तेजपाल असो की निवृत्त न्यायमूर्ती गांगुली की प्रत्यक्ष मुलीचा पिता, रोजच्या रोज बलात्काराच्या, विनयभंगाच्या घटनांनी वातावरण कलुषित होते आहे. एका बाजूला उच्च शिक्षण घेणारी, लाख-लाख रुपयांचं पॅकेज घेणारी स्त्री दिसते आहे, पण म्हणून ती या समाजात सुरक्षित आहे? पती-पत्नीला समान सन्मान देणारं नातं संपवून पतीस देव आणि पत्नीस दयनीय, पददलित बनवणारा कालखंड तब्बल दोन हजार वर्षांचा तरी आहे. काळाच्या ओघात स्त्रीची दयनीय अवस्था कशी होत गेली आणि स्त्री पुरुषाच्या बरोबरीने, सन्मानाने जगवायची असेल तर काय करायला हवं,  इतिहासाचा कौल काय आहे,  हे सांगणारा या वर्षांचा हा पहिला लेख.
पृथ्वीतलावरच का, सर्व धर्माच्या आपापल्या देवलोकांतील प्रत्येक स्वर्गात स्त्री ही उपभोग्यच आहे. तिथेही पुरुषांस रिझवणे आणि सुख देणे यापुरतेच तिचे स्थान आहे. मद्य आणि स्त्री यांत फारसा फरक कुठल्याच स्वर्गात दिसत नाही आणि स्त्रीच्या सुखासाठी कुठल्याही स्वर्गात पुरुषांची योजना कोणाच्याही देवांनी केल्याचे ऐकिवात नाही. मग पृथ्वीलोकांतील सामान्य मानवांस यात बदल करणे जमावे ही अपेक्षा का ?
‘बाप से कुस्ती खेलेगा?’ ढोलकी बडवत भर रस्त्यावर पूर्वी डोंबारी प्रश्नोत्तरांचा खेळ मांडायचा. रिकामटेकडे बघायला उभे राहायचे. हा खेळ त्यांनी आधीही अनेकदा पाहिलेला असायचा. ते डोंबाऱ्याचे खेळ आता बंद झालेयत. आता मीडिया रोज नवा प्रश्न विचारतोय; कांद्याचे भाव उतरणार की नाही?, रस्त्यावरले खड्डे बुजवणार की नाही?, या वर्षी सुका दुष्काळ पडेल का ओला? भ्रष्टाचार थांबणार की नाही?, स्त्रियांवरील अत्याचार थांबणार कधी? स्वाद असेपर्यंत चुइंगम चावायचा मग थुंकायचा. गिळून पचवायची परंपराच संपलेली. ‘वापरा आणि फेका’ या उक्तीचे युग ! प्रश्न ‘टीआरपी’साठी. त्यातून मिळणाऱ्या जाहिरातींमुळे भरणाऱ्या पोटासाठी! उत्तरांसाठी नाही. प्रश्नाच्या मुळापर्यंत जायचंच नाही. शासन, प्रशासन, महसूल, उद्योग, वैद्यक, शिक्षण आणि इतर सर्वच क्षेत्रांत एकाच वेळी फोफावणाऱ्या, पालवणारा भ्रष्टाचार, अन्याय आणि बलात्काराच्या फांद्या एकाच वृक्षापासून फुटून तरारल्याचं लक्षात येईल का प्रत्येक प्रश्नाचे मूळ गाठल्यास? तेच टाळण्यासाठी ही धूळफेक आहे का?
तत्त्वज्ञान, अध्यात्म, अिहसा; फक्त मानवाची नव्हे, तर सर्व जीवांची समता- या साऱ्यांचे प्रथम पुरस्कत्रे आपण भारतीय आहोत आणि सुखोपभोग, संपत्ती, सत्ताप्राप्तीसाठी केला जाणारा अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, िहसा, बलात्कार यांची पराकोटीही याच देशात सर्वाधिक वेगाने होत आहे. जागोजागी दिसणारे स्त्री-पुरुष नात्याचे गढुळलेले, रक्ताळलेले प्रवाह हा त्याचाच एक भाग आहे. यांच्या उगमस्थानाचा वेळीच शोध घेतला नाही तर एकमेकांत मिसळत यांचा विशाल नद होण्यास फार काळ जावा लागणार नाही. आजूबाजूची रक्ता-मांसाची माती खेचत वाहणाऱ्या या प्रवाहात बघता बघता जमत गेलेला चिखल एवढी खोल दलदल माजवेल की त्यात बुडणाऱ्या आपल्या मूळ संस्कृतीस वाचवणं अशक्य होऊन जाईल.
