– हेमा होनवाड

तिबेटमधील एका खेड्यात अर्धभटक्या जमातीत जन्मलेला येशी. अनेक अडथळ्यांना सामोरे जात भारतात येतो आणि २० वर्षं ‘तिबेटी निर्वासित’ म्हणूनच जगतो. परंतु ‘शिक्षण हे केवळ एक उपजीविकेचं साधन नाही तर स्वत:ची ओळख करून घेण्याचं आणि स्वत:शी जोडलेलं राहण्याचा एक मार्ग आहे.’ हे वेळीच उमगल्याने येशी ‘संगणक विज्ञान’ शिकला. ‘सॉफ्टवेअर डिझाइन’ला सामाजिक कार्याशी आणि त्यातून माणसांना जोडण्यासाठीचे त्याचे प्रयत्न सांगणाऱ्या या लेखाचा हा भाग पहिला.

मी शाळेत जायला लागले तेव्हा देश नुकताच स्वतंत्र झाला होता. मंतरलेले दिवस! शाळेत आम्ही देशप्रेमाची गीतं भाबडेपणानं मोठमोठ्याने गात असू. ‘आता स्वातंत्र्य मिळालं, यापुढे सगळं कसं छान होणार’ ही खात्री वाटायची आणि भविष्याची सोनेरी स्वप्नं रंगवायचो. चित्रपटही तसेच होते. ते दिवस भारावलेले होते खरे, पण ते होतं केवळ अज्ञानातलं सुख. फाळणीच्या काळात घडलेली हिंसा, अत्याचार याबद्दल आम्ही अनभिज्ञ होतो. मोठ्यांवर, नेत्यांवर पूर्ण विश्वास होता. आम्हा छोट्या मुलांसारखीच बहुसंख्य मोठी माणसंही वास्तवापासून खूप दूर होती. येशीबद्दल लिहायला सुरुवात केली आणि मला शाळेत गायचो ते एक गीत आठवलं,

‘‘हम गाते नया तराना है,

दुनिया को दोस्त बनाना है।

दूध में जैसी शक्कर मिलती,

उसी तरह घुल जाना है।।’’

पण प्रत्यक्षात दुधात साखरेसारखं विरघळून जाणं दूरच, पण खड्यासारखं वगळलं जाण्याचे अनुभवच असंख्य माणसांना येत होते. अनेक स्तरांवर माणसामाणसांत कळत-नकळत भेदभाव होत होता याचा आम्हाला तेव्हा पत्ताच नव्हता. पण वास्तवाचं भान येऊ लागलं. भ्रमनिरासाचे धक्के पचवून सकारात्मक राहून काम करत राहणं एवढी एकच गोष्ट माणसाच्या हातात असते हे समजलं.

सुरुवातीला असं जगणाऱ्या माणसाला, येशीला सलाम! कोणत्या घरात आणि कोणत्या देशात आपला जन्म होतो यावर अवलंबून न राहता आपलं भविष्य स्वत: घडवणारा येशी कोणत्या आणि किती अडथळ्यांना सामोरा गेला आणि अजूनही जातो आहे हे पाहिल्यावर त्याच्या जिद्दीला, धैर्याला आणि कृतज्ञतेमुळे टिकून राहिलेल्या विनम्र सकारात्मकतेला शतश: प्रणाम! येशी तिबेटच्या पूर्वेला वसलेल्या एका छोट्या खेड्यात अर्धभटक्या जमातीत जन्मला. लहानपणीच्या दोन गोष्टी त्याला आठवतात. वयाच्या ५व्या वर्षी दूरवरच्या शाळेपर्यंत तो चालत जायचा आणि तिथे चिनी भाषा शिकवली जायची. दुसरी, खूपदा दाट जंगलात बहिणीबरोबर शांतपणे वेळ घालवायला त्याला खूप आवडायचं. येशी सात वर्षांचा झाला तेव्हा त्याच्या वडिलांनी मन कठोर करून त्याला शिक्षणासाठी आणि सुरक्षिततेसाठी भारतात पाठवायचा निर्णय घेतला आणि येशीचं सगळं विश्वच बदललं. ते वर्ष होतं १९९७.

