26 September 2020

News Flash

ड्रग्जचे मुंबई कनेक्शन

मुंबईतील अमली पदार्थाचा व्यापाराचा माग ब्रिटिशकाळापर्यंत जातो.

सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतल्यामुळे चर्चेत आलेला ‘उडता पंजाब’ अमली पदार्थाच्या व्यसनाधीनतेने पंजाबमधील तरुणाईला कसा विळखा घातला आहे, हे ठळकपणे मांडतो. या चित्रपटाशी संबंधित वादांच्याच दरम्यान ठाणे पोलिसांनी ‘इफेड्रिन’ या अमली पदार्थाचं एक मोठं रॅकेट उघडकीस आणलं. या रॅकेटमध्ये नव्वदीच्या दशकात लोकप्रिय ठरलेल्या ममता कुलकर्णी या अभिनेत्रीचा सहभाग असल्याचंही स्पष्ट झालं आहे.

एकीकडे अमली पदार्थाच्या भीषण वास्तवावर भाष्य करणारे सिनेमे प्रदर्शित होताहेत तर दुसरीकडे समाजातील अशा घटनांमध्ये, गुन्ह्य़ांमध्ये सिनेमा क्षेत्रातील काही व्यक्तींचा संबंध आहे असं वास्तव पुढे आलं आहे. हे सगळं आपल्यापासून लांब आहे, असं मानण्यात काही हशील नाही कारण या अमली पदार्थाच्या व्यसनांच्या ऑक्टोपसने आजच्या तरुणाईला विळखा घातलेला आहे.  या वास्तवाचा आमच्या प्रतिनिधीनी सर्व अंगांनी घेतलेला वेध- चैताली जोशी, अनुराग कांबळे, नीलेश पानमंद

मुंबईतील अमली पदार्थाचा व्यापाराचा माग ब्रिटिशकाळापर्यंत जातो. व्यापारासाठी भारतात आलेल्या ईस्ट इंडिया कंपनीची बरीच भिस्त अफूच्या व्यापारावर होती. १९व्या शतकात मुंबईस्थित अनेक पारशी, बनिया, मराठी तसेच कोकणी मुस्लीम व्यापाऱ्यांनी उत्तर भारतातून येणाऱ्या अफूची निर्यात करून पैसा कमावला. वाहतूक होत असलेल्या मार्गावरही अफूची विक्री होत असे. त्यामुळे मुंबई आणि परिसरात अफूची नशा ही त्या काळी सर्वसामान्य बाब होती. चरस, अफू, गांजा या निसर्गजन्य पदार्थापासून बनवलेल्या अमली पदार्थाचे वास्तव्य या महानगरीत अनेक दशके होते. त्यानंतर ब्राउन शुगर, मॅन्ड्रेक्स या अमली पदार्थानी नशेच्या विश्वात प्रवेश केला. हळूहळू हेरॉइन, कोकेन या सिंथेटिक अमली पदार्थाची चटक महानगरीला लागली. आफ्रिकेत तयार होऊन अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि नेपाळमार्गे देशात येणाऱ्या या अमली पदार्थानी मुंबईला आपल्या कवेत घेतले नसते तरच नवल. त्याबरोबरच एलएसडी, एक्स्टसी अशा पार्टी ड्रग्जनी तरुणाईला भुरळ घातली.

गेल्या दशकभरात मुंबई अमली पदार्थाची राजधानी झाल्याचे दिसून येत आहे. त्याला विशेष हातभार लावला आहे, अमली पदार्थाचा व्यापार करणाऱ्या नायजेरियन नागरिकांनी. गेल्या काही काळात म्यानमार, लाओस आणि थायलंड हा सुवर्ण त्रिकोण तसंच पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इराण या सुवर्ण कोर (क्रेसंट) मधील एक महत्त्वाचा बिंदू म्हणून भारत आणि खास करून मुंबई नावारूपाला आली आहे. सध्याच्या घडीला मेथा अ‍ॅम्फाटामाइन आणि मेफ्रेडोन या अमली पदार्थानी हलकल्लोळ माजवला आहे. अवघ्या १०० रुपयांपासून उपलब्ध असलेल्या या दोन्ही अमली पदार्थानी किशोरवयीन मुलांनाही आपल्या जाळ्यात ओढले आहे. २०१४ च्या आसपास मेफ्रेडोन अर्थात एमडी या अमली पदार्थाने एकाएकी डोके वर काढले. मुंबईच्या आसपासच्या परिसरात तयार होऊन विक्रीसाठी मुंबईत येणाऱ्या या अमली पदार्थाची अल्पावधीतच मुंबईतील किशोरवयीन मुलांना चटक लागली. मेफ्रेडॉन अवघ्या तीन ते चार महिन्यांत नशा करणाऱ्याचा खात्मा करत असल्याने त्याच्या खरेदी-विक्रीवर बंदी येण्यासाठी त्याचा समावेश ‘शेडय़ूल ड्रग’च्या यादीत करावा, अशी मागणी महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे केली. २०१५ मध्ये त्याला मान्यता मिळाली. बंदी घालण्यात आल्याने साहजिकच एमडीची किंमत वाढली आणि सध्या हे एमडी सहजपणे उपलब्ध होणे तरी बंद झाले आहे.

मॅन्ड्रेक्स आणि चाळके प्रकरण

९० च्या दशकात मुंबईत थैमान घातले होते ते मॅन्ड्रेक्सच्या गोळ्यांनी. थेट आफ्रिकेतून होणाऱ्या या गोळ्यांच्या व्यापाराला मुंबई पोलीस, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो यांनी आळा घालण्याचा प्रयत्न केला होता. १९ ऑगस्ट १९९३ साली पोलिसांनी वरळी, मुंबईतील एका रेस्टॉरन्टबाहेर जीप अडवली. जीपमधून १५० किलो मॅन्ड्रेक्स जप्त करण्यात आले. ही जीप अंधेरीचा रहिवासी मिलिंद चाळके याने भाडय़ाने घेतली होती. पुण्यापासून साधारण ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या पौड गावात चाळकेच्या नावावर गोळ्या तयार करण्याचा कारखाना होता. या कारखान्याच्या तपासणीत १६०० किलो मेथाक्वालोन पावडर आणि ११० किलो मॅन्ड्रेक्सच्या गोळ्या हस्तगत करण्यात आल्या. चाळकेच्या चौकशीत या अमली पदार्थाचे धागेदोरे झाम्बियापर्यंत असल्याचे लक्षात आले. ११ जानेवारी १९९४ साली मुंबई पोलिसांनी ३३ वर्षीय डॉक्टर इम्तियाझ अहमद इलियास याला अटक केली. डॉ. इलियास याच्यासोबत असलेल्या चार जणांकडे ६०० ग्रॅम हेरॉइन सापडले. पण त्यांच्या चौकशीत पोलिसांनी तब्बल ४८०० किलो मॅन्ड्रेक्सच्या गोळ्यांचा साठा पकडला. हा साठा मोझाम्बिकला पाठविण्यात येणार होता. व्हिक्टोरिया डॉक्समध्ये तब्बल २० कंटेनरमध्ये २०६ ड्रममध्ये हा साठा ठेवण्यात आला होता.

बॉलीवूडसुद्धा..

अमली पदार्थ आणि बॉलीवूड कलाकार यांचे नाते पाहायचे झाल्यास पहिले नाव अर्थातच संजय दत्त याचे घ्यावे लागेल. ‘खलनायक’ या चित्रपटांतून गाजलेला संजय दत्त दुसरीकडे अमली पदार्थाच्या विळख्यात कमालीचा अडकला होता.

  • १९८२ साली संजय दत्तला अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी पाच महिन्यांची कैद सुनावण्यात आली. कोकेन ते हेरॉइन अशा सर्व प्रकारच्या अमली पदार्थाची सवय लागलेल्या संजय दत्तला अखेर अमेरिकेतील पुनर्वसन केंद्रात पाठविण्यात आले. जुन्या जमान्यातली अभिनेत्री परवीन बाबी हिच्या एलएसडी या अमली पदार्थाच्या व्यसनाचीही कमालीची चर्चा त्या काळी झाली होती.
  • मे २००१ – अभिनेता फरदीन खान याला नऊ ग्रॅम कोकेन बाळगल्याप्रकरणी पकडण्यात आले.
  • २००६ साली भाजप नेते प्रमोद महाजन यांचा मुलगा राहुल महाजन अमली पदार्थाच्या अमलाखाली नवी दिल्लीतील सफदरगंज येथील बंगल्यात सापडला. त्याच्यासह असलेले प्रमोद महाजन यांचे स्वीय सचिव विवेक मोईत्रा यांचा अमली पदार्थाच्या अतिरिक्त सेवनाने मृत्यू झाला तर राहुलला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करावे लागले.
  • मार्च – २०१३ मालिका कलाकार आणि दाम्पत्य असलेले शिल्पा आणि अपूर्वा अग्निहोत्री यांना मुंबईच्या उपनगरातील एका हॉटेलात सुरू असलेल्या रेव्ह पार्टीमध्ये पकडण्यात आले.

पोलीस दलाला तडाखा

९ मार्च २०१५ मध्ये मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला मिल स्पेशल हवालदार धर्मराज काळोखे याच्या सातारा येथील घरात ११० किलो मेफ्रेडोन म्हणजेच एमडी पावडर सापडल्याने एकच खळबळ उडाली, काळोखे याला त्याच दिवशी अटक करण्यात आली. दुसऱ्याच दिवशी काळोखेच्या मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यातील कपाटाची झडती घेण्यात आली. त्यातून आणखी १२ किलो एमडी सापडल्यानंतर एकच खळबळ माजली. पोलिसांच्या चौकशीत हे अमली पदार्थ बेबी पाटणकर या अमली पदार्थाच्या तस्कर महिलेने पुरविल्याचे स्पष्ट झाले. वरळीत राहणाऱ्या बेबीच्या शोधासाठी मुंबई पोलिसांनी अनेक पथकं कामाला लावली. तब्बल ४० दिवस पोलिसांना गुंगारा देणाऱ्या बेबी पाटणकरला पनवेलजवळ २२ एप्रिल रोजी अटक करण्यात आली. बेबीच्या चौकशीदरम्यान, ती या ४० दिवसांत मुंबईत येऊन गेल्याचे पोलिसांना कळले आणि तपासयंत्रणा चक्रावली. अवघे मुंबई पोलीस ज्या गुन्हेगाराला शोधत होती, ती बिनदिक्कतपणे मुंबईत येऊन जाणे कसे शक्य आहे, याचा तपास सुरू झाला. तेव्हा फरार बेबीच्या संपर्कात काही पोलीस अधिकारीही असल्याचे पोलीस यंत्रणांच्या लक्षात आले. त्यांच्याकडून बेबीला तपासपथकांचे काम, त्यांचा रोख याविषयी खडान्खडा माहिती पुरविली जात होती. तपासाअंती अमली पदार्थविरोधी कक्षाच्या आझाद मैदान कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास गोखले यांच्या बरोबरीने निरीक्षक गौतम गायकवाड, साहायक पोलीस निरीक्षक ज्योतीराम माने, उपनिरीक्षक सुधाकर सारंग आणि हवालदार यशवंत पार्टे अशा पाच पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना ३० मे रोजी अटक करण्यात आली आणि पोलीस दलात एकच भूकंप झाला. बेबीशी जवळपास १५ पोलीस अधिकाऱ्यांचा संपर्क असल्याचा संशय तपासयंत्रणांना होता, मात्र केवळ त्यातील पाच जणांविरोधातच पुरावे मिळाले. वरळीत एकेकाळी दुधाचा व्यवसाय करणारी बेबी अमली पदार्थात असलेल्या अमाप नफ्याकडे पाहून ब्राउन शुगरच्या व्यवसायात उतरली. एका बाजूला अमली पदार्थाची तस्करी करत असताना दुसरीकडे तिच्या व्यवसायात प्रतिस्पर्धी असलेल्या तस्करांची ‘खबर’ ती पोलिसांना देऊ लागली. त्यामुळे पोलिसांच्या गोटातही बेबीला मान मिळू लागला. पोलिसांची आपल्यावर मेहेरनजर असल्याचे पाहून बेबीने आपला व्यापार विस्तारत नेला. त्याचदरम्यान, वरळी पोलीस ठाण्यात नियुक्त असलेल्या धर्मराज काळोखे या हवालदाराशी तिची ओळख झाली. काळोखेही मग या व्यवसायात उतरला. अनेक वर्षांपासून बेबी पाटणकरच्या साथीने काळोखे हा अमली पदार्थाचा व्यापार करत असल्याचे चौकशीत पुढे आले. त्यासाठी काळोखे याने पोलीस दलातील आपल्या सहकाऱ्यांचीही मदत घेतल्याचा आरोप झाला. पण, हैद्राबादच्या फोरेन्सिक लॅबने काळोखेच्या घरात सापडलेली पावडर एमडी नसल्याचा अहवाल दिला आणि एकच खळबळ माजली. पोलिसांना या संपूर्ण प्रकरणात जाणीवपूर्वक गोवले नाही ना, अशीही चर्चा सुरू झाली. त्यानंतर काळोखे याला गुन्ह्य़ातून मुक्त करण्यासाठी ४० लाख रुपये स्वीकारताना एका व्यक्तीला मे २०१६ मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. तो सातारा पोलीस उपअधीक्षक दीपक हुम्बरे यांच्या वतीने ते पैसे स्वीकारत असल्याचे स्पष्ट झाले.  त्यामुळे हुम्बरे यांच्यावरही गुन्हा दाखल झाला. गुन्ह्य़ाच्या सुरुवातीपासूनच काळोखे याच्या घरात सापडलेला पदार्थ एमडी आहे की आणखी काही याच्याविषयी अजूनही संभ्रम असून न्यायालयात हा खटला सुरू आहे.
अनुराग कांबळे – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2016 1:27 am

Web Title: drugs mumbai connection
Next Stories
1 रॅकेट इफेड्रिन तस्करीचे…
2 डाळींच्या बाजारपेठेत ८ हजार कोटींच्या नफेखोरीसाठी ‘सरकारी कट’!
3 तरुणांचे आर्थिक नियोजन
Just Now!
X