स्त्री-पुरुष नात्याच्या निर्मळतेवर तर मानवी समाजजीवनाचं अस्तित्व अवलंबून असतं. रोज नव्याने जन्मणाऱ्या माणसाच्या पिलांच्या सांस्कृतिक आणि मानसिक जडणघडणीचं ते पोषणमूल्य असतं. कुटुंबसंस्था-पर्यायाने समाजसंस्था आणि अंतिमत: शासनसंस्था यांचा तो पाया असतो. भौतिक लाभ आणि सुख समसमान वाटून घेऊन समाधान पावण्याची शिकवण त्यात असते. कर्तव्यपालन आणि विवाहसंबंधाने वाटून घेतलेल्या जबाबदारीच्या जाणिवेतून समाजोपयोगी भौतिक उत्पादन करणारी, समाजहिताची जाण जोपासणारी घरटी त्यातून उभी राहतात. आणि समाज-प्रांत-देशाची नीतिमूल्ये आणि भौतिक संपत्ती यांची वृद्धी होते. याचाच अर्थ असा की, नीतिमूल्ये ढासळलेल्या, भौतिक अधोगतीस लागलेल्या देशातील स्त्री-पुरुष संबंधातील निर्मळता बाधित आहे. तो देश जर मूळ पदावर आणायचा असेल तर गढुळलेल्या स्त्री-पुरुष नात्याचा सर्वप्रथम विचार व्हावा लागेल. निदान या देशाच्या, पर्यायाने सर्व देशवासीयांच्या स्वत:च्या आíथक आणि भौतिक उन्नतीसाठी.
ब्रिटिशांनी या देशावर राज्य केलं नसतं तर सतीची चाल, केशवपन कधीच बंद झालं नसतं. स्त्रियांस शिक्षणाचा हक्क मिळाला नसता असं म्हटलं जातं. पण हे श्रेय राजा राममोहन राय यांच्यापासून आगरकर, फुले, कर्वे, लोकहितवादी, रानडे, आंबेडकर, पंडिता रमाबाई, ताराबाई िशदे, सावित्रीबाई फुले अशा अगणित विचारवंतांना-सुधारकांना जातं. १८५० ते १९५० हे शतकच स्त्रीउद्धाराचं ठरलं. काही हजार वर्षांच्या अन्याय आणि अत्याचाराच्या इतिहासातील केवळ शंभर वष्रे! आणि हे सर्व विचारवंत ब्रिटिशांच्या राजवटीत, ब्रिटिशांच्या शिक्षणपद्धतीत घडले होते. ब्रिटिश गेल्यानंतर एकाएकी हे विचारवंत-सुधारक घडणं थांबलं? का या विचारवंतांची ब्रिटिश साम्राज्यकाळात होणारी कदर एकाएकी थांबली? याच विचारवंत-सुधारकांस समजा आजच्या राजवटीत, समाजव्यवस्थेत नव्याने जन्म मिळाला तर लोकमान्यांच्या गणपती उत्सवात ‘चुनरी के पिछे’  आणि ‘चिकनी चमेली’वर नाचणाऱ्या दबंग समाजाकडून आणि या धांगडधिंगाण्यास राजमान्यता देणाऱ्या आदर्श राजवटीकडून त्यांना तसाच प्रतिसाद मिळेल का? आपल्या देशाचा, समजुतींचा, विचार-विकारांचा, राजयंत्रविकासाचा इतिहास निदान थोडक्यात पाहिल्याशिवाय महाभारत काळापासून आजपर्यंत सुरू असलेल्या स्त्रीच्या अधिकारपूर्ण विटंबनेबाबतच्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला सापडणार नाहीत. कारण शतकानुशतकांच्या संस्कारांनी, विचार-विकारांनी सामान्य जनमानसात नकळत, पण दृढ झालेली स्त्रीप्रतिमा आपल्याला त्याशिवाय कळणार  नाही. अश्मयुगात – अंदाजे पाच लाख ते पाच हजार र्वष इसवीसन पूर्व – किंवा महाभारतात वर्णिलेल्या कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुगात माणसे जगात सर्वत्रच टोळीने-कळपाने राहात होती. इतर प्राण्यांप्रमाणे माणसांच्या टोळ्याही पोटापुरत्या अन्नाच्या शोधात भटकत होत्या. ना पती-पत्नी नातं होतं, ना आई-बाप, ना समाज, ना प्रशासन, संपत्तीचा साठा नव्हता, त्यामुळे सत्तासंघर्ष नव्हता, अन्याय, भ्रष्टाचार नव्हता. इतर प्राण्यांप्रमाणे शरीरसंबंधसुद्धा निसर्गनियमानुसार केवळ मानवी वंशाच्या विस्तारासाठी होता. नातेसंबंधांवर नियंत्रण नव्हतं. पुरुष-स्त्रिया-बालक सारेच ‘कळपाचे’ असत.
