तंबाखूतील घातक ऑक्सिडंट्समुळे नायट्रिक ऑक्साइड या रसायनाच्या निर्मितीत अडथळा येऊन लैंगिक अवयवांतील रक्तपुरवठा कमी होत जातो तसेच निकोटीनमुळे कामभावनेलाच ओहोटी लागते. म्हणून लैंगिक अवयवांची कामोत्तेजना हळूहळू कमी होत जाते. लैंगिक भावनेलाच नष्ट करणाऱ्या तंबाखूच्या व्यसनाला दूर ठेवणं गरजेचं आहे हे सांगणारा हा लेख. नुकत्याच (४ जुलै) झालेल्या तंबाखू मुक्त दिनानिमित्ताने..
अकबर आणि बिरबल यांची एक गोष्ट आहे. एकदा बादशहा अकबर आणि बिरबल महालाच्या गच्चीवर गप्पा मारत असताना बादशहाचे लक्ष लांबवर असलेल्या तंबाखूच्या शेताकडे जाते. त्या शेतात एक गाढव उभे असते पण ते काही तिथे चरत नाही हे पाहून बादशहा हसून तंबाखूचे व्यसन असणाऱ्या बिरबलाला म्हणतो, ‘पाहिलंस बिरबल, गाढवही तंबाखूला तोंड लावत नाहीये.’ हजरजबाबी बिरबल चटकन बादशहाला म्हणतो,‘जहाँपनाह, गाढवच तंबाखूला तोंड लावत नाही.’
पण इथे मात्र बिरबल पूर्णपणे चुकला! कारण अज्ञानी व्यसनी व ज्ञानी व्यसनी आडमुठेच तंबाखूला तोंड लावत मिरवत असतात.
तंबाखूचे व्यसन हे असेच व्यापक प्रमाणात असणारे व्यसन आहे. कुठल्याही व्यसनशत्रूशी लढायचे असल्यास त्या शत्रूची पूर्वपीठिका व शरीरशास्त्रीय कार्यपद्धत माहीत करून घेणे आवश्यक असते.
तंबाखूची पूर्वपीठिका :
मुळात दक्षिण अमेरिकेत जवळजवळ इसवी सन पूर्व ३ ते ५ हजार वर्षांपासून अस्तित्वात असणारा हा पदार्थ नळकांडीतील धूम्रपानाच्या स्वरूपात मध्य अमेरिकेत ९व्या शतकात वापरला जात असल्याचे आढळले आहे. पण त्या वेळी तो वेदनाशामक औषध किंवा धार्मिक विधी म्हणूनच केवळ प्रचलित होता. त्याचा नियमित वापर होत नव्हता. ‘नवीन जगा’च्या शोधात गेलेल्या कोलंबसच्या शोध-मोहिमेत याचा वापर इतरांना कळला. इसवी सन १४९२ मधे रॉड्रिगो द जेरेझ हा स्पॅनिश खलाशी पहिला धूम्रपान करणारा युरोपियन ठरला. जुआँ निकोट या लिस्बनमधील राजनतिक अधिकाऱ्याने इसवी सन १५६० मध्ये पहिल्यांदा फ्रान्समध्ये ही वनस्पती आणली आणि मग नंतर तिथून इंग्लंडमधे तिची ओळख झाली. निकोटिनमुळेच युरोपमधे हिचा प्रसार झाल्यामुळे तंबाखूतील रसायनाला ‘निकोटिन’ हे नाव पडले. पोर्तुगीजांमुळे भारतातील राजदरबारी इसवी सन १६००च्या सुमारास हिचा प्रवेश झाला.
तंबाखूचा मूळ वापर ती खाण्यापेक्षा धूम्रपान करण्याकडे होता. तिच्यातील उत्तेजक गुणामुळे तिचा प्रसार झपाटय़ाने झाला. इसवी सन १६०२ मध्ये अमेरिकेतील व्हर्जििनया प्रांतातील जेम्स टाऊन इथे जॉन रोल्फ याने पहिल्यांदा व्यावसायिक पीक म्हणून तिचे उत्पादन सुरू केले. तंबाखूला ‘ब्राऊन गोल्ड’ म्हणजेच ‘तपकिरी सोने’ म्हटले जात होते. परंतु पहिली व्यावसायिक सिगारेट इसवी सन १८६५ मध्ये वॉिशग्टन डय़ूकने सुरू केली. जेव्हा जेम्स बोन्सॅकने पहिले सिगारेट बनवणारे मशीन इसवी सन १८८१ मध्ये तयार केले तेव्हापासून तंबाखूच्या धूम्रपानाचा प्रसार झपाटय़ाने वाढला. भारतामध्ये इसवी सन १८८७ मध्ये ‘बिडी’चे व्यावसायिक उत्पादन सुरू झाले आणि तिच्या स्वस्त किमतीमुळे तळागाळात तंबाखूचे व्यसन फोफावले. ‘स्मोकिंग’ हा शब्द इंग्रजी भाषेत अठराव्या शतकाच्या शेवटी शेवटी निर्माण केला गेला. तोपर्यंत ‘िड्रकिंग स्मोक’ असे म्हटले जात असायचे.
