कॅनडात ६ डिसेंबर १९८९ला घडलेले माँट्रियल हत्याकांड हे स्त्रीवादाच्या विरोधातून, स्त्रीद्वेषातून झाले आहे हे जाणवल्यावर पुरुषांनीच पुढाकार घेऊन पुरुषसत्ताक मानसिकता बदलायचे ठरवले आणि त्यातूनच पुढे जगभर ‘मेन फॉर चेंज’, ‘मेन कॅन स्टॉप रेप’, ‘प्रो फेमिनिस्ट मेन्स ग्रुप’, ‘मेनली मेन अगेन्स्ट व्हायलेंस अँड सेक्सिझम्’ अशा पुरुष संघटना स्थापन झाल्या. आपल्याकडे त्यापूर्वीपासूनच संत असोत की समाजसुधारक, सगळ्याच पुरुषांनी स्त्रीचा कायमच आदर केला. त्यांच्या कामामुळे स्त्री चळवळीला कायमच बळ मिळत गेले.
कॅनडामधील माँट्रियल शहरात घडलेल्या ‘त्या’ भयंकर घटनेची दखल जगभरातील माध्यमांना घ्यावी लागली. ६ डिसेंबर १९८९ रोजी दुपारी ‘इकोल पॉलिटेक्निक कॉलेज’च्या एका वर्गात हातात बंदूक आणि सुरा घेऊन मार्क लिपाईन हा २५ वर्षांचा मार्क लिपाईन अचानक शिरला. वर्गातील सर्व पुरुष विद्यार्थ्यांना बाहेर जायला सांगून त्याने मुलींवर बेछूट गोळ्या झाडल्या. जीव वाचवण्यासाठी आकांत करणाऱ्या १४ मुलींचे मृतदेह वर्गात कोसळले. १४ मुली गंभीर जखमी झाल्या. मार्कने नंतर आत्महत्या केली. ‘सुसाइड नोट’मध्ये त्याने लिहून ठेवलं, ‘स्त्रीवाद्यांविषयी माझ्या मनात प्रचंड संताप आहे. माझं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या स्त्रीवाद्यांना त्यांच्या निर्मात्याकडे यमसदनाला पाठवण्याचं मी ठरवलं आहे.’ मार्कच्या वरील निवेदनाने स्त्रियांच्या संघटनांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली.
जगभरातील स्त्रियांच्या संघटनांनी या भयंकर हत्याकांडाचा निषेध केला. गुन्हेगाराच्या स्त्रीद्वेष्ट्या भूमिकेचा शोध घेणारं लिखाण माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालं. कॅनडातील सामाजिक वातावरणावर या घटनेचा गंभीर परिणाम झाला. सरकारने शस्त्र वापरण्याचा कायदा अधिक कठोर केला. ६ डिसेंबर हा कॅनडामध्ये स्त्रियांवरील ‘हिंसाचार विरोधी दिवस’ म्हणून पाळला जातो.
माँट्रियल शहरातील विचारी आणि संवेदनशील पुरुषांनाही या घटनेने अस्वस्थ केलं. अशा समविचारी ‘स्त्रीवाद’ समर्थक पुरुषांनी एकत्र येऊन ‘मेन फॉर चेंज’ ही संघटना स्थापन केली. ही एक नवी सुरुवात होती. संघटनेने या हिंसाचाराचा निषेध केला. आपली भूमिका जाहीर केली. ‘माँट्रियल हत्याकांड ही आपल्या समाजातील स्त्रियांच्या विरोधातील कृती आहे. हे कोणा माथेफिरूचे काम नाही. ज्या मानसिकतेतून या मुलींची हत्या झाली, त्या हिंसक संस्कृतीपासून स्त्री, पुरुष आणि मुलांना मुक्त करण्यासाठी संघटनेचे सदस्य बांधील आहेत.’
