देशात करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं चित्र असलं तरी करोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे धास्ती वाढली आहे. मागच्या काही दिवसात देशात करोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंट रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. देशातील १८ जिल्ह्यांमध्ये करोना डेल्टा प्लस व्हेरिएंटचे ५० रुग्ण समोर आले आहेत. करोना डेल्टा प्लस व्हेरिएंटची सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून आल्याने चिंतेत भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राचे संचालक डॉ सुजीत सिंह यांनी खबरदारीचा इशारा दिला आहे. त्यांनी देशातील ८ राज्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये आंध्र प्रदेश, दिल्ली, हरियाणा, केरळ, महाराष्ट्र, पंजाब, तेलंगणा आणि पश्चिम बंगाल ही राज्ये आहेत. या ठीकाणी ५० टक्क्यापेक्षा अधिक रुग्ण आढळल्याचे त्यांनी सांगितले.

“डेल्टा व्हेरिएंट हा अल्फा व्हेरिएंटपेक्षा खूपच घातक आहे. या व्हेरिएंटला वैज्ञानिक भाषेत B.1.1.7 असं नाव देण्यात आलं असून सर्वात प्रथम इंग्लंडमध्ये आढळून आलं होता” असं एनसीडीसीचे डायरेक्टर डॉ सुजीत सिंह यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत २० जणांना डेल्टा प्लस व्हेरिएंटची लागण झाली आहे. मध्य प्रदेशात ७, पंजाब-गुजरातमध्ये २-२, केरळमध्ये ३, आंध्र प्रदेशमध्ये १, तामिळनाडुत ९, ओडिशात १, राजस्थानमध्ये १, जम्मू आणि कर्नाटकमध्ये १-१ रुग्ण आढळला आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंट रुग्णांची वाढती संख्या पाहता प्रशासन सतर्क झालं आहे. त्यामुळे लवकर करोना व्हायरसची तिसरी लाट येईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

देशात आतापर्यंत डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हेरिएंटने पीडित ८० वर्षीय वृद्ध व्यक्तीचं निधन झालं आहे. मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे एका महिलेचा मृत्यू झाला होता. ती आणि तिचा पती दोघेही करोना पॉझिटिव्ह होते. पतीने करोनावर मात केली. मात्र पत्नीचा करोनामुळे मृत्यू झाला. पतीने करोनाची लस घेतली होती. तर पत्नी लस घेतली नव्हती.

देशात सलग तिसऱ्या दिवशी आढळले ५० हजारापेक्षा अधिक रुग्ण

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४  तासांत ५१.६६७ नवीन करोनाचे रुग्ण आढळले. तसेच १,३२९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ६४,५२७ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. सध्या देशात ६,१२,८६८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

डेल्टा प्लस व्हायरसमुळे देशात करोनाची तिसरी लाट येणार?

देशात करोनाची तिसरी लाट येणार असल्याने चिंता व्यक्त होत असताना डेल्टा प्लसच्या विषाणूंनी यामध्ये भर टाकली आहे. दरम्यान देशातील काही तज्ज्ञ डॉक्टर तसंच जनुकीय क्रमनिर्धारकांनी (जिनोम सीक्वेन्सर) हे नवे विषाणू या संक्रमण वाढीस कारणीभूत ठरत नसल्याचं म्हटलं आहे. इन्सिट्यूट ऑफ जिनोमिक्स अॅण्ड इंटरग्रेटिव्ह बायालॉजीचे संचालक डॉक्टर अनुराग अग्रवाल यांनी करोनाच्या दुसऱ्या लाटेत सुरक्षेचे नियम कमी केले जाऊ नयेत अशी सूचना यावेळी केली आहे.