सुब्रमण्यम स्वामी यांच्यासारख्या नेत्याकडून सातत्याने होत असलेली टीका, केंद्र सरकारची त्यास असलेली मूक संमती आणि एकुणातच सरकारदरबारी असलेली नकारात्मक मानसिकता या सर्व पाश्र्वभूमीवर भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी या पदासाठी मुदतवाढ स्वीकारण्यास नकार दर्शवला आहे. शनिवारी राजन यांनी त्यांचा हा निर्णय रिझव्‍‌र्ह बँकेतील त्यांच्या सहकाऱ्यांना पत्राद्वारे कळवला. राजन यांच्या या निर्णयानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. उद्योगजगताने राजन यांच्या या निर्णयामुळे देशाचे नुकसान झाले असल्याची प्रतिक्रिया नोंदवली आहे.
राजन यांनी पुन्हा अध्यापन क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे. त्‍यामुळे राजन यांच्‍या नंतर या पदावर कुणाची वर्णी लागेल, याची चर्चा जोरात सुरू झाली आहे. गव्हर्नर पदासाठी सध्या प्रामुख्याने सात जण स्पर्धेत आहेत. या पदासाठी सर्वांत आघाडीवर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रमुख अरुंधती भट्टाचार्य आहेत. तसेच आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर उर्जित पटेल, विजय केळकर, राकेश मोहन, अशोक लाहिडी, सुबीर गोकर्ण आणि अशोक चावला यांची नावे चर्चेत आहेत. या सात जणांपैकी अरुंधती भट्टाचार्य, उर्जित पटेल  हे दोघे या पदासाठी प्रमुख दावेदार आहेत.
दरम्यान, पुरेसे चिंतन आणि सरकारशी विचारविनिमय केल्यावर येत्या ४ सप्टेंबरला पूर्ण होत असलेला माझा कार्यकाळ संपल्यानंतर मी पुन्हा माझ्या अध्यापन क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, असे असले तरी आवश्यकता असेल त्यावेळी देशाची सेवा करण्यास मी उपलब्ध असेल, असे रघुराम राजन यांनी म्हटले आहे.