lp48टीव्ही ते सिनेमा असा कलाकाराचा सर्वसाधारण प्रवास असतो. सिनेमात गेलेला कलाकार तिथेच रमतोही. याला काही अपवाद आहेत. टीव्हीतून लोकप्रिय झालेले कलाकार सिनेमांमध्ये स्थिरावल्यानंतरही आता पुन्हा छोटय़ा पडद्याकडे वळले आहेत.

सिनेसृष्टीत चमकण्यासाठी कलाकार मंडळी टीव्हीचा वापर पहिली पायरी म्हणून करायचे. टीव्हीत झळकल्यानंतर एकेक प्रोजेक्ट मिळत सिनेमात जाण्याचं कलाकारांचं अंतिम ध्येय असायचं. पण, आता हे चित्र काहीसं बदलताना दिसतंय. सिनेमाची ताकद आजही तितकीच आहे. कलाकारांचं आजही सिनेमात काम करण्याचं स्वप्न असतंच. पण, ते टीव्ही या माध्यमाकडे केवळ करिअरची पहिली पायरी म्हणून बघत नाहीत. तर सिनेमाइतकंच महत्त्व त्याही माध्यमाला दिलं जातंय. अनेक नावाजलेले कलाकार आता पुन्हा टीव्हीकडे वळताना दिसताहेत. टीव्ही हे माध्यम अधिकाधिक प्रभावी होत चाललंय. प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी टीव्ही या माध्यमात काम करणं कलाकारांना महत्त्वाचं वाटू लागलं आहे. कित्येक कलाकारांना टीव्हीत काम केल्यामुळे ओळख मिळाली आहे. टीव्हीकडे यू-टर्न घेतल्याचं चित्र सहसा हिंदीत बघायला मिळतं. पण, आता मराठीतही काही नावाजलेल्या कलाकारांनी मालिका, रिअ‍ॅलिटी शोजमध्ये काम करणं पसंत केलंय. मोठय़ा पडद्यावरचे कलाकार वेगवेगळ्या वाहिन्यांवरील मालिकांमधून छोटय़ा पडद्यावर आता दिसताहेत. वैभव मांगले, संतोष जुवेकर, अमोल कोल्हे, आनंद इंगळे, भरत जाधव ही कलाकार मंडळी विविध मालिका, शोजमधून स्मॉलस्क्रीनवर प्रेक्षकांच्या भेटीस आवतरली आहेत. या सगळ्याच कलाकारांना मालिकांमधूनच ओळख मिळाली आहे. यांच्यापैकी काहींचा करिअरचा श्रीगणेशा रंगभूमीपासून झाला असला तरी करिअरच्या महत्त्वाच्या टप्प्यांपैकी एक म्हणजे त्यांच्या मालिका ठरल्या आहेत. या नव्या लाटेत नायिकांपेक्षा नायकांचं प्रमाण अधिक असल्याचं दिसून येत आहे. ‘हसा चकटफू’ या मालिकेतील भरत जाधव यांची अण्णा ही व्यक्तिरेखा प्रचंड गाजली. आता तेही लवकरच कलर्स मराठीच्या ‘आली लहर केला कहर’ या रिअ‍ॅलिटी शोमधून छोटय़ा पडद्यावर दिसणार आहेत. दिग्दर्शक केदार शिंदे आणि भरत जाधव ही जोडी पुन्हा एकदा एकत्र एका शोमधून दिसेल. याबाबत भरत सांगतात, ‘सिनेमे चालू असल्यामुळे त्यातून वेळ काढत कार्यक्रम करणं शक्य नव्हतं. गेल्या दोन वर्षांपासून मी मोजके सिनेमे करतोय. मालिकेसाठी पूर्ण वेळ देणं शक्य नसल्यामुळे एखाद्या चांगल्या कथाबाह्य़ कार्यक्रमात काम करावंसं वाटत होतं. मालिकांमधील काम करण्याची पद्धत पटत नाही. १२-१४ तासांचं काम, स्क्रिप्ट आयत्या वेळी येणं, नियोजन नसणं हे मला पटत नाही. यामुळे लेखक, दिग्दर्शक, कलाकार यांच्या क्रिएटिव्हिटीला वेळच मिळत नाही. मालिका करणं वाईट नाही. पण त्यात नियोजनाची कमतरता भासते. मी कसा आणि किती वेळ काम करणार याची कल्पना आधीच दिली आहे. टीव्ही हे माध्यम प्रभावी असलं तरी प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी मी टीव्ही हे माध्यम शोधलं असं नाही. टीव्हीशिवायही नाटक-सिनेमांच्या माध्यमांतून मी घराघरांत पोहोचलोय. सिनेमांमधून ब्रेक हवा होता. टीव्हीत वेगळं काही करायचं होतं. नाटकांचे दौरे सुरूच राहतील.’
