करोनाची कुठलीही लक्षणे आढळून न आलेल्या व्यक्तींकडून चीनमध्ये ४४ टक्के नागरिकांना करोना व्हायरसची लागण झाली. चीनमध्ये एका अभ्यासातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. करोनाची लागण झाल्यानंतर ती लक्षणे दिसून येण्याच्या दोन ते तीन दिवस आधी एका व्यक्तीमधून दुसऱ्या व्यक्तीमध्ये करोना व्हायरसचे संक्रमण होते असा चिनी अभ्यासकांचा अंदाज आहे. १५ एप्रिलला नेचर मेडिसीनमध्ये हा स्टडी रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला आहे.

चिनी अभ्याकांचा हा निष्कर्ष निश्चित विचार करायला भाग पाडणार आहे. कारण करोना व्हायरसची लक्षणे आढळून आली तरच चाचणी करण्याची भारताची सध्याची रणनिती आहे. ज्यांनी परदेश प्रवास केला आहे तसेच करोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची करोना चाचणी केली जात आहे.

रुग्णालयातील करोनाची लक्षणे आढळलेले आरोग्य कर्मचारी, हॉटस्पॉट असलेल्या भागांमधील नागरिक तसेच श्वसोश्वास करताना ज्यांना त्रास होतोय अशी रुग्णांची करोना चाचणी केली जात आहे. करोनाची कुठलीही लक्षणे न दिसणाऱ्या फक्त त्या लोकांची चाचणी करण्यात आली आहे, जे करोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आले होते. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने १५ फेब्रुवारी ते दोन एप्रिल दरम्यान ५,९११ सारी रुग्णांच्या COVID-19 च्या चाचण्या केल्या. त्यात १०४ रुग्णांचे करोना चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले.