ठरवून केलेल्या लग्नाच्या संदर्भात माहितीची खातरजमा करणे, हा आज अनेकांच्या चिंतेचा विषय झाला आहे. माहितीची विश्वासार्हता कशी तपासून पाहायची? त्यांनी दिलेली माहिती खरी कशावरून? हा अनेकांना पडणारा प्रश्न असतो. अनेकदा जर श्रीमंत स्थळ असेल तर त्यांच्या नावावर भुलून लग्न केलं जातं आणि लग्नानंतर बडय़ा घराचा पोकळ वासा अनुभवास येतो.
आभा, आदित्य, शिरीष, दीक्षा, सुजाता, अनुपम सगळे गप्पांत रंगले होते. आभा आणि आदित्यचं नुकतंच लग्न ठरलं होतं. अगदी रीतसर पाहून ठरलेलं लग्न होतं ते. त्यावरूनही सगळे जण त्या दोघांची चेष्टा-मस्करी करत होते. त्यातूनच मग जॉब त्यातल्या जबाबदाऱ्या, सध्याची पे स्केल्स या विषयांवर गप्पांची गाडी आली. आभा आदित्यला, तिच्या होणाऱ्या नवऱ्याला म्हणाली, ‘ए, तू सांग ना कोणत्या कॉलेजमधून बी.ई. केलंस?’ सगळे जण खो खो हसायला लागले. ‘ए, आदित्य आणि बी. ई? कुणी सांगितलं हा बी. ई. आहे म्हणून? ए आदित्य, कुणी दिली तुला इंजिनीअरिंगची डिग्री?’ सगळे जण आदित्यची टिंगल करायला लागले तशी आभा बुचकळ्यात पडली.
‘म्हणजे तू बी. ई. नाहीस? मग तू मला खोटं का सांगितलंस?’ आभा तडक त्या गोतावळ्यातून बाहेर पडली. तिचे डोळे नकळत झरू लागले. आपण फसवले गेलो हे तिला कळून चुकलं. ती तशीच तडक घरी निघून आली. ‘‘आई, आदित्य बी ई. नाहीये. तो डिप्लोमा होल्डर आहे. त्यातलेसुद्धा १-२ पेपर राहिले आहेत म्हणे. त्यांनी आपल्याला फसवलंय.’’ तिने आल्या आल्या आईला सांगायला सुरुवात केली. ‘‘आपण त्यांना त्याचं शिक्षण विचारलं आणि त्यांनी नुसतंच सांगितलं की तो इंजिनीअर आहे म्हणून, पण आपण त्याची डिग्री नाही विचारली आणि त्यांनीही ती नाही सांगितली. आई मला हे लग्न नाही करायचं. त्याचं शिक्षण कमी आहे म्हणून नाही तर त्यांनी मला फसवलंय म्हणून.’’ आभा प्रचंड अस्वस्थ झाली आणि दु:खीही.
  ठरवून केलेल्या लग्नाच्या संदर्भात माहितीची खातरजमा करणे, हा आज अनेकांच्या चिंतेचा विषय आहे. माहितीची विश्वासार्हता कशी तपासून पाहायची? त्यांनी दिलेली माहिती खरी कशावरून? हा अनेकांना पडणारा प्रश्न असतो. अनेकदा जर श्रीमंत स्थळ असेल तर त्यांच्या नावावर भुलून लग्न केलं जातं आणि लग्नानंतर बडय़ा घराचा पोकळ वासा अनुभवास येतो. वरच्या उदाहरणातदेखील आदित्यचे वडील एका मोठय़ा कंपनीत मोठय़ा हुद्दय़ावर काम करणारे होते. आणि आईसुद्धा उच्चशिक्षित होती. ही पाश्र्वभूमी लक्षात घेऊन आदित्यच्या शिक्षणासंदर्भात कुणीच जास्त चौकशी केली नाही. आणि तिथेच फसगत झाली. ‘‘परदेशातल्या मुलांच्या बाबतीत हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. त्याच्या-तिच्या सवयी काय असतील? फॉर्ममध्ये लिहिलेला पगार बरोबर असेल ना? त्याचं-तिचं वागणं कसं असेल? बाहेर काही अफेअर तर नसेल ना? एक ना दोन – असंख्य प्रश्न मनात.’’
 राजश्रीचे वडील याच चौकशीसाठी आले होते. मुंबईच्या एका मुलाचं स्थळ त्यांना कळलं होतं, पण त्यांना चिंता पडली होती की त्याची माहिती कशी काढायची? त्यांना त्याची सगळी माहिती हवी होती म्हणजे तो वागायला कसा आहे? त्याच्या मित्रां-मत्रिणींमध्ये तो कसा वागतो? तो िड्रक्स किती घेतो? किती वेळा घेतो? ब्रॅण्ड कोणता आहे? स्मोकिंग करतो का? त्याचं चारित्र्य कसं आहे? तो लोकांना समजून घेतो का? ऑफिसमध्ये त्याचं पटतं का सगळ्यांशी? ते म्हणाले, ‘‘अशा अनेक गोष्टींचा विचार करायला लागलं की झोप उडते हो माझी. कशी फुलासारखी वाढवली आहे मी माझ्या मुलीला. बरं या मुलाची कुठूनही ओळखसुद्धा निघत नाहीये. मी बराच प्रयत्न केला. शिवाय त्याच्या घराची माणसं कशी आहेत? माझ्या मुलीला काही त्रास तर नाही ना होणार?’’अशा पद्धतीची सगळी माहिती काढायची म्हणजे डिटेक्टिव्ह एजन्सीचीच मदत घ्यावी लागेल. आणि तरीसुद्धा चारित्र्य वगरे समजणं हे खरंच खूप अवघड आहे. आणि अशा प्रकारे विचार करत गेलो तर गुंता वाढत जाईल. कारण माणूस असा कळत नाही. लग्नाला वीस वीस र्वष झाली तरी अनेकांना आपला जोडीदार नेमका कसा आहे ते लक्षात येत नाही. त्यापेक्षा प्रत्यक्ष त्याच्या आई-वडिलांना भेटावं, निरनिराळ्या विषयांवर गप्पा माराव्यात, त्यांच्या घरातल्या रितीभाती, पद्धती जाणून घ्याव्यात. त्यातून त्या घराची संस्कृती समजत जाईल. इतर कुठल्या लोकांकडे केलेल्या चौकशीपेक्षासुद्धा आपण प्रत्यक्ष बोलून जाणून घेणे हे जास्त सयुक्तिक ठरेल असे वाटते.