‘वादळवाट’, ‘या गोजिरवाण्या घरात’, ‘जिवलगा’ या मालिकांमुळे संतोष जुवेकर घराघरात पोहोचला. तिथून त्याच्या करिअरची खरी सुरुवात झाली. सिनेमांमध्येही तो चांगलाच लोकप्रिय होऊ लागला. पण, बरीच र्वष मोठय़ा पडद्यावर झळकल्यानंतरही त्याला छोटा पडदा खुणावू लागला. कलर्स मराठीच्या ‘अस्सं सासर सुरेख बाई’ या मालिकेत तो प्रमुख भूमिकेत दिसतो आहे. तो साकारत असलेली यश महाजन ही व्यक्तिरेखाही त्याच्या इतर व्यक्तिरेखांप्रमाणेच लोकप्रिय झाली आहे. संतोष त्याच्या यू-टर्नबद्दल सांगतो, ‘मी साडेसात वर्षांनी मालिका करतोय. इतक्या वर्षांमध्ये टीव्ही माध्यमात खूप बदल झालेत. सिनेमांपेक्षाही टीव्हीतून कलाकार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतात. तसंच फेस व्हॅल्यूही टीव्हीमुळे जास्त मिळते. एखाद्या मालिकेत कलाकाराने चांगलं काम केलं की त्याचे सिनेमे, नाटकंही बघण्यास प्रेक्षक पुढे सरसावतो. टीव्ही या माध्यमाचं महत्त्व वाढत आहे.’ सिनेमातून टीव्हीकडे येताना संतोषने विशिष्ट मुद्दय़ांचा विचार केला आहे. तो सांगतो, ‘सिनेसृष्टीत असे मोजकेच लोक आहेत ज्यांचे सिनेमे १०० थिएटर्सपैकी ७०-८० थिएटरमध्ये पोहोचतात. असे सिनेमे फारतर दोन आठवडे थिएटरमध्ये असतात. त्यामुळे किती लोक हे सिनेमे बघतात ही शंकाच आहे. माझा सिनेमा एका थिएटरला लागतो, मग दुसऱ्या आठवडय़ात आलेल्या नव्या सिनेमामुळे माझ्या सिनेमाचे शोज विभागले जातात. अशावेळी सिनेमा लोकांपर्यंत पोहोचत नाही. ज्या सिनेमासाठी मी इतकी मेहनत घेतोय ती मेहनत एक किंवा दोन आठवडय़ांमध्ये संपणार असेल तर त्याला काही अर्थ नाही. म्हणून मी टीव्हीकडे वळायचं ठरवलं.’ सिनेसृष्टीत करिअर करताना ‘वादळवाट’ आणि ‘या गोजिरवाण्या घरात’ या दोन मालिका टर्निग पॉइंट असल्याचं तो सांगतो.
सिनेसृष्टीत कलाकारांबद्दल गॉसिप, चर्चा, अफवा या सुरूच असतात. काहींमध्ये तथ्य असतं तर काही उगाच वाऱ्यासारख्या पसरत असतात. अशा अफवांबद्दलच संतोष सांगतो, ‘एखाद्या कलाकाराबद्दल कधीकधी चुकीची माहिती पसरली जाते. माझ्या बाबतीत असं घडलंय. ‘संतोष जुवेकर जास्त पैसे घेतो’ अशी चर्चा इंडस्ट्रीत होते. त्यामुळे निर्माते माझ्याकडे येणं टाळतात. पण असं कोणाच्या तरी सांगण्यावर विश्वास न ठेवता थेट माझ्याशी संवाद साधणं केव्हाही उत्तम. मालिकेमुळे आर्थिक स्थैर्य मिळालंय. त्यामुळे आता सिनेमांच्या संहिता वाचताना, सिनेमे निवडताना पुरेसा वेळ हातात आहे.’
