकघरातून बाहेर पडणारा प्रत्येक सुवास तिच्या स्वत:च्या स्वातंत्र्याचाही गंध घेऊन यायला हवा. मात्र त्यासाठी स्त्रीलाच झगडावं लागलेलं आहे. गृहिणींना त्यांच्या घरगुती कामासाठी वेतन द्यावे का, या विषयावरील वादविवादाची सुरुवात १९७० च्या दशकाच्या सुरुवातीला झाली. या विचाराची मुळे स्त्रीवादी चळवळ आणि स्वायत्ततावादी मार्क्सवादी चळवळीमध्ये होती. १९७२ मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या तिसरी ‘राष्ट्रीय महिला मुक्ती परिषदे’मध्ये ‘घरकामासाठी मजुरी’ ही मागणी औपचारिकरीत्या मांडण्यात आली. त्यानंतर १९७३ मध्ये इटलीत घरकामाच्या मोहिमेसाठी वेतन या चळवळीची स्थापना झाली आणि ती पुढे ब्रिटन व अमेरिकेतही पसरली. या चळवळीने असा युक्तिवाद केला की, घरगुती विनामूल्य श्रम हे भांडवलशाही व्यवस्थेसाठी अत्यावश्यक आहेत, परंतु त्या श्रमाला कोणताही आर्थिक मोबदला मिळत नाही आणि त्यामुळेच स्त्रियांचं शोषण घडतं.

एका अपघातात मृत पावलेल्या गृहिणीच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या खटल्यात १७ फेब्रुवारी २०२४ या वेळी दिलेल्या निर्णयाच्या वेळी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने असं नमूद केलं की, घराची काळजी घेणाऱ्या स्त्रीचं योगदान ‘उच्च दर्जाचं’आहे आणि तिच्या श्रमाचं आर्थिक मोजमाप करणं अत्यंत कठीण आहे.

सण समारंभ, नटणं, मुरडणं आणि सुंदर दिसण्याची स्पर्धा या सगळ्यातून ती आजही जाते, हे सगळं तिला हवं असतं, कारण ती त्याच पुरुषसत्ताक संस्कारात वाढलेली असते. यात होणारं शोषण अदृश्य असतं. ते तिच्या लक्षात येत नाही, कारण ही पुरुषसत्ताक व्यवस्था तिच्यात, त्यांच्या वागण्यात आणि संपूर्ण समाजात खोलवर रुजलेली आहे. ही परिस्थिती केवळ भारतापुरती मर्यादित नाही. जगभरात, वेगवेगळ्या प्रमाणात, स्त्रीच्या भूमिकेबाबत अशीच रचना दिसते. याचं मूळ माणसाच्या विकासाच्या आरंभिक टप्प्यात आहे. काही इतिहासकार असा दावा करतात की, प्राचीन काळी स्त्री-पुरुष समान होते; परंतु प्रश्न असा आहे, ती समानता खऱ्या अर्थाने होती का? स्त्री मातृत्व स्वीकारते आणि त्या भूमिकेतून आलेली शारीरिक व सामाजिक बंधनं हळूहळू नैसर्गिक मानली जाऊ लागली. काळाच्या ओघात ती निर्णय प्रक्रियेतून बाहेर फेकली गेली आणि पालकत्व ही तिची सामाजिक जबाबदारी बनली.

प्रत्येक सण, समारंभ, लग्न, बारसं, डोहाळेजेवण, पूजा याच्या वेळी दिल्या जाणाऱ्या जाहिराती आणि बाजारपेठा स्त्रियांना, गृहिणींना प्रमुख ग्राहक बनवत आहेत, यातून एक सुप्त स्पर्धा तयार होते. आभास असा निर्माण होतो की, गृहोपयोगी वस्तूंची फक्त तिलाच गरज आहे, फ्रिज, वॉशिंग मशीन, मिक्सर, सौंदर्य प्रसाधनं ही फक्त तीच वापरते. यामुळे आज भांडवलशाही युगात ती प्रमुख खरेदीदार बनली आहे. फॅशन, शिक्षण, घर खरेदी, सजावट. प्रत्येक गोष्टीत तीच मुख्य ग्राहक आहे. पण या खरेदीमागेही एक प्रकारचं शोषण दडलेलं आहे, जे तिलाच जाणवत नाही. कारण पुरुषसत्ताक व्यवस्थेचा पहिला आणि सर्वात प्रभावी घटक म्हणजे आई स्वत: आहे. ते कसं तर तीच सासू आहे, तीच सूनही होती, तीच मुलगीही होती, बहीणही तीच, त्यामुळे या नात्यांच्या गराड्यात सापडलेली आहे आणि ते निभावण्याची जबाबदारीसुद्धा तिचीच ठरलेली आहे.

या पुरुषसत्ताक व्यवस्थेत समानता आणायची असेल तर संगोपन आणि जीवनाच्या प्रत्येक गोष्टीत पुरुषाचा सहभाग वाढवायला हवा आहे, जोपर्यंत पुरुषाच्या तोंडीही ‘माझा चहापासून भाजी आणण्यापर्यंत ते माझ्या हातची पोळी गोल, मऊसूत होते,’ असं येत नाही तोपर्यंत.

sarlabhirud@live.com

‘पडसाद’ तुमच्यासाठी

‘पडसाद’ हे सदर तुमच्यासाठी आहे. तुम्ही मोकळेपणाने आम्हाला कळवू शकता तुमची मते, अगदी मतभेदांसह. एखाद्या लेखाविषयी ठोस विचार मांडणारी पत्रे नक्कीच प्रसिद्ध केली जातील. फक्त आणि फक्त मराठीमध्ये पाठवलेलीच पत्रे प्रसिद्ध केली जातील. ईमेल करताना सब्जेक्टमध्ये ‘चतुरंग पडसाद’ असा उल्लेख करावा.

याशिवाय तुम्ही पाठवू शकता तुमचे ललित लेखन ‘मनातलं कागदावर’ या सदरासाठी. तुमचा अनुभव किंवा मनाला भिडणाऱ्या एखाद्या विषयावर तुम्ही मांडू शकता तुमचे विचार, ८०० ते १००० शब्दांमध्ये.

आमचा पत्ता : ईएल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे,नवी मुंबई ४००७१०.

chaturang@expressindia.com
chaturang.loksatta@gmail.com