लडाखच्या गलवान खोऱ्यात झालेल्या भारतीय आणि चिनी सैनिकांच्या संर्षामध्ये ४०-४५ नव्हे तर ६० चिनी सैनिक ठार झाले होते, असा खुलासा अमेरिकेच्या ‘न्यूजवीक’ या वृत्तपत्राने केला आहे. त्याचबरोबर गलवान खोऱ्यातील हा हिंसाचार चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या आदेशानंच झाला असल्याचंही यात म्हटलं आहे.

‘न्यूजवीक’च्या वृत्तात इशारा देताना म्हटलंय की, “चीन आपल्या अपयशामुळं अधिक अस्वस्थ झाला आहे, यामुळे याचे विपरित परिणाम होऊ शकतात. या पराजयामुळं अस्वस्थ झालेले चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग भारताविरोधात मोठे पाऊल उचलण्यास तयार आहेत. त्यामुळे येत्या काळात सीमेवर तणावाची परिस्थिती अधिक वाढू शकते.”

जिनपिंग राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर सीमावाद वाढला

या वृत्तात असंही म्हटलं आहे की, नोव्हेंबर २०१२ मध्ये शी जिनपिंग हे चिनी कम्युनिस्ट पार्टीचे सरचिटणीस बनल्यापासून भारताशी जोडलेल्या सीमेवर चिनी सैनिकांची आक्रमकता वाढली आहे. जिनपिंग हे चिनी कम्युनिस्ट पार्टीचे सेंट्रल मिलिट्री कमिशनचे अध्यक्ष आणि पक्षाचे सरचिटणीस देखील आहेत. भारत आणि चीन दरम्यान सीमानिश्चित झालेली नाही, त्यामुळे याचाच फायदा चिनी सैनिक घुसखोरीसाठी घेतात.

रशियानं भारताला सांगितला होता चिनी अजेंडा

फाउंडेशन फॉर डिफेन्स ऑफ डेमोक्रसीजचे क्लिओ पास्कलच्या हवाल्याने न्यूजवीकने म्हटलंय की, रशियानं मे महिन्यांतच चीनच्या हरकतींबाबत भारताला इशारा दिला होता. रशियाच्या माहितीनुसार, चीन तिबेटच्या भागात पहिल्यापासूनच युद्ध सराव करीत होता. त्यामुळेच जेंव्हा गलवान खोऱ्यात १५ जून रोजी संघर्ष निर्माण झाला तेव्हा भारताला आश्चर्याचा धक्का बसला. हा संघर्ष जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या दोन देशांमध्ये झालेला ४५ वर्षातील पहिला संघर्ष होता.