गुप्तचर यंत्रणांकडून अयोध्येमध्ये दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याचा अलर्ट मिळाल्यानंतर संपूर्ण शहरात ३० बॉम्ब निकामी करणारी पथके तैनात करण्यात आली आहेत. राम जन्मभूमी-बाबरी मशिद खटल्याचा निकाल लवकरच येईल. त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण अयोध्येत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई १७ नोव्हेंबरला निवृत्त होणार आहेत. त्याआधी हा निकाल येण्याची शक्यता आहे.

अयोध्येतील सर्व धर्मशाळा रिकामी करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. मंगळवार रात्रीपासून सर्व धर्मशाळा रिकाम्या असतील. स्थानिक रहिवाशांव्यतिरिक्त कोणालाही अयोध्येमध्ये थांबता येणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली. १० नोव्हेंबरपासून अयोध्येमध्ये सुरक्षा दलांच्या ३०० तुकडया तैनात होणार आहेत. यात केंद्र आणि राज्य सरकारची सुरक्षा पथके असतील.

वादग्रस्त जागेजवळील राम कोट भागातील रस्ते सुद्धा पोलिसांनी बंद केले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांना सर्तक राहण्याच्या आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याची अॅडव्हायजरी जारी केली आहे. सलग ४० दिवसांच्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या वादग्रस्त जमीन खटल्यासंबंधीचा निकाल राखून ठेवला आहे.