हैदराबादमधील बलात्कार प्रकरण

हैदराबाद येथे पशुवैद्यक महिलेवर बलात्कार करून तिला जाळणारे चार आरोपी पोलिस चकमकीत मारले गेले असतानाच आता त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांनी चकमकीवेळी पोलिसांवर हल्ले केल्याचा आरोप आहे. दरम्यान आरोपींच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कारास तेथील न्यायालयाने चार दिवस स्थगिती दिली आहे. आरोपींना न्यायबाह्य़ पद्धतीने ठार करण्यात आल्याची याचिका दाखल करण्यात आली होती त्यावर हा आदेश देण्यात आला.

भादंवि  कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न), कलम १७६( पूर्वसूचना न देणे), तसेच भारतीय शस्त्रास्त्र कायद्यातील काही कलमे यानुसार गुन्हा दाखल केला असून चकमकीवेळी उपस्थित असलेल्या दहा पोलिसांच्या चमूच्या प्रमुखांनी शुक्रवारी प्राथमिक माहिती अहवाल दाखल केला. दरम्यान, राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या पथकाने येथे आल्यानंतर चौकशी सुरू केली आहे.

दरम्यान, महबूबनगर जिल्हा सरकारी रुग्णालयात आरोपींचे शवविच्छेदन करून त्याचे चित्रीकरण करण्यात आले. शुक्रवारी पोलिस चकमकीत हे चारही आरोपी मारले गेले होते. घटनास्थळी तपासासाठी नेले असता आरोपींनी पोलिसांवर हल्ला केल्याने गोळीबार करण्यात आला. त्यात आरोपी ठार झाले.