आसाममध्ये नदीतील बेट असलेल्या माजुली जिल्ह्य़ात गुरुवारी विमान कोसळून झालेल्या अपघातात भारतीय वायुदलाचे दोन वैमानिक ठार झाले.

जोरहाट हवाई तळावरून नेहमीप्रमाणे उड्डाण केल्यानंतर थोडय़ाच वेळात हे मायक्रोलाइट विमान कोसळल्याचे संरक्षण खात्याच्या प्रवक्त्याने सांगितले. या दोन आसनी विमानाचा सांगाडा सापडला असून, याप्रकरणी चौकशीचा आदेश देण्यात आला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी नवी दिल्लीत दिली. या अपघातात मरण पावलेल्या दोन वैमानिकांची ओळख पटली असून, त्यांची नावे विंग कमांडर जाय पॉल जेम्स आणि विंग कमांडर डी. वत्स अशी असल्याचे तेजपूर येथील संरक्षण खात्याचे प्रवक्ते ले.क. हर्षवर्धन पांडे यांनी पीटीआयला सांगितले. या वैमानिकांनी विमान आपत्कालीन परिस्थितीत उतरवण्याचा प्रयत्न केला, मात्र विमान जिल्ह्य़ाच्या उत्तरेकडील एका वाळू दांडय़ात कोसळले व त्याला आग लागली.  ब्रह्मपुत्रेतील ज्या वाळू दांडय़ात विमान कोसळले, त्या दरबार चपोरी येथे मानवी वस्ती नाही. जिल्ह्य़ातील इतर खेडय़ांतील लोकांनी ज्वाळांनी वेढलेले हे विमान पाहिल्यानंतर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना त्याबाबत माहिती दिली.