‘शिकू आनंदे’ या सदरातील रती भोसेकर यांचा ‘बोलावे, परि जपून’ हा २ एप्रिल रोजीचा सुंदर लेख वाचला. लेखात लिहिल्याप्रमाणे लहान मुलांची शब्दसंग्रह वाढविण्याची क्षमता अफाट असते आणि कानावर पडलेला प्रत्येक शब्द मुलांचा मेंदू टिपकागदासारखा टिपून घेतो. या दोन्ही गोष्टी सत्य आहेत. लेखिकेने सांगितलेल्या आणखी दोन महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे लहान मुलं त्यांच्या शाळेतील शिक्षकांचे तसेच आजूबाजूच्यांचेही सतत निरीक्षण करीत असतात आणि त्यांचं वागणं, बोलणंही ती पटकन उचलतात. म्हणून वर्गात शिक्षकांनी (घरी पालकांनी) प्रत्येक शब्द न् शब्द जपून वापरायला हवा. या लेखाद्वारे लेखिकेने समस्त पालकांना एक मोलाचा सल्ला व इतरांनाही मार्गदर्शक तत्त्व सांगितले आहे असे वाटते. ते असे की लहानांसमोर जे काही बोलले किंवा त्यांना शिकवले जाते, ते मुलं पटकन उचलतात. मुलांना सुसंस्कृत/ सुशिक्षित बनविण्यासाठी याचा सल्ल्याचा/ तत्त्वाचा वापर होणे लेखिकेला अपेक्षित असावे.
– रविकांत तावडे, नवी मुंबई

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनुभव सांगायला हवेत
१९ मार्च रोजी प्रसिद्ध झालेल्या गौरी दाभोळकरांचा ‘कथा त्या कपाची’ हा लेख वाचल्यानंतर पहिली प्रतिक्रिया मनात उमटली की वयाची पंचाहत्तरी उलटली तरी आपल्याला या स्त्रीशी निगडित असलेल्या गोष्टीबद्दल काहीच कसं ठाऊक नव्हतं! मी माझ्या ओळखीच्या दोन-तीन स्त्री रोगतज्ज्ञांना विचारलं, तर आश्चर्य म्हणजे त्यांनाही याबद्दल ठाऊक नव्हतं. आपल्या संबंधीच्या, भल्याबुऱ्या प्रश्नांबद्दल आपणच किती अनभिज्ञ असतो!
मासिक स्रावाच्या वेळी वापरावयाच्या विविध प्रकारच्या नॅपकिन्सची टीव्हीवरच्या सर्व वाहिन्यांवरून दिवसातून अनेकदा जाहिरात होत असते. मग वरील लेखात उल्लेखिलेल्या या मेन्स्ट्रअल कपाचा, या साधनाचा प्रचार का होऊ शकला नाही? वरील लेखाच्या लेखिका या डॉक्टर नाहीत. पण मासिक पाळीच्या वेळी त्या स्वत: हा कप वापरतात आणि इतरांना त्याची उपयुक्तता पटवून देण्यासाठी त्यांनी हा प्रपंच मांडला. या कपांच्या वापरामुळे, नॅपकिन्समुळे होणारे प्रदूषण व पर्यावरणावरचा विपरीत परिणाम टळू शकतो, असा ठाम विश्वास लेखिकेने व्यक्तकेला आहे. आपण लाजेखातर या विषयावर मोकळेपणाने बोलत नाही परिणामी काही उपयुक्त गोष्टी सर्वदूर पोहोचत नाहीत. काहींना त्याबद्दल माहिती असेलही, पण एक हजार रुपयांच्या वर त्याची असलेली किंमत किती जणींना परवडणारी आहे? लेखिकेच्या मते एक कप घरीच पुन:पुन्हा स्वच्छ धुऊन- ‘स्टरलाइज्ड’ करून वापरता येण्यासारखा असला तरी तो वापरण्यासंबंधीचे प्रात्यक्षिक पाहिल्याशिवाय किंवा वापरणाऱ्या आणि काही त्रास न होणाऱ्या स्त्रिया पुढे येऊन, त्यांचे अनुभव एकमेकींना सांगितल्याशिवाय या साधनाचा प्रचार होणार नाही. त्यातून हा कप दुकानात, केमिस्टकडे मिळत नाही, तो इंटरनेटवरून मागवावा लागतो, त्यामुळे सहज उपलब्ध न होणाऱ्या वस्तूच्या मागे लागण्याची मानसिकता नसते आणि पर्यावरणाबद्दलची कळकळ तर नसतेच.
लेखिकेने ज्या तळमळीने, सविस्तरपणे सर्व बाजूंनी विचार करून या मेन्स्ट्रअल कपाबद्दल विवेचन केले आहे त्यासाठी त्यांचे कौतुक केलेच पाहिजे.
– प्रमिला राऊत, सोलापूर.

