२८ ऑक्टोबरच्या अंकातील डॉ. मीना वैशंपायन यांचा ‘अनवट अक्षरवाटा’ सदरातील ‘प्रज्ञावती’ हा आयन रँडच्या व्यक्तिमत्त्वाचा व विचारांचा मागोवा घेणारा लेख आवडला. वस्तुनिष्ठ तत्त्वज्ञान रंजक भाषेत आणि प्रवाही कथानकाद्वारे सादर करून वाचकांना विचार करावयास भाग पाडणारी ‘अ‍ॅटलास श्रग्ग्ड’  ही कादंबरी म्हणजे बुद्धीवादाची गीताच.

भारतीय समाजकारणात सध्या वाढत चाललेल्या ‘निव्वळ भावनिक दृष्टिकोनावर’ आयन रँडचं तत्त्वज्ञान उपाय ठरू शकेल. कोणत्याही गोष्टीकडे तर्कनिष्ठपणे पाहण्याची वृत्ती निर्माण होण्यासाठी ‘अ‍ॅटलास श्रग्ग्ड’ सारखी पुस्तके उपयुक्त ठरू शकतात. गरिबांचा श्रीमंत देश असणाऱ्या आपल्या देशात साम्यवादाला झुकते माप असणे स्वाभाविकच आहे, अशा वेळेस उद्यमशील व्यक्तिमत्त्वांच्या, संस्थांच्या पाठीशी भक्कम बळ देणे गरजेचे आहे. दुर्बलांच्या विकासाबरोबरच, सबळांना नवनिर्मितीस साहाय्य करणे गरजेचेच आहे. या लेखातून आयन रँडच्या विचारांना अधोरेखित केल्याबद्दल धन्यवाद.

– तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

चांगल्या विषयाबद्दल अभिनंदन

२८ ऑक्टोबरच्या अंकामधील मीना वैशंपायन यांचा आयन रँडवरील ‘प्रज्ञावती’ हा सम्यक भाषेत लिहिलेला लेख वाचताना त्यांनीच लेखाच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आपल्या दैवताविषयी वाचताना भक्ताच्या चेहऱ्यावर उमटावे तसे कौतुक वाटत होते.

त्यांच्या ‘फाऊंटनहेड’ आणि ‘अ‍ॅटलास श्रग्ड’ या दोन कादंबऱ्या ऑल टाइम हिट समजल्या जातात आणि या दोन कादंबऱ्यांमधूनच त्यांनी प्रामुख्याने आपले तत्त्वज्ञान मांडले आहे.  प्रकाशनानंतर सुमारे दोन वर्षांच्या काळानंतर ‘माऊथ पब्लिसिटी’ ने ‘फाऊंटनहेड’ ही कादंबरी बेस्टसेलर ठरली तरी प्रकाशनापूर्वी १२ प्रकाशकांनी ती नाकारली होती.

१९४३ मध्ये ‘फाऊंटनहेड’ प्रकाशित झाल्यानंतर १९५६ मध्ये १२ वर्षांनी ‘अ‍ॅटलास श्रग्ड’ प्रकाशित झाली. पण हा सर्व काळ रँड या महाकादंबरीकरिता भरभरून अभ्यास करत होती, नोंदी काढत होती. तिचे अभ्यासक लेनर्ड पेकफ यांच्या म्हणण्यानुसार तिच्या वह्य़ांमध्ये ‘अ‍ॅटलास श्रग्ड’बद्दलच्या १ जानेवारी १९४५ पासूनच्या नोंदी सापडतात. (या नोंदीदेखील प्रकाशित झालेल्या आहेत.)

वैशंपायन यांनी रँड यांनी मांडलेल्या वस्तुनिष्ठतावादाचा उल्लेख फक्त एका वाक्यात केला आहे. पण वस्तुनिष्ठतावाद हा त्यांच्या विचारांचा, लेखनाचा आणि जगण्याचा सारांश आहे.  वस्तुनिष्ठतावाद ही रँड यांनी वैचारिक विश्वाला दिलेली देणगी आहे. ‘अ‍ॅटलास श्रग्ड’च्या भाषेत वस्तुनिष्ठतावाद म्हणजे ‘‘अ ्र२ अ.’’ एखादी गोष्ट सांगायची अथवा करायची असल्यास ती आडवळणाने न सांगता, भुई न धोपटता थेटपणे सांगणे किंवा करणे म्हणजे वस्तुनिष्ठतावाद. ‘मला असे म्हणायचे होते..’ असे मागाहून न म्हणता जे म्हणायचे आहे तेच म्हणणे म्हणजे वस्तुनिष्ठतावाद. वस्तुनिष्ठतावाद म्हणजे कायावाचामने भोंदूगिरीला तीव्र आणि स्पष्ट नकार. वस्तुनिष्ठतावाद म्हणजे कायिक, वाचिक, मानसिक आणि वैचारिक प्रतारणेला विरोध. आणि म्हणूनच बोलण्याप्रमाणे न वागणारी आणि वागण्याप्रमाणे न बोलणारी एकजात सर्व राजकारणी माणसे या ‘अ‍ॅटलास श्रग्ड’मधील काळ्याकुट्ट व्यक्तिरेखा आहेत.

