* कामकाज सुरू झाल्यानंतर जनलोकपाल विधेयक सादर करणार असल्याची घोषणा केजरीवाल यांनी केली. त्यावर नायब राज्यपालांनी दिलेल्या सल्ल्यानुसार केंद्रीय गृह मंत्रालयाच्या परवानगीविना विधेयक मांडणे घटनाबाह्य़ असल्याचे भाजप व काँग्रेसच्या नेत्यांनी केजरीवाल यांना सांगितले. त्यानंतरही विधेयक सादर करण्याचा निर्धार केजरीवाल यांनी व्यक्त केला. भाजप व काँग्रेस सदस्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या आसनासमोर येत घोषणाबाजी केली. त्यामुळे कामकाज तहकूब करण्यात आले.
* विधानसभा अध्यक्ष मनविंदर सिंह धीर यांनी जनलोकपाल विधेयक सादर करण्याची अनुमती असल्याची घोषणा केली. त्यामुळे विरोधकांच्या रागाचा भडका उडाला. त्यांनी थेट धीर यांच्याविरोधातच अविश्वास ठराव आणणार असल्याची घोषणा केली. त्यात काँग्रेसचे सदस्य आघाडीवर होते. गोंधळामुळे धीर यांनी कामकाज २० मिनिटांसाठी तहकूब केले.
* भाजप नेते डॉ. हर्षवर्धन अत्यंत आक्रमक झाले. कोणत्याही परिस्थितीत विधानसभेत घटनाबाह्य़ कामकाज होणार नाही. हे असेच चालत राहिले तर धीर यांच्याऐवजी अन्य कुणालाही विधानसभा अध्यक्ष निवडावे लागेल. काँग्रेस नेते अरविंदर सिंह लवली यांनीदेखील त्यांचीच री ओढली.
* धीर यांनी सांगितले की, जनलोकपाल वित्त विधेयक असल्याने त्यावर नायब राज्यपालांचे मत आवश्यक आहे. नायब राज्यपालांनी मात्र केंद्र सरकारच्या परवानगीविना हे विधेयक विधानसभेत सादर होऊ शकणार नाही, असे कळविले आहे.
* तरीही धीर यांनी केजरीवाल यांना विधेयक सभागृहात सादर करण्याची परवानगी दिली. त्यावर, विधेयक सादर करण्याच्या प्रस्तावावर मतदान घेण्याची मागणी विरोधकांनी केली. ४२ सदस्यांनी प्रस्तावाच्या विरोधात तर २७ जणांनी समर्थनार्थ मतदान केले.
* त्यानंतर केजरीवाल यांनी अत्यंत भावनात्मक भाषण केले. लोकशाहीच्या मंदिरात (विधानसभा, लोकसभा) माईक तोडला जातो तेव्हा मला फार वेदना होतात, असे ते म्हणाले. त्यावर, विधानसभेत घटनाबाह्य़ कामकाज होत असताना तुम्हाला वेदना होत नाही का, असा टोला हर्षवर्धन यांनी लगावला.
* अरविंदर सिंह लवली यांनी संत रविदास जयंतीच्या दिवशी सुट्टी न दिल्याबद्दल सरकारला खडसावले. जनलोकपाल विधेयकाची प्रत नियमाप्रमाणे ४८ तास (बुधवारी) आधी देणे अनिवार्य असताना गुरुवारी मध्यरात्री ही प्रत वितरित करण्यात आली, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.