‘केबिनमधली’ तिला भेटताना केलेला द्राविडी प्राणायाम हा नंतर उमजलेल्या त्या स्त्री उद्योजकतेच्या कर्तृत्ववान रूपाने सुखावून जायचा. खरं समाधान ‘तुम्ही चांगली माहिती दिली आहे’ या शब्दांबरोबरच ‘आम्हालाही त्यांच्याशी संपर्क करता येईल का,’ असं प्रतिसादात ऐकताना, वाचताना मिळायचं. लेख छापून येत असताना संबंधितांपासून प्रेरणा घेण्याची अविरत इच्छा अनेक वाचकांनी व्यक्त केली. अर्थात सर्व समाविष्ट करून घेण्याला मर्यादा होती तरी दीपाली, वंदना यांच्या रूपाने अनोख्या कार्याची दखल घेतल्याचं समाधान आहे. ज्योती, वैशाली, स्मिनू यांचा ‘कॉर्पोरेट’बरोबरच सामाजिक दायित्वाचा पदरही या निमित्ताने उलगडला. नवउद्यमींसाठी ही एक प्रेरणा होऊ शकेल.
‘चतुरंग’करिता नव्या वर्षांत – २०१६ मध्ये ‘बिझनेस वुमन प्रोफाइल’ द्यायचं ठरलं तेव्हा त्याचं ‘विकिपीडिया प्रोफाइल’ न होता प्रत्यक्ष अनुभव, त्यांचा सल्ला अपेक्षित होतं आणि मुख्य म्हणजे ती उद्योगिनी ‘सीईओ’सारख्या वरिष्ठ पदावरील हवी, व्यवसाय क्षेत्रात नावाजलेली असावी, तिची कंपनी, ब्रॅण्ड माहितीतला असावा. या उद्योजिकांचं, त्यांच्या कंपन्यांचं ‘युनिकनेस’ देण्याचं आणि नवउद्यमींना, स्त्रियांना यातून प्रेरणा मिळेल, असा मंत्र देण्याचीही अटही होती. नक्कीच आव्हानात्मक काम होतं, मी लगेच या प्रस्तावाला होकार दिला. वार्ताकन, कार्यक्रमांच्या निमित्ताने नोंद करून ठेवलेल्या कॉर्पोरेट महिला, सीईओ, चेअरपर्सन, रिजन हेड यांची नावं चाळली. काही नावं ई-मेल, व्हिजिटिंग कार्डमधून धुंडाळली. दैनिकं, नियतकालिकांमध्ये आलेल्या मुलाखती टिपल्या. फोर्ब्सच्या याद्याही मिळविल्या. १०० हून स्त्री उद्योजकांचा ‘डेटा’ तयार झाला.
पहिल्याच लेखासाठी विभा पाडळकर नाव नक्की झालं. त्यांचा मुलाखतीला होकार मिळाला. वेळ, ठिकाणही ठरलं. व्यस्ततेमुळे नंतर स्थळ, काळ सारंच बदललं. ‘नंतर करू यात’ या त्यांच्या सल्ल्याने तर अवसानच गळलं. पहिलाच लेख आणि सगळं अगदी गळ्याशी आलं. येणारे-केले जाणारे फोन-मेसेज, भोवतालचे वाहन-वाहनकोंडीचे आवाज अशा वातावरणात अखेर मुलाखत अक्षरश: चालता-बोलता पूर्ण झाली. ‘एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स’च्या माध्यमातून खासगी आयुर्विमा क्षेत्रातील पहिली स्त्री आणि (महाराष्ट्रीयही) सीएफओ झाल्यानंतर विभा पाडळकर बऱ्यापैकी ओळखीच्या झाल्या होत्या, पण आलेल्या पहिल्या अनुभवाने पुढच्या भागांच्या मालिकेच्या शक्याशक्यतेची मी फक्त तूर्त कल्पनाच केली आणि काळावर सोडून दिलं. प्रत्यक्षात लेख छापून आल्यानंतर गुरगावच्या अजित घैसास यांचा पहिलाच ईमेल हा विभामधील ‘डाऊन टु अर्थ’चे तिच्या आईचे गुण कसे उतरले आहेत याचा होता. लतिका पाडळकर या चेन्नईच्या जिल्हाधिकारी असतानाचे अनुभव त्यांनी मांडले होते. त्यामुळे सदर लिहिण्याचा उत्साह वाढला.