रँडच्या नोंदींनुसार या कादंबरीत फादर आमेद्यूस नावाचे एक पात्रही दाखवायचे होते. हा धर्मगुरू प्रामाणिकपणे चांगल्याची भक्ती करणारी आणि तरीही सतत दयेतील नैतिकता आचरणारी सकारात्मक व्यक्तिरेखा असणार होता पण अशी काही व्यक्तिरेखा वाचकांना पटवणे अशक्य वाटल्याने तिने ती बाद केली. ‘अ‍ॅटलास श्रग्ड’ नंतर तिने फिक्शन म्हणावे असे लेखन केले नाही. पण तिच्या आवडत्या वस्तुनिष्ठतावादाबद्दल लेख लिहिले, पुस्तके लिहिली, भाषणे दिली, मुलाखती दिल्या. आणि तरीही ‘तत्त्वज्ञान हे फक्त तत्त्वज्ञानाच्या पुस्तकातच राहते, फक्त अभ्यासकांपर्यंतच पोहोचते आणि म्हणूनच निखळ तत्त्वज्ञानाच्या पुस्तकापेक्षा ते तत्त्वज्ञान मांडणाऱ्या आणि कितीतरी जास्त लोकांपर्यंत पोहोचणाऱ्या कादंबऱ्या लिहिणे हेच मला जास्त आवडते,’’ असे तिने म्हटले आहे.

अतिशय चांगल्या विषयाबद्दल मीना वैशंपायन यांचे अभिनंदन.

मनीषा जोशी, कल्याण.

सर्पदंशावर चांगला लेख

‘दंश : विषाचा आणि विषमतेचा’ हा २१ ऑक्टोबरच्या अंकातील वास्तवावर भाष्य करणारा लेख वाचला आणि सरकारदरबारी असणारी उदासीनता दिसून आली. सर्पदंशाने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण भारत तसेच जगभरात किती भयानक आहे हे लेख वाचल्यावर दिसून येते. कोकणात सर्पदंशाचे प्रमाण इतरांच्या तुलनेने जास्त आहे. आपल्याकडे प्रथमिक आरोग्य केंद्रावर डॉक्टर असला तर औषध नाही आणि.. अशी परिस्थिती आहे. या सर्व गडबडीत रुग्ण बाधित होतो व मरतो. सापाच्या जाती व त्यावरील विविध औषधांऐवजी एकच प्रभावी औषध बनविणे हि शास्त्रज्ञांची कल्पना उपयुक्त आहे. यामुळे रुग्ण वाचविणे सोपे होईल. दळणवळणाची साधने व प्रत्येक आरोग्य केंद्रावर अद्ययावत अ‍ॅम्ब्युलन्सची सोय असणे आवश्यक आहे.

– अनिल ल. तावडे , मुंबई.

‘कानडा हो विठ्ठलू.. वाचनीय

ऑक्टोबर २८च्या ‘चतुरंग’मधील प्रभाकर बोकील यांच्या ‘कानडा हो विठ्ठलू कर्नाटकु?’ या नितांतसुंदर लेखाबद्धल अभिनंदन. झाडावरून पडणारे फळ सर्वानाच दिसते पण एखाद्या न्यूटनलाच त्यामागील गुरुत्वाकर्षणाचा शोध घ्यावासा वाटतो. सुरेलपणे गायलेले अभंग आपण सर्व ऐकतो. ते कानातून हृदयात जातात पण बोकील यांच्यासारख्यांच्या हृदयात ते डोक्यामाग्रे जातात. त्यांना त्यातील शब्दांचा वेध घ्यावासा वाटतो. त्यांचा नक्की अर्थ जाणून घ्यावासा वाटतो. या जिज्ञासेतून ते संगीत आणि अध्यात्म या दोन्हींत अधिकार असणाऱ्या हृदयनाथांना काही प्रश्न साध्या पत्राद्वारे विचारतात. विशेष म्हणजे याला ‘फॅन-मेल’ म्हणून उडवून न लावता हृदयनाथजी आपण होऊन फोन करून प्रतिसाद देतात, त्यातून अर्थाचे स्तर उलगडून दाखवणारा चांगला संवाद घडतो ज्याचा प्रत्यय आपल्याला या लेखातून येतो. काळ पुढे सरकतो तसे भाषेचे आणि भौगोलिक संदर्भ बदलत जातात. काही साध्या सोप्या गोष्टी-शब्द  गूढ होऊन बसतात. आणि ते गूढ जिज्ञासूंना बेचन करते. मग हृदयनाथजींसारखे मर्मज्ञ आपणही या क्षेत्रात अजून विद्यार्थीच आहोत, अशी नम्र भूमिका घेत शंकांचे निराकरण करतात.

– श्रीराम बापट, दादर