येशीनं हिमालयातून एका अतिशय खडतर प्रवासाला पायी चालत सुरुवात केली. तो दोन महिन्यांहूनही अधिक काळ चालत होता. त्याचा मोठा भाऊ त्यापूर्वीच घरातून पळून गेला होता. त्यानं नेमलेले नेपाळी वाटाडे येशीला वाट दाखवत होते. ट्रेकमध्ये पदोपदी धोका होता. दिवसा गुहेमध्ये किंवा दाट झाडीमध्ये लपून बसावं लागायचं आणि रात्री भूक आणि थंडीचा सामना करत चालत राहायचं. दोन वेळा तर जीवावरच बेतलं होतं. एकदा जंगलात विश्रांती घेत असताना कुत्री भुंकायला लागली आणि माणसांचे आवाज येऊ लागले. गटाच्या म्होरक्यानं तोंडातून आवाज फुटू नये म्हणून येशीचं तोंड इतका वेळ दाबून ठेवलं की त्याची शुद्ध हरपण्याची वेळ आली होती.

दुसऱ्या प्रसंगी त्यांचा चमू रस्त्यावर टेहळणी पथकाच्या ताब्यात सापडला. प्रचंड गोंधळ झाला. त्या गोंधळात ‘सुदैवानं’ येशीला कोणीतरी जोरात लाथ मारली आणि तो गटारात फेकला गेला आणि बेशुद्ध झाला. बाकीच्यांना दणकून मार बसला आणि अटक झाली. शुद्धीवर आला तेव्हा येशीला कोणीतरी प्लास्टिकच्या पिंपांखाली लपवलेल्या स्थितीत एका जीपमधून घेऊन जात होतं. सरतेशेवटी जीप नेपाळमधील तिबेटच्या स्वागत कक्षात पोहोचली. तिथे येशीला त्याचा भाऊ भेटला. तिथून त्याची रवानगी भारतात, धरमशालामध्ये झाली. त्यानंतर येशीला मसुरी येथील तिबेटी मुलांच्या ‘होम स्कूल’मध्ये दाखल करण्यात आलं. त्या घरातील एक तपाचा काळ हा येशीच्या जडणघडणीतील महत्त्वाचा काळ ठरला. येशीच्या शब्दात- ‘‘मी आज जो आहे तो त्या घरामुळे!’’

हे घर येशीसारख्या आईवडील आणि घर सोडून आलेल्या मुलांसाठीच निर्माण केलं होतं. इथल्या शाळेत मुलं इतर शाळांसारखा अभ्यास तर करायचीच; पण शाळेव्यतिरिक्तच्या वेळात ती त्यांची काळजी घेणाऱ्या आईवडिलांबरोबर घरी राहायची आणि ते मोठ्या जिव्हाळ्यानं आणि आस्थेनं त्यांची काळजी घ्यायचे. घर सोडून आल्याचं तीव्र दु:ख थोडं सुसह्य व्हायचं. प्रेम, जिव्हाळ्याबरोबर जगण्यासाठी आवश्यक तेवढी शिस्तही त्या वातावरणात जाणीवपूर्वक रुजवली जायची. या गोष्टी येशीनं आपोआप आत्मसात केल्या. मूलभूत शालेय विषय शिकत असताना मुलं आपली भाषा आणि संस्कृती यांच्याशी जोडून राहतील याचीपण काळजी घेतली जायची. अशा संतुलित वातावरणात संगोपन झाल्यामुळे ‘शिक्षण हे केवळ एक उपजीविकेचं साधन नाही तर स्वत:ची ओळख करून घेण्याचं आणि स्वत:शी जोडलेलं राहण्याचा एक मार्ग आहे.’ हे येशीला उमगलं.