एनएसई हा भारतातील सर्वात मोठा शेअर बाजार. त्याच्या स्थापनेपासून-गेल्या दोन दशकांपासून कार्यरत असलेल्या चित्रा रामकृष्ण, वेगवान राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, निर्देशांक-आर्थिकबाबतच्या आकडय़ांची गर्दी अशा वातावरणात एक शांत स्वभावाची व्यक्ती रेखाटता आली. चित्रा यांची कौटुंबिक माहिती न देण्याचं ‘डिस्क्लेमर’ पाळावं लागल्याची खंत मात्र कायम राहील. चित्रा यांच्यावरील मुलाखतीनंतर गोकुळ शिंदे यांनी, जबाबदारीसह दिलेली इत्थंभूत माहिती नक्कीच उपयोगाची आहे, ही पावती दिली. (चित्रा यांनी डिसेंबरच्या सुरुवातीला एनएसईच्या एमडी व सीईओपदाचा राजीनामा दिला आहे.)
‘बिझनेस बिट’ करताना वार्ताकन, इतर कार्यक्रमाच्या निमित्ताने इंडोको रेमिडिज,
अदिती कारे-पाणंदीकर यांच्याशी संपर्क व्हायचाच. या सदरासाठी एका औषधनिर्मिती उद्योगातील तिसरी पिढी म्हणून अदिती यांची ओळख करून देण्याचा हेतू होता. मुलाखतीदरम्यान त्यांच्यातील कलेविषयीचा कप्पा कळला आणि त्यांचा वेगळाच पैलू समोर आला.
‘एलआयसी म्युच्युअल फंड’मध्ये नीलेश साठे असताना नेहमी जाणं व्हायचं. ती केबिन परिचयाची असली तरी नव्याने आलेल्या सरोज डिखले यांच्या स्वभावाबाबत अनभिज्ञता होती. टेबलावरचा ‘मिनी ऑफिस पार्टी’चा पसारा बाजूला सारत त्या ‘नॉन स्टॉप’ बोलायला लागल्या. एलआयसीतील गोवा, ग्रामीण भागातील कार्य आणि बरंच काही. त्यांचे सहकारी, दूरध्वनीवरून नातेवाइकांशी त्यांचं संभाषण यातून त्यांच्याविषयीची आपुलकी दिसली. मॅडमबरोबर गोव्यात काम करताना आलेला उत्साहपूर्ण अनुभव विवेक चनाखेकर यांनी त्यांच्या मेलमधून मांडला. सरोज यांच्या एका मैत्रिणीने फोन करून विचारलं, ‘‘आम्हालाही माहीत नाही एवढं तुम्ही तिच्याबद्दल पहिल्याच भेटीतून कसं मांडलं?’’
आघाडीच्या मनोरंजन क्षेत्रातील महाराष्ट्रीय सीईओ म्हणून ज्योती देशपांडे यांना भेटण्याची उत्सुकता होतीच. त्यासाठी डिसेंबर २०१५ मध्येच केलेल्या संपर्कानंतर त्यांच्या विदेशभ्रमणामुळे भेटीसाठी थेट फेब्रुवारी २०१६ उजाडला. लेखात ज्योती यांनी व्यक्त केलेली सामाजिक कार्याची इच्छा पाहून ठाण्याच्या प्रशांत गुप्ते यांनी आपल्या नैसर्गिक वनस्पती व त्याद्वारे उपचार व्यवसायाच्या माध्यमातून सहकार्य करण्याची तयारी दर्शविली.