सुसंगत संस्कार आपल्याच हातात
रती भोसेकर यांचा ‘बोलावे परी जपून’ हा लेख वाचला आणि मनोमन पटला. लेखिकेने केलेले सविस्तर विवेचन मनापासून भावले. खरोखरच मुले अनुकरणप्रिय असतात. सहजगत्या एखादी कृती किंवा वाक्य मुले आत्मसात करत असतात. आपले आईवडील, आजीआजोबा, घरातली मोठी भावंडे, आपले शिक्षक काय बोलतात, कसे वागतात यावर त्यांचे लक्ष असते. ‘आधी केले मग सांगितले’ या उक्तीप्रमाणे मोठय़ांनी राहिले तर म्हणजेच आपल्या वागण्या-बोलण्यावर संयम ठेवला तर फार सोपे होते. त्यामुळे तू टी.व्ही. बंद कर, कार्टून बघू नको, मोबाइलशी खेळू नको असे सांगण्याच्या आधी आपण स्वत:वर किती संयम ठेवतो हे बघायला पाहिजे. आधुनिक काळात मुलांना वाढविणे हे शिवधनुष्य पेलण्यासारखेच आहे. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे असे मला वाटते. काळ बदलला तरी सुसंगत असे संस्कार करणे आपल्याच हातात आहे.
– मीनल श्रीखंडे, पुणे</strong>