येशीच्या भावानं त्याला सांगितलं की, येशी आईच्या पोटात असताना चिनी आर्मी-डॉक्टरच्या चुकीच्या औषधोपचारामुळे, जन्मापासूनच त्याच्या पायात पुरेशी ताकद नव्हती. साहजिकच त्याच्या खेळावर मर्यादा आल्या. पण येशीनं निश्चयाने स्वत:च्या इतर गुणांवर लक्ष केंद्रित केलं. तो मन लावून अभ्यास करायचा आणि नियमितपणे अनेक उपक्रमांत सहभागी व्हायचा. वादविवाद, प्रश्नमंजूषा यांतील सहभागामुळे तो चारचौघांसमोर आत्मविश्वासानं बोलायला शिकला. निबंध आणि नियतकालिक, मासिकांच्या संपादकीय लेखनातून तो चिकाटीनं लिहायला शिकला. अशी स्वत:ची शक्तिस्थानं त्यानं स्वत: निर्माण केली.’’

लिखाण हा त्या काळात येशीचा ऊर्जास्राोत ठरला. माध्यमिक शाळेत शालेय द्वैमासिक आणि वार्षिक अंकाच्या संपादक मंडळाचा तो सदस्य होता. शाळेतील मुख्याध्यापकांच्या प्रोत्साहनानं येशीनं शाळेत असतानाच एक छोटं कविता आणि लघुकथांचं पुस्तकही तयार केलं. बारावीला येशी सगळ्या तिबेटी मुलांमध्ये पहिला आला.

येशी सांगत होता, ‘‘माझ्या विकासासाठी मला सर्वतोपरी मदत करणाऱ्या सगळ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त कशी करावी याबद्दलच्या चिंतनातून एक मार्ग मला सापडला. नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या हेतूनं मी आणि मित्रांनी मिळून एक गट स्थापन केला. मोठ्या वर्गातील मुलं तिबेटहून येणाऱ्या नवख्या मुलांना भाषा, गणित व शास्त्र या मूलभूत विषयाचा अभ्यास करायला मार्गदर्शन करायची. आरोग्य, पर्यावरण आणि तिबेटसमोर उभे असलेले प्रश्न याबाबत सत्र घेऊन वास्तवाचं भान राहील असा प्रयत्न करायची. शालेय जीवनात पुढाकार घेऊन मी हा जो प्रयोग सुरू केला तो पुढे भारतात अनेक महाविद्यालयांमध्ये स्वीकारला गेला. आईवडिलांना सोडून नव्या देशाशी जुळवून घेताना आम्हाला आलेले अनुभव हा या उपक्रमाचा पाया होता.’’

२०१०मध्ये शाळेतून बाहेर पडल्यानंतर येशी बंगळूरुमध्ये ‘संगणक विज्ञान’ ( Computer Science) या विषयात इंजिनीअरिंग करण्यासाठी ‘केएनएस’ तंत्रज्ञान संस्थेत दाखल झाला. अ-तिबेटी वातावरणात राहण्याचा हा त्याचा पहिलाच अनुभव होता. सुदैवानं येशीला त्याच्या वर्गमित्रांनी उत्तम पाठिंबा दिला. त्यांना येशीच्या जीवनाच्या लढाईबद्दल उत्सुकता होती. किती लहान वयात त्याला घर सोडून आईवडिलांच्या प्रेमाला पारखं व्हावं लागलं आणि तो शाळेत गृहपालकां- बरोबर लहानाचा मोठा कसा झाला, ही त्याची गोष्ट ऐकताना मित्रांच्या डोळ्यातून अश्रू ओघळायला लागायचे. या अनुभवातून येशीला हे जाणवलं की ‘अशा वैयक्तिक गप्पा-गोष्टीतूनच माणसं एकमेकांशी जोडली जातात, एकमेकांना स्वीकारतात, वादविवादातून नव्हे.’

माझ्या पिढीतील अनेक जण तंत्रज्ञानाला जरा बिचकूनच असतात. पण इंटरनेटचा प्रभावी उपयोग करून उत्तम परिणाम साधता येतात हे येशीच्या उदाहरणावरून मला समजलं. महाविद्यालयामध्ये गेल्यावर वेगवेगळ्या समुदायांना एकमेकांशी जोडण्यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीचं महत्त्व येशीला प्रकर्षानं जाणवलं. त्यानं एक ‘ब्लॉग’ लिहायला सुरुवात केली आणि कालांतरानं त्याचं रूपांतर एका ‘पोर्टल’मध्ये झालं. इथून विविध समुदायांच्या बातम्या, सांस्कृतिक आणि मानवी हक्कांच्या गोष्टी तो लोकांपर्यंत पोचवू शकत असे. संपादन करताना लेखनाचा सूरही सांभाळावा लागायचा. ‘ब्लॉग’चं उद्दिष्ट साधं होतं. स्वत:ची गोष्ट स्पष्ट शब्दात निर्भयपणे सांगायची पण कोणाहीबद्दल अनादराचा सूर नसायचा. यामुळे विखुरलेले लोक एकमेकांशी जोडण्याचा मार्ग सुलभ झाला.

येशीचं भारतात २० वर्षांहूनही अधिक वास्तव्य होतं आणि या कालावधीत पूर्ण वेळ त्याचा दर्जा ‘तिबेटी निर्वासित’ हाच राहिला. दरवर्षी त्याला त्याच्या निवासी परवान्याचं नूतनीकरण करून घ्यावं लागायचं. दुसऱ्या शहरात शिकायला जायचं असेल किंवा साधा प्रवास करण्यापूर्वी ‘परदेशी नागरिक नोंदणी कार्यालया’त अर्ज देऊन पूर्वपरवानगी घ्यावी लागायची. या परवान्याचे नियम कायम बदलत असायचे. त्यामुळे येशीच्या डोक्यावर दरवर्षी नूतनीकरणाच्या वेळी टांगती तलवार असायची.

परदेशात जाणं याहीपेक्षा कठीण होतं. या कार्यपद्धतीमुळे सतत ‘आपण इथले नाही’ ही परकेपणाची बोचणी मनाला होती आणि ‘आपलं अस्तित्व कायम असुरक्षित आणि कोणाची तरी मान्यता मिळण्यावर अवलंबून असल्याची’ एक त्रासदायक भावना येशीला टोकत असायची. हा एक मोठ्ठा धोंडा प्रवासात त्याला कायम पुन्हा पुन्हा ओलांडावा लागायचा. या अनुभवातून येशी घडत गेला.

महाविद्यालयानंतर धरमशालेत ‘सेंट्रल तिबेटियन अॅडमिनिस्ट्रेशन’मध्ये (Central Tibetan Administration) सुरुवातीला वेब-डेव्हलपर, नंतर डेटाबेस डेव्हलपर आणि प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून त्यानं जबाबदारी स्वीकारली. टीम साथीला घेऊन येशीनं ‘केंद्रीय डिजिटल लोकसंख्याशास्त्रीय प्रणाली’ची योजना तयार केली. या प्रकल्पात पंचावन्नहून अधिक क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं. भारत, नेपाळ आणि भूतानमधील तिबेटी निर्वासितांच्या ९० हजारांहून अधिक नोंदी केल्या. ही माहिती पंचवीसपेक्षा जास्त देशांपर्यंत पोहोचवली. या प्रणालीवर काम करताना येशीच्या हे लक्षात आलं की, ‘ हा डेटा लोकांच्या जीवनाचं प्रतिनिधित्व करतो म्हणून अधिक प्रामाणिकपणे हे डिझाइनिंग करणं महत्त्वाचं आहे.’

‘तंत्रज्ञानाला संदर्भाची जोड असली तरच दर्जेदार काम होऊ शकतं’ हा महत्त्वाचा निष्कर्ष येशीनं काढला. वापर करणाऱ्या माणसांच्या जगण्याशी तंत्रज्ञान सुसंगत असायला पाहिजे. ‘सॉफ्टवेअर डिझाइन’ला शिक्षण आणि सामाजिक कार्याशी जोडण्यासाठी खोलवर अभ्यास करण्याची आवश्यकता आहे, असं त्याला वाटत होतं. येशीची ही अभ्यास करण्याची तीव्र इच्छा त्यानं कशी पूर्ण केली, ते पुढच्या (२५ नोव्हेंबर) लेखात.