आई बाबा त्यांच्या मुलाला रागावले तर मूल काय करेल? थोडावेळ रुसून बसेल, रडेल, त्रास देईल. मात्र एका १२ वर्षाच्या मुलाने जरा अचाटच धाडस केले. आई-बाबा रागावले म्हणून सिडनी येथील एका मुलाने आईचे क्रेडिट कार्ड चोरले आणि विमानाने प्रवास करत तो बाली या ठिकाणी पोहचला. तिथे त्याने एका आलिशान हॉटेलमध्ये त्याने चार दिवस ऐषोआरामात घालवले. त्यानंतर त्याचा शोध लागला.

या मुलाचे नाव समजू शकलेले नाही. मात्र या घटनेने आपण अत्यंत अस्वस्थ झालो आहोत अशी प्रतिक्रिया या मुलाच्या आईने दिली आहे. दरम्यान मला या ट्रीपची मजा आली, मला काहीतरी साहसी करायचे होते जे मी करून दाखवले असे या मुलाने स्थानिक प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.

ऑस्ट्रेलियातील सिडनी या ठिकाणी राहणाऱ्या या १२ वर्षांच्या मुलाचे आपल्या आई आणि वडिलांसोबत भांडण झाले. त्यानंतर हा मुलगा शांत झाला. त्याने दुसऱ्या दिवशी आपल्या आजीकडून गोड बोलून आपला पासपोर्ट मिळवला. मग मी शाळेत जातो आहे असे सांगितले. कोणत्या एअरलाइन्सने आपल्याला आई वडिलांची सही असलेले पत्र लागणार नाही याचाही इंटरनेटवर शोध घेतला होता, अशीही माहिती समोर आली आहे. सिडनी एअरपोर्टला त्याला त्याचे ओळखपत्र विचारण्यात आले ते त्याने दाखवले आणि मी माध्यमिक शाळेत शिकतो असे त्याने सांगितले. ‘द गार्डिअन’ने या संदर्भाले वृत्त दिले आहे.

त्यानंतर तो बाली या ठिकाणी गेला. तिथे उंची हॉटेलमध्ये तो राहिला. तसेच सगळ्या खर्चासाठी त्याने आईचे क्रेडिट कार्ड वापरले. या खर्चाच्या तपशीलांवरून या मुलाचा शोध लागला. दरम्यानच्या काळात मुलगा हरवल्याची तक्रार त्याच्या आई वडिलांनी सिडनी पोलिसांनी केली. त्यानंतर पोलीस या मुलाचा शोध घेत होते. अखेर तो बाली या ठिकाणी पळून गेला असल्याचे समजले. त्याला घरी आणण्यात आले आहे. मुलाच्या या कृतीने आई वडिलांना धक्का बसला आहे. मुलाच्या अशा पळून जाण्यावर काय बोलावे ते सुचत नसल्याचे या मुलाच्या आईने म्हटले आहे.