करोना व्हायरसचं लागण होण्याचं प्रमाण वाढतंय, करोनामुळे इतक्या लोकांचा गेला जीव, अशा नकारात्मक बातम्यांना कंटाळला असाल तर हे तुम्ही वाचायलाच हवे. दिल्लीत चक्क १०६ वर्षांच्या आजोबांनी करोनाला यशस्वी लढा दिला आहे. एवढंच नाही तर ते ठणठणीत होऊन घरीही परतले आहेत. विशेष म्हणजे स्पॅनिश फ्लूच्या महासाथीच्या वेळी ते केवळ ४ वर्षांचे होते.

डॉक्टरांनी सांगितलं की, करोनातून ठणठणीत बरे झालेल्या १०६ रुग्णाला राजीव गांधी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. करोना व्हायरसच्या संसर्गातून बरे झाल्यानंतर या आजोबांच्या पत्नी, मुलगा आणि कुटुंबातील इतरांनाही डिस्चार्ज देण्यात आला आहे.

एका वरिष्ठ डॉक्टरने सांगितले की, या १०६ वर्षीय रुग्णाने या अगोदर १९१८ साली स्पॅनिश फ्लू पाहिला होता. त्यावेळी स्पॅनिश फ्लूने जगभरात हाहाकार माजवला होता. एका अंदाजानुसार ‘स्पॅनिश फ्लू’मुळे चार ते पाच कोटी लोकांचा मृत्यू झाला होता. म्हणजेच त्यावेळी असणाऱ्या जागतिक लोकसंख्येच्या १.७ टक्के लोकांचा या आजारामुळे मृत्यू झाला होता.