ताम्रपाषाण युगात, अंदाजे दोन हजार वष्रे इसवीसन पूर्व किंवा महाभारताने उल्लेखलेल्या कलियुगाच्या प्रारंभकाळी गुरे घेऊन भटकणाऱ्या माणसांच्या टोळ्यांस अग्नी, हत्यारं, शेती आणि कारागिरीची साधनं उपलब्ध झाली. टोळ्या ठिकठिकाणी स्थिरावल्या. शेती, साधनसंपत्ती वाढू लागली. त्यावरील कब्जा- मालकी सातत्याने राखण्यासाठी संरक्षणाची गरज भासली. त्यातून समाजाच्या एकजुटीस आरंभ झाला. यातून घरांचा समुदाय आणि त्याभोवतालच्या िभती उभ्या राहिल्या. ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलात व अथर्ववेदाच्या अठराव्या कांडात यम आणि यमीच्या दिलेल्या संवादावरून तत्कालीन स्त्री-पुरुष संबंधाच्या नियंत्रित होत असलेल्या स्वरूपाचा एक दाखला मिळतो.
त्या काळी प्रजा, राज्य, पिता, पुत्र, माता, भगिनी इत्यादी नाती अस्तित्वात नव्हती. फक्त अमुक मूल अमुक स्त्रीचं, इतकंच म्हणता येण्याची शक्यता होती. कळपातील सर्व स्त्रिया कळपातील सर्व बालकांच्या माता समजल्या जात. त्यामुळेच काíतकेय हा सहा किंवा सात मातांचा पुत्र म्हणून वर्णिला आहे. त्या प्रारंभकाळात मनुष्यबळ हे स्वसंरक्षणाचं प्रमुख साधन असल्याने बेबंद यमनक्रिया करून मनुष्यसंख्याबल उत्पन्न करणं हाच स्त्री-पुरुष संबंधाचा हेतू असल्याने स्त्री-पुरुषांस समान प्रतिष्ठा होती किंबहुना मनुष्यास जन्म देऊ शकणाऱ्या स्त्रीस अधिक महत्त्व होतं.
जसजशी उत्पादनाची साधनं वाढत गेली, संपत्ती, समाजाची संपन्नता वाढत गेली तसतसं समाजनियमन होत गेलं. वैयक्तिक सत्ता-संपत्तीच्या हस्तांतरणासाठी स्वत:च्या वंशाची, वारसाची गरज भासू लागली. वारसाच्या गरजेतून कुटुंबसंस्था आकारली. वारसाच्या शुद्धतेसाठी स्त्रीचा इतर पुरुषांशी असणाऱ्या संबंधांवर बंधनं आली तरी स्त्री-पुरुषांची प्रतिष्ठा समसमान होती. स्त्रीचेही उपनयन होत होते. तिला शिक्षणाचा अधिकार होता. पतीच्या निवडीचा अधिकार होता. निदान पाचव्या शतकापर्यंत मुलींचे विवाह प्रौढपणीच होत असावेत याचे दाखले मिळतात. जातकात विवाहयोग्य मुलीचं वय सोळा र्वष सांगितलं आहे. परंतु कालांतराने आíथक आणि सामाजिक प्रक्रियेच्या नियमांनुसार समाजव्यवस्था, धर्मनियम बदलत गेले.