हा तर एका मातेचा अपमान
वासंती वर्तक यांस,

मी, वसुधा वसंत खरे, लेखिका वंदना खरे हिची सख्खी आई. आपल्या १६ एप्रिल २०१६ च्या ‘एकाला चलो रे’ सदरातील लेखाच्या अनुषंगाने हे पत्र लिहित आहे. मी, आज ७६ वर्षांची आहे. मी माझ्या मुलीला, वंदनाला कसे वाढवले हे माझे मला व माझ्या सर्व नातेवाईक व मित्रमंडळी यांस माहीत आहे. पण आपला लेख धादांत असत्य व आक्षेपार्ह विधानांनी खचाखच भरलेला आहेच पण त्यात आपण एका मातेचा व ज्येष्ठ नागरिकाचा अपमान करून त्यास मनस्ताप देण्याचे काम मात्र केलेले आहे, कसे ते खालील मुद्दय़ांवरून स्पष्ट होते.
अगदी पहिलेच वाक्य, ‘तू आमची नाहीस, आमच्या फॅमिली फोटोत तू नकोस’, असे कधीही झालेले नाही, कोणीही म्हटलेले नाही. ती तिच्या सर्वात धाकटय़ा मामाच्या लग्नाला नागपूरला आलेली असतानाचे फोटो आमच्याकडे आहेत. त्यात ती अगदी स्पष्ट दिसत आहे. या लग्नासाठी ती नागपूरला आधीच १५ दिवस येऊन राहिली होती. त्या वेळी ती भक्ती बर्वे यांची काही स्वगते म्हणून दाखवीत असे, त्याचे सर्व नातेवाइकांनी तोंडभरून कौतुक केले.
‘घरात सगळे रागराग करायचे.’ मुळीच नाही, उलटपक्षी पित्याचे पाठबळ नसल्याने सतत सहानुभूती व अतोनात कोडकौतुक होई. आजोबा संध्याकाळी दमून-भागून आल्यावरसुद्धा मुद्दाम तिला बागेत फिरायला नेत व आजी कायम तिच्या आवडीचा शिरा, पुरणपोळी करीत असे व मामा ‘एनसीसी’त मिळालेली बिस्किटे, मिठाई तिच्यासाठी राखून ठेवीत असे.
ज्या वयात प्रेम कशाशी खातात हे ठाऊक नसते त्या वयात शाळेत असताना आठवीतील तिच्याच वर्गातील एका हुशार मुलाला प्रेमपत्र लिहिल्याने शाळेने हिला रस्टिकेट केले होते. दोन वर्षांकरिता हिला कोठे कोण प्रवेश देणार? आपणच थोडी दया दाखवावी ही माझी विनंती त्या वेळचे मुख्याध्यापक व अधीक्षक यांनी धुडकावून लावली. अखेर वेडे मूल आईचेच असते असे समजून एका शाळेत मोठय़ा मिनतवारीने प्रवेश मिळवला. तेव्हा लाड कोणी केले? शिक्षकांनी की आईने? अशा वेळी चार अनुभवाच्या, शहाणपणाच्या गोष्टी समजावून सांगणाऱ्या आईचे वर्णन आपण थेट ‘माता न तू वैरिणी’ असे कसे करता?
ज्या मित्राने केवळ मित्र भावनेने मदत केली व म्हणून लग्न केले असे ती म्हणते. त्यानेच पुढे कौटुंबिक हिंसाचार का करावेत? एक सुस्वरूप, गुणवान, सुशिक्षित मुलगी एका कुरूप अशिक्षित, झोपडपट्टीतील रिक्षावाल्याच्या नादी लागल्यावर कोणती आई बोलणार नाही? एवढय़ावरून वंदना आईची पंच्िंाग बॅग कशी होते?
मी वंदनाला घराबाहेर काढले नाही. तिने पळून जाऊन लग्न केले, तरीही तिचे सर्व अपराध पोटात घातले व तिचे घरी येणे जाणे चालूच ठेवले. पुढील आयुष्य सुखाचे जावे म्हणून तिच्या पतीला स्वत:ची रिक्षा घेण्यासाठी दहा हजार रुपये काढून दिले. दुसऱ्या लग्नानंतरही नाशिकला कायमस्वरूपी जागा घेण्यासाठी २५ हजार रुपये काढून दिले. ते दरमहा हप्त्याने फेडून टाकू असे पत्रही लिहून दिले होते; परंतु आजपर्यंत २५ रुपयेही परत केले नाहीत.
दुसरे लग्न वंदनाने आपल्या मनाने, समजून उमजून स्त्रीवादी संघटनांच्या साक्षीने केले होते. मग ते अपयशी का ठरले? सर्व दोष जोडीदाराचाच का? मी मुक्तास कधीही धोंड म्हटले नाही. उलट तिचे घरी बोलावून खाण्यापिण्याचे लाडच केले. वेगवेगळ्या नातेवाईकांकडे नेऊन वेगवेगळ्या संस्कारांची, परंपरांची व चालीरीतींची ओळख करून दिली कारण वंदनाला वेळच नव्हता म्हणून. उदाहरणार्थ, गणपती उत्सव, लग्न समारंभ, मुंज इत्यादी. दोन दोन हातांनी लिहिण्याची कला मुक्तामध्ये होती तिचे संवर्धन करण्यासाठी वंदनाने काय केले?
मुक्ता दहावीत असतानासुद्धा शिक्षक असलेल्या मामाकडे मार्गदर्शनासाठी वंदना तिला घेऊन आली तेव्हाही तिला कोणी झिडकारले नाही. होईल तेवढी मदतच मामाने केली.
वंदनाची स्कॉलरशिप कशी व का गेली? आर्किटेक्टच्या दुसऱ्या वर्षी सबमिशनसाठी मीच पुरवलेले ७०० रुपयांचे पेपर्स हिच्या नवऱ्याने तारेत फाडून टाकले व ही नापास झाली. अर्थातच स्कॉलरशिप गेली. यालाही आईच जबाबदार का? वंदनाचे मोठेपण दाखविण्यासाठी इतरांना खोटे व खलनायक दाखवण्याची काय गरज?
ज्या आईचा ती एवढा तिरस्कार करते त्या आईचे ‘खरे’ हे आडनाव ती का लावते? तिने आडनावात केलेल्या बदलाचे पुरावे सोबत पाठवत आहे. तिचे अजूनही काही पत्रव्यवहार वेगवेगळ्या नावाने माझ्या पत्त्यावर येत असतात.
मी आजही वयाच्या ७६ वर्षी नोकरी करून स्वकमाईने उदरनिर्वाह करत आहे. ज्या वयात
मुलीने पालकांची जबाबदारी घेणे कायद्याने बंधनकारक आहे त्या वयात मला किमान मनस्ताप तरी कोणी देऊ नये.
सारांश, वंदनाचे जीवन हे सुरवातीपासूनच आक्रस्ताळी आहे. त्यासाठीच मी तिला शक्यतो लगाम घालायचा प्रयत्न केला व सावध राहण्यास सांगितले, पण व्यर्थ. आपण मात्र तिला नायिका ठरविण्याच्या नादात मला उगाचच खलनायिकेच्या भूमिकेत ढकलले अहे. ‘लोकसत्ता’सारख्या अग्रगण्य वृत्तपत्रास व आपल्यासारख्या ज्येष्ठ व अनुभवी लेखिकेस हे शोभत नाही. यास्तव आपण झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करायला हवी. वंदनाच्या खासगी जीवनाची चिरफाड करण्यात मला स्वारस्य नाही. पण या लेखात तिने व आपण माझी बदनामी केली आहे व मनस्ताप दिला आहे यासाठी हा पत्रप्रपंच.

कळावे. धन्यवाद! आपली
वसुधा वसंत खरे

मराठीतील सर्व वाचक प्रतिक्रिया बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Readers response to chaturang articles
First published on: 30-04-2016 at 01:01 IST