तंबाखूच्या व्यसनाने सावध होऊन सार्वजनिक नतिकतेला धोका मानून इसवी सन सोळाव्या शतकातच ओट्टामन साम्राज्याच्या चौथा मुराद या राजाने तंबाखूवर पहिली बंदी घातली. तर इसवी सन १६०४ मध्ये जेम्स पहिला यानेही तंबाखूवर चार हजार टक्के कर बसवून तिच्या व्यसनाला आळा घालण्याचा पहिला प्रयत्न केला. कशाचाही परिणाम न होता तंबाखूचे व्यसन जगभरच रुजले जात होते.
तंबाखूची शरीरशास्त्रीय कार्यपद्धत : –
तंबाखूचा शरीरावर होणारा घातक परिणाम लक्षात घेण्यासाठी तिचे शरीरशास्त्राप्रमाणे होणारे रासायनिक परिणाम सर्वसामान्यांनी जाणून घेतले पाहिजेत. धूम्रपानाने शिरकाव करणारे पदार्थ मज्जातंतूंना उत्तेजित करून निकोटिनने मज्जासंस्थेतील असिटील कोलीन या रसायनाचे परिणाम जास्त प्रकर्षांने उद्दीपित करतात. म्हणूनच हृदयाची धडधड वाढणे, मेंदूची उत्तेजकता, जलद प्रतिसाद-वेळ यासारखे परिणाम आढळतात. परंतु व्यसनाधीनतेसाठी जो परिणाम कारणीभूत ठरतो तो म्हणजे ‘न्युक्लिअस एॅक्युबन्स’ या मेंदूतील आनंद-केंद्रात डोपामीन रसायनामुळे एन्डॉर्फिन्स पसरण्याचा. डोपामीन हा आनंद-रस असून त्यामुळे निर्माण होणारे एन्डॉर्फिन्स हे मेंदूतील सुखशांती-रस आहेत.
पहिल्यांदा इसवी सन १९२९ मधे फ्रिट्झ लिकिनी या जर्मन शास्त्रज्ञाने धूम्रपान आणि फुप्फुसाचा कॅन्सर यांच्यातील संबंध स्टॅटिस्टिकद्वारे दाखवून दिला. परंतु तंबाखूविरुद्धचा लढा दुसऱ्या महायुद्धामुळे जोम धरू शकला नाही. खरे म्हणजे सर्वसामान्यांमध्ये पसरलेले बिडीचे व्यसन अजूनच घातक असल्याचे आढळून आले आहे. त्यामध्ये कार्बन मोनॉक्साईड, निकोटिन व टार यांचे प्रमाण तर सिगारेटपेक्षाही जास्त प्रमाणात असते.       
‘तंबाखू सेक्सला घातक आहे’ : वैधानिक इशारा
वयोगट १६ ते ५९ वर्षांमधील ८४०० पुरुषांच्या ऑस्ट्रेलियात केलेल्या एका संशोधनातून ‘अथेरोस्केरॉसिस’ या रक्तवाहिन्यांची लवचिकता घालवून त्यांना कडकपणा आणणाऱ्या विकाराचा धोका तंबाखूमुळे खूपच असल्याचे आढळले आहे. त्याचमुळे हृदयविकार होतो. पण तेवढेच नाही तर त्यामुळे िलग-ताठरतेची, इरेक्टाईल डिस्फंक्शन ही लैंगिक समस्याही उद्भवते हे डॉ. डेव्हिड कात्झ यांनी ठामपणे सांगितले. तंबाखूच्या सर्वात प्रकर्षांने जाणवणाऱ्या व डॉक्टरांनाही अनभिज्ञ असणाऱ्या तंबाखूच्या सेक्सवरील परिणामांची माहिती म्हणूनच अत्यावश्यक आहे. किंबहुना तंबाखूचा सर्वात पहिल्यांदा घातक परिणाम हा सेक्सवर आढळून येतो, परंतु जागरूकता नसल्यानेच सर्वसामान्य, वैद्यकीय तज्ज्ञ व सरकारही या विषयी अंधारात आहेत.