श्राद्धादी कर्मकांडं सुरू झाली. स्वर्ग, नरक, देव, देवदूत, याहवेह, गॉड, अल्ला या कल्पना जन्मास आल्या; ज्या अजूनही दृढ आहेत. स्वर्गात दुधाचे समुद्र, सोन्याचे डोंगर, मध-मद्याच्या नद्या, न कोमेजणारी फुलं, सौंदर्य कधीही न ओसरणाऱ्या अनाघ्रात स्त्रिया असण्याच्या अक्षय सुखाची ग्वाही दिली गेली. त्यासाठी मृत्यूनंतर स्वर्गात जाण्याचा प्रत्येकास सोस निर्माण झाला. त्यासाठी अग्नी देणारा, िपडदान करणारा आणि दर वर्षी न विसरता श्राद्ध घालणारा स्वत:चा पुत्र हवा झाला. स्वत:च्या स्त्रीस झालेला पुत्र स्वत:चा आहे याची खात्री हवी झाली. त्याचा बंदोबस्त करायचा तर स्त्रीस बंदिस्त करणं आवश्यक ठरलं. मग ‘विवाह हाच कन्येचा उपनयन संस्कार, पती हाच तिचा गुरू आणि पतिगृह हेच तिचं गुरुकुल’ अशी कल्पना धर्मशास्त्रकारांनी रूढ केली. मुलीच्या विवाहाचं वय सोळा वरून आठावर आलं. बापाएवढय़ा वयाच्या पुरुषाशी स्त्रीचं बालिकावस्थेत लग्न होऊ लागलं. असा पुरुष पालन-पोषणाच्या नावाखाली मुलीवर मालकी हक्क गाजवू लागला. (पान १ वरून)  तीही त्याला आपला रक्षणकर्ता, पोषणकर्ता असल्याच्या पूज्य भावनेने देव मानू लागली. अशा बालविवाहाच्या रूढीस सुज्ञ पित्यांचा विरोध होऊ नये म्हणून ‘बालपणी कन्येचा विवाह न करणाऱ्या पित्याला तिच्या प्रत्येक ऋतुकालाच्या समयी भ्रूणहत्येचं पाप लागतं’ असं म्हणून मृत्यूनंतर नरकात जाण्याची भीती घातली गेली. हा काळ साधारण इ. स. ५०० ते १०००. तोपर्यंत गृहिणी, सचिव, सखी असणारी प्रगल्भ, सुशिक्षित, कर्तबगार स्त्री पुढील काळात दोन वेळ भाकरतुकडा देणाऱ्या पतीस देव मानणारी, त्याच्या उपकारांच्या ओझ्याखाली दबलेली असहाय दासी झाली.
नरकप्राप्तीच्या भीतीने आईबापांसाठी मुलीचं वाढणारं वय चिंतेची बाब झाली. मुलींच्या लग्नाची घाई होऊ लागली. त्या आईबापांच्या उद्धारासाठी सधन, धनदांडगे एकापेक्षा अधिक विवाह करू लागले. बहुपत्नीत्वाची चाल वाढलीच, परंतु स्वत:च्या आईबापांसाठी स्त्री नरकाचं द्वार ठरली. संन्यासवादही वाढत होता. ब्रह्मचर्याने मोक्षप्राप्ती होते असाही समज दृढ झाला होता. अध्यात्मवादाचा तोच कल होता. त्यामुळे संन्यासमार्ग आणि ब्रह्मचर्यापासून विचलित करणारी स्त्री ही पुरुषांच्या मोक्षाच्या मार्गातली धोंड ठरली. मोहाचा डोह बनली.
घरातील विधवेच्या असहायतेचा गरफायदा घेणारे पुरुष, अनेक स्त्रियांशी विवाह करून त्यांना सुख देण्यास अपुरे पडणारे पुरुष, क्षणिक मोहापायी संन्यासमार्ग आणि ब्रह्मचर्यापासून विचलित होणारे पुरुष स्त्रीला स्वैराचारी ठरवू लागले. शरीरसुखास हपापलेली म्हणू लागले.
अशा स्त्रियांस बंदिस्त करण्याचा, चोप देण्याचा, दान करण्याचा, विकून टाकण्याचा, बळी देण्याचा हक्कसुद्धा समाजाने पुरुषांस दिला.
