भक्ती बिसुरे

जगासाठी २०२० हे वर्ष करोना विषाणू संसर्गाचं संकट घेऊन अवतरलं. महाराष्ट्रात २०२०च्या मार्चमध्ये करोना संसर्गाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. टाळेबंदी हा आजाराला प्रतिबंध करण्यासाठी अवलंबण्याचा एक पर्याय असतो या गोष्टीचा अनुभव प्रथमच सर्वानी घेतला. काही दिवसांच्या किंवा महिन्यांच्या टाळेबंदीने करोना संकटातून आपण बाहेर येऊ अशी अपेक्षा असतानाच त्या वेळी विस्कळीत झालेले जनजीवन आज तब्बल दीड वर्षांनंतरही पूर्ववत होण्याचे लक्षण दिसत नाही. विषाणू संसर्गाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतून तावून-सुलाखून बाहेर पडल्यानंतर आता महाराष्ट्रासह देशासमोर करोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचे संकट आ वासून उभे आहे. तिसरी लाट नेमकी कधी येणार, येणार तेव्हा तिची तीव्रता पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या तुलनेत कमी असेल की अधिक, तिसऱ्या लाटेचा संसर्ग झाल्यास रुग्णांना लक्षणे नेमकी काय असतील, मृत्यूचे प्रमाण कमी असेल किंवा अधिक आणि महत्त्वाचे म्हणजे सध्या आपण घेत असलेली करोना प्रतिबंधक लस तिसऱ्या लाटेतील संसर्गाचा प्रभाव रोखणार की नाही, असे अनेक प्रश्न सध्या सर्वाच्या मनात आहेत. अनेक तज्ज्ञांनी ही तिसरी लाट ऑगस्ट महिन्यामध्ये अपेक्षित आहे, असे अंदाज व्यक्त केले होते. मात्र आता डेल्टा प्लस विषाणूबाधितांची संख्या देशाच्या अनेक राज्यांमध्ये वाढताना दिसते आहे. महाराष्ट्रातही आता डेल्टा प्लसचे रुग्ण वाढताना दिसत असून त्यामुळे केंद्र आणि राज्य दोन्ही सरकारांनी दोनच दिवसांपूर्वी तिसऱ्या संसर्गलाटेबद्दल गंभीर इशारा जारी केला. त्यानंतर बुधवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील निर्बंध पुन्हा एकदा कडक करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. शुक्रवापर्यंत राज्य शासनातर्फे हे कडक निर्बंधांचे तपशीलवार निर्देश जारी होणे अपेक्षित आहे. एकुणातच आता तिसरी लाट ऑगस्टमध्ये येण्याऐवजी तब्बल महिनाभर आधी म्हणजे जुलै महिन्याच्या सुरुवातीला अपेक्षेपूर्वीच येण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे.

संसर्गाची पहिली लाट ओसरल्यानंतर अनेक शहरांसह राज्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यामुळे करोना संसर्गाचे संकट कायमचे संपल्याप्रमाणे जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली. मुखपट्टी, अंतरभान, तातडीचे कारण असल्याशिवाय घराबाहेर न पडणे या सूचनांकडे थेट कानाडोळा करून सणसमारंभ, राजकीय सभा, सोहळे अशा गोष्टी सुरू झाल्या. त्याचे पर्यवसान म्हणून २०२१च्या फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा करोना रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाली. वाढत्या रुग्णसंख्येने हळूहळू लाटेचे स्वरूप धारण केले आणि पहिल्या लाटेच्या तीव्रतेचे सर्व उच्चांक मोडून काढत दुसऱ्या लाटेने राज्यासह देशाला हादरवले. सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा, औषधे, प्राणवायू, रुग्णालये या सगळ्यांचा तुटवडा अनुभवल्यानंतर अखेर रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने थोडा दिलासा मिळाला, मात्र तोपर्यंत पुन्हा एकदा आपण तिसऱ्या लाटेशी दोन हात करण्याच्या तयारीला लागलो आहोत. बाहेर वावरण्याचे बहुतांश निर्बंध उठवण्यात आल्याने रुग्णवाढ सुरू झालीच तर तिची तिसरी लाट येण्यास फार वेळ लागणार नाही, हे उघड आहेच. त्यामुळेच सर्व प्रतिबंधात्मक नियम पाळत राहणे हे सर्वाधिक महत्त्वाचे आहे.

