सुमित्रा भावे / सुनील सुकथनकर  

आयुष्यातल्या काही घटनांना ‘पण का? आणि असं कसं? खरंच का?’ असे प्रश्न विचारावेसे वाटले तर त्यांना मी लघुकथा म्हणते. बाकीच्या घटना म्हणजे अनेकदा नुसतेच ‘रिपोर्ताज’ असतात. माझे बार्सिलोना, हॉंगकॉंग – चीनमधले अनुभव अशाच काही लघुकथा आहेत.. सिनेमाच्या पोतडीतील लघुकथांचा हा भाग ३.

ही कथा स्पेनमधली म्हणजे बार्सिलोनाचीच आहे. आमची राहण्याची व्यवस्था असलेलं हॉटेल थिएटरपासून तसं दूर होतं. हॉटेलातून उतरून रस्त्यावरची गंमत बघायला, रमत-गमत जायला मी खूप उत्सुक होते. पहिल्याच दिवशी मी जिना उतरून दाराच्या बाहेर आले तर रस्त्यावर एका छोटय़ा चबुतऱ्यावर एक बाई बसलेली. माझं तिच्याकडे लक्ष गेलं. बाई वयस्कर. तिच्यासमोर एक सुंदर डिझाइनचा रुमाल पसरलेला. ती माझ्याकडे बघून मोकळं, गोड हसली. तिच्यासमोर मरवा किंवा दवणा अशा काहीशा सुगंधी रोपांच्या काडय़ा ठेवलेल्या होत्या. तिने एक काडी माझ्यापुढे केली. मी घेतली आणि ‘थॅन्क्यू’ म्हटलं. तिने खुणेनेच मला सांगितलं, ‘‘वास घे.’’ मी वास घेतला तर अमाप सुगंध! मी पुन्हा तिला ‘थॅन्क्यू’ म्हटलं. तिने हसून हाताने ‘अच्छा’ केलं. थिएटरवर पोचल्यावर तिथे भेटलेल्या मत्रिणीला ती काडी दाखवून मी म्हटलं, ‘‘एका छान आजीने मला ही काडी दिली.’’ त्यावर ती मत्रीण हसून म्हणाली, ‘‘ओह, आय नो दॅट बेगर वुमन.’’ बेगर? भिकारी? हा शब्द ऐकून मी दचकलेच. ती भिकारीण होती? स्वच्छ कपडय़ातली, प्रसन्न चेहऱ्याची, रंगीबेरंगी चांगला रुमाल पसरवून बसलेली.. माझा फ्लॅशबॅक सुरू झाला. माझं लहानपण ज्या घरात गेलं ते मोठं दोन मजली घर. समोर महादेवाचं मंदिर. आमचं घर आणि महादेवाचं मंदिर यांच्यामध्ये मदान म्हणावं, इतका मोठा चौक. आमच्या घराच्या वरच्या मजल्यावर कमानदार, पुरुषभर उंचीच्या, कोरीव, लाकडी खिडक्या होत्या. त्या खिडकीतून सरळ देवळाच्या दरवाजाच्या आतला, सभामंडपाच्या बाहेरचा मोठ्ठा दगडी नंदी दिसायचा. हे आमचं घर म्हणजे पूर्वी त्या शंकराच्या देवळाचा नगारखाना होता. त्या खिडकीत बसून सनई चौघडावाले देवाला जागं करण्यासाठी आणि त्याचं मन रमवण्यासाठी ही वाद्यं वाजवत असत. दर सोमवारी देवाच्या दर्शनाला भाविकांची रीघ असायची. आणि त्या दिवशी देवळाबाहेर अनेक भिकारी ओळीनं बसायचे. त्यांच्या जागा पक्क्या ठरलेल्या.  त्यांच्यात एक भिकारी तर स्वच्छ पांढऱ्या कपडय़ात असायचा. मला माझ्या कमानदार खिडकीतून तिथली सगळीच वर्दळ बघायला गंमत वाटायची. तेव्हाचा त्यांचा ‘ड्रामा’ माझ्या चांगलाच लक्षात राहिलाय. एरवी हे भिकारी एकमेकांत गप्पागोष्टी करत असत. काही काहीवेळा जोरजोरात भांडतही असत. आणि कुणी भक्त येताना दिसला की एकदम आवाज बदलून, ‘बिचारा’ आवाज काढून, देहबोली बदलून, वाकडी मान करून, डोक्याला हात लावून पैसे देण्यासाठी त्या भक्ताची आळवणी करत. मला हा त्यांचा ‘रोल प्ले’ खूप मजेदार वाटायचा. भिकारी म्हणजे कोण? ‘माझ्याकडे नाहीय, तुमच्याकडे आहे, त्यातलं थोडं मला देता का’, असं म्हणणारे. हे म्हणण्यात खरंतर गैर काहीच नाही.

