अर्चना जगदीश

भारत सरकारने  जानकी अम्मल यांचा त्यांच्या महत्त्वपूर्ण शास्त्रीय संशोधनासाठी ‘पद्मश्री’ देऊन सन्मान केला. तर पर्यावरण मंत्रालयाने वनस्पती नामकरण शास्त्रातील संशोधनासाठी त्यांच्या नावाने पुरस्कार सुरू केला. इतकेच नव्हे तर, इंग्लंडच्या ‘जॉन इन्स सेन्टर’ने जानकी अम्मल यांच्या सन्मानार्थ विकसनशील देशातून पदव्युतर शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या नावाने शिष्यवृत्ती सुरू केलीय. त्या मोलाचं आणि समाजोपयोगी संशोधन करणाऱ्या व्रतस्थ संशोधिकेविषयी..

ऊस म्हणजे अस्सल भारतीय पीक.

‘इक्षू’ म्हणून प्रसिद्ध असलेला ऊस, ग्रीक भारतात आले तेव्हा म्हणजे इ.स.पू ३२६-२० मध्ये त्यांना माहीतही नव्हता. ‘भारतीय लोक नदीकाठच्या कुठल्या तरी गवतापासून मधमाश्यांचा उपयोग न करता मध तयार करतात,’ असं मेगॅस्थेनिस या ग्रीक इतिहासकाराने लिहून ठेवले आहे. त्या काळी ऊस हे अजिबात नफा देणारं पीक नव्हतं. पण तरीही बौद्ध काळापासूनच भारतात लोक उसाची शेती करत.

अर्थात गेल्या दोन हजार वर्षांत चित्र बदललंय आणि जगभरात, मुख्यत: उष्ण कटिबंधात, साखर उत्पादन, व्यापार, बदलणारा भूगोल आणि त्याभोवती फिरणारं अर्थकारण या सगळ्याचा केंद्रिबदू आहे ऊस आणि उसाची शेती. मॉॅरिशससारख्या समुद्री देशाचा भूगोल उसाच्या शेतीने बदलून गेला आहे. मूळच्या ज्वालामुखीने तयार झालेल्या भूभागावरची इथली जंगलं आणि जैवविविधता या शेतीने गिळंकृत केलीय. उसाचे उत्पादन वाढवण्यासाठी होणारा रसायनांचा, पाण्याचा अतिरिक्त वापर, त्यामुळे होणारी पर्यावरणाची हानी असे नवे प्रश्नही या शेतीमुळे गेल्या पन्नास वर्षांत तयार झालेत. उसाचा इतिहास फार रोचक आहे. भारतात हजारो वर्षांपासून उसाची शेती होत असली तरी पूर्वी इथला ऊस तितकासा गोड नव्हता. त्या काळी सर्वात गोड ऊस पापुआ न्यू गिनी आणि आग्नेय आशियात इंडोनेशियामध्ये पिकत असे. भारताला या देशांमधून चांगल्या प्रतीचा ऊस आयात करावा लागत असे. भारतीय उसाचे उत्पन्न वाढविण्यासाठी आणि त्यात अधिक माधुर्य आणण्यासाठी पेशी जनुकशास्त्रातले मूलभूत संशोधन एका भारतीय स्त्रीने केले होते हे कुणाला फारसे माहीतही नाही. जवळजवळ सव्वाशे वर्षांपूर्वी जन्मलेल्या आणि हे संशोधन करणाऱ्या जानकी अम्मल या थोर स्त्रीची ओळख करून देण्यासाठी हे थोडंसं इक्षुपुराण!

केरळमधल्या थलासेरी इथे १८९७ मध्ये जन्मलेल्या एडवलेथ कक्कड जानकी अम्मल म्हणजे मद्रास प्रांताचे दिवाण राव बहादूर कृष्णा यांच्या अनेक अपत्यांपैकी एक. त्यांची शिक्षणाची, संशोधनाची आवड त्यांच्या वडिलांनी जोपासली. ज्या काळी भारतीय स्त्रियांना साधं लिहिता-वाचता यावं म्हणून मूलभूत शिक्षणासाठी धडपड करावी लागत होती आणि स्त्री-शिक्षणाला विरोध होत होता, त्या काळात म्हणजे १९२१ मध्ये जानकी यांनी मद्रासच्या (आता चेन्नई) ‘क्वीन्स मेरी कॉलेज’मधून वनस्पतीशास्त्र या विषयातली पदवी मिळवली. त्यानंतर ‘वुमेन्स ख्रिश्चन कॉलेज’मध्ये शिकवत असताना त्यांना उच्चशिक्षणासाठी मानाची ‘बार्बर फेलोशिप’ मिळाली आणि त्या अमेरिकेतील मिशिगन येथे पदव्युत्तर शिक्षणासाठी गेल्या. नंतर दोन वर्षे भारतात आपल्याच महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून काम केलं. १९२५ मध्ये पुन्हा मिशिगन विद्यापीठात जाऊन १९३१ मध्ये पीएच.डी. पूर्ण केली.

