बँक खाते सुरु करताना तसेच तत्काळ पासपोर्टसाठी आधार बंधनकारक असेल, असे स्पष्टीकरण युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (यूआयडीएआय) दिले आहे. आधार नसलेल्यांना ‘आधार’साठी केलेल्या अर्जाचा क्रमांकही देता येणार आहे.

आधार सक्तीच्या घटनात्मक वैधतेविरोधात दाखल झालेल्या विविध याचिकांचा निकाल लागेपर्यंत आधार जोडणीची सक्ती करता येणार नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने मंगळवारी दिला होता. यामुळे आधार जोडणीसाठी ३१ मार्चपर्यंत देण्यात आलेली मुदत आपोआप बारगळली आहे. बँक खाते, मोबाइल क्रमांक आदी आधारशी संलग्न करण्याची मुदतच अनिश्चित काळासाठी वाढल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (यूआयडीएआय) स्पष्टीकरण दिले आहे. नवीन बँक खाते व तत्काळ पासपोर्टसाठी आधार बंधनकारक असेल, असे यूआयडीएआयने स्पष्ट केले होते.

दरम्यान, केंद्र आणि राज्य सरकारमार्फत विविध आर्थिक लाभ तसेच पाठ्यवृत्त्या, शिष्यवृत्त्या आणि आर्थिक साह्य घेण्यासाठी आधार संलग्नता अनिवार्यच राहणार आहे. ९२ योजनांना आधार सक्ती कायम असेल, असे मंगळवारी सुप्रीम कोर्टाच्या निकालातून स्पष्ट झाले होते.