मध्य प्रदेशात कमलनाथ यांच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेस सरकार पुन्हा शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्त्वाखालील भाजपाचं सरकार सत्तेत आलं आहे. काही दिवसांपूर्वीचं मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्यामुळे आता भाजपानं २४ जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. सप्टेंबरमध्ये ही पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे.

मध्य प्रदेशात २४ जागांसाठीच्या विधानसभा पोटनिवडणुकीची अद्याप घोषणा झाली नसली, तरी भाजपानं मंत्रिमंडळ विस्तारानंतर त्यावर लक्ष्य केंद्रीत केलं आहे. द प्रिंटनं भाजपातील सूत्रांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे. विधानसभा पोटनिवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात भाजपा ६० व्हर्च्युअल रॅली घेणार आहे. त्याचबरोबर दुसऱ्या २४ साधारण प्रचार सभा घेण्याचं भाजपाचं नियोजन आहे. पोटनिवडणुकीसाठी प्रचाराचा दुसरा टप्पा ऑगस्टमध्ये सुरू होण्याची शक्यता असुन, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा प्रचार अभियानात सहभागी होण्यात आधीच सर्व तयारी करण्याचा विचार भाजपाकडून सुरू आहे.

पहिल्या टप्प्यात २४ जागांसाठी ६० व्हर्च्युअल रॅली आयोजित केल्या जातील. त्यानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान व ज्योतिरादित्य शिंदे हे दोघे एकत्र येऊन प्रचार सभा घेणार आहेत. या पोटनिवडणुकीत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपा तब्बल ६५ हजार व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपची मदत घेणार आहे. भाजपाकडून या निवडणुकीत राज्याचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या सरकारवर भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून प्रचार केला जाणार आहे.

पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मागील महिन्यातच व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून उत्तर प्रदेशातील जनतेशी संवाद साधला होता. काँग्रेस महत्त्वाचे व मोठे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे सध्या भाजपाची राज्यातील स्थिती आणखी मजबूत झाल्याचं दिसून येतं आहे.