आमच्याकडे माधुकरी मागायला एक तरुण ब्राह्मण यायचा. शाळा शिकत होता. घरी वारावर जेवायला इतर मुलंही यायची. माधुकरीवाल्याची वेळ ठरलेली होती. दाराशी यायचा. आमचं दार मोठं होतं, दाराची लोखंडी कडी मोठ्ठी होती. ती तो वाजवायचा. आई म्हणायची, ‘‘माधुकरी आलाय. त्याला वाढून ये.’’ तो बिचारा चेहरा करून काही मागणं वगैरे करायचा नाही. नुसता येऊन उभा राह्य़चा. त्याला नेहमी ताजं जेवण दिलं जायचं, शिळंपाकं नाही. वारावर जेवायला येणारी मुलं व्यवस्थित पाटावर बसून जेवायची. त्यांना घरच्या मुलांना वाढावं तसं गरम जेवण वाढलं जायचं. म्हणजे ही भीक नव्हती का? तर नव्हती. गरजेनं माणूस भिकारी होत नाही. दात्याच्या नजरेतल्या कंजुषीनं गरजू भिकारी होतो. त्यामुळे ‘दिठी’तला चार आणे मागणारा वारकरी भिकारी नाही. पण ‘वास्तुपुरुष’मधले नि:स्पृह, तत्त्वनिष्ठ अण्णा भिकारी आहेत. इतरांची नजर त्यांना भिकारी बनवते. मुंजीमध्ये तर शिकायला जाणाऱ्या मुलाला आईपासून तोडून ‘भिक्षांदेही’ म्हणायला शिकवलं जातं. भारतात साधू-संन्यासी भिक्षा म्हणजे भीक मागायला घरोघरी हिंडतात, लोकाधारित जगायचं हे तत्त्व. गरजेपुरतंच मागायचं आणि त्यांचा सन्मान कमी न करता समाजाने आपल्या घासातला घास देऊन त्यांना जगवायचं. हा भारतीय सामाजिक धर्म.  समाजकार्य हा विषय शिकताना मला समजलं की, भीक मागणं हा आपल्या देशानं गुन्हा ठरवला आहे. खरं तर हे भारतीय संस्कृतीच्या विरोधीच. भिकाऱ्यांना पोलीस पकडतात आणि त्यांच्यासाठी शासनानं खास संस्था काढली आहे, त्यात नेऊन ठेवतात. मग उपजीविकेचं काही कौशल्य शिकवून बाहेर पाठवतात. कुणीही नुसत्या आळसाखातर ऐतखाऊ बनू नये, हा विचार. ती संस्था मी पाहिली. थक्क करणारा अनुभव होता. गरीब, आजारी, मनोरुग्ण, अशिक्षित, सुशिक्षित, तगडे सगळ्या प्रकारचे भिकारी तिथे होते. संस्थेत आश्रय, खाणं सगळं मोफतच होतं. तरीही सगळ्यांच्या मनात ‘इथून बाहेर पळून जावं, छानशी मोकळेपणाने भीक मागावी,’ असंच असायचं. कसं काय? आणि का ? ‘श्यामची आई’ चित्रपटात कवी यशवंतांची कविता आहे- ‘स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी’ म्हणजे आपण सगळेच आपापल्यापरीने, आपापल्या परिस्थितीचे स्वामीही असतो आणि भिकारीही असतो की काय? आपलं भिकारीपण आपल्याला कळलं तर कदाचित आपण दुसऱ्याला भिकारी बनवणार नाही. बार्सिलोनाला दुसऱ्या दिवशी पुन्हा मी हॉटेलमधून थिएटरवर जायला रस्त्यावर आले तर आज्जी होतीच. तिच्याकडे ताज्या-सुगंधी काडय़ाही होत्याच. तिने मला पाहून एक काडी हसून पुढे केली. मी ती काडी घेतली आणि आज तिचे नुसते आभार मानले नाहीत. मी तिच्या समोरच्या रुमालात एक नाणं टाकलं. मग तिने मला स्पॅनिशमध्ये ‘थॅन्क्यू’ म्हटलं आणि काडीचा वास घेऊन मी तिला ‘थॅन्क्यू’ म्हटलं. किती ही साधी, प्रसन्न देवघेव!

मी ऑस्ट्रेलियाला जाताना हॉंगकॉंग विमानतळावरची गोष्ट. त्यावेळी फक्त वीस डॉलर्स न्यायला परवानगी होती. माझ्याकडे फक्त वीस डॉलर्सची एक नोट होती. पुढचं विमान जवळजवळ पाच तासांनी होतं. चहाचे स्टॉल्स मला वीस डॉलर्सचे सुटे देईनात. मला भूकही लागली होती आणि चहाची तल्लफही आली होती. मी निमूट बसून होते. तेवढय़ात पलीकडे बसलेल्या एका माणसाने त्याचं पाकीट काढलं. मला दिसलं त्याच्याकडे बऱ्याच नोटा होत्या, बरीच नाणी होती. तो उठून एका चहाच्या स्टॉलकडे गेला. मी त्याच्या मागून धावले. मी त्याला म्हटलं, ‘‘हे वीस डॉलर्स घेऊन मला काही सुटे पैसे द्याल का?’’ तो म्हणाला, ‘‘मला डॉलर्सचा उपयोग नाही.’’ मी म्हटलं, ‘‘बरं, पण मला चहा हवा आहे.’’ तो हसून म्हणाला, ‘‘घ्या तुम्ही चहा. मी पैसे देतो.’’ तर लख्खकन माझ्या मनात वीज चमकून गेली, आपण भिकारीच की. गुपचूप चहा घेतला आणि म्हटलं, काय हरकत आहे मान्य करायला, कधी-कधी आपणही भिकारी असतोच की! म्हणजे खरंतर आपण भिकारी नसतोच. वस्तू, पैसे, प्रेम, मदत देताना देणाऱ्याने ती सन्मानाने दिली तर दोस्ती ठरते. म्हणजे चहा पिताना मी भिकारी नव्हतेच.

‘दिठी’तला प्रसंग लिहिताना आणि चित्रित करताना असा हा सगळा गुंता माझ्या मनात होता. एक म्हातारा वारकरी दुसऱ्या वारकऱ्याला म्हणतो, ‘‘चार आणे देता का?’’ दुसरा काही न बोलता निमूटपणे चार आणे काढून देतो. क्षणभराने विचारतो, ‘‘हे संपल्यावर?’’ म्हातारबाबा म्हणतो, ‘‘विठ्ठल दिल की’’ म्हणजे हा भिकारी नाही. देण्याची जबाबदारी विठ्ठलाची. म्हणजे आपल्या सगळ्यांची की! देवघेवीला वस्तू आणि किंमत याच्यापलीकडे न्यायचं म्हणजे ती देवघेव मैत्रीची होते. ज्या सहजतेनं आळंदीला, इंद्रायणीच्या काठी किशोर कदम आणि आमचे देवाबाबा- धुमाळ यांनी हा प्रसंग केला आहे, त्यानं मला किती निववलं! आयुष्यातल्या काही घटनांना ‘पण का? आणि असं कसं? खरंच का?’ असे प्रश्न विचारावेसे वाटले तर त्यांना मी लघुकथा म्हणते. बाकीच्या घटना म्हणजे अनेकदा नुसतेच ‘रिपोर्ताज’ असतात. माझा चीनमधला अनुभव अशीच एक लघुकथा आहे. चीनमधल्या शेंगडूला मी चित्रपट महोत्सवासाठी गेले होते. ‘कासव’ चित्रपट दाखवायचा होता. आम्ही ज्या हॉटेलमधे राहत होतो त्याच्या समोरच्या रस्त्यापलीकडे एक मोठ्ठं खास चिनीपद्धतीचं देऊळ, मला माझ्या खिडकीतून दिसत होतं. मी कुतुहलानं आमच्या दुभाषीला ‘कुठल्या देवाचं हे मंदिर?’ असं विचारल्यावर ती म्हणाली, ‘‘तसा बुद्धपण आहे या मंदिरात, पण मुख्य हे मंदिर आहे युएन त्संग याचं. तो फार पूर्वी भारतात येऊन गेलेला होता.’’ त्याच्या प्रवासवर्णनांचा उल्लेख मी शाळेत वाचला होता. मी दुभाषीला म्हटलं, ‘‘मला ते देऊळ बघायचंय’’, ती मला घेऊन गेली. देऊळ सुंदरच होतं. पण कथा या देवळाची नाहीये. देवळातच एका बाजूला एक पत्र्याची शेड होती. तिथे लाकडी बाक आणि टेबलं ठेवलेली होती. लोक तिथे शांत बसून काहीतरी पित होते. मला ते दृश्य विशेष वाटलं. मी तिला विचारलं, ‘‘ही माणसं इथे काय पितायत?’’ ती म्हणाली, ‘‘इथे अशी प्रथा आहे, की देऊळ हिंडून झाल्यावर, इथे बसून चहा प्यायचा. सुंदर जाईच्या वासाचा जॅस्मिन टी!’’ मी म्हटलं, ‘‘चल, आपणही पिऊ.’’ चहाचं एक खास झाकलेलं भांडं समोर आलं. ‘‘यातून चहा कसा प्यायचा? बशीत ओतायचा का?’’ थोडी दूर बसलेली एक बाई माझ्याकडे लगबगीने चालत आली. आणि चहा कसा प्यायचा ते मला चिनी भाषेत सांगायला लागली. तिला इंग्रजी येत नव्हतं. मला चिनी येत नव्हतं. त्यामुळे ती चिनी भाषेत आणि मी मराठीत असा आमचा संवाद सुरू झाला. तिने ‘चॅंगची चाउ चाउ’ (मला तिचं चिनी असं ऐकू येत होतं.) असं काहीतरी बोलत हसऱ्या चेहऱ्यानं चहा पिण्याचं प्रात्यक्षिक आणि शिक्षणही दिलं. तिच्या त्या बारीक डोळ्यांनी, ती माझ्याकडे टक लावून काहीतरी शोधल्यासारखं बघत होती. मी म्हटलं, ‘‘अशी चिनी कपबशी कुठे मिळेल?’’ ती म्हणाली, ‘‘इथे जवळपास कुठेच मिळणार नाही. अशी अस्सल कपबशी अगदी गावातच मिळेल.’’ (म्हणजे पुणाच्या तुळशीबागेसारख्या बाजारात) म्हणजे हे सगळं दुभाषीच्या मार्फत चाललेलं. ती म्हणाली, ‘‘तुला हवी का अशी कपबशी?’’ मी म्हटलं, ‘‘हो, पण तेवढय़ासाठी लांब गावात कुठे जाणार?’’ तिने दुभाषीला विचारलं, ‘‘तुम्ही इथून पुढे कुठे जाणार?’’ तर आम्ही जाणार होतो एका मॉलमधे, चिनी चहा विकत घ्यायला. ती म्हणाली, ‘‘आणि त्यानंतर?’’ दुभाषी म्हणाली, ‘‘त्यानंतर समोरच्या हॉटेलात.’’  ‘‘ठीक आहे’’, असं म्हणून ती निघून गेली. मी आणि दुभाषी आम्ही तरळत तरळत संध्याकाळचे रस्त्यावरचे दिवे, गर्दी बघत मॉलमधे गेलो. हवा तो चहा घेतला. आणि पैसे द्यायला कॅशियरसमोर आलो तो पाठीमागून हाक आली. वळून बघते तर आमची मघाची मत्रीण. तिच्या हातात एक सुंदर बॉक्स. तिने तो बॉक्स उघडून माझ्यासमोर त्यातली सुंदर कपबशी धरली. म्हणाली, ‘‘ही तुझ्यासाठी.’’ मी क्षणभर गोंधळूनच गेले. आभार तरी कसे मानू? या भांडय़ाची किंमत काय? माझ्याकडे तेवढे चिनी पैसे आहेत ना? आणि ते पैसे तिला देऊन टाकले तर आत्ता घेतलेल्या चहाचं काय? भर्रकन हे सगळे प्रश्न माझ्या मनात भिरभिरून गेले. मला दुभाषी म्हणाली, ‘‘ओह गॉड, दिस इज अ‍ॅन एक्सपेन्सिव्ह पॉट! आणि त्याच्यावर कमळाचं चित्र आहे. म्हणजे अस्सल चिनी.’’ मी म्हटलं, ‘‘बाप रे, किती पैसे द्यायचे विचार तिला!’’ मी आणि दुभाषी हे बोलतोय तेवढय़ात ती मत्रीण कॅशियरकडे गेली. तिने घाईने मी घेतलेल्या चहाचे पैसे दिले. मी गोंधळून, ‘‘अगं अगं.. नको नको’’ केलं. माझ्या या गोंधळाकडे साफ दुर्लक्ष करून तिने तो चहा दुभाषीच्या हातात ठेवला आणि तिला सांगितलं, की ‘‘हिला सांग, याचा चहा करून या भांडय़ातून पी.’’ मी पुन्हा दुभाषीला विचारलं, ‘‘याचे पैसे किती द्यायचे ?’’ माझा प्रश्न ऐकून त्या मत्रिणीने माझे हात धरले. तिच्या मिचमिच्या डोळ्यांच्या पापण्या अगदीच मिटल्यासारख्या झाल्या आणि त्यातून सरळ पाण्याचे ओघळ आले. ती मला म्हणाली, ‘‘का ते मला विचारू नकोस. पण तू माझी आईच आहेस. आईकडून कसे पैसे घेऊ? पशाचा काही संबंधच नाही. तू हा चहा या कपातून पी.’’ माझ्या दुभाषीचेही डोळे भरून आले. तिने सावकाश त्या बाईच्या बोलण्याचं भाषांतर केलं. आणि स्वत: तिच्या पाठीवर थोपटलं. आम्ही वळलो. ती तिथेच उभी होती. थोडं पुढे जाऊन मी मागे वळून तिला हात केला आणि नि:शब्द चालायला लागलो. मला या माझ्या लेकीचं नावही माहीत नाही. काहीच माहीत नाही. ते सुंदर भांडं आणि त्याच्यावर फुललेलं लाल कमळ माझ्या घरात आहे, ते बघून मला अस्वस्थ उमज येत असते..

sumitrabhavefilms@gmail.com

chaturang@expressindia.com