टेलिब्रॅण्ड्सचा पसारा एवढा मोठा असू शकतो हे कंपनीच्या ठाण्यातील औद्योगिक नगरीतील मुख्यालयावरून जाणवलं. मनीषा इसरानी यांच्या या निर्मितीमागे मोजकी पण धडाडीची टीम आहे. शिक्षण, करिअर आणि व्यवसाय अशा फेऱ्यांत प्रियकर-पतीबरोबरचा त्यांनी कथन केलेला प्रवास हा चित्रपटकथेसारखाच होता. मूळच्या सिंधी असूनही अस्खलित मराठी बोलणं आणि कंपनीतील प्रत्येक कर्मचाऱ्यांची त्यांच्या नावासह असलेली ओळख मुलाखतीदरम्यान दिसून आली.
भटकंतीची आवड करिअरमध्ये परिवर्तित करून लहानपणीचं नेतृत्व करण्याचं कसब पर्यटन उद्योगासाठीही उपयोगी आणण्याची किमया ‘थॉमस कुक’च्या शिबानी फडकर यांना साधल्याचं त्यांच्याशी बोलताना जाणवलं तर किचकट अशा वायदा वस्तू व्यवहार क्षेत्रातील आणि तेही आंतरराष्ट्रीय स्तरावरील उल्लेखनीय कार्य ‘अॅटलांटिक’च्या वैशाली सरवणकर यांच्यामार्फत उलगडून दाखविता आलं. सिंगापूरमधील वास्तव्यामुळे मुंबईतील मुलाखतीकरिता धावत्या भेटीतही वैशाली यांनी खासकरून विदर्भातील शेतकऱ्यांसाठी कार्य करण्याची तळमळ व्यक्त केली. त्यासाठी ‘मला वैदर्भियांची साथ हवीय’ असंही त्या म्हणाल्या.
मोतीलाल ओसवाल समूह वित्तीय सेवा क्षेत्रातील बडा समूह. दीपाली शिंदे यांच्याबरोबरच्या मुलाखतीद्वारे त्याच्या एका छोटय़ा व्यवसायाशी ओळख करून देण्याचा प्रयत्न झाला. मात्र रिक्षाचालक पिता व ‘अन्नपूर्णा’ असलेल्या मातेच्या या लेकीने प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत हॉटेल ते फायनान्स क्षेत्राकडे केलेला प्रवास यानिमित्ताने टिपता आला.
महिको आणि त्याचे संस्थापक डॉ. बारवाले हे महाराष्ट्राला तसे परिचित. या व्यवसायाची शाखा असलेल्या संशोधनातील मुख्य तंत्रज्ञान अधिकारीपदाची जबाबदारी त्यांच्या कन्या
डॉ. उषा यांच्यावर आहे. संशोधनाविषयीची त्यांची धडपड वयाच्या साठीतही कायम असल्याचं जाणवलं. जुन्या कंपनीनेही कालानुरूप कृषी क्षेत्रात संशोधनाची कास धरायला हवी, हा त्यांचा आग्रह दिसला.
एक साधी दूरचित्रवाणी संच उत्पादक कंपनी. पण अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत सादर केलेल्या उत्पादनांमुळे ‘गॅझेट वुमन’ ठरलेल्या व्हीयू टेक्नॉलॉजिज्’च्या देविता सराफ यांची डिझाइनकार, मॉडेल अशी रूपं वाचकांसमोर सादर करता आली. किचकट तांत्रिक उत्पादनांच्या व्यवसायात एक तरुणी अव्वल ठरल्याचा वस्तुपाठ देता आला.
उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या स्रोताला अस्सल व्यावसायिकतेची जोड देणं ‘मेट्रोपॉलिस हेल्थ केअर’च्या अमिरा शाह यांना जमलं ते केवळ अचूकतेच्या जोरावर. मुलाखतीकरिता दिलेली वेळ, उत्तरं यातील ‘परफेक्टनेस’ जपण्याबाबत त्या आग्रही दिसल्या. ‘कॉर्पोरेट इंटरव्ह्य़ू’ म्हणजे फोटोही ‘ऑफिस सूट’मधलाच हवा, यासाठीचा त्यांचा आग्रही विचार व कृती एकच असल्याची जाणीव करून देणारा होता.
