सुषमा देशपांडे
संत स्त्रियांचे अनेक अभंग त्यांच्या आयुष्यासह लोकांपर्यंत पोचवायला हवेत या विचारातून ‘बया दार उघड’ हे नाटक लिहिलं गेलं. संत स्त्रियांचा आवाज असो किंवा चळवळीतील विविध टप्प्यांवरच्या जगभरच्या स्त्रियांचा आवाज असो, तो एकच असतो. त्याचमुळे तेराव्या शतकातलं काव्य आजच्याही स्त्रीच्या जगण्याचा आधार बनतं.
संत स्त्रियांच्या अभंगांवरील ‘बया दार उघड’ या नाटकाचं बीज मनात पेरलं गेलं, त्याला कारण ठरलं त्यांच्या अभंगांवर आधारित डॉ. विद्युत भागवतांचा लेख. तो वाचून मी संत स्त्रियांवर लिहिलेल्या गोष्टी शोधायला सुरुवात केली. शेवटी एके दिवशी ‘सकळ संत गाथा’चे दोन जाडजूड ग्रंथ घरात आले. तेराव्या ते अठराव्या शतकात रचलेले हे स्त्री संतांचे अभंग वाचताना मी अवाक् होऊन जायचे.
संत स्त्रियांच्या अभंगाने मी झपाटले गेले. कित्येक जणी ‘देवा झाले मी वेसवा झाले, सौरी झाले…’सारखे भाव त्यांच्या काव्यातून व्यक्त करतात, ते वाचून वेड लागायचं. वारीची थोडी-फार माहिती असल्याने आणि डॉ. रामचंद्र देखणे यांची दिंडी वारीत असते हे समजल्याने त्यांच्याशी संपर्क साधला आणि मग त्यांच्याशी सतत बोलणं सुरू झालं. त्यांच्या दिंडीसह वारीला जायचंही ठरवलं. तसेच डॉ. रा. चिं. ढेरे, गं. बा. सरदार, डॉ. तारा भवाळकर, अरुणा ढेरे यांची पुस्तकं वाचत होते. ‘नागी’ ही ढेरे यांच्या पुस्तकात, तर ‘गोदा’ ताराताईंच्या पुस्तकात भेटली. वारीत फिरताना दरवर्षी वारी करणाऱ्या स्त्रिया भेटल्या. ‘तीन आठवडे वारीत असलो, की वर्षभर जगण्याची ऊर्जा मिळते.’ म्हणताना या स्त्रियांच्या चेहऱ्यावर खोल आनंद जाणवायचा.
स्वत:ला ‘नि:संग धांगडी’ म्हणवणारी मुक्ता, ‘देहासी विटाळ, म्हणती सकळ आत्मा तो निर्मळ’ असं मासिक पाळीवर बोलणारी सोयरा, ‘चहूकडे देवा दाटला वणवा…’ म्हणत विठ्ठलाला साद घालणारी निर्मळा, विठ्ठलाला सवाल करणाऱ्या नामदेवांची आई गोणाई आणि बायको राजाई, ‘सोडूनी लाज झाले निर्लज्ज डौर घेत हाती’ अशी हाळी देणारी बहेणी, ‘तुझी सत्ता आहे देहावर, समाज, माझेवरी तुझी किंचित नाही’ असे नवऱ्याला ठणकावून सांगणारी विठा, ‘मुक्त अवघे देही, मुक्त अवघी मही’ म्हणत मुक्तीचा जयघोष करणारी गोदा, ‘तुझे म्हणविता दुजे अंगसंग, उणेपणा सांग कोणाकडे?’ असा विठ्ठलाला सवाल करणारी कान्होपात्रा, ‘वाटुली पाहता उत्कंठीत मन, गेली विसरोनी तानभूक’ म्हणणारी छोटी नागी आणि ‘डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी…’ म्हणत समाजाला आव्हान देणारी जना. यांचे अंश आज या वारीला जाणाऱ्या स्त्रियांमध्ये आहेत, असं वाटायचं.
विठ्ठल हे या कालच्या आणि आजच्या काळात भेटलेल्या स्त्रियांचं व्यक्त होण्याचं माध्यम आहे, हे जाणवायचं. संत स्त्रियांचे हे अनेक अभंग त्यांच्या आयुष्यासह लोकांपर्यंत पोचवायला हवेत या विचारातून नाटक लिहिलं गेलं. अर्थाची खोली असणारे हे अभंग एकनाथांच्या खेळांमधून गुंफले. याच काळात एक थोर अभ्यासक मला म्हणे, ‘‘तू ज्या स्त्रियांचं कौतुक करत आहेस, त्यांचे अभंग त्यांच्या घराच्या पुरुषांनी लिहिलेले आहेत.’’ माझा याबाबत शोध सुरू झाला. पण मला तसे कोणी लिहिलेले सापडेना. या विचारावर कोणी अभ्यासकाने काही लिहिलेले मिळेना. विचार करताना मलाच जाणवलं, कोणीही पुरुष घरातल्या स्त्रीच्या वतीने ‘देवा झाले मी वेसवा.’ म्हणू शकणारच नाही. बाईची आंतरिक ताकद हे स्वत:बाबत म्हणू शकते. त्या अभ्यासकानेही हे अखेर मान्य केलं.
