करोनाचा फैलाव रोखण्यासाठी संचारबंदीची अंमलबजावणी करणाऱ्या पोलिसांवर हल्ला करणाऱ्या लोकांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये (एनएसए) कारवाई करण्यात येणार असल्याचे शुक्रवारी उत्तर प्रदेश सरकारने स्पष्ट केले.

संचारबंदीची अंमलबजावणी करणाऱ्या पोलिसांवर हल्ले करण्यात आले असल्याचे वृत्त कळल्यानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला. जनतेने घराबाहेर पडू नये यासाठी पोलीस आपले कर्तव्य बजावत आहेत त्या पोलिसांवरच हल्ले करण्यात आले आहेत, अशा लोकांना धडा शिकविण्यासाठी त्यांच्याविरुद्ध एनएसएअन्वये कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे गृहविभागाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. संचारबंदी झुगारून पोलिसांवर हल्ले करणाऱ्या लोकांना प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

मध्य प्रदेश : आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला

भोपाळ/इंदूर : इंदूर शहरातील तातपत्ती बाखल परिसरामध्ये आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या चार जणांवर इंदूर जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये (एनएसए) कारवाई केली आहे. आरोग्य विभागाचे पाच जणांचे पथक बुधवारी तातपत्ती बाखल परिसरामध्ये करोना रुग्णांच्या नातेवाईकांचे विलगीकरण करण्यासाठी गेले होते तेव्हा जमावाने त्या पथकावर दगडफेक केली. त्यामध्ये दोन महिला डॉक्टर जखमी झाल्या होत्या. पोलिसांनी गुरुवारी या हल्ल्याप्रकरणी सात जणांना अटक केली, त्यापैकी चार जणांवर प्रशासनाने एनएसएअन्वये कारवाई केली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. इंदूर पोलिसांनी या हल्ल्याप्रकरणी शुक्रवारी आणखी सहा जणांना ताब्यात घेतले आहे.

तबलिगी जमातच्या सदस्यांकडून रुग्णालयात परिचारिकांशी गैरवर्तन

गझियाबाद : येथील जिल्हा रुग्णालयात विलगीकरण करण्यात आलेल्या तबलिगी जमातच्या कार्यकर्त्यांनी परिचारिकांशी गैरवर्तन करून त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह शेरेबाजी केला. इतकेच नव्हे तर विवस्त्र होऊन अश्लील प्रकार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन त्यांच्याविरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये (एनएसए) कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

या धक्कादायक प्रकारानंतर तबलिगी जमातच्या या सदस्यांना एका खासगी शैक्षणिक संस्थेत तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या कक्षात हलविण्यात आले आहे. या प्रकारात सहभागी असलेले सदस्य हे मानवतेचे शत्रू असल्याची संतप्त प्रतिक्रिया उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केली आहे.

हे सदस्य कायदा मानण्यास तयार नाहीत किंवा केलेली व्यवस्थाही त्यांना मान्य नाही, आरोग्य सेविकांबरोबर जे कृत्य केले ते अत्यंत घृणास्पद आहे. त्यांच्याविरुद्ध एनएसएन्वये कारवाई केली जाईल, त्यांची गय केली जाणार नाही, असे आदित्यनाथ यांनी एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे.

रुग्णालयात महिला कर्मचाऱ्यांना उद्देशून अश्लील शेरेबाजी करणे आणि आक्षेपार्ह कृत्य केल्याप्रकरणी जमातच्या सदस्यांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. करोनाची लागण झालेला यामधील एक रुग्ण विवस्त्रावस्थेत रुग्णालयात फिरत असल्याचा आरोप एका परिचारिकेने केला आहे. काही जणांनी अश्लील गाणी म्हटल्याचाही आरोप करण्यात आला आहे.