उत्पादन, कंपनी, व्यक्ती हेरून ब्रॅण्डचं महत्त्व अधोरेखित करून देणारं ‘बरखाज् ब्रॅण्ड क्लिनिक’. स्थावर मालमत्ता व्यवसायातून झालेल्या या आगळ्यावेगळ्या क्षेत्राचं बरखा दत्तानी यांचं नेतृत्व. व्यवसायाबरोबरच आयुष्यातही आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ‘ब्रॅण्ड’ कसा तयार करावा, याचं मार्गदर्शन या भागाद्वारे विशेषत: तरुण पिढीला मिळालं. बरखा यांच्यावरील लेखाकरिता तरुणवर्गाचा खूप प्रतिसाद मिळाला. अगदी शिरपूर, सोलापूरसारख्या निमशहरी भागातील कॉलेजमध्ये असणाऱ्यांना या क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असल्याचं आलेल्या पत्रांवरून जाणवलं.
व्यवसायाचा भाग प्रत्यक्षात आचरणात प्रत्येक वेळी येईलच, असे नाही. कर्मचाऱ्यांबद्दलचं बोलणं-वागणं, पाहुण्यांकरिता स्वत:ची केबिन सोडून थेट स्वागत कक्षापर्यंत येणं हे सारं केवळ ‘किज हॉॅटेल’चंच नव्हे तर ‘हॉस्पिटॅलिटी’ क्षेत्राचं प्रतिनिधित्व जणू फक्त अंशू सरिनच करतात, असं जाणवलं. त्यांच्या भेटीत ‘मी काय केलं’ पेक्षा ‘मला काय शिकायला मिळालं’ हेच अधिक भावलं.
‘युनिव्हर्सल स्पोर्ट्सबिझ’ची अंजना रेड्डी स्वत: बॅटमिंटपटू. खांद्याच्या किरकोळ अपघातामुळे आवडत्या खेळावर आणि वडिलांचा भक्कम उद्योगाचा डोलारा यावर पाणी सोडणाऱ्या व्यक्तिमत्त्वाची स्वावलंबी आणि स्वाभिमानी बाजू दिसली. विशेष म्हणजे ‘खेळातून कदाचित त्या ‘रुड’ झाल्या असाव्यात,’ असे सांगणारे, समजवणारे काही ईमेल आले.
सणांच्या हंगामात ग्राहक खरेदी, सोने-शेअर बाजाराचा कल यावर बातम्यांसाठी अधिक काम करावं लागतं. याच दरम्यान चर्चेतील डॉट कॉम, ई-कॉमर्स क्षेत्रातील एक कंपनी या सदरात समाविष्ट करता आली. एक अब्ज डॉलरची उलाढाल आणि या क्षेत्रातील सर्वात मोठी पहिली विदेशी गुंतवणूक अशी कामगिरी करणाऱ्या ‘शॉपक्ल्यूज’च्या राधिका अगरवाल यांचा काही बिकट संकटानंतरही व्यवसाय आलेख चढता राहिला.
आयुशक्ती आणि स्मिता नरम ही दोन्ही नावं तशी बहुधा सर्वानाच परिचयाची. सध्याचा योगविद्या, आयुर्वेदाचा प्रसारमारा पाहता अधिकच प्रसिद्धी दिली जाण्याची भीती होती. (तशी काही पत्रंही नंतर आली.) पण स्मिता यांना भेटल्यावर आयुशक्ती व्यवसायाचं वेगळेपण आणि पती पंकज नरम यांच्याबरोबरचा भागीदारीतील व्यवसायही ‘स्टेक सेल-बाय’पासून अलिप्त राहू शकला नाही, हे समोर आलं. उच्चभ्रू कौटुंबिक पाश्र्वभूमी असलेल्या स्मिता या मुलांच्या संस्काराबाबत किती दक्ष आहेत, यातून एका ‘कॉर्पोरेट लेडी’चा आईचा चेहरा दिसला.