काकडेकाका (‘आविष्कार’चे अरुण काकडे) पहिल्यांदा मी ‘सावित्री’चे प्रयोग सुरू केले तेव्हा पुण्यात पत्ता शोधून भेटायला आले होते. ‘‘छबिलदासमध्ये ‘सावित्री’चा प्रयोग करायचा आहे तुला.’’ असं हक्काचं आमंत्रण दिलं त्यांनी. प्रयोग झाला. काकांनी सांगितलं, ‘‘यानंतर तुला हवं तेव्हा तू ‘छबिलदास’मध्ये प्रयोग करू शकतेस. तुला भाडं आकारलं जाणार नाही.’’ ‘आविष्कार’बरोबरचं नातं तेव्हाच रुजायला सुरुवात झाली. २००६ मध्ये काकांना वयाची ७५ वर्षं आणि नाटक करायला लागून ५० वर्षं पूर्ण झाली, म्हणून दर महिन्याला एक नाटक करण्याचा घाट घातला होता. ‘‘तुझ्याकडून एक नाटक हवं आहे.’’ असं सांगायला काका पुण्यात आले. मी ‘बया दार उघड’ काकांना वाचून दाखवलं. काकांनी नाटक ‘आविष्कार’साठी करायचं ठरवलं.
मला तेव्हा दुसऱ्या दिग्दर्शकाने हे नाटक बसवावं, असं वाटत होतं. चेतन दातारांचं नाव निश्चित झालं. चेतनला घेऊन मी वारीलाही जाऊन आले. मात्र चेतनने चकवलं, चेतन गेलाच. त्यानंतर काका मागे लागले, ‘‘तुझं नाटक आहे, तुला बसवावं लागेल.’’ माझं काही मन होईना. मी टाळत राहिले. रवी सावंतही विचारत राही. २००९मध्ये काका आणि रवीने जरा जोरातच नाटक करण्याचा आग्रह केला आणि मी म्हणाले, ‘‘२ ऑगस्ट २०१० तारीख बुक करा. चेतनच्या स्मृतिदिनी.’’ आखणी सुरू झाली. मी सांगितलं, ‘‘काका, मला संगीतासाठी देवदत्त साबळे हवा आहे. संगीत लाइव्ह असणार आहे.’’ काकांचा कोणत्याच गोष्टीला नकार नव्हता. देवदत्तशी जेव्हा बोलले तेव्हा तो म्हणे, ‘‘तुला नाटकाचा आत्मा करून हवा आहे.’’ त्याने कमाल काम केलं. ‘आविष्कार’चे कलाकार वाचनासाठी आले, ते नाटकाचा भाग झाले. नंदिता पाटकर, शिल्पा साने, गीता पांचाळ, प्रज्ञा मानवतकर, पराग सारंग, गौरव सातव आणि राजश्री देशपांडे, हे मूळचे कलाकार.
पुढे सोनाल खळे, शुभांगी भुजबळ, तृप्ती नार्वेकर असे अनेक जण जोडले गेले. गाण्यासाठी तेजस्विनी इंगळे आली. मूळची गाणं शिकणारी तेजू, ‘‘नाटकासाठी भाव आणि शब्द पोचणं महत्त्वाचं. सूर थोडा चुकला तरी चालेल.’’ असं म्हटल्यावर अवाक् पाहात राहिली. माझ्या डोक्यात संत स्त्रियांचे शब्द रुजलेले होते. संगीत वादनासाठी सागर लेले, जयेश धारगळकर, प्रदीप जोशी सुरुवातीला होते. सागरमुळे अनेक वादक पुढे जोडले गेले. तालमी ‘आविष्कार’च्या माहीम येथील शाळेच्या जागेत होत होत्या. माझं घर तेव्हा ‘आरे कॉलनी’त होतं. माझी जिवाभावाची मैत्रीण विजया चौहान ‘आविष्कार’च्या शाळेजवळ माहीममध्ये राहाते. तिने फतवा काढला, ‘‘तू इथे माझ्याकडे राहणार आहेस.’’ तालमीचा वेळ सुकर होण्यासाठी खूपच मदत झाली.