अपार नसíगक समृद्धी, जगभरच्या व्यापारातील वृद्धी आणि त्यामानाने तुटपुंजी लोकसंख्या यामुळे साचणाऱ्या संपत्तीच्या वाटणीवरून कळपा कळपातील धटिंगणांत युद्धं होऊ लागली; तेव्हा वर्णविग्रह होऊन स्वत:स जास्तीत जास्त वाटा मिळावा अशा प्रयत्नांत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे समाजाचे गट दृढ झाले. वाढणाऱ्या कलाकौशल्यपूर्ण कारागिरीतून मिळणाऱ्या संपत्तीतही वाटेकरी होण्यासाठी मग जातिसंस्थेची संकल्पना पुढे आणून सुतार, चांभार, लोहार, सोनार वगरे अगणित जाती पाडून प्रत्येकास दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ अथवा कनिष्ठ दर्जा देऊन चंद्रगुप्त मौर्यकालीन अस्तित्वात असलेली एकजूटच मोडून काढण्यात आली. माणसा माणसांत द्वेष-मत्सर-वैराची भावना पेरत त्यांना शासन-प्रशासनाच्या हातचं बाहुलं बनवण्यात आलं. कुठली तरी जात स्वीकारल्याशिवाय माणसास ग्रामस्थाचे, नागरिकत्वाचे हक्क मिळेनासे झाले. आणि एखादी जात स्वीकारली की माणूस इतर जातींस आपोआप परका ठरू लागला. या वर्ण-जातींच्या उतरंडीत ‘स्त्री’ सगळ्यांत तळाची पायरी ठरली. उच्च जातीच्या पुरुषाने कनिष्ठ जातीच्या स्त्रीवर केलेली बळजबरी श्रुति-स्मृितच्या आधारे मान्यताप्राप्त झाली. पुरुषाच्या मनी उत्पन्न झालेला मोह ही स्त्रीची चूक ठरली. स्त्रीच्या चुकीला शासन करण्याचा अधिकार पुरुषास मिळाला. स्त्रीवर झालेल्या बळजबरीचा न्याय करताना पुरुषाची ‘जात’, स्त्रीची ‘जात’ विचारात घेतली जाऊ लागली. पतीस शरीरसुख देऊन, वंशवेल टिकवण्यासाठी प्रजोत्पादन करण्याव्यतिरिक्त दुसरा कुठलाही उपयोग नसणारी स्त्री अधिकच असहाय, हतबल झाली. पती मेल्यावर तर तिची उपयुक्तताच उरली नाही. विधवा म्हणून उपयोग झाल्यास वापरावी किंवा कचरा जाळतो तशी जाळून टाकावी. सतीची चाल अशीच फोफावली असावी. सती न गेल्यास केशवपन, उपास-तापास, कष्ट असं आगीपेक्षा अधिक पोळणारं जीवन तिच्या वाटय़ास आलं.
द्विदल धान्याच्या दोन्ही डाळींप्रमाणे समान असणाऱ्या पती-पत्नीला समान सन्मान देणारं नातं संपवून पतीस देव आणि पत्नीस दयनीय, पददलित बनवणारा हा कालखंड तब्बल दोन हजार वर्षांचा तरी आहे. इस्लामच्या आक्रमणामुळे हे बदल झाल्याचे काही इतिहासकार सांगतात. परंतु या आक्रमणाआधी कितीतरी शतकं हा बदल अस्तित्वात आला होता. या बदलांमागील कारणं ही निव्वळ आíथक आणि राजकीय सत्ताकारणाची, चंगळवादाची आहेत. त्या काळी त्यासाठी धार्मिक आधार आवश्यक असल्यामुळे त्या त्या काळी सोयीस्कर असे बदल तत्कालीन श्रेष्ठींनी शास्त्रकारांकडून करून घेतलेले दिसतात. या साऱ्या इतिहासाने सामान्य जनमानसात दृढ झालेली स्त्रीची प्रतिमा – स्वर्गसुख देणारी उपभोग्य वस्तू; श्राद्ध, स्वर्गलोकप्राप्ती, संपत्तीसाठी वारस पुरवणारी प्रजोत्पादनक्षम वस्तू; पुरुषावर सर्वस्वी अवलंबून असणारी दासी, मोक्षाच्या मार्गातली धोंड, मोहाचा डोह, स्वैराचारी, शरीरसुखास हपापलेली मादी म्हणून चार िभतींत बंदिस्त ठेवावी अशी; जिला चोप देण्याचा, दान करण्याचा, विकून टाकण्याचा हक्क पुरुषास दिला आहे अशी पतीची संपत्ती. हस्तांतरणयोग्य मालमत्ता. कनिष्ठास त्याची जागा दाखवून देण्यासाठी श्रेष्ठाने कधीही विटाळावी अशी. म्हणून पुरुषाच्या शत्रूच्या विटंबनेचं लक्ष्य. म्हणून प्रत्येक दंगल वा युद्धानंतर जेत्याकडून ओरबाडली जाणारी ती पराभूताची ‘स्त्री’.