भारतात आल्यावर त्यांनी त्रिवेंद्रमच्या महाराजांनी सुरू केलेल्या महाविद्यालयामध्ये १९३२ ते ३४ अशी दोन वर्षे वनस्पतीशास्त्राच्या प्राध्यापक म्हणून काम केलं. त्यानंतर त्यांनी १९२० मध्ये सुरू झालेल्या कोइम्बतूरच्या ऊस संशोधन केंद्रात उसाच्या पेशी, जनुकशास्त्र आणि सुधारित जाती यावर मूलभूत संशोधनाला सुरुवात केली. इथेच त्यांनी भारतभरातल्या उसाच्या नैसर्गिक प्रजाती आणि त्यांचे गुणधर्म याचा सखोल अभ्यास केला. पेशी जनुकशास्त्र आणि गुणधर्मावर आधारित निवड यांचा उपयोग करून जास्त गोड आणि भारतातील सर्व प्रकारच्या वातावरणाला योग्य अशी उसाची सुधारित जात तयार केली. १९३५ मध्ये सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि नोबेल पुरस्कार विजेते सी. व्ही. रमण यांच्या प्रयत्नांनी भारतात ‘इंडियन अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्स’ सुरू झाली आणि त्यांनी पहिल्याच वर्षी जानकी यांना तिथे संशोधन करण्यासाठी बोलावून घेतलं गेलं. मात्र तिथे त्यांना स्त्री संशोधक म्हणून खूप त्रास झाला आणि स्वत:ला सतत सिद्ध करावं लागलं, असं त्यांच्या त्या वेळच्या काही सहकाऱ्यांनी लिहून ठेवलं आहे. या सगळ्याला कंटाळून जानकी २-३ वर्षांतच लंडनच्या ‘जॉन इन्स्टिटय़ूट ऑफ हॉर्टिकल्चर’मध्ये पेशी-जनुकशास्त्रज्ञ म्हणून रुजू होण्यासाठी निघून गेल्या.

त्या १९४० ते ४५ या काळात लंडनमध्ये होत्या. दुसऱ्या महायुद्धाची प्रत्यक्ष झळ लंडनला लागायला लागली. रात्री बॉम्बहल्ल्यामुळे घरातच कॉटखाली बसून आसरा घ्यावा लागला तरी सकाळी उठून त्या प्रयोगशाळेत जात, इतस्तत: पसरलेल्या काचा साफ करून पुन्हा कामाला लागत. ‘जॉन इन्स्टिटय़ूट’मध्ये त्यांनी अनेक वनस्पतींच्या पेशी जनुकशास्त्रावर संशोधन केलं. त्यांच्या कामाने प्रभावित होऊन ‘लंडन हॉर्टिकल्चर सोसायटी’ने त्यांना पेशी जनुकशास्त्रज्ञ म्हणून काम करण्यासाठी आमंत्रित केलं. तिथे त्यांना जगप्रसिद्ध जनुकशास्त्रज्ञ आणि संशोधकांबरोबर काम करायची संधी मिळाली. सुप्रसिद्ध सी. डी. डार्लिगटन यांच्याबरोबर त्यांनी जगभरातल्या पिकांच्या प्रमुख जातीच्या जनुकांचा माहितीकोश तयार केला. ‘वाइजली’मध्ये त्यांनी मुख्यत: मॅग्नोलिया या वनस्पतीवर काम केलं. त्यांच्या कामाची पावती म्हणून सोसायटीने मॅग्नोलियाच्या एका झुडपी जातीचं नाव ‘मॅग्नोलिया कोबस जानकी अम्मल’ असं ठेवलंय.

१९५१ मध्ये स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी जानकी अम्मल यांना ‘भारतीय वनस्पती सर्वेक्षण विभागा’ची पुनर्रचना करण्यासाठी भारतात बोलावून घेतलं. चौरंगी भागात असलेलं वनस्पती सर्वेक्षणाचं मुख्यालय त्यांनी सर्व प्रकारे सुधारलं आणि एक उत्तम पद्धत त्याच्या व्यवस्थापनासाठी तयार केली. कामामध्ये संपूर्ण झोकून देणं हे त्यांचं वैशिष्टय़ होतं. एकदा जबाबदारी घेतली, की ती उत्तम रीतीने पार पडली पाहिजे यावर त्यांचा कटाक्ष होता. आपल्या कार्यालयाबाहेरचा रस्ता आणि त्यावरचा पालापाचोळा झाडण्याचं कामदेखील अनेकदा त्या स्वत: करत. ‘भारतीय वनस्पती सर्वेक्षण विभागा’च्या संचालक म्हणून काम करताना त्यांनी आदिवासी लोक आणि त्यांचं वनस्पतींबद्दलचं ज्ञान यावर स्वत: फिरून माहिती मिळवण्याचं कामदेखील केलं आणि त्यासाठी त्या लडाखपासून सह्य़ाद्रीच्या अंतर्भागातल्या अनेक आदिवासी लोकांमध्ये फिरल्या. त्यांना  जैवविविधता आणि पर्यावरण यातही रस होता. आयुष्याच्या शेवटच्या पर्वात त्यांनी केरळमधल्या कुंतिपुझा नदीवर होऊ घातलेल्या ‘सायलेंट व्हॅली जलविद्युत प्रकल्पा’ला कसून विरोध करत स्पष्टपणे आपली भूमिका मांडली.