करोना विषाणूच्या उत्परिवर्तनातून सुरू झालेला डेल्टा प्लस विषाणूचा संसर्ग हा जगातील अनेक देशांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. भारताबरोबरच अमेरिका, ब्रिटन, पोर्तुगाल, स्वित्र्झलड, जपान, पोलंड, नेपाळ, चीन आणि रशियात ‘डेल्टा प्लस’चे रुग्ण आहेत. एवढेच नव्हे तर सुरुवातीला केवळ भारतात आढळलेल्या ‘डेल्टा विषाणू’चे रुग्णही आता ८० देशांमध्ये आहेत. उत्परिवर्तनातून तयार झालेल्या ‘डेल्टा प्लस’सारख्या विषाणू संसर्गक्षमतेवर नियंत्रण ठेवणे अवघड असले तरी करोना प्रतिबंधात्मक पारंपरिक नियम पाळत राहणे अत्यावश्यक असल्याचा पुनरुच्चार सर्व स्तरांतील तज्ज्ञ करतात. मुखपट्टी वापरणे, गर्दी टाळणे आणि वेगवान लसीकरण केले तर तिसरी लाट रोखणे शक्य असल्याचे मत देशाच्या करोना कृतीगटाचे प्रमुख आणि निती आयोगाचे सदस्य व्ही. के . पॉल यांनी अलीकडेच स्पष्ट केले. त्यामुळे मुखपट्टी, वैयक्तिक स्वच्छता, गर्दी टाळणे यांसह लसीकरणाचे महत्त्व अधोरेखित होत आहे.

जनरल फिजिशियन आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राज्य शाखेचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे सांगतात, करोनाचे नवे उत्परिवर्तन म्हणून समोर आलेल्या डेल्टा प्लसचे महाराष्ट्रात रुग्ण आढळले आहेत. प्राथमिक संशोधन असे दर्शवते की, मोनोक्लोनल प्रतिपिंडांना हे उत्परिवर्तन जुमानत नाही. त्यामुळे लशीतून तयार होणाऱ्या प्रतिपिंडांना ते जुमानणार का, हे अद्याप स्पष्ट नाही. तसे झाले तर तिसरी लाट ही पहिल्या दोन्ही लाटांच्या तुलनेत अधिक गंभीर असेल ही शक्यता नाकारता येत नाही. सध्या रत्नागिरी, मुंबई, जळगाव आणि पालघरमध्ये डेल्टा प्लसचे रुग्ण आहेत. ज्या भागांमध्ये या उत्परिवर्तनाचे रुग्ण आहेत, त्या परिसरांमध्ये रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांची कसून तपासणी, नियमांचे कठोर पालन या गोष्टी राबवल्या जाणे आवश्यक आहे. डेल्टाप्रमाणे डेल्टा प्लसच्या संक्रमणाचा वेग अधिक राहिला तर त्यामुळेही तिसरी लाट अधिक गंभीर होण्याचा धोका राहतो, असेही डॉ. भोंडवे यांनी स्पष्ट केले. डॉ. भोंडवे पुढे सांगतात, टाळेबंदीतील नियम शिथिल झाले की साथरोग संपल्याप्रमाणे नागरिकांचे वर्तन असते. आताही पर्यटन स्थळांवर मोठी गर्दी करणारे नागरिक ते पुन्हा दर्शवत आहेत. करोना प्रतिबंधासाठी अत्यंत महत्त्वाचा उपाय असलेल्या लसीकरणाची संथगती हीदेखील या काळात चिंतेची बाब ठरत आहे. लसीकरण मोहीम हाती घेतल्यानंतर तिचा वेग अपेक्षेएवढा नाही. लशीचा पुरवठा सुरळीत राखणे, लसीकरणाच्या प्रक्रियेत कोणतीही तांत्रिक अडचण येऊ न देणे या बाबी महत्त्वाच्या आहेत. को-विन संकेतस्थळावरील नोंदणीची अट शिथिल करण्यात आली असली तरी ते करण्यातही बराच विलंब लागल्याने लसीकरण रखडणे अशा बाबी साथरोगाच्या काळात योग्य नसल्याचेही डॉ. भोंडवे सांगतात.