मौर्य कालात  पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून परकीय सन्याशी लढणारी, परकीयांस या मातीतून हुसकावून लावणारी स्त्री या हतबल, असहाय अवस्थेस पोहोचली तरी त्यास भल्याबुऱ्या अशा श्रुति-स्मृितच्या मर्यादा होत्या. पापपुण्यांच्या समजुतींचा तरी लगाम होता. दुसऱ्याची स्त्री, अपत्ये, संपत्ती, मालमत्ता अन्यायाने हिरावल्यास, त्यांना नुकसान पोहोचवण्याचे पाप केल्यास मृत्यूनंतर नरकयातना भोगाव्या लागतील अशी भीती होती. देवळातल्या मूर्तीमधल्या देवतांवर, त्यांच्या शक्तींवर, कर्मकांडांवर राजा आणि प्रजा यांचा अतूट विश्वास होता.  त्यामुळे या देशातील नागरिक अतिशय सचोटीने, प्रामाणिकपणे, न्यायवृत्तीने जगत होते. चीनपासून रोमपर्यंतचा व्यापार-सौदे-हुंडय़ा केवळ भारतीय श्रेणींच्या-व्यापाऱ्य़ांच्या शब्दाच्या भरवशावर सुरू होता. हे सारं बदललं ते गझनीच्या महमुदाच्या स्वाऱ्यांनंतर. इसवी सन १००० ते १०२७ ही सत्तावीस र्वष गझनीच्या महमुदाने असंख्य स्वाऱ्या करून उत्तर भारतातील प्रतिष्ठित मंदिरं लुटली. सर्वशक्तिमान मूर्त्यां, दैवतं त्याच्या हल्ल्याला बळी पडली. सोरटीच्या सोमनाथावरील महमुदाच्या हल्ल्याने तर सारा देश हादरला. भारतीयांच्या श्रुति-स्मृति आणि मूर्तिपूजेवरील अभंग विश्वासाला बसलेला तो पहिला धक्का. त्यानंतर पुढील काही शतकं इस्लामच्या, इसायांच्या हल्ल्याचे हे धक्के बसत राहिले. मूर्त्यां फोडणाऱ्याची, मंदिरं लुटणाऱ्यांची होणारी भरभराट पाहताना भारतीयांचे विश्वास, श्रद्धा कायमच्या दुभंगल्या. मूर्त्यांचे पूजक मूर्त्यांच्या भंजकांचे विश्वासू चाकर झाले. मंदिराचे रक्षक मंदिर लुटणाऱ्यांचे लाचार झाले. तळागाळातील जनता भांबावली. काय खरं, काय खोटं कळेनासं झालं. श्रुति-स्मृितचे नियम, स्वर्ग-नरकाची कल्पना, पापपुण्याची भावना केवळ तळागाळातील संभ्रमितांपुरतीच उरली. ही तळागाळातील माणसं विहिरीचं विटाळलेलं पाणी पिऊनही बाटू लागली. पण विहीर विटाळणाऱ्यांच्या राजदरबारी वर्षांनुवष्रे चाकरी करूनही श्रेष्ठांचा धर्म टिकून राहिला. तळागाळातील स्त्रिया परकीयांच्या बलात्काराला बळी पडून आयुष्यातून उठल्या. जेत्यांच्या गुलाम आणि वेश्या झाल्या. पण श्रेष्ठांच्या स्त्रिया त्याच परकीयांशी विवाहसंबंध जोडून जेत्यांच्या राण्या आणि पट्टराण्या झाल्या. कुठलंही पाप न करता पददलितांच्या वाटय़ाला पृथ्वीवरच नरकवास आला. परकीयांच्या साथीने स्वकीयांना लुटणाऱ्या श्रेष्ठींना मात्र पापाच्या बदल्यात पृथ्वीलोकावर स्वर्गसुखं प्राप्त झाली. आजपर्यंत या परिस्थितीत बदल झालेला नाही. कांद्याच्या चढत्या-पडत्या भावाखाली दडपणारे, रस्त्यांवरल्या खड्डय़ांत