बहुसंख्य पुरुष हिंसक नसतात. आपल्या समाजात, कुटुंबात ज्या पद्धतीने पुरुषांना वाढवलं जातं. त्यातून त्यांच्यात आक्रमकता, हिंसेचं आकर्षण जोपासलं जातं. मवाळ वागण्याला बायकी समजलं जातं. ‘मर्दानगी’ची कल्पना शारीरिक ताकदीशी जोडली जाते. पुरुषांची घडण, सामाजिकीकरण असं होतं की, काही पुरुष आपल्यापेक्षा दुर्बल स्त्री-पुरुषांशी, मुलांशी हिंसक वागतात. त्यातच पुरुषार्थ आणि मर्दानगी समजतात. अशा पुरुषांना स्त्रियांचा नकार, प्रश्न विचारणं सहन होत नाही. भेदभावाचं वातावरण, द्वेष हिंसेला प्रोत्साहन देतं. ‘मेन फॉर चेंज’ संघटनेनं पुरुषांसाठी एक आचारसंहिता जाहीर केली. ‘पुरुष म्हणून मला जास्तीचे अधिकार आहेत, ते मिळवण्यासाठी मी कोणावरही आक्रमण करू शकतो’, या कल्पनेतून पुरुषांनी मुक्त झालं पाहिजे, पुरुषांनी आपल्या भावना, वाटणारी भीती मोकळेपणाने व्यक्त करायला हवी, पुरुष मदत मागू शकतो आणि करू शकतो, त्यांनी लैंगिक भाषा, शब्दोच्चार टाळावेत, स्त्रियांचा अपमान करणाऱ्या जाहिराती, माध्यमांवर बहिष्कार टाकावा, स्त्रियांवर केल्या जाणाऱ्या हिंसेला विरोध करावा, समाजाने लादलेल्या पुरुषी अपेक्षांना नकार द्यावा, कोणावरही सत्ता न गाजवता, कब्जा न करता मला माझं सामर्थ्य सिद्ध करता येऊ शकतं, पुरुष म्हणून मी माझ्या कृत्याची जबाबदारी घेतली पाहिजे, अशा अनेक बाबींचा या आचारसंहितेत समावेश केला. शाळा, महाविद्यालयात जावून ही आचारसंहिता मान्य करण्याची चळवळ संघटनेने उभी केली.
‘मेन फॉर चेंज’ची प्रेरणा घेऊन कॅनडात ‘मेन कॅन स्टॉप रेप’ आणि ‘प्रो फेमिनिस्ट मेन्स ग्रुप’ अशा काही पुरुषांच्या संघटना स्त्रीमुक्ती चळवळीतील सहभागासाठी स्थापन झाल्या. त्यातूनच अमेरिकेतील आणि कॅनडातील पुरुषांची ‘मेनली मेन अगेन्स्ट व्हायलेंस अँड सेक्सिझम्’(एमएमएव्हीएस) ही संयुक्त संघटना स्थापन झाली. संघटनेने आपल्या भूमिकेत म्हटले, ‘पुरुषांकडून स्त्रियांवर होणारी हिंसा हा गुन्हा आहे. स्त्रीविरोधी होणाऱ्या गुन्ह्यांना स्त्रियांचे प्रश्न म्हणूनच का समजलं जातं. पुरुषांनी आम्ही गुन्हे करणारे, गुन्हे करणाऱ्यांचे वंशज, मित्र आहोत हे मान्य करायला हवं. हे गुन्हे रोखण्याचं कामही पुरुषांचंच आहे. जगातील हिंसेचा शेवट करायचा असेल, तर प्रत्येक पुरुषाला स्वत:पासून त्याची सुरुवात करावी लागेल.’ प्रगल्भ पुरुष, माणूस होण्यासाठी पुरुषांना बदलायला हवं. स्त्रियांसह सत्ता आणि सामर्थ्य वाटून घेण्याचा विचार स्वीकारायला हवा. त्यातूनच आमचाही खरा विकास होईल, आम्ही अधिक माणुसकीने जगायला शिकू, हा विचार ‘एमएमएव्हीएस’ने रुजवला. जगभर अनेक पुरुष संघटनेचे सभासद झाले.
