काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडला. आता राम मंदिराच्या उभारणीसाठीचं कामही सुरू झालं आहे. राम मदिरच्या भूमीपासून काही अंतरावर असलेल्या शरयूच्या तटावर रामलीलाचं आयोजन करण्यात येणार आहे. सोशल मीडिया, सॅटलाईट टेलिव्हिजन आणि युट्यूबच्या प्रेक्षकांसाठी रामलीलाचं आयोजन करणअयात आलं आहे. यामध्ये अनेक अभिनेते आणि प्रामुख्यानं खासदार यात आपला अभिनय साकारणार आहेत. यासाठी ४ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे.

“करोना महामारीमुळे घालण्यात आलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी कोणत्याही प्रेक्षकांना येण्याची परवानगी दिली जाणार नाही. सर्व भाग त्या ठिकाणी, लक्ष्मण किल्ल्यावर चित्रित करण्यात येणार आहेत. तसंच एखाद्या चित्रपटाप्रमाणे ते प्रसारितही केले जातील. लोकांना त्यांच्या घरांमध्ये बसून आनंद घेता येईल,” अशी माहिती रामलीलाचे आयोजक आणि मेरी माँ फाऊंडेशनचे संस्थापक सुभाष मलिक यांनी दिली. रामलीलामध्ये उत्तर पूर्व दिल्लीचे खासदार मनोज तिवारी हे अंगद ही भूमिका साकारणार आहेत. तर खासदार आणि भोजपुरी अभिनेते रवी किशन हे भरत ही भूमिका साकारतील. विरू दारा सिंह हे हनुमानाच्या. अभिनेते रझा मुराद अहिरवन आणि असरानी हे नारद मुनीच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

या रामलीलाचं मुख्य आकर्षण शाहबाज खान आहेत, त्यांच्या आवाजामुळे रावणाची भूमिका पुन्ही जीवित होणार आहे. तसंच रामलीलामध्ये रितू शिवपुरी कैकई आणि राकेश बेदी हे विभिषणाच्या भूमिकेत पाहायला मिळणार असल्याचं मलिक म्हणाले. राम आणि सीता या भूमिकांसाठी सोनू डागर आणि कविता जोशी यांची निवड करण्यात आली आहे. “सीता मातेची भूमिका साकारणं ही माझ्यासाठी मोठी बाब आहे. माझ्या जीवनातील आनंददायी क्षणांपैकी हा एक क्षण आहे. विषेशत: ज्या ठिकाणी राम मंदिराची उभारणी केली जाणार आहे त्याच मातीत रामलीलामध्ये भूमिका साकारालया मिळणं ही मोठी बाब आहे,” असं कविता जोशी यांनी सांगितलं.

तर दुसरीकडे सोनू डागर यांनीदेखील आपल्या भूमिकेची तयारी सुरू केली आहे. प्रभू श्रीराम यांचं जीवन समजून घेण्याचा आपण प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. मेरी माँ फाऊंडेशनची स्थापना २०१६ मध्ये करण्यात आली होती. हे फाऊंडेशन दिल्लीतील अनेक प्रमुख रामलीलांसोबत जोडलेले आहेत. रामलीलासाठी अभिनेत्यांची निवड दिल्लीतील रामलीला मंचावर अभिनत्यांसोबतच्या अनुभवर आधारित आहे. मी त्यांना पाहिलंय आणि सर्वच उत्तम कलाकार असल्याचे मलिक म्हणाले. रामलीलासाठी एक सेट उभारण्यात येईल. तसंच याचं प्रसारण व्हर्च्युअल पद्धतीनं केलं जाणार आहे. यात सोशल मीडियाची मदतही घेतली जाणार आहे. करोना काळात उत्तर प्रदेश सराकरानं आखून दिलेल्या गाईडलाइन्सचं पालन केलं जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

“अयोध्येतील रामलीलासाठी ४ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यामधील पैशाचा सर्वाधिक वापर हा सेट उभारणीसाठी केला गेला आहे. आमचं विशेष लक्ष हे आवाज आणि अत्याधुनिक प्रकाश व्यवस्थेवर आहे. मुख्यत्वे रामलीला पाहणाऱ्या पेक्षकांना संवाद ऐकण्यास अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु यावेळी तसं होणार नाही. प्रेक्षकांना अगदी उत्तमपणे संवाद ऐकता येतील,” असं मलिक म्हणाले.