अनेकदा असंही होतं की, वधू-वर यांच्या स्वत:च्या बाबतीत किंवा घरातल्या अनेक गोष्टी सांगितल्या जात नाहीत. आणि लग्नानंतर त्या कळल्या तर फसवलं गेल्याची आणि एकूणच त्या व्यक्तीबद्दल कायमस्वरूपी अढी निर्माण व्हायची शक्यता असते. अरुंधती आणि अद्वैत दोघे जण दोन वेळा बाहेर भेटले एकमेकांना. विविध विषयांवर त्यांनी गप्पा मारल्या. दोघांनाही जाणवत होतं की या भेटींचं रूपांतर नात्यात होऊ शकेल. अरुंधतीला एक लहान भाऊ होता आणि तो गतिमंद होता. पण ही गोष्ट ना त्यांनी लग्नाच्या माहितीच्या फॉर्ममध्ये दिली होती ना तिने त्याला भेटल्यावर सांगितली होती. पण त्याला भेटून आल्यावर मात्र ती अस्वस्थ झाली. एका बाजूला हे कळल्यावर अद्वैत नकार देईल ही भीती वाटत होती आणि एका बाजूला न सांगितल्याची रुखरुख. मला म्हणाली, ‘‘काय करू. न सांगता तर मला पुढे जायचं नाही. पण तो आता म्हणू शकतो की आधी का नाही सांगितलंस? मला खूप भीती वाटते आहे.’’
काही वेळा तर लोक सहजपणे ‘नरो वा कुंजरो वा’ अशा पद्धतीने बोलताना दिसतात. लग्नाच्या संदर्भात आपल्या मुलाचे-मुलीचे मार्केटिंग करण्याची अहमहमिका लागलेली दिसते. माझा मुलगा-मुलगी म्हणून नाही सांगत, पण अहो तो-ती खरंच खूप गुणी आहे, असे पालुपद अनेक पालक आळवताना दिसतात. मग त्याच्या कोणत्या गुणाचे कौतुक करत आहोत याचे भान सुटलेले दिसते. खरं तर मुलगा काय, मुलगी काय लग्नानंतर आलेल्या प्रत्यक्ष जगण्यातून, आलेल्या प्रसंगाला तोंड देण्यातून त्याचा खरा स्वभाव कळत जातो आणि अनेकदा घडतही जातो. त्यामुळे लग्नापूर्वी विशिष्ट पद्धतीने वागलेली व्यक्ती लग्नानंतर अडचणींच्या, कठीण प्रसंगांत कशी वागेल हे सांगणं कठीण असतं. पण अनेक पालकांना आपल्या मुलांचं खूप कौतुक असतं. पण हीच माणसं निवडलेल्या स्थळाची काटेकोर माहिती मिळावी म्हणून तो मुलगा-मुलगी जिथे काम करतात तिथे फोन करून किंवा प्रत्यक्ष जाऊन चौकशी करतात. अशा वेळी त्या मुलाला-मुलीला ऑकवर्ड वाटू शकतं.
 पायलच्या लग्नाचे तिचे आईबाबा बघत होते. रवी नावाच्या एका मुलाचे स्थळ तिला सांगून आले होते. त्यांच्या घरी त्यांची पहिली भेटही झाली होती. रवीचे बाबा तिची माहिती काढायला थेट ती नोकरी करत असलेल्या शाळेत पोचले. एका दिवसाची रजा घेण्यावरून तिची आणि त्या शाळेतल्या हेड क्लार्कची नुकतीच वादावादी झाली होती. आणि नेमकी रवीच्या वडिलांनी चौकशी केली ती त्याच हेड क्लार्कजवळ. तो म्हणाला, ‘‘अहो एक नंबरची भांडकुदळ आहे ती.’’ अनेकदा एकाला एखाद्याच्या बाबतीत आलेला अनुभव दुसऱ्याला तसाच येईल असं नाही. याचा तारतम्याने विचार करायची गरज आहे. आणि इतर अनेक ठिकाणी चौकशी करण्यापेक्षा आपणच थेटपणे भेटणे-बोलणे चांगले. नाहीतर माहितीची खातरजमा करताना प्रत्येक गोष्टीची चौकशी करत राहिलो तर आपल्याच मुलांच्या लग्नाला उशीर होत जाईल? आणि तरीही विश्वासार्ह माहिती मिळेलच याची काय खात्री?
 chaitragaur@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Verify the information in marriage
First published on: 10-08-2013 at 01:01 IST