बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सध्या सीबीआय आणि एनसीबीमार्फत तपास सुरु आहे. यातच अभिनेत्री कंगना रणौतने बॉलिवूडमधील ड्रग्स पार्टींचा मुद्दा उचलून धरला आहे. तिच्या या मुद्द्यावर अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिली असून आता अभिनेता अध्ययन सुमननेदेखील हायप्रोफाइल पार्ट्यांमधील ड्रग्सविषयी भाष्य केलं आहे. ‘कलाविश्वातील काही हायप्रोफाइल पार्ट्यांमध्ये अनेक मोठे कलाकार ड्रग्सचं सेवन करतात’, असं अध्ययनने एका मुलाखतीत म्हटलं आहे.

” कलाविश्वात ड्रग्सचं सेवन होतं हे निश्चितच खरं आहे. कलाविश्वातील अनेक हाय प्रोफाइल पार्ट्यांमध्ये मी दिग्गज कलाकारांना सर्रास ड्रग्सचं सेवन करताना पाहिलं आहे. माझ्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात मी या पार्ट्यांचा एक भाग होतो. त्यावेळी मीअशा अनेक पार्ट्यांमध्ये गेलो आहे. मात्र, काही वर्षांपासून मी या पार्ट्यांमध्ये जाण्याचं टाळतो. अशा पार्ट्यांमध्ये जायचं नाही हा माझा स्वत:चा निर्णय आहे. त्यामुळे त्या लोकांशी मैत्री करायची की नाही हादेखील माझा निर्णय आहे”, असं अध्ययन म्हणाला.

पुढे तो म्हणतो,”ड्रग्सचं सेवन फक्त बॉलिवूडमध्येच होतं? दिल्लीत होत नाही? लग्नकार्यात होत नाही? मोठ्या व्यावसायिकांच्या घरी होत नाही? कॉलेजमध्ये होत नाही? ड्रग्सचं सेवन केवळ बॉलिवूडमध्येच होतं असं म्हणणं चुकीचं आहे. या अशा पद्धतीने बॉलिवूडला बेइज्जत करणं चुकीचं आहे”.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी अध्ययन सुमनने यापूर्वीदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून भाष्य केलं आहे. अलिकडेच त्याने सुशांतचा मृत्यू झाल्यानंतर अस्वस्थ वाटतंय असं म्हटलं होतं. काही दिवसांपूर्वी अध्ययन सुमनची ‘आश्रम’ ही नवी वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. त्यामुळे अध्ययन सध्या चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.