दिल्लीत पुन्हा एकदा केजरीवाल सरकारच येईल असं एक्झिट पोलचे अंदाज सांगत आहेत. एबीपी सी व्होटर्सच्या एक्झिट पोलनुसार आपचीच दिल्लीत पुन्हा सत्ता येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दिल्ली विधानसभेच्या ७० जागांपैकी आम आदमी पार्टीला म्हणजेच आपला ५० ते ६३ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर भाजपाला ५ ते १९ जागा मिळतील असं हा एक्झिट पोल सांगतो आहे. गेल्यावेळी एकही जागा न मिळालेल्या काँग्रेसला ४ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दिल्ली विधानसभा निवडणूक ही भाजपा आणि आप या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती. या विधानसभेसाठी मतदानाची प्रक्रिया तर पार पडली आहे. मात्र ११ तारखेला निकाल लागणार आहेत. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एबीपी आणि सी व्होटर्सचा एक्झिट पोल समोर आला आहे. ज्यानुसार आपचीच सरशी होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भाजपाला १९ जागा मिळतील असा अंदाज आहे तर काँग्रेसला चार जागा मिळतील असा अंदाज आहे.

एवढंच नाही तर अरविंद केजरीवाल यांना शह देण्यासाठी भाजपाने उभे केलेल्या मनोज तिवारी यांच्याही जागा धोक्यात आहेत असंही एक्झिट पोल सांगतो आहे.

काय सांगतो आहे हा एक्झिट पोल?

आम आदमी पार्टी – ४९ ते ६३ जागा

भाजपा ५ ते १९ जागा

काँग्रेस ० ते ४ जागा