News Flash

97 वकिलांची फौज एम.जे.अकबर यांना निर्दोष सिद्ध करण्यासाठी सज्ज

अडचणीत सापडलेल्या अकबर यांच्या बचावासाठी, त्यांना निर्दोष सिद्ध करण्यासाठी तब्बल 97 वकिलांचं पथक सज्ज

संग्रहित छायाचित्र

परराष्ट्र राज्य मंत्री एम. जे. अकबर यांनी त्यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करणाऱ्या पत्रकार प्रिया रमाणी यांच्याविरोधात पतियाळा कोर्टात मानहानीचा दावा दाखल केला आहे. अकबर यांच्याविरोधात एक, दोन नव्हे तर 10 महिलांनी आरोप केले आहेत. अकबर यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी विरोधकांकडून सुरू आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या अकबर यांच्या बचावासाठी, त्यांना निर्दोष सिद्ध करण्यासाठी तब्बल 97 वकिलांचं पथक सज्ज झालं आहे. ‘करंजवाला अँड कंपनी’ ही लॉ फर्म कोर्टात अकबर यांचा खटला लढणार आहे. या फर्ममधील 97 वकिल अकबर यांच्यावरील आरोपांचा अभ्यास करत आहेत. मात्र, 97 पैकी केवळ सहाच वकिल कोर्टात अकबर यांची बाजू मांडतील असं फर्मकडून सांगण्यात आलं आहे.

आरोप करणाऱ्या महिलांविरोधात कायदेशीर लढाई देण्याचं अकबर यांनी ठरवलंय. आपल्यावर झालेले सर्व आरोप खोटे आणि निराधार असल्याचं त्यांनी म्हटलंय. रविवारी आफ्रिकेहून परतलेल्या अकबर यांनी आपल्यावरील आरोप असंस्कृत आणि बिनबुडाचे असून लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच मी टू वादळ का सुरू झाले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. ‘माझ्यावरील लैंगिक गैरवर्तनाचे आरोप बनावट आहेत. अशा आरोपांमुळे माझ्या प्रतिष्ठेचे भरून न येणारे नुकसान झाले आहे. माझे वकील या तथ्यहीन आरोपांबाबत कायदेशीर पावले उचलतील’, असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानुसार आज त्यांच्या वकिलांनी पत्रकार प्रिया रमाणी यांच्याविरोधात पतियाळा कोर्टात मानहानीचा दावा दाखल केला. प्रिया रमाणी यांनीच अकबर यांच्यावर सर्वप्रथम लैंगिक छळाचा आरोप केला होता. एम. जे. अकबर ‘टेलिग्राफ’चे संपादक असताना नोकरी देण्यासाठी घेतलेल्या मुलाखतीवेळी अकबर यांनी कसा लैंगिक छळ केला याची माहिती सर्वप्रथम प्रिया रमाणी यांनी दिली होती. त्यानंतर एकामागोमाग एक अनेक महिलांनी अकबर यांच्यावर गंभीर आरोप केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2018 9:05 pm

Web Title: 97 lawyers roped to defend mj akbar me too
Next Stories
1 केंद्र सरकार ‘एम.फील’ आणि ‘पीएचडी’च्या नियमांमध्ये बदल करण्याच्या तयारीत?
2 मनोहर पर्रिकरांच्या प्रकृतीत सुधारणा, राजीनाम्याचं वृत्त चुकीचं : गोवा भाजपाध्यक्ष
3 राहुल गांधी, सत्तेचं दिवा स्वप्न पाहणं सोडा-अमित शाह
Just Now!
X