जानकी अम्मल स्वत: मोठय़ा जनुकशास्त्रज्ञ असल्या तरी कमालीच्या प्रसिद्धीपराङ्मुख होत्या. एखाद्या बौद्ध भिक्षुणीसारख्या, पूर्णत: शांत, समाधानी असल्यामुळे त्यांच्या गरजाही मर्यादित होत्या. आयुष्यातला बराच काळ परदेशात व्यतीत करूनही त्यांनी आपलं भारतीयत्व जपलं. त्या नेहमी पांढरी सुती किंवा रेशमी साडी नेसत आणि दागिने वगैरे गोष्टींमध्ये त्यांना अजिबात रस नव्हता. त्या जन्मभर अविवाहित राहिल्या. काम-संशोधन हेच त्यांचं सर्वस्व होतं. अखेरच्या टप्प्यात भारतात राहत असताना त्यांनी भरपूर मांजरी पाळल्या होत्या आणि त्यांची जनुकीय वैशिष्टय़ंदेखील नोंदवून ठेवली होती. त्यांच्याबद्दल खूप कमी माहिती उपलब्ध आहे. निवृत्तीनंतरही त्या काम करत होत्या. थोडा काळ त्यांनी ट्रॉम्बे इथं ‘अणुविज्ञान संशोधन केंद्रा’त काम केलं, त्यानंतर सन्माननीय शास्त्रज्ञ म्हणून मद्रास विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र उच्च अभ्यास विभागात कार्यरत होत्या. वयाच्या सत्त्याऐंशिव्या वर्षी प्रयोगशाळेत काम करत असतानाच त्यांना मृत्यू आला.

महत्त्वपूर्ण शास्त्रीय संशोधनासाठी भारत सरकारने ‘पद्मश्री’ देऊन १९७७ मध्ये त्यांचा सन्मान केला. तर २००० मध्ये पर्यावरण मंत्रालयाने वनस्पती नामकरण शास्त्रातील संशोधनासाठी त्यांच्या नावाने एक पुरस्कार सुरू केला. २९ हजारपेक्षा जास्त वनस्पती प्रजाती सांभाळणाऱ्या जम्मूतावी इथल्या  पादपालयाला (हर्बेरियम) जानकी अम्मल यांचं नाव दिलं आहे. इंग्लंडच्या ‘जॉन इन्स सेन्टर’ने जानकी अम्मल यांच्या सन्मानार्थ विकसनशील देशातून पदव्युतर शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या नावाने शिष्यवृत्ती सुरू केलीय.

जानकी अम्मल यांचं कार्य कमालीचं प्रेरणादायी आहे. पेशीस्तरावरचं अवघड संशोधन हे त्यांनी जैवतंत्रज्ञान विकसित होण्याआधीच्या काळात केलं आहे. आज ते सर्व करण्यासाठी अनेक यंत्रे आणि संगणकाधारित संशोधनप्रणाली उपलब्ध आहेत. त्यांचं सर्व संशोधन समाजोपयोगी होतं. त्यात यित्कचितही स्वार्थ नव्हता. पूर्वसुरींनी किंवा मोठय़ा माणसांनी सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यांनी कसोशीने पार पाडली. अत्यंत साधेपणाने आयुष्य व्यतीत केलं. ध्येय सापडलं-समजलं तर स्त्रिया प्रतिकूल सामाजिक परिस्थितीतही पुढे जात राहतात, याचं जानकी अम्मल हे उत्तम उदाहरण आहे. त्यांच्यासारख्या थोर पण विस्मृतीत गेलेल्या महान संशोधिकेची ही ओळख नक्कीच प्रकाशमय वाट दाखविणारी आहे.

साखरेच्या माधुर्याचा अनुभव घेताना, त्यांच्यासारख्या विदुषीची आठवण आपल्याला कधीतरी नक्की व्हायला हवी!

godboleaj@gmail.com

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

chaturang@expressindia.com