चैतन्य प्रेम

जन्मापासूनचं आपलं जगणं हे बहिर्मुख आहे. बहिर्मुख म्हणजे आपल्या जाणिवा, भावना, कल्पना, विचार यांचं पोषण हे बाहेरच्या जगाच्याच आधारानं होतं. बाहेरचं, दृश्य म्हणजे दिसणारं जग खरं वाटत असतं आणि त्या जगातली माणसं, वस्तू आणि परिस्थितीनुरूप आपल्या मनात अनुकूल वा प्रतिकूल भावना आकारास येत असतात. त्या भावनांनुसार आपलं जगणं साकारत असतं. या बहिर्मुख जगातल्या समस्त गोष्टी; मग ती माणसं असोत, वस्तू असोत की परिस्थितीही असो, या काळाच्या पकडीत असल्यानं त्यात नित्य परिवर्तन होत असतं. हे परिवर्तन ज्याच्या-त्याच्या धारणेनुसार प्रत्येकाला चांगलं किंवा वाईट वाटत असतं. या धारणेचा पाया सुप्तपणे स्वार्थ हाच असतो. तेव्हा या बाह्य़ जगात जो-तो ‘मी’केंद्रित होऊनच जगत असतो. त्यामुळे या दृश्य जगातील अनंत घडामोडींचं मूळ अदृश्य अशा ‘मी’मध्येच असतं! तर काळाच्या पकडीत असल्यानं सतत बदलत असलेल्या परिस्थितीत जगत असलेला माणूस हा त्या परिस्थितीला आपल्या मनाप्रमाणे वाकवू पहात असतो. त्याच्या या प्रयत्नांतच त्याची बहुतांश मानसिक आणि शारीरिक शक्ती खर्च होत असते. प्रत्यक्ष कष्टात शारीरिक शक्ती नेहमीच अधिक लागते असं नाही, पण त्या कष्टांनुरूप फळ मिळालं नाही, तर खर्च होणारी मानसिक शक्ती अतोनात असते. इतकंच नव्हे, त्या मानसिक शक्तीच्या व्ययाचा परिणाम शरीरावरही होतो. माणसाच्या अनेक रोगांचं मूळ हे सतत चिंता करीत राहण्याच्या त्याच्या सवयीतही असतं, या निष्कर्षांपर्यंत आता आधुनिक वैद्यकही पोहोचत आहे. सततच्या चिंतेनं नकारात्मकताही मनात रुजत जाते. शरीराला एखादा रोग जडला असेल आणि त्याचवेळी मन जर सकारात्मक असेल तर तो रोग बरा करण्याच्या उपचारांना शरीर फार वेगानं साथ देतं, असंही पाहण्यात येतं. किंवा त्या सकारात्मकतेनं रोगाला सामोरं जाताना मनाची उमेद ओसरत नाही. तर माणसाच्या जीवनाचं असं काळाच्या आधीन असलेलं भवितव्य लक्षात घेऊन माणासानं प्रत्यक्ष जगण्याकडे अधिक लक्ष दिलं तर त्या अवधानानंही बरंच काही साध्य होत जाईल. आपल्या जगण्याचं निरीक्षण-परीक्षण करून आपल्याकडून होणाऱ्या अनेक किरकोळ चुका आपल्या आपल्यालाच लक्षात येतील. मग पुन्हा अशी चूक आपल्या वर्तनात होऊ द्यायची नाही, असा विचारही मनात उत्पन्न होईल. याचा अर्थ पुन्हा तशी चूक घडणारच नाही, असं नव्हे, पण त्या चुकीच्या पुनरावृत्तीची शक्यता तरी कमी होत जाईल. कधीकधी आपण दुसऱ्याला गृहित धरतो आणि नकळत आपल्या वागण्या-बोलण्यातून दुखावतो. अशा वर्तनाचं प्रमाणही कमी होऊ लागेल. इतकंच नव्हे, तर बाहेरच्या जगाशी आपला संबंध कर्तव्यनिष्ठ अधिक असला पाहिजे, मोहनिष्ठ कदापि नसावा, ही जाणीवही वाढू लागेल. मग लोकांच्या आणि आपल्याही मनातल्या अवास्तव अपेक्षा, कल्पनांना आपण प्रतिसाद देणार नाही. तेव्हा आपल्या वाटय़ाला आलेलं आयुष्य हाच मोठा लाभ आहे. जन्म आपल्या हातात नव्हता, मृत्यू आपल्या हातात नाही, पण जगणं तरी या क्षणी हातात आहे! या जाणिवेनं जीवनाकडे पाहू तेव्हा ज्या निष्काळजीपणे आपण आपल्या वेळेचा, आपल्या क्षमतांचा गैरवापर करीत असतो, तो कमी होईल. मग आपल्या वेळेचा, क्षमतांचा वापर आंतरिक प्रवासासाठी अर्थात सद्गुरू बोधानुरूप जगण्यासाठी सुरू होईल.