प्रदूषणाच्या मुद्द्यावरुन तामिळनाडूत तुतिकोरिन येथे वेदांतच्या स्टरलाइट कॉपर प्रकल्पाविरोधात आंदोलन सुरु झालं तेव्हा तेथून काही अंतरावर पोलिसांची एक गाडी उभी होती. यावेळी एक कर्मचारी गाडीच्या टपावर बंदूक घेऊन बसला होता. इतर पोलीस कर्मचारी खाली बुलेपप्रूफ जॅकेट घालून तर काहीजण खाकी वर्दीत उभे होते. काही वेळाने टपावर बसलेल्या त्या कर्मचाऱ्याने एखाद्या कमांडोप्रमाणे झोपून निशाणा साधला. याचवेळी मागून एक आवाज ऐकू येतो, ‘एक तरी ठार झाला पाहिजे’. एएनआयने हा व्हिडीओ रिलीज केला आहे. यानंतर काही वेळातच गोळी झाडली जाते. पण ही गोळी कोणाला लागली की नाही याबद्दल मात्र माहिती मिळू शकलेली नाही.

तुतिकोरिन येथे वेदांतच्या स्टरलाइट कॉपर प्रकल्पाविरोधात आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला मंगळवारी हिंसक वळण लागलं. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ११ जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी पोलिसांनी केलेल्या कारवाईसंबंधी चौकशीचा आदेश दिला आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी यांनी ही हत्या असून, राज्य पुरस्कृत दहशतवाद असल्याची टीका केली होती. संध्याकाळी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी शोक व्यक्त करत मृतांचा आकडा ११ वर गेल्याची माहिती दिली. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये १७ वर्षीय चिमुरडीचाही समावेश आहे.

दरम्यान हाणामारीत अनेक पोलिसांसह २० जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री पलानीस्वामी यांना मृतांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केलं आहे.

गेले महिनाभर या प्रकल्पाविरोधात जनआंदोलन सुरु आहे. यात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात येणार होता. पोलिसांनी त्याला परवानगी नाकारली आणि प्रतिबंधात्मक आदेश लागू केला. तरीही पाच हजार निदर्शकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेत दगडफेकीत त्या इमारतीच्या काचा फोडल्या. पोलिसांनी बळाचा वापर केल्याने चिडलेल्या आंदोलकांनी दगडफेक करत काही खासगी वाहने पेटवून दिली आणि एका पोलीस वाहनावर हल्ला चढवला.