ऑक्सिजन सिलेंडर्सचा काळाबाजार केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज पंजाब बाग परिसरातून दोघांना अटक केली आहे. आरोपींची नावं श्रेय ओबेरॉय (३०), विकासपुरी आणि अभिषेक नंदा(३२), शालिमार बाग अशी या दोघांची नावं असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

पोलिसांनी सांगितलं की ओबेरॉय हा ऑक्सिजन सिलेंडरचा काळाबाजार करत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांना पकडण्याचे प्रयत्न सुरु केले. पोलिसांनी छापा टाकून त्याला अ़टक केली आणि त्याच्याकडून २ ऑक्सिजन सिलेंडर्सही ताब्यात घेतले. ओबेरॉयने पोलिसांना सांगितलं की हे दोन्ही सिलेंडर त्याने प्रत्येकी ३७ हजार रुपयांना विकत घेतले असून तो हे सिलेंडर्स सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येकी ५० हजाराला विकणार होता.

चौकशीदरम्यान अशी माहिती मिळाली की तो खेळणी ऑनलाईन विकतो. त्याचा सहकारी अभिषेक नंदाकडून त्याने सिलेंडर्स घेतले होते. यानंतर अभिषेकलाही अटक करण्यात आली.या दोघांकडून एकूण ५ सिलेंडर आणि एक गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली असून अधिक चौकशी सुरु आहे.

देशात सध्या करोना संसर्गाचा विस्फोट झाल्याचे चित्र आहे. दररोज लाखांच्या संख्येत नवीन करोनाबाधित वाढत आहेत. रूग्णांचा मृत्यू संख्येही मोठी भर पडत आहे. परिणामी आरोग्यंत्रणा कोलमडत आहेत. रूग्णालयांमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, बेड, रेमडेसिविर व लसींचा तुटवडा निर्माण होत आहे. यामुळे रूग्णांचे हाल होत असून, रूग्णांच्या नातेवाईकांना देखील विविध अडचणींना समोरं जावं लागत आहे.