– समीर जावळे

सफदर हाश्मी हे नाव काहीसं विस्मरणात गेलं आहे. त्यांची आठवण आज येण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आजच्या दिवशी त्यांची हत्या करण्यात आली होती. सफदर हाश्मी हे एक नाटककार होते. ते कम्युनिस्ट विचारांचे होते. गीतकार, नाटककार सफदर हाश्मी यांना आजच्या दिवशी ठार करण्यात आलं. त्यावेळी त्यांचं वय होतं अवघं ३५. कम्युनिस्ट विचारांचे सफदर हाश्मी यांचं नाव भारतीय नाट्यसृष्टीत आजही आदराने घेतलं जातं. नेमकं काय घडलं होतं की त्यांची हत्या करण्यात आली? याचा आढावा आपण या बातमीत घेणार आहोत.

सफदर हाश्मी यांनी नुक्कड नाटक ही संकल्पना अस्तित्त्वात आणली. सफदर जननाट्य मंच आणि दिल्ली स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे ते सदस्य होते. गांव से शहर तक, मशीन, औरत और महंगाई ही त्यांची नुक्कड नाटकं गाजली. नुक्कड अर्थात एखाद्या नाक्यावरही तुम्ही तुमची कला सादर करु शकता हा नुक्कड नाटक सुरु करण्यामागचा त्यांचा विचार होता. त्यांनी विविध सामाजिक विषयांवर २४ नाटकं लिहिली होती. त्यांच्या मृत्यूपर्यंत या नाटकांचे एकूण ४ हजार प्रयोग झाले होते. मजूर, तळागाळातील उपेक्षित वर्ग, महिला, विद्यार्थी यांचे प्रश्न त्यांच्या नाटकांमधून मांडले जातात. सफदर हे डाव्या विचारांचे होते. १९८९ मध्ये त्यांनी त्यांच्यासोबत नाटकात काम करणाऱ्या सहकलाकार मल्यश्रीसोबत विवाह केला. ते पीटीआय, इकॉनॉमिक टाइम्स या ठिकाणीही कार्यरत होते. दिल्लीत त्यांनी पश्चिम बंगाल सरकारचे प्रेस इनफॉर्मेशन ऑफिसर म्हणूनही काम केलं. १९८४ मध्ये त्यांनी नोकरी सोडली आणि आपला सगळा वेळ नाटक आणि समाजकार्याासाठी देण्याचा निर्णय घेतला. सफदर हे त्यांच्या नाटकांमधून सामाजिक विषयांवर ज्वलंत भाष्य करत. त्यामुळे त्यांचे विरोधक वाढत होतेच. त्याचाच परिणाम हा झाला की त्यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली.

एक कम्युनिस्ट म्हणून सफदर यांची ओळख असली तरीही ते प्रसिद्ध होते नाटककार आणि कलाकार म्हणूनच. मशीन या त्यांच्या नाटकातून त्यांनी कामगार वर्गाला झेलाव्या लागणाऱ्या समस्या, चंगळवाद या विषयांवर भाष्य केलं. समाजातील शोषित, वंचितांचे प्रश्न त्यांनी नाटकांमधून समोर आणले. नुक्कड नाटक सादर करण्यासाठी मंच असावाच अशी त्यांची अट नव्हती. त्यामुळे ते अगदी रस्त्यावरही प्रयोग सादर करत. लोकांशी नाटकांमधून संवाद साधत. त्यामुळे लाखो लोक त्यांच्याशी जोडले गेले होते.

काय घडलं २ जानेवारी १९८९ ला?

गाझियाबाद या ठिकाणी रस्त्यावर सफदर हाश्मी हल्ला बोल हे नाटक सादर करत होते. नगरपालिकेची निवडणूक तोंडावर आली होती. त्यावेळी नाटक रस्त्यावर सुरु होते. नाटक सुरु असतानाच तिथे त्यावेळचे काँग्रेसचे उमेदवार मुकेश शर्मा आले. त्यांनी सफदर यांचे नाटक थांबवले आणि रस्ता मोकळा करण्यास सांगितले. ज्यानंतर सफदर यांनी त्यांना विनंती केली की काही वेळ थांबा किंवा दुसऱ्या रस्त्याने निघून जा. मात्र अचानक काय घडले ठाऊक नाही काही गुंडांनी नाटकाच्या कलाकारांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात सफदर गंभीर जखमी झाले. त्यांना सीटू रुग्णालयातही दाखल करण्यात आलं. मात्र सफदर एवढे गंभीर जखमी झाले होते की त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सफदर यांच्या मृत्यूनंतर कामगार, वंचित, शोषितांसाठी लढणारा एक आवाज शांत झाला. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर तिसऱ्याच दिवशी त्यांच्या पत्नी तिथे आल्या होत्या. त्यांनी सफदर यांचे अर्धवट राहिलेले नाटक पूर्ण केले.