१९९१मध्ये इंग्लंड आणि वेल्समध्ये स्त्रीवाद समर्थक पुरुषांनी सुरू केलेल्या ‘व्हाइट रिबन’ संस्थेचं जाळं अनेक देशांत पसरलेलं आहे. २५ नोव्हेंबर हा दिवस स्त्रियांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी पाळण्यात यावा म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाकडे आग्रह धरणाऱ्यांमध्ये ‘व्हाइट रिबन’ ही प्रमुख संस्था आहे. २०१०मध्ये इंग्लंडमधील प्रेस्टन येथे स्थापन झालेल्या ‘मेन अगेन्स्ट व्हायलंस’ संघटनेने स्त्रिया आणि मुलींवर होणाऱ्या घरगुती आणि लैंगिक अत्याचाराविरुद्ध अनेक उपक्रम हाती घेतले. ब्रिटिश शाळांमध्ये अभ्यासक्रमांतून लैंगिक आणि घरगुती हिंसाचारांविरुद्ध शिक्षण द्यावं अशी मागणी केली आहे.
स्त्री चळवळीचं नेतृत्व स्त्रियांनी करावं, आपण त्यांना मदत करावी, सहभाग द्यावा असा विचार करणाऱ्या भारतातील स्त्रीवादी पुरुष मित्रांनादेखील अशा संघटनांची गरज वाटते. १९८५मध्ये पुण्यात मुकुंद किर्दंत यांच्या पुढाकाराने ‘पुरुष उवाच’ हा गट स्थापन झाला, तर मुंबईत १९९३मध्ये हरीश सदानी आणि मित्रांनी एकत्र येऊन ‘मेन अगेन्स्ट व्हायलेंस अँड अब्यूज’ (MAVA) हा गट स्थापन केला. या दोन्ही गटांचा लिंगभाव संवेदनशीलतेवर विश्वास आहे. आपल्या कामातून हा विचार रुजवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ‘पुरुष उवाच’तर्फे अनेक विषयांवर अभ्यास मंडळं घेतली जातात. दरवर्षी ‘पुरुष उवाच’ हा दिवाळी अंक प्रसिद्ध केला जातो. त्यात पितृसता, मर्दानगी, पौरुषत्वाची कल्पना नाकारणाऱ्या, स्त्री-पुरुष समतेचा विचार मान्य असणाऱ्या पुरुषांचं लिखाण असतं. ‘मावा’तर्फे ‘माणूसपणाच्या वाटेवरची पुरुष स्पंदनं’ असे घोषवाक्य असलेला ‘पुरुष स्पंदन’ दिवाळी अंक प्रसिद्ध होतो.
पुरुषसत्तेने स्त्री-पुरुषांना दिलेल्या भूमिका दोघांच्याही माणूस म्हणून घडण्यात अडथळा, मर्यादा निर्माण करणाऱ्या आहेत. या चौकटीमुळे पुरुषांवरही अनेक बंधनं येतात. ती बदलण्यासाठी पुरुषांनी पुढाकार घ्यायला हवा यासाठी ‘मावा’ संघटनेने महाविद्यालयीन युवकांमध्ये सातत्याने उपक्रम राबवले आहेत. पुरुषांनी केवळ स्त्रियांना पाठिंबा देणं पुरेसं नाही, तर स्त्रियांच्या चळवळीत बरोबरीनं सहभागी व्हायला हवं, यासाठी ‘मावा’ संघटनेचे कार्यकर्ते प्रयत्न करतात.