ठेचकाळणारे, ओल्या-सुक्या दुष्काळात होरपळणारे, सारे तेच संभ्रमित, तळागाळातले, धर्मनिष्ठ सामान्यजन आहेत. या परिस्थितीला कारण असणारे स्वकीय, परकीय साठवलेल्या संपत्तीच्या बळावर सत्ता आणि स्वर्गसुख अनुभवत आहेत. ज्या स्त्रियांवर अन्याय, अत्याचार, बलात्कार होतायत त्या याच स्तरातल्या पापाभिरू, असहाय अबला आहेत. आणि ज्यांच्या अर्धनग्न, बीभत्स अंगविक्षेपाने चाळवलेला पुरुष हे करण्यास प्रवृत्त होतो त्या रूपगर्वतिांच्या पायांशी संपत्ती, सत्ता लोळण घेत आहे. या परिस्थितीत बदल होणार नाही कारण त्यासाठी आवश्यक ती एकजूट समाजात नाही.
 ग्रीकांना या मातीतून हुसकावलं तेव्हा हाती शस्त्र घेऊन स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने रणात उतरल्या होत्या. नंद राजवट उलथवली तेव्हा शूद्र चंद्रगुप्ताच्या साथीने ब्राह्मण कौटिल्याने नंद साम्राज्यास आव्हान दिलं होतं. ना स्त्री-पुरुषांत, ना जाती-जातींत भेदाभेद होता. ना कर्मकांडांचं स्तोम होतं, ना अस्पृश्यता होती. या देशातील सामान्यांनी प्रस्थापितांविरुद्ध घडवलेली ती शेवटची राज्यक्रांती होती. तशी उलथापालथ परत होऊ नये म्हणूनच बहुधा त्या एकसंध एकजुटीस-समाजऐक्यास जन्मनिष्ठ जातींच्या, िभतींच्या अगणित चौकटी घालून प्रस्थापितांनी विभक्त केलं असावं. राजद्रोह्य़ांना एकेकटे एकेका कोठडीत बंद केलं जातं तसं धर्मा-धर्माचे, जाती-जातींचे, भाषा-भाषांचे, पुरुष-स्त्रियांचे, द्वेष-विद्वेषांचे वेगवेगळे तुरुंग उभारले असावेत. त्या साऱ्या तुरुंगांच्या चाव्या सिंहासनाधिष्ठ राजे-महाराजे, सेनापती, सरदारांकडे; लालपिवळ्या दिव्यांच्या गाडय़ांतून, शरीररक्षकांच्या ताफ्यांसोबत फिरणाऱ्या श्रेष्ठजनांकडे सुपूर्द केल्या असाव्यात. हे श्रेष्ठजन भूलोकातील स्वर्गात राहतात. यांना ना देवाची भीती असते, ना माणसाची. पापपुण्यांचे नियम त्यांना लागू नसतात. चिरंतन सुखाचं अमृत त्यांनी प्राशन केलेलं असतं. हे श्रेष्ठजन पाळी पाळीने लाल-पिवळ्या दिव्यांच्या गाडय़ांमध्ये बसतात. धर्मा-धर्माची, जाती-जातींेची, भाषा-भाषांची पडलेली शकलं परत एकत्र जुळू नयेत याची दक्षता घेतात. त्यासाठी प्रत्येक धर्माच्या, जातीच्या मनात असुरक्षिततेची भावना टिकेल याकडे जातीने लक्ष देतात. तळागाळातील प्रत्येक जीव असहाय होईल, सार्वत्रिक अन्याय आणि अत्याचार सुरू राहील, भ्रष्टाचार सतत फोफावेल याची ते काळजी घेतात. या परिस्थितीचं श्रेय सर्व विश्वातील अगणित देव-देवतांना देण्याची हुशारी ते दाखवतात. त्यासाठी धर्मग्रंथ आणि श्रुति-स्मृति विस्मरणात जाणार नाहीत याची खबरदारी प्रत्येक क्षणी घेतात. सामान्यजनांचा कर्मकांडांवरील विश्वास अबाधित ठेवतात.