जिंदाल समूहाचं सॉ लिमिटेड हे भल्या मोठय़ा पाइपनिर्मितीचं अंग. त्याची धुरा स्मिनूजिंदाल यांच्याकडे आहे. शालेय जीवनात त्यांना झालेला अपघात, त्याही स्थितीत सुरुवातीपासून त्यांचं उद्योगात प्रमुखपदी असणं, त्यांची ‘स्वयंम्’ हे सारं यानिमित्ताने समोर आलं. दिल्लीतील स्मिनू यांच्या या सदरासाठीचा संपर्क व्यस्त वेळापत्रकामुळे सतत लांबत राहायचा. मात्र नंतरच्या बोलण्यातून ‘स्वयंम्’चं कार्य मुंबई, पश्चिम भारतातही सुरू करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.
मेघना घईंवरील लेख प्रसिद्ध झाल्यानंतर जळगावच्या रायसोनी इन्स्टिटय़ूटने असे चित्रपटाशी संबंधित सर्व अभ्यासक्रम व्हिसलिंग वूड्समार्फत सुरू करण्याची तयारी दर्शविली.
आणि शेवटी..
कॉलममध्ये अनेक व्यक्ती काही कारणांनी सुटल्या. काही समोरून टाळले गेले तर काही माझ्याकडून. कारण लिहिण्यासाठीच्या मापदंडात ते बसत नव्हते. प्रसिद्ध झालेल्यांतील काही ‘प्रोफाइल’ अगदी ‘फिट’ बसणारे होते, असंही नाही. मात्र वेगळं क्षेत्र, वेगळी व्यक्ती म्हणून प्राधान्य दिलं गेलं.
मुलाखतींच्या निमित्ताने छायाचित्रणाची मोठी हौस भागवून घेता आली. ‘सबजेक्ट-ऑब्जेक्ट’चा कधी नव्हे ते ‘थ्रीसिक्टी डिग्री’ विचार या वेळी झाला. ‘केबिनमधली’ तिला भेटताना केलेला द्राविडी प्राणायाम हा नंतर उमजलेल्या महिला उद्योजकतेच्या कर्तृत्ववान रूपाने सुखावून जायचा. खरं समाधान ‘तुम्ही चांगली माहिती दिली आहे’ या शब्दांबरोबरच ‘आम्हालाही त्यांच्याशी संपर्क करता येईल का’ असं प्रतिसादात ऐकताना, वाचताना मिळायचं.
लेख छापून येत असताना संबंधितांपासून प्रेरणा घेण्याची अविरत इच्छा अनेक वाचकांनी व्यक्त केली. त्यासाठी त्यांनी या ‘बिझनेस वुमन’चे संपर्कही मागितले. दूरचित्रवाणी माध्यम क्षेत्रातील काही मित्र-मैत्रिणींनी ‘मला त्यांना आमच्या अमुक कार्यक्रमासाठी बोलवायचंय,’ अशी मध्यस्थीची गळही टाकली. काही ‘प्रोफाइल’बद्दल एक-दोघांनी नाराजीही व्यक्त केली. कदाचित ‘ती’ नेतृत्व करत असलेल्या कंपन्यांबद्दल वाचकांना आलेला अनुभव त्यासाठी कारणीभूत असावा. तर काहींनी त्यांच्या संपर्कातील कर्तृत्ववान स्त्रियांची शिफारसही केली. यामध्ये सामाजिक संस्था, शाळा, स्टार्टअप, कुठल्याशा कंपनीत विक्री-विपणन जबाबदारी हाताळणाऱ्यांची नावं होती. पण सर्व समाविष्ट करून घेण्याला मर्यादा होती तरी दीपाली, वंदना यांच्या रूपाने अनोख्या कार्याची दखल घेतल्याचं समाधान आहे. ज्योती, वैशाली, स्मिनू यांचा ‘कॉर्पोरेट’बरोबरच सामाजिक दायित्वाचा पदरही यानिमित्ताने उलगडला. नवउद्यमींकरिता हीदेखील एक प्रेरणा होऊ शकेल.
सदर समाप्त
वीरेंद्र तळेगावकर
veerendra.talegaonkar@expressindia.com