‘फू बाई फू’ या शोमुळे घराघरात पोहोचलेले आनंद इंगळे आणि वैभव मांगले हे दोघेही आता पुन्हा मालिकांमध्ये दिसताहेत. वैभव मांगले झी मराठीच्या ‘माझे पती सौभाग्यवती’ या नव्या मालिकेतून दिसत आहेत. ‘काकस्पर्श’, ‘टाइमपास’, ‘टाइमपास टू’ अशा अनेक सिनेमांमध्ये लोकप्रियता मिळालेला वैभव आता वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तद्दन सिनेमे करण्यापेक्षा एखादी चांगली मालिका करण्याला ते प्राधान्य देतात. ‘मालवणी डेज’ आणि ‘शेजारी शेजारी पक्के शेजारी’ या मालिकांनंतर ते पुन्हा छोटय़ा पडद्यावर एंट्री करताहेत. ‘कलाकाराने सर्व माध्यमांचा अनुभव घ्यायला हवा. नाटक, सिनेमांप्रमाणेच मालिकांमध्येही कलाकाराने चांगलं काम केलं असेल तर त्याचं कौतुकच होतं. टीव्ही माध्यम कलाकारांसाठी महत्त्वाचं ठरत आहे. टीव्ही घराघरात पोहोचत असल्यामुळे नाटक-सिनेमांपेक्षा मालिकांमधून कलाकारांचं कौतुक जास्त होतं. चांगल्या प्रोजेक्टमधून टीव्हीत काम करावं असं मला वाटत होतं. ‘माझे पती..’मुळे माझा हा विचार प्रत्यक्षात उतरला’, असं वैभव सांगतात.
अलीकडे बॉलीवूडचे बडे स्टार्स हिंदी वाहिन्यांवर झळकले. अमिताभ बच्चनपासून सुरू झालेला हा ट्रेंड अगदी आता सोनाक्षी सिन्हापर्यंत येऊन पोहोचला. या साखळीत शाहरूख, सलमान, आमिर, अक्षय कुमार, अजय देवगण, मिथुन चक्रवर्ती असे अनेक कलाकार आहेत. सिनेसृष्टीत कलाकारांची अशी एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये उडी मारलेली नेहमीच लक्षात राहते. जे कलाकार टीव्हीमुळे प्रेक्षकांच्या लक्षात राहतात पण, कालांतराने सिनेमा, नाटकांकडे वळतात आणि पुन्हा टीव्हीकडे वळतात तेव्हा प्रेक्षकांसाठी ती मेजवानी ठरते. हीच लाट आता मराठीमध्ये दिसून येत आहे. सिनेमात काम करण्याचं प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं. आता काळ बदलतोय. प्रेक्षकांच्या नजरेत राहायचं असेल तर टीव्हीत दिसणं हेही महत्त्वाचं ठरतंय. या विचारसरणीत तथ्य असल्याचं अमोल कोल्हे सांगतात. ‘टीव्हीमध्ये दिसणं हे आता महत्त्वाचं मानलं जातं, हे मला पटतं. पण कलाकार टीव्हीमध्ये कोणती मालिका किंवा शो करतोय हे महत्त्वाचं आहे. एखाद्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना कलाकाराला स्वत:ला एक व्यक्ती म्हणून व्यक्त होता येतं. स्वत:ला सादर करता येतं. पण मालिकेत काम करताना एखाद्या भूमिकेतून कलाकार व्यक्त होत असतो. ‘मंडळ भारी आहे’ या कार्यक्रमाची संकल्पना मला आवडली आणि कार्यक्रम स्वीकारला.’ ‘राजा शिवछत्रपती’ या मालिकेमुळे अमोल लोकप्रिय झाले. शिवाजी महाराजांची भूमिका साकारल्यावर मालिका संपल्यानंतर अमोल यांनी तीन वर्षे ‘शंभूराजे’ या नाटकात शंभूराजेंची भूमिका साकारली. ‘कलावैभवचे निर्माते मोहन तोंडवळकर ‘शंभूराजे’ हे नाटक करत होते. पण त्यांना संभाजीच्या भूमिकेसाठी मनासारखा नट मिळत नव्हता. पण नंतर या भूमिकेसाठी माझी निवड झाली. दरम्यान ‘राजा शिवछत्रपती’ ही मालिका सुरू झाली. मालिका सुरू असल्यामुळे मोहन काकांनी माझ्यासाठी दीड-दोन र्वष नाटकाला अल्पविराम दिला. मालिका संपल्यानंतर मी पुन्हा नाटकाकडे वळलो. आता काहीतरी वेगळं करू पाहायचं होतं. म्हणून ‘मंडळ..’साठी होकार दिला’ असं ते सांगतात.