दशकं गेली, शतकं उलटली तरी कथा काही बदलत नाही. बकासुराला गाडाभर अन्न गाव रोज पाठवतच आहे. पत्नी पणाला लावणाऱ्या धर्मासमोर दु:शासन द्रौपदीच्या वस्त्राला हात घालतोच आहे. जमदग्नी ऋषींच्या सांगण्यावरून रेणुकेचं ऑनर कििलग होतंच आहे. अजूनही स्त्रीमोहाचा डोह, विषाचा डंख, नरकाचं द्वार आहे. स्वर्गसुखाची आस जोपर्यंत विझत नाही, तोपर्यंत ती सुखाचं साधन होणारी उपभोग्य वस्तूच राहणार आहे. पुरुषश्रेष्ठांचा स्वर्ग जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत भूलोकीचा नरकवास हेच तिचं जीवन असणार आहे. १८५० ते १९५० या शतकात सुधारकांनी काहीसं बदललेलं तिचं प्राक्तन परत मूळ पदावर येत आहे. सध्या तिला ट्रेन आणि बसमध्ये स्वतंत्र आसनांची गरज पडते आहे. तिथेही कायद्याच्या रक्षकांच्या रक्षणाची गरज भासतेच आहे. हळूहळू तिला चुचकारत तिच्यासाठी संपूर्ण वेगळी वाहनं, रस्ते, शाळा, कॉलेजं, कार्यालयं बनतील. तिला समाजापासून पूर्णपणे विभक्त केलं जाईल. तिच्याच भल्यासाठी तिला परत पदराआड, बुरख्याआड दडवलं जाईल. शेवटी परत चार िभतींत कोंडलं जाईल. इराण, अफगाणिस्तानसारख्या काही देशांत हेच याआधी घडलं आहे. पोळपाट-लाटणं बडवत रस्त्यावर येणारी, पदर खोचून प्रशासनाला जाब विचारणारी स्त्री कधीच विस्मृतीत गेली आहे. स्वत:चं घर सांभाळताना, आíथक भार पेलताना स्वत:वर होणारा अन्याय, अत्याचार, बलात्कार निवारता निवारता ती सभोवतालापासून दूर लोटली जात आहे.
  अठराव्या शतकापर्यंत युरोप-अमेरिकेसह जगभरातील स्त्रीची अवस्था सारखीच होती. पृथ्वीभोवती, सूर्य, तारे, सारं विश्व गरगरतं अशा भ्रामक कल्पनांवर आधारलेल्या असंख्य धर्माच्या तालावर सारं जग चालत होतं. परंतु अठराव्या शतकाच्या अखेरीस वेग घेतलेल्या विज्ञानाची कास धरत ज्या देशांनी आपापल्या पुराणकल्पना सन्मानपूर्वक दूर सारून आधुनिक कायद्यांची कास धरली, त्या त्या देशांत स्त्री पुरुषाच्या बरोबरीने समान सन्मानाने जगू लागली. त्या देशांची भौतिक, आíथक, वैज्ञानिक प्रगती झाली. ज्या देशांतील शासकांनी केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी धर्माला पुढे करत जुनाट पुराणकल्पना आणि अर्थहीन कर्मकांडांत प्रजेस गुंतवलं त्या देशांतील स्त्री पुरुषांच्या दावणीला बांधली गेली. त्या साऱ्या देशांची भौतिक, आíथक, वैज्ञानिक अधोगती झाली. त्या साऱ्या देशांत आज बलात्कार, िहसा, भ्रष्टाचार माजला आहे. त्याची कारणं आणि त्यावरील उपाय दोन्हीवरही इतिहास नि:संदिग्ध भाष्य करतो. ते स्वीकारता आलं तर आणि तरच या देशात पूर्वी नांदणारी समृद्धी, शांती, नतिकता परतू शकते. स्त्री-पुरुषांच्या नात्यांतील निर्मळता परत उमलू शकते. हा इतिहासाचा कौल आहे!    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This tile is history
First published on: 04-01-2014 at 07:27 IST