जर तंबाखू, सिगारेट यांच्या पाकिटांवर ‘तंबाखू सेक्सला घातक आहे’ असाच वैधानिक इशारा छापायला सरकारने सांगितले तर सर्वसामान्यांवर याच वैधानिक इशाऱ्याचा परिणाम जास्त होईल.
तंबाखूतील घटक-पदार्थ लैंगिकतेला खूपच घातक असतात हे शास्त्रीय संशोधन समाजापुढे आले तर कदाचित तंबाखूमुळे होणाऱ्या कॅन्सर व हृदयविकारांना न जुमानणाऱ्या कित्येक व्यसनाधीन व्यक्ती यामुळे तरी व्यसनापासून परावृत्त होण्यासाठी प्रवृत्त होतील.  
हार्ट आणि मेस्टन या संशोधकांना इ.स. २००८ मध्ये असे आढळले की, तंबाखूतील घातक ऑक्सिडंट्समुळे (फ्री रॅडिकल्स) नायट्रिक ऑक्साईड या रसायनाच्या निर्मितीत अडथळा येऊन लैंगिक अवयवांतील रक्तपुरवठा कमी होत जातो तसेच निकोटिनमुळे कामभावनेलाच ओहोटी लागते. म्हणून लैंगिक अवयवांची कामोत्तेजना हळूहळू कमी होत जाते.
पुरुषाच्या िलगातील व स्त्रीच्या जनन-भागातील रक्तप्रवाह वाढल्याने लैंगिक प्रतिसाद घडत असतात. या रक्तप्रवाह-संस्थेवर निकोटिनमुळे घातक परिणाम होत असतात. रक्तवाहिन्या आकुंचित होणे हा परिणाम िलगाची ताठरता कमी करत असतो. म्हणजेच नपुंसकतेचा धोका उद्भवत असतो. व्यसन जितके काळ तितका तो परिणाम जास्त. म्हणूनच अशा व्यसनी पुरुषांना लैंगिक समस्या जास्त प्रमाणात उद्भवतात. याबद्दल तो पुरुष जितका जागरूक राहील तितके लवकर त्याच्या ते लक्षात येईल.
परंतु हुलीहान-गिब्लीन आणि केलार या संशोधकांना आढळलेला तंबाखूचा अजूनही घातक परिणाम म्हणजे मेंदूत नपुंसकतेचे रसायन ‘प्रोलॅक्टिन’ याचे प्रमाण धूम्रपानाने वाढते. कोलमन व बँक्रॉफ्ट यांना निकोटिनचा थेट परिणाम पिटय़ुटरी ग्रंथीवर होऊन प्रोलॅक्टिन हॉर्मोनच्या नियमनात अडथळा येतो असे आढळले. तर सन, केन आणि साचिका या संशोधकांना लक्षात आले की, मेंदूतील ‘न्युक्लिअस ट्रक्टस सॉलिटॅरीस’ यावरही परिणाम होऊन ‘प्रोलॅक्टिन’ वाढत असते. ‘प्रोलॅक्टीन’मुळे मेंदूतील सेक्सचे केंद्रच मुळी अनुत्तेजित होत असते व कामभावनाच नष्ट होत जाते. याचा परिणाम दाम्पत्यातील कामसंबंधात दुरावा निर्माण होऊन पती-पत्नी नातेही धोक्यात येऊ शकते. कामसंबंधात पडणारे अंतर व लैंगिक ताठरता कमी कमी होत जाणे, म्हणजेच नपुंसकता येणे हे तंबाखूच्या व्यसनामुळे आहे हे जर कळले तर असे व्यसनी पुरुष जास्त जागरूक होतील. शिवाय तंबाखू, सिगारेट, गुटख्याच्या उग्र वासाने पुरुषाची कामुक जवळीक वा चुंबनादी कामक्रीडा याचा स्त्रीलाही संतापजन्य तिटकारा होत असतो हे वेगळेच.
तंबाखूजन्य पदार्थामधील गुटखा तर पुरुषाच्या वीर्यातील पुरुषबीज शुक्राणूंची हालचाल मंदावत त्यांचे प्रमाणही कमी करतो. त्यामुळे पुरुषामधे वंध्यत्व उत्पन्न होत असते. म्हणूनच लैंगिकतेवरील घातक परिणाम लक्षात घेऊन तंबाखूच्या व्यसनी पुरुषांना व विशेषत: तरुणांना विशेष सल्ला : तुम्हाला पुरुष म्हणून जगायचे असेल तर तंबाखू, गुटखा दूर ठेवा!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व कामस्वास्थ्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tobacco can destroy sex life
First published on: 06-07-2013 at 04:14 IST