राज्याचे करोनाविषयक तांत्रिक सल्लागार आणि निवृत्त आरोग्य महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे म्हणतात, पुणे-मुंबई यांसारख्या मोठय़ा शहरांतून दुसरी लाट ओसरली असली तरी संपूर्ण राज्याबाबत तसे म्हणता येत नाही. महाराष्ट्राच्या अनेक भागांत आजही दुसरी लाट सुरू आहे. तिचा आलेख ओसरलेला नाही. त्यामुळे दुसऱ्या लाटेवर पूर्ण नियंत्रण आणण्याआधीच आपण तिसऱ्या लाटेबद्दल चर्चा करत आहोत, असे दिसते. शहरी भागात दुसरी आणि तिसरी लाट एकमेकींत मिसळण्याची शक्यता आहे, त्याच वेळी ग्रामीण भाग अद्याप दुसऱ्या लाटेतून सावरण्याचेच चिन्ह नाही, याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. डेल्टा प्लस या नव्या उत्परिवर्तनाचा धोकाही मोठा असल्यामुळे कोणताही बेजबाबदारपणा आपल्याला परवडणारा नाही असे चित्र आहे. साथीचे चित्र आटोक्यात आणायचे तर वेगवान लसीकरणाला पर्याय नाही. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला लसपुरवठा करण्यात दुजाभाव झाला नसता तर आताच्या तुलनेत अधिक लसीकरण शक्य होते. मध्य प्रदेशसारखे राज्य वेगवान लसीकरण करू शकते तर पायाभूत सुविधांच्या दृष्टीने महाराष्ट्राला ते अवघड नाही.

करोना विषाणू संसर्ग पसरण्यास सुरुवात चीनपासून झाली. आज जगातल्या सर्वाधिक बाधित देशांमध्ये भारताचा प्रामुख्याने समावेश आहे. जगातील इतर देशांप्रमाणे लसीकरणाचा वेग राखणेही भारतात फारसे साध्य होताना दिसत नाही. त्या पार्श्वभूमीवर आता डेल्टा प्लसचे संकट समोर उभे राहिले आहे. करोना संसर्गाच्या सुरुवातीला आजार नवा, त्याची लक्षणे नवी, त्यावर उपचारही नवे- त्यामुळे दिसेल त्या लक्षणावर उपचार आणि प्रयोग हा महासाथ हाताळण्याचा प्रमुख गाभा ठरला. निर्बंध उठल्यामुळे रुग्णसंख्या पुन्हा वाढण्याची शक्यता आहेच. हे रुग्ण डेल्टा प्लस उत्परिवर्तनाचे असल्यास त्याचा प्रसार रोखण्याचे शिवधनुष्यही पेलायचे आहे. प्राप्तपरिस्थितीत मुखपट्टीचा कटाक्षाने वापर करणे, हात धुणे आणि वैयक्तिक स्वच्छता, तसेच गर्दी टाळणे, शारीरिक अंतर राखणे आणि मिळेल ती लस तातडीने घेणे या सूत्रांची अंमलबजावणी तातडीने केली नाही, तर कोविडची तिसरी लाट आपल्या उंबरठय़ाच्या आत कधी येईल, ते आपल्याला कळणारही नाही.

लसीकरण प्रमाणपत्राला पारपत्राप्रमाणे महत्त्व द्यावे!

अर्थचक्र रुळावर आणण्यासाठी आपण निर्बंध शिथिल करतो, मात्र त्याचा गैरफायदाही मोठय़ा प्रमाणावर घेतला जातो. यावर उपाय म्हणून लसीकरण प्रमाणपत्राला पारपत्राप्रमाणे महत्त्व द्यावे, अशी सूचना मी करत आहे. दुकान सुरू ठेवण्यासाठी, दुकानात येऊन खरेदी करण्यासाठी, व्यवसाय करण्यासाठी, पर्यटनासाठी, रेस्टॉरंटमध्ये येण्यासाठी अशा प्रत्येक ठिकाणी प्रवेश, परवानगी देण्यासाठी लसीकरण प्रमाणपत्र तपासावे, अन्यथा टाळेबंदीचा पर्याय स्वीकारावा. काही राज्यांनी कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठीही लसीकरण प्रमाणपत्र मागितले आहे. तसे न केल्यास लसीकरणाबाबतही नागरिक पुरेसे गंभीर होणार नाहीत आणि आताच्या घडीला ते परवडणारे नाही.

– डॉ. सुभाष साळुंखे, करोनाविषयक तांत्रिक सल्लागार, महाराष्ट्र राज्य

response.lokprabha@expressindia.com