कुंकू ! एक तांबडय़ा रंगाची भुकटी. म्हणावं तर अगदी क्षुल्लक बाब. पण हिंदू समाजाने त्यामध्ये मांगल्य, पावित्र्य भरलेलं. कुंकवात स्त्रीचा जीव अडकलेला. कधी अनवधानाने कुंकू पुसलं गेलं तर केवढा मोठा अपशकुन! पूर्वीच्या काळात कुंकू पुसणं असं नुसतं म्हटलं तरी नवऱ्याचं बरं-वाईट होईल या धास्तीमुळे ‘कुंकू वाढवलं’ असं म्हटलं जाई. चतुरंग पुरवणीमध्ये ‘जिणे वैधव्याचे’ या अनुभवांवर आधारित लेखामध्ये विधवांचा कुंकू लावण्याचा हक्क व आत्मसन्मान यासाठी चाललेलं प्रबोधन व उपक्रमांबद्दल वाचल्यानंतर कुंकवाच्या मांगल्याबाबत, पवित्रतेबाबत असलेला अंधश्रद्धाळूपणाविषयी लिहावं, असं वाटल्याने शब्दबद्ध केलेले गेल्या पंचाहत्तर वर्षांतील माझे व्यक्तिगत अनुभव व मनन.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वयाच्या ५-६  वर्षांपर्यंत आईच्याभोवती घोटाळत आईबरोबर चत्रगौरीची सुंदर आरास सजवण्यामध्ये लुडबुड करत चटकदार आंब्याची डाळ नि आंबटगोड पन्ह्याचा आस्वाद घेत हळदीकुंकू साजरं करायचं. संक्रांतीचा पांढराशुभ्र काटेदार हलवा आणि वाण लुटण्याचा आनंद. हरितालिकेला पारिजातकाच्या फुलांची मोहक रांगोळी आणि फलाहार, सारं मोठं लोभस आणि मौजमजेचं वाटे. त्याच्या अर्थाचा विचार करण्याएवढी शिंगं अजून फुटलेली नव्हती. कुंकवाकडे प्रथम लक्ष गेलं ते प्रभातच्या ‘कुंकू’ सिनेमातील नायिका नीरा (शांता आपटे) कुंकू कपाळाला टेकवताना संभ्रमावस्थेत सापडल्याने तिचा भेदरलेला चेहरा आणि थरथरता हात पाहून. तिला प्रश्न पडला होता की कुंकू लावायचा तिला अधिकार आहे का? जिचं भाग्य नवरा मिळाल्याने भविष्यात उजळायचं असतं अशी कुमारिका किंवा जिचा नवरा हयात असल्याने सौभाग्य उजळलेलं असतं अशी सौभाग्यवती यांना फक्त कुंकू लावण्याचा हक्क! मग तो नवरा दारुडय़ा, छंदीफंदी, मारहाण करणारा कसाही असला तरी बाईला इतर पुरुषांपासून संरक्षण देतो ना हेच बाईचं महाभाग्य! जी अगदी बळजबरीने लादलेला औटघटकेचाही नवरा गमावते अशा पांढऱ्या पायाच्या अवदसेचं कपाळ पांढरंच हवं! एवढंच काय त्या काळात तर आमच्या घरात केशवपन केलेल्या अलवण (विटकट तांबडं विनाकाठापदराचं लुगडं) नेसणाऱ्या पार्वतीकाकू होत्या. शेजारच्या ‘बाई’ होत्या आणि अशा किती तरी अभागी बालविधवा माझ्या परिसरात होत्या, ज्यांना समाजानं माणसाचं जिणंच नाकारलेलं होतं! याला काही अपवाद मात्र होते. माझी आजी माझे आजोबा वारल्यावरही (१९३२ साली) कुंकू लावत होती. स्वत:च्या हिमतीवर नागपूरमधील शेतावर तिने संत्र्यांचा बगिचा फुलवला होता. नागपूरला एकटी राहून समर्थपणे शेतीवाडी सांभाळत होती. मातृसेवा संघांची अध्यक्ष या नात्याने संस्थेची जबाबदारी चोखपणे पार पाडत होती. अशा करारी, कर्तबगार स्त्रिया किती तरी, पण रूढी-परंपरेने बहुतेकांच्या आयुष्याचे बळजबरीने मातेरं केलं जात होतं.
कुंकू! एक तांबडय़ा रंगाची भुकटी. म्हणावं तर अगदी क्षुल्लक बाब. पण हिंदू समाजाने त्यामध्ये मांगल्य, पावित्र्य भरलेलं.
सासूबाई, तुमचं नेसणं फुलाचं।
राघू मनाले वंशाचं॥
सासूबाई, सारा संसार तुमचा।
कपाळी कुंकू एवढा। दागिना आमचा॥
 विवाह हा मंगल विधी, स्त्रीच्या दृष्टीने जन्मोजन्मीची गाठ बांधणारा आणि त्याचं मंगल प्रतीक म्हणजे कुंकू! कुंकवात स्त्रीचा जीव अडकलेला. कधी अनवधनाने कुंकू पुसलं गेलं तर केवढा मोठा अपशकुन! त्या काळात कुंकू पुसणं हा वाक्प्रचारही निषिद्ध होता. पुसणं असं नुसतं म्हटलं तरी नवऱ्याचं बरं वाईट होईल या धास्तीमुळे ‘कुंकू वाढवले’ असं म्हटलं जाई.  
सासू नि सासरे।
माझ्या घराचे भूषण।
कपाळी कुंकू लावले।
भरजरीचे निशाण॥

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Womens importance
First published on: 20-12-2014 at 01:05 IST