‘लटपट लटपट तुझं चालणं…’ हा अरुणा अंतरकर यांचा (१८ ऑक्टोबर) संध्या या अभिनेत्रीवरील लेख वाचला. कधी कधी काही व्यक्तिमत्त्वे आपली कलात्मकता इतक्या शांतपणे जगतात की त्यांच्या अस्तित्वाचाही आपल्याला विसर पडतो, पण त्यांच्या जाण्यानंतर जाणवतं की त्या खरंच किती मोठ्या होत्या. अशाच होत्या संध्या, म्हणजेच विजया देशमुख.
‘चंदनाची चोळी’ नंतर त्या पडद्यामागे गेल्या, प्रसिद्धीपासून दूर राहिल्या, पण त्या प्रत्येक क्षणी कलाप्रति, नृत्याप्रति, आणि व्ही. शांतारामांविषयीच्या अखंड निष्ठेप्रति जगल्या. मधुरा जसराज यांनी लिहिलं आहे, ‘‘शांताराम आजारी असताना त्यांच्या उलट्याही त्यांनी स्वत:च्या हातात घेतल्या.’’ ही केवळ सेवा नव्हे, ती एक कलाकाराची नि:स्वार्थ भक्ती होती.
संध्या यांनी ‘स्त्री’ चित्रपटाच्या वेळी सिंहाबरोबर ‘लाइव्ह शूटिंग’ केले, ‘नवरंग’मधील हत्ती-घोड्यांच्या मधोमध केलेलं अतिशय कठीण स्त्री-पुरुष नृत्य, आणि ‘झनक झनक पायल बाजे’मधील कठीण उलट्या स्टेप्स हे सर्व प्रसंग स्त्रीशक्ती आणि जिद्दीचं प्रतीक ठरले, पण दुर्दैवाने, त्यांच्या पडद्यावरच्या लावण्यपूर्ण प्रतिमेमुळे (हेवी मेकअप आणि क्लोजअपमुळे)त्यांच्या कलेची गूढ खोली, त्यांची तपस्वी वृत्ती झाकली गेली.
आज त्या आपल्यात नाहीत, पण ‘पिंजरा’, ‘नवरंग’ आणि ‘दो आखे बारह हाथ’मधील त्यांचा तेजस्वी चेहरा अजूनही पडद्यावर झळकतो. आणि जणू सांगतो आहे, ‘‘सौंदर्य क्षणभंगुर असतं, पण निष्ठा अमर असते.’’या विलक्षण कलाकाराला त्रिवार प्रणाम.– डॉ. विजय आठल्ये, मुलुंड.
व्यसनमुक्ती केंद्राची शब्दसहल!
आनंद काकांची (डॉ. आनंद नाडकर्णी) लेखणी मराठीच्या मधुरतेसह थेट भिडते. त्यांचे दर पंधरवड्याने प्रसिद्ध होणारे ‘ऊब आणि उमेद’ हे सदर मी आवडीने वाचतो. शब्दसहल तीही व्यसनमुक्ती केंद्राची डॉक्टरांच्या लेखणीने अगदी उबदार झाली आहे. एकीकडे ‘समाजसेवा’ या शब्दातील गांभीर्य कमी होत असताना केवळ खासगी आस्थापनांत ‘कंपनी’केंद्रित कर्तव्ये साजरी केली जातात, हे संस्थेचा जीवनपट वाचल्यावर मनात आलं.
लोकप्रतिनिधी हेही एका अर्थानं समाजसेवेचे माध्यमच! ‘प्रशासन आणि सरकार’ अशी संघटनात्मक बांधणी दिमतीला असतानाही हा गाडा फारच कमी वेळेला किमान शक्तीनिशी चालतो. पण एकूण हे सदर वाचनीय आहे. – विजय भोसले, घणसोली.
सार्वजनिक चर्चेचा विषय
‘काळजी वाहकांचा आधार’ (३० ऑगस्ट) या विषयावरील अनघा सावंत यांच्या लेखात मध्यमवर्गीय, आणि सुखवस्तू अशा कुटुंबामध्ये हा प्रश्न सध्या चर्चेचा आणि म्हणून समाजिक चिंतेचा बनून राहिलेला दिसतो. कारण या प्रश्नाचे कंगोरे लक्षात घेतले, तर या प्रश्नाशी निगडित, आर्थिक, कौटुंबिक आणि सामाजिक अशा सर्व बाजूंनी हा प्रश्नांचा विचार करून उत्तर शोधण्याचा प्रयत्न करावा लागतो आहे.
जोपर्यंत वास्तव्यासाठी ‘चाळ व्यवस्था’ प्रचलित होती आणि छोटेखानी का होईना एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात होती, तोपर्यंत हा प्रश्न इतका गंभीर नव्हता. परंतु आता आधुनिक राहणी आणि प्रत्येकाला आपआपली स्वतंत्र अशी ‘स्पेस’ असली पाहिजे, हा आग्रह यातून ‘कुटुंबातील ज्येष्ठांचा सांभाळ’ अर्थातच त्यातच आजारी व्यक्तीसुद्धा आल्याच, हा प्रश्न आता जागोजागी दिसू लागला आहे. आणि म्हणून हा विषय सार्वजनिक चर्चेचासुद्धा झाला आहे.
ज्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम आहे, ते यावर काही तरी सन्माननीय उपाय शोधून प्रश्न मार्गी लावू शकतात. कारण घरी स्वतंत्र सेवेकरी नेमून, पैसे देऊन सेवा घेण्याचा मुद्दा असो, नाही तर वृद्धाश्रमात ज्येष्ठांची सोय करून देणे असो, दोन्ही बाबतींत आर्थिक पाठबळ हा मोठा अडचणीचा टप्पा पार करणे, सर्वसाधारण आर्थिक परिस्थिती असणार्या कुटुंबासाठी जवळजवळ अशक्यप्राय गोष्ट आहे.
शिवाय बऱ्याच वृद्धाश्रमांमध्ये ८० वर्षे वयाच्या वृद्धांना प्रवेश देणे बंद केले आहे आणि आजारपणामध्ये, जरूर ते प्राथमिक उपचार दिल्यानंतरची जबाबदारी संबंधित व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकाने घ्यावी, असा नियम केला आहे. अर्थातच हे सर्व नियम आणि निर्णय त्यांना स्वानुभवातून घ्यावे लागतात, हे विसरून चालणार नाही.
‘ठेवीले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान’, आणि आपल्या जीवनाची इतिश्री होण्याच्या अखेरच्या टप्प्यावर आपण जगत चाललो आहोत, ही अवस्था ज्या ज्येष्ठांनी मनोमन स्वीकारून आपली वाटचाल पुढे चालू ठेवली आहे त्यांच्यासाठी हा जीवनाचा टप्पा फार काही सुखावह नसला, तरी सर्वांसाठी सोयीचा ठरू शकतो, इतके मात्र नक्की म्हणता येईल. – मोहन गद्रे, कांदिवली.