वारी ही आनंदयात्रा असते. तोच आनंद नाटकात अपेक्षित होता. नेपथ्य म्हणून वारीचा चौथरा पायऱ्यांसह उभा करायचं ठरलं. रवीने मागे संदेश भंडारेचा वारीतला फोटो टाकला. वारीचं वातावरण आकार घेऊ लागलं. इतर वेळेस नाटकातल्या पात्रांचं व्यक्तिमत्त्व काय? त्याचा इतिहास काय? आदी गोष्टींचा विचार केला जातो. तो विचार इथे नव्हता. एका टप्प्यावर मुलींच्या हातात टाळ दिले आणि तालमींना वेगळा रंग भरला गेला. तालमींच्या दिवसांतच वारीचा कालावधी आला आणि कलाकारांना घेऊन वारीला जायचं ठरवलं. टाळ गळ्यात अडकवून मुली वारीत उतरल्या आणि वारीतल्या होऊन गेल्या. आनंदयात्रा अंगात भिनली. रंगमंचावर कमाल ऊर्जा निर्माण होऊ लागली.
काकांना वाटत होतं कपड्यांचा विचार करता, नऊवार साड्या शिवून घेऊयात. मी अरुंधती पाटील (राणी सबनीस) या मैत्रिणीला मदतीसाठी बोलावलं. काठापदराच्या साड्या घेऊन साधं सलवार कमीज शिवलं आणि ओढणी गरज असेल तेव्हा खोचून पदरासारखी घेतली. यात अंजली आणि करिष्मा नानावटी यांनी मदत केली.
तालमीत काका कमाल रमायचे. मुलींचे भाव पाहून तसे भाव करत राहायचे. त्यांच्या डोळ्यातून पाणी यायचं. मी कलाकारांच्या समोर आणि काका माझ्या मागे बसलेले असायचे. एकदा चालू तालमीत मुली फिसफिस हसत आहेत म्हणून मी ओरडले, तर मुलींनी मला हळूच काकांकडे बघायला सांगितलं. नाटक हेच जगणं असलेला हा माणूस, तालमीत तल्लीन असायचा.
तसंच एकदा खेडेगावातल्या माझ्या मैत्रिणी म्हणाल्या होत्या, ‘‘ताई, ‘सावित्री’ लई आधार देते हे खरं हाय, पन या संत बाया जास्तच जवळच्या वाटतात.’’ तेराव्या शतकातल्या स्त्रीचं काव्य आज आधार बनतं हे विशेष.
असाच स्त्रियांचा आवाज ज्योती म्हापसेकरने (आणि ‘स्त्रीमुक्ती संघटने’तील सहकाऱ्यांच्या मदतीने) अभिवाचनासाठी लिहिलेल्या ‘समतेकडे वाटचाल’ या स्त्री चळवळीच्या इतिहासावरील पेपरमध्ये होता. साधारण १८व्या शतकापासून स्त्रियांसंदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवर काय घडत होतं आणि महाराष्ट्रात तेव्हा काय घडत होतं याचा त्यात धांडोळा आहे. ज्योतीने मला विचारलं, ‘‘याचं वाचन करण्यासाठी मदत करशील का? पेपर वाचला आणि मला वाटलं, हा पेपर नाटकाच्या पद्धतीनं बसवायला हवा. चळवळीतल्या गाण्याचा उपयोग त्याच्यात होताच. शिवाय स्त्री चळवळीतल्या स्त्रियांची छायाचित्रे मिळवून एक प्रकल्प करायचं ठरलं. पुण्यात आम्ही हा ‘पेपर’ प्रथम बसवला. अलका पावनगडकर या ‘स्त्रीमुक्ती संघटने’च्या कार्यकर्तीने मुख्य जबाबदारी घेतली. अलका गाते उत्तम. १० मुलींचा गट जमला. ‘‘हे रूढार्थानं नाटक नाही. आम्हाला स्त्री चळवळीचा इतिहास माहीत आहे. आम्हाला तो तुम्हाला सांगावसा वाटतो.’’ म्हणत सुरुवात व्हायची. विविध चळवळीतली गाणी आणि अर्थपूर्ण आकृतिबंध होत हे सादरीकरण व्हायचं. खूप छान होता हा अनुभव. हाच ‘पेपर’ पुन्हा मुंबईतही बसवला होता.
संत स्त्रियांचा आवाज असो किंवा चळवळीतील विविध टप्प्यांवरच्या जगभरच्या स्त्रियांचा आवाज असो, अर्ध आकाश पेलणाऱ्या स्त्रियांचा आवाज वर्षानुवर्षं आसमंतात पोचत आहे. तसा तो टिकायलाच हवा.