सिनेमा एके सिनेमा असं धोरण न ठेवता कलाकार विविध माध्यमांमध्ये काम करताना दिसत आहेत. एका वेळी तिन्ही माध्यमांमध्ये काम करणारेही काही कलाकार आहेत. मात्र यात नियोजन असणं हे महत्त्वाचं. आनंद इंगळे यापैकी एक. ‘कुंकू’, ‘फू बाई फू’, ‘शेजारी शेजारी पक्के शेजारी’ अशा मालिकांमधून लोकप्रिय झालेले आनंद सांगतात, ‘मी मालिकांपासून दूर होतो असं नाही. एका मालिकेनंतर दुसरी मालिका करताना सहा-आठ महिन्यांचा ब्रेक घेतो. मालिकेत विशिष्ट व्यक्तिरेखा साकारताना त्याचे पडसाद इतर भूमिकांवर पडू नयेत म्हणून हा ब्रेक घेतो. जेणे करून पुढची भूमिका साकारताना उत्साह आणि ताजेपणा वाटेल. काही महिन्यांच्या ब्रेकनंतर मी ‘तुमचं आमचं सेम असतं’ ही मालिका करतोय. टीव्ही हे प्रभावशाली आणि लोकप्रियतेचं माध्यम आहे. आर्थिकदृष्टय़ाही हे माध्यम सशक्त आहे. आमच्यासारखे कॅरेक्टर आर्टिस्ट सिनेमांची निवड त्या-त्या आवडीनुसार करू शकतात. त्यामुळे भारंभार सिनेमे करण्यापेक्षा एखादी उत्तम आशयाची मालिका करणं केव्हाही चांगलं.’ टीव्ही या माध्यमात सतत नवनवे बदल होत असतात. तांत्रिकदृष्टय़ा आणि आशयातही हे बदल होत असतात. असे बदल होण्याचा वेग खूप आहे. आनंद फक्त सहा-आठ महिन्यांच्या ब्रेकने नवीन मालिका करत असले, तरी त्यांना हे बदल दरवेळी नवीन वाटतात. ते सांगतात, ‘खासगी चॅनल्सच्या सुरुवातीला मालिकांचे विषय चांगले असायचे. मधल्या काळात सगळ्या वाहिन्यांनी त्यांचा मोर्चा ‘किचन पॉलिटिक्स’याकडे वळवला होता. पण, आता पुन्हा चांगल्या आशयाच्या काही मालिका आहेत. तांत्रिकदृष्टय़ा अनेक बदल होताना दिसतात. अनेक नवीन चेहरे या माध्यमाकडे येताना दिसतात. या तरुण मंडळींनी फक्त गांभीर्याने काम केलं पाहिजे. नवोदित कलाकारांची संख्या वाढणं हा प्रमुख बदल म्हणता येईल. पूर्वी अभिनय येतो म्हणून मालिकेत घेतलं जायचं. पण आता मालिका केली की अभिनय करायला सुरुवात करतात. टीव्हीत काम करताना आता फक्त ‘उत्तम दिसणं’ हेही पुरेसं असतं.’
सध्या वाहिन्यांमध्ये नवे चेहरे घेण्याचा ट्रेंड राज्य करतोय. यात अनुभव असलेले-नसलेले, हौशी असे कोणतेही कलाकार खरंतर इथे चालतात. ‘चांगलं दिसणं’ ही त्यातली एक प्रमुख अट असते. म्हणूनच आताच्या मालिकांवर एक नजर टाकली तर प्रमुख भूमिकांमधले कलाकार अगदीच नवीन किंवा एखाद्या मालिकेचा अनुभव असलेले दिसतील. या नवीन फळीत चांगल्या-वाईट अशा दोन्ही कलाकारांचा समावेश आहे. पण या नवलाईच्या लाटेत अभिनयात मुरलेले आणि टीव्ही या माध्यमाचा अभ्यास असलेले कलाकार सामील होताना दिसताहेत. यापैकी सगळेच कलाकार मालिका किंवा रिअ‍ॅलिटी शोमध्ये प्रमुख भूमिकेत नसतील पण, त्यांच्या सहज अभिनयाने आणि सादरीकरणाने ते पुन्हा प्रेक्षकांच्या मनात घर करतील यात शंका नाही.
चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com