पुरुष संवेदनशील माणूस आहे. परंपरेने लादलेल्या वर्चस्ववादी भूमिकेचा त्याग केलेल्या पुरुषांमध्ये स्त्रियांवर होणारी हिंसा थांबवण्याची क्षमता आहे, असा वरील सर्व गटांचा विश्वास आणि अनुभव आहे. केवळ अशा संघटनांशी संबंधित पुरुषच नाही, तर आपल्या आजूबाजूला, नातेसंबंधात असे संवेदनशील आणि बदलायला तयार असलेले काही पुरुष असतात. असे पुरुष आई, बहीण, मैत्रीण, पत्नी, मुलगी, कार्यालयातील सहकारी अशा विविध नात्यांतून भेटणाऱ्या स्त्रियांच्या जगण्यात आनंद निर्माण करतात. त्यांचे मित्र बनतात. पेर इस्डाल (Per Isdal) या ज्येष्ठ मानसशास्त्रज्ञाच्या मते ‘पुरुषाला बदलणं अवघड असलं तरी शक्य आहे. हिंसेला पर्याय अहिंसक वागणं शिकत जाणं हाच आहे. म्हणजेच स्पर्धेला सहकार्याचा, अनादराला आदराचा, हुकूमशाहीला लोकशाही आणि समतेचा, गप्प बसणं किंवा एकानेच बोलण्याला संवादाचा, नियंत्रणाऐवजी समजून घेण्याचा, भीती, द्वेष, अपमानाऐवजी प्रेम, सन्मान असा बदलाचा प्रवास करता येईल. तसेच पुरुषाने तो करत असलेल्या हिंसाचार आणि दडपशाहीची जबाबदारी घ्यायला हवी.’
भयमुक्ती आणि हिंसा मुक्तीचा हा एकत्रित प्रवास आहे. स्त्रीवाद, स्त्रीमुक्ती पुरुषविरोधी नाही. स्त्री-पुरुषांमधील मानुषभान वाढवण्यासाठी स्त्रीवादाची निर्मिती झाली. हा मानवमुक्तीचा प्रवास आहे. माणसाने माणसाशी माणसासम वागणे लक्षात आलं की हा प्रवास सहज होतो. आपला वाटतो.
आपल्या देशात अशा सहृदयी पुरुषांची फार मोठी परंपरा आणि वारसा आहे. स्त्रियांना अध्यात्माचा अधिकार देणारे वर्धमान महावीर, तथागत गौतम बुद्ध, संत मीराबाईंचे भक्तीमार्गातील श्रेष्ठत्व स्वीकारणारी भक्ती परंपरा, जनाबाईंना सखा वाटणारे संत ज्ञानेश्वर, नामदेवांनी निर्माण केलेली वारकरी परंपरा, अक्कमहादेवीचा वैराग्य आणि ज्ञानाचा शोध समजून घेणाऱ्या क्रांतिकारी संत बसवेश्वरांनी निर्माण केलेली लिंगायत अशा सर्व विद्रोही परंपरांनी स्त्रियांच्या मुक्तीची वाट तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. राजा राममोहन रॉय, ईश्वरचंद्र विद्यासागर, महात्मा जोतिबा फुले, गोपाळ गणेश आगरकर, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, इरोड वेंकट रामासामी पेरियार, महर्षी कर्वे इत्यादी पुरुष सुधारकांची मोठी परंपरा आपल्याला लाभली आहे. या पुरुषांनी स्त्रियांच्या वेदना जाणून घेतल्या,स्त्रियांची दु:ख ऐकली, त्यांची उत्तरं शोधली. स्त्रियांना सामर्थ्य दिलं. स्त्री-पुरुष समानतेचं भान समाजात निर्माण केलं. समन्यायी, सहिष्णु, उदार होत भारतीय पुरुषांनी हा वारसा पुढे न्यायला हवा.
पुरुषभान जागवण्याची जबाबदारी घर, शाळा ते राज्यसंस्था तसेच सर्व सामाजिक संस्थांची आहे. घरातील वातावरण, शाळेतील अभ्यासक्रम, राज्यसंस्थेची धोरणं सर्व प्रकारच्या हिंसाचाराला आणि द्वेषाला विरोध करणारी आणि लिंगभाव समानतेला पोषक हवीत तरच पोलीस प्रशासन मुलींशी, स्त्रियांशी दहशतीने वागणार नाही, स्त्रियांच्या तक्रारी ऐकून घेतल्या जातील. त्यावर कारवाई केली जाईल. कधीही माँट्रियलसारखं हत्याकांड घडणार नाही. लिंगभाव संवेदनशीलतेचा हा प्रवास स्त्री-पुरुषांनी एकत्र येऊन करू या. समूहपातळीवरचे असे प्रयत्न वाढत जावोत.
advnishashiurkar@gmail.com