तेलंगणा विधानसभा निवडणुकीत डिसेंबरमध्ये झालेल्या पराभवानंतर, येथील काँग्रेसला आता अपमानजनक परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. काँग्रेसच्या १८ पैकी तब्बल १२ आमदरांनी तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) मध्ये त्यांच्या पक्षाच्या विलीनीकरणासाठी विधनासभा सभापतींची गुरूवीरी भेट घेऊन मागणी केली आहे.

काँग्रेसच्या या १२ आमदारांनी तेलंगणा विधानसभा सभापती पोचाराम श्रीनिवास यांची भेट घेऊन टीआरएसमध्ये विलीनीकरणाची मागणी केली. नियमानुसार, कोणत्याही राजकीय पक्षाच्या विलीनीकरणासाठी त्या पक्षाच्या निवडून आलेल्या सदस्यांपैकी दोन तृतीयांश सदस्यांची आवश्यकता असते. तेलंगणा विधानसभेतील कॉंग्रेसच्या एकुण १९ आमदारांपैकी १२ आमदारांनी सत्तारूढ टीआरएसवर निष्ठा दाखविली आहे. तर या अगोदरच काँग्रेसच्या विधान परिषदेच्या चार पैकी तीन सदस्यांनी टीआरएस मध्ये या प्रवेश केलेला आहे.

तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष एन उत्तम कुमार रेड्डी यांनी नालगोंडा लोकसभा मतदार संघातुन विजय मिळवल्याने, त्यांनी बुधवारी हुजुरनगर विधानसभा मतदार संघाच्या आमदारकीचा राजीनामा दिला . रेड्डी यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस आमदारांची संख्या १८ झाली आहे. त्यामुळे आता नियमानुसार पक्ष बदलासाठी आवश्यक असलेला दोन तृतीयांश आकडा पुर्ण होत आहे.

एकीकडे काँग्रेस आमदार टीआरएस मध्ये जात असताना दुसरीकडे खासदार उत्तम कुमार रेड्डी यांनी काँग्रेस आमदारांच्या सोबत विधानभवनाच्या आवारातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर बसुन या विलीनीकरणाचा विरोध केला. तसेच, काँग्रेस याविरोधात लोकशाही मार्गाने लढा देईल असे सांगितले. शिवाय आम्ही सकाळपासून सभापतींचा शोध घेत आहोत परंतु ते सापडलेले नाही. आता तुम्हीच त्यांना शोधण्यासाठी मदत करा असेही ते म्हणाले.  सत्तारूढ टीआरएस पक्षामध्ये काँग्रेस आमदार सहभागी होण्यामागे आर्थिक लाभाचे कारण आहे. अशाप्रकारे विधानसभेत विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे काँग्रेस